१२ नोव्हेंबरः आजचा इतिहास

१२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

खरा मुळशी पॅटर्न सेनापती बापट (जन्म १८८०)

लवकरच मुळशी पॅटर्न नावाचा मराठी सिनेमा येतोय. त्यात शेतजमिनी विकून पैसे कमवणाऱ्या तरुण पिढीचा पॅटर्न दाखवलाय म्हणे. पण खरा मुळशी पॅटर्न उभा केलाय तो सेनापती बापट यांनी. मुळशी तालुक्यात मुळा नदीवर टाटा पॉवर्सने बांधलेल्या धरणातल्या विस्थापित शेतकऱ्यांचा लढा त्यांनी १९२०च्या दशकात उभारला. म्हणून त्यांना सेनापती ही पदवी मिळाली. त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. गाव अहमदनगर जिल्ह्यातलं पारनेर. ते इंग्लंडमधे शिक्षणासाठी गेले. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने पॅरिसमधे प्रचंड स्फोटक बाँब बनवण्याचं तंत्र शिकून घेतलं. त्याची पुस्तकं बंगालमधल्या क्रांतिकारकांपर्यंत पोचवलं. पुढे त्यांनी क्रांतिकार्याचा मार्ग सोडला. तरी स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहिलेच. समाजसेवेचं व्रत घेतलं. ते जिथे राहत तिथले रस्ते रोज झाडत. स्वातंत्र्यानंतरही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन याचं नेतृत्व केलं. तुरुंगवास झाला तेव्हा तो सत्कारणी लावत खूप लिखाण केलं. राष्ट्रप्रेमाने ओथंबलेल्या अनेक कविताही लिहिल्या. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, ही त्यांची कविता प्रसिद्धच आहे. त्यांचं निधन २८ नोव्हेंबर १९६७ ला झालं.

 

पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली (१८९६)

भारतात पक्षी निरीक्षणाची परंपरा निर्माण केली ती डॉ. सलीम अली यांनी. पक्ष्यांची शिकार करता करता त्यांना लहानपणीच पक्षी निरीक्षणाचा नाद लागला. उद्योगधंद्यानिमित्त ब्रम्हदेशात गेले असताना तिथली जंगलं फिरुन पक्ष्यांची माहिती टिपून ठेवायच्या छंदाने वेडाचं रूप घेतलं. पुढे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली. भारतात सोय नव्हती म्हणून त्यांनी जर्मनीला जाऊन पक्षीशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं. काही काळ इंग्लंडमध्ये काम केलं. सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर त्यांनी केलेला अभ्यास बीनएचएसच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. या निबंधाने त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळाला. 'हँडबुक ऑफ इंडिया अँन्ड पाकिस्तान' हे दहा खंडाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसह त्यांनी या खंडांत नोंदवली. त्यांच्या या कामाला अभिवादन करण्यासाठी त्यांचा जन्मदिन 'पक्षीदिन' म्हणून साजरा होतो.

 

रिडर्स डायजेस्टचे जनक डेविट वॉलेस (जन्म १८८९)

डेविट वॉलेस यांनी त्यांच्या पत्नी लिला बेल वॉलेस यांच्यासोबत रिडर्स डायजेस्ट या मासिकाची १९२२ साली सुरवात केली. आजही हे जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या मासिकांपैकी एक आहे. त्याच्या २१ भाषांत ४९ आवृत्त्या आहेत. त्याच्या २५ लाखांहून जास्त प्रती दर महिन्याला निघतात. त्याची भारतीय आवृत्ती १९५४ ला सुरू झाली. वॉलेस यांना रिडर्स डायजेस्ट सुरू करण्याची कल्पना कशी सुचली हे जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे. ते एका प्रकाशन संस्थेत नोकरी करत. तिथे त्यांना वाचनाचा नाद लागला. जगभरातल्या विविध क्षेत्रातली माहिती मिळवण्यासाठी खूप वाचावं लागतं, असं त्यांना जाणवलं. ते सारांश रूपाने एकाच मासिकात छापलं तर वाचकांची मोठीच सोय होईल, असं त्याला वाटलं. त्यातून ५ फेब्रुवारी १९२२ ला रिडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

 

गब्बर सिंग अमजद खान (जन्म १९४०)

अमजद खान जन्माच्या आधीपासूनच सिनेमाशी संबंधित होते. त्यांचे वडील जयंत यांनी हिंदी सिनेमाचा एक काळ गाजवला होता. आयुष्यभर अमजद खान सिनेमे करत राहिले. त्यात अनेक सुपरहिट होते. पण त्यांची ओळख गब्बर सिंग अशीच होती आणि आहे. शोले मधे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार होते, पण त्यात अमजद खान यांनीच भाव खाल्ला. आजही गब्बर इज बॅक नावाचा सिनेमा येतो, इतकी ही भूमिका बॉलीवूडमधे माइलस्टोन बनली. हिरोचे डायलॉग नेहमीच लक्षात ठेवले जातात. पण या विलनच्या डायलॉगच्या आज म्हणी बनल्यात. अमजद खान यांनी अमिताभबरोबर अनेक सुपरहिट सिनेमे दिले. शतरंज के खिलाडीसाठी सत्यजित राय ते आगे की सोचमधे दादा कोंडके अशी त्यांची रेंज होती. विलनच्या कित्येक भूमिकांबरोबरच शतरंज के खिलाडीमधला नवाब वाजिद अली शाह, यारानातला बिशन, उत्सवमधला वात्सायन, चमेली की शादीमधला अॅडवोकेट हरीश अशा भूमिका वेगळ्या आणि अविस्मरणीय ठरल्या. त्यांचं २७ जुलै १९९२ ला निधन झालं.

 

बाजीगरची पंचविशी (रिलीज १९९३)

तो विलन असणारा हिरो आहे की हिरो असणारा विलन आहे, असं बुचकळ्यात पडूनही एक अख्खी पिढी बाजीगरच्या प्रेमात पडली. नाईंटिजच्या पिढीची आवड घडवणारा हा एक महत्त्वाचा बॉलीवूडपट ठरला. नीती अनीतीच्या चर्चेला कंटाळलेल्या जागतिकीकरणानंतरच्या पिढीने बाजीगरला उचलून धरलं. ए किस बिफोर डायिंग या हॉलिवूड सिनेमावरून बाजीगर उचलला होता, याच्याशी तेव्हाही कुणाला घेणंदेणं नव्हतं, आजही नाही. अब्बास मस्तानचा खिलाडी तसा आधी गाजला होता, पण या डायरेक्टर भावांना ओळख मिळाली ती बाजीगरमुळेच. शाहरूख त्या आधी चॉकलेट हिरो होता. बाजीगरसारखी रिस्क घेतली म्हणून तो खरोखर बाजीगर बनला. ती रिस्क न घेणारा अरमान कोहली कधीचाच संपला. या सिनेमापासून काजोलची शाहरूखबरोबर जोडी जमली. ती परवाच्या दिलवालेपर्यंत अनेक सिनेमांत टिकली. शिल्पा शेट्टीचा तर तो पहिलाच सिनेमा होता. नकट्या नाकाची शिल्पा निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचीही आवडती हिरोईन बनली. इतका तिचा करिश्मा होता. याच्या यशात अन्नू मलिकच्या संगीताचाही हात होताच. आजही ही गाणी नेहमी रेडियोवर वाजत असतात.