१२ डिसेंबरः आजचा इतिहास 

१२ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १२ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

जाणता नेता शरद पवार (जन्म १९४०) 

पाच राज्यांतला विधानसभा निवडणुकांच्या निकालांमधे भाजपला धक्का बसल्यानंतर देशाच्या राजकारणातल्या सारीपाटावरच्या सोंगट्या कशा खेळायला हव्यात, याची गणितं शरद पवारांच्या डोक्यात सुरू झाली असतील. आज देशभरात एकाच वेळेस विरोधी आणि सत्ताधारी अशा दोन्हीकडे सर्वाधिक आदर असलेल्या अगदी मोजक्या व्यक्तिमत्त्वांमधले ते एक आहेत. पंतप्रधान बनण्याचं त्यांचं स्वप्नं पूर्ण होण्याची शक्यता आता उरलेली नाही. त्यांचा पक्ष हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याही जागा लोकसभेत जिंकू शकणार नाही, हेदेखील सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम आहे. नरेंद्र मोदी त्यांना गुरू म्हणतात. राहुल गांधी त्यांचा सल्ला घेतात. इतकी पुण्याई त्यांनी निश्चितपणे कमावलीय. आज ७८वा वाढदिवस साजरा करत असतानाही दिवसभर कामात गढलेला हा नेता देशाचं आणि देशाच्या राजकारणाच्या भवितव्याचा वेध इतर कुणाही पेक्षाही अधिक अचूकपणे घेत असतो. 

लोकनेते गोपीनाथ मुंडे (जन्म १९४९) 

अभाविपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा राजकारणातल्या मोठमोठ्या पदांपर्यंत झेप घेणारे गोपीनाथ मुंडे यांचं जीवन हे यशस्वी संघर्षगाथाच होते. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं केलं. तसंच भाजपलाही महाराष्ट्रात स्पर्धेत आणलं. शेटजी भटजींचा हा पक्ष बहुजनांपर्यंत पोचवला. ओबीसी राजकारणाची मोट बांधली. त्यातून नव्या नेतृत्वाची फळीच उभी केली. त्यामुळे ते अनेकांचे भाग्यविधाते ठरले आणि त्यांच्या वंजारी समाजासाठी तर देवच बनले. आज त्यांच्या नावाने असलेला गोपीनाथगड हे अनेकांचं प्रेरणास्थान बनलंय. चार वर्षांपूर्वी विचित्र अपघातात  त्यांचा प्राण गेला नसता, तर ते कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले असते. पण आजचा भाजप त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालतोय का, याचा विचार आज भाजपला करावा लागणार आहे. 

शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी (निधन २०१४)

खरं तर युनोमधली गडगंज पगाराची नोकरी आणि परदेशातलं प्रतिष्ठीत आयुष्य सोडून शेती करायला महाराष्ट्रात येण्याचं शरद जोशींना काही कारण नव्हतं. पण भारताच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करताना शेतकऱ्यांच्या गुलामीची जाणीव त्यांना झाली. या निष्कर्षांना प्रॅक्टिकल ताळा करण्यासाठी त्यांनी अंगारमळ्यावर शेती केली. संपूर्ण व्यवस्था शेतकऱ्यांना आश्रित ठेवण्यासाठी राबते, यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना जागं करण्याची हाक दिली. शेतमालाला भाव मिळण्यासाठी खुल्या बाजाराची पाठराखण केली. शेतकऱ्यांना शेतीचं अर्थशास्त्र शिकवलं. लढायला शिकवलं. शेतकऱ्यांसाठी आपलं सर्वस्व ओवाळून टाकलं. त्यातून शेतीच्या विषयावरचं नवी जाणीव निर्माण झाली. पण त्यांना राजकारण मात्र जमलं नाही. शेवटी भाजपच्या वळचणीला जावून राज्यसभेचा खासदार व्हावं लागलं. आता त्यांच्या निधनानंतर प्रामुख्याने संघवालेच त्यांच्या आरत्या ओवाळत आहेत. आणि त्यांनी ज्यांना विरोध केला ते कम्युनिस्ट शेतकऱ्यांची यशस्वी आंदोलनं उभारत आहेत. 

सही रे सही भरत जाधव (जन्म १९७३) 

मराठीचा सुपरस्टार भरत जाधवचा आज बड्डे. मागील दोन दशकांपेक्षा जास्त काळ तो मराठी नाटकं आणि सिनेमे आपल्या नावावर चालवतोय. दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबईच्या गिरणगावांत घडले, तिथेच हा तिसरा सुपरस्टारही घडला. तिथेच शाहीर साबळेंच्या महाराष्ट्राची लोकधारामधे तो पहिल्यांदा रंगमंचावर आला. ऑल द बेस्टमधून त्याची सुरवात झाली. पाठोपाठ अधांतरसारख्या गंभीर नाटकात त्याने आपल्या अभिनयाची ताकद दाखवली. त्यानंतर शंभरेक सिनेमे आणि नाटकांतून त्याने यश मिळवलं. टीवीवरही तो अधनामधना येत राहिला. या सगळ्यात सही रे सही हा माईलस्टोन होता. त्यातल्या चार भूमिका त्याने प्रचंड एनर्जीने आणि ताकदीने गाजवल्या. तरीही त्याच्या क्षमतेची कामं त्याला फारच कमी मिळाली, असं म्हणावं लागेल. 

सिक्सर किंग युवराज सिंग (जन्म १९८१)

युवराजने त्याच्या नावाप्रमाणेच युवा पिढीवर राज्य केलं. चंदीगढला जन्मलेला युवराज २०००ला इंटरनॅशनल क्रिकेटमधे आला. त्याआधीच त्याने अंडर नाईंटीन वर्ल्डकप आणि रणजीमधे लक्ष वेधून घेतलं होतं. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या क्रिकेटच्या तिन्ही कौशल्यात त्याने तिन्ही फॉरमॅटमधे ठसा उमटवला. गेमचेंजर बॅट्समन, अडचणीत देवासारखा धावून येणारा बॉलर आणि गली पॉइंटवर नाव कोरणारा फिल्डर ही त्याची रूपं क्रिकेटरसिकांनी मनात जपून ठेवलीत. २०११ चा वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर त्याच्या डाव्या फुफ्फुसाला कॅन्सरसारखा दुर्धर रोग झाल्याचं निदान झालं. त्यातून न खचता, न डगमगता वेदनादायी उपचारांना सामोरं जात पूर्णपणे बरा होऊन तो मैदानावर परतला. पूर्वीपेक्षाही जास्त आक्रमकपणे त्याने मैदान गाजवलं. क्रिकेटच्या मैदानावरचे अनेक विक्रम युवराजच्या नावावर आहेत. पण २००७च्या टी२० वर्ल्डकपमधे इंग्लंडविरुद्ध त्याने लगावलेले ६ बॉलमधले ६ सिक्स कायमच क्रिकेटच्या दुनियेत राज्य करत राहतील.