सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

०९ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


‘स्त्री ही जन्मत नाही. ती बनते’ असं फ्रेंच लेखिका सिमोन द बोव्हुआर हिने मांडलं आणि जगाचा स्त्रीप्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. स्त्रीप्रश्नाचा इतक्या वेगवेगळ्या अंगानी अभ्यास करणारी ती एकमेव लेखिका आहे. पुरूषांसारखंच वातावरण मिळालं तर स्त्रीसुद्धा प्रगती करू शकते हे तिच्यामुळे जगाला कळलं. त्यासाठी आपण जन्मभर तिच्या ऋणात रहायला हवं.

‘वन इज नॉट बॉर्न अ वूमन. वन बिकम्स वन.’ याचा अर्थ बाई जन्मत नाही तर ती घडवली जाते असा घेता येईल. हे वाक्य ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकाच्या पहिल्या पानावर झळकतं आणि आपले डोळे विस्फारतात. बाई जन्मत नाही या वाक्याचा अर्थ आपली सगळी ज्ञानेंद्रियं शोधू लागतात आणि असं लिहिणारा लेखक आहे तरी कोण याकडे आपलं लक्ष वेधलं जातं. पण हा लेखक नसतो. ती लेखिका असते. सिमोन द बोव्हुआर असं लेखिकेचं नाव ठळकपणे दिसू लागतं. बाकीचं सगळं अंधूक होतं.

२० व्या शतकातली आघाडीची स्त्रीवादी लेखिका म्हणून सिमोन द बोव्हुआर यांचं नाव घेतलं जातं. ९ जानेवारी १९०८ ला फ्रान्समधल्या एका उच्च मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी बोव्हुआर दांपत्याला आणखी एक मुलगीच झाली. तिचं नाव हेलन. सिमोनच्या जन्मानंतर लगेचच म्हणजे १९१४ मधे पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. यात फ्रान्सनं सपाटून मार खाल्ला. उच्च मध्यमवर्गीय बोव्हुआर कुटुंबालाही याची झळ बसली.

कधीकाळी भरपूर संपत्ती मिरवणाऱ्या बोव्हुआर कुटुंबाला पहिल्या महायुद्धानंतर मात्र खाणारी तोंडं आणि कमावणारे हात यांचं गणित जमवणं अवघड होऊन बसलं. त्यात पदरात दोन मुली. त्यांच्या लग्नाचा खर्च झेपायचा कसा? शिवाय त्याकाळी लग्नात हुंडा देण्याची पद्धत फारच रुढ होती. आपल्याला हा खर्च जमणार नाही हे सिमोनच्या वडलांनी ओळखलं. यामुळेच त्या काळच्या इतर मध्यमवर्गीय मुलींसारखा लहान वयात लग्न होऊन घरी बसण्याचा मार्ग सिमोनसाठी आपोआपच बंद झाला.

‘सिमोन एकदम पुरुषासारखी विचार करते’ असं तिचे बाबा म्हणायचे. ‘द मेमरीज ऑफ ड्युटीफुल डॉटर’ या आपल्या आत्मचरित्रात सिमोन तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते. तिच्या श्रद्धाळू आईच्या इच्छेवरून कॅथलिक कॉनवेंट शाळेत सिमोनचं नाव घातलं. धार्मिक शाळेत शिकून सिमोनही फार धार्मिक झाली. आपणही नन म्हणजे संन्यासी व्हावं असं तिच्या मनात होतं. मोठेपणी झालं मात्र उलटंच! सिमोन नास्तिक झाली. तिने देव नाकारला आणि आयुष्यभर अस्तित्ववादाची विचारसरणी स्वतःमधे उतरवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

बाई सामाजिक संस्कारातून घडते

फ्रान्समधे फर्स्ट म्हणजेच पहिलं सेक्स किंवा लिंग म्हणून पुरुषांना मान दिला होता. आणि सेकंड किंवा दुय्यम सेक्स म्हणजे बाई असं ते समीकरण होतं. ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकात सिमोनने स्त्रीवादाचं अस्तित्ववादाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केलंय. अस्तित्ववाद म्हणजे माणूस आधी अस्तित्वात येतो आणि मग त्याचं स्वरूप ठरवलं जातं असं मानणारी विचारसरणी. हीच विचारसरणी तिने महिलांच्या जडणघडणीबद्दल मांडली.

बाईसुद्धा जन्माला येताना बाई असत नाही. ती जन्मते एक कोरी पाटी म्हणून. ती जन्मते तेव्हा फक्त मादी असते. पण तिच्या जन्मापासून मरणापर्यंत हा समाज तिच्यावर जो संस्कार करतो त्यामधून ती बाई म्हणून घडत जाते,  असं सिमोन सांगते. थोडक्यात सिमोन सेक्स आणि जेंडर या दोन संकल्पनेत फरक करते. सेक्स म्हणजे लिंग. जे माणसाला त्याच्या लैंगिक अवयवांमुळे जन्मतःच मिळालेलं असतं. पण जेंडर म्हणजे लिंगभाव. आसपासचा समाज जे संस्कार करतो त्यावरून माणसाचं जेंडर ठरत जातं.

बाई मादीचे लैंगिक अवयव घेऊन जन्मते. पण लहान असल्यापासून बाईला तिनं कसं असलं पाहिजे याचे संस्कारी धडे दिले जातात. बाई हळवी असते, मायाळू असते. मुली फक्त बाहुलीशीच खेळतात. महिलांना घरातली कामं पुरुषांपेक्षा जास्त चांगली जमतात किंवा मुलींमधे उपजतच दयाळूपणा असतो, असे धडे मुलींना लहानपणापासून दिले जातात आणि यातून बाई घडत जाते अशी मांडणी सिमोन करते.

मूळ तत्त्वज्ञान नेमकं कुणाचं?

सिमोनच्या स्त्रीवादामागे जो अस्तित्ववाद दडलाय त्याचं श्रेय जाँ पॉल सार्त्र या तत्त्वचिंतकाला जातं. सार्त्र हा सिमोनच्याच काळातला, फ्रान्समधला अस्तित्ववादी लेखक आणि विचारवंत होता. अस्तित्ववादाची अतिशय पद्धतशीर मांडणी करणारा तत्त्वचिंतक म्हणून तो ओळखला जातो. सिमोन आणि सार्त्र यांच्यात अत्यंत जवळकीचं नातं होतं. त्या दोघांनी कधीही लग्न केलं नाही. पण आयुष्यभर ते एकमेकांचे सोबती, पार्टनर म्हणून राहिले.

सार्त्रच्या अस्तित्वावादावरून सिमोनने तिच्या स्त्रीवादाची मांडणी केली, असं म्हटलं जातं. तर अनेक अभ्यासकांचं मत याउलट आहे. मूळात सिमोनने स्त्रीवादात मांडलेली सूत्रंच सार्त्रने उचलली असं त्याचं मत पडतं. हे दोघे तासंतास, दिवसेंदिवस कॉफी शॉपमधे बसून तत्त्वज्ञानावर, राजकीय, सामाजिक पुस्तकांवर चर्चा करायचे. एकमेकांची पुस्तकं प्रकाशित होण्यापूर्वी एकमेकांना वाचायला द्यायचे. त्यामुळेच अस्तित्ववादाचं नेमकं तत्त्वज्ञान कुणाचं याविषयी अंदाज लावण्यापलिकडे आपण काहीही करू शकत नाही.

पण सिमोन आणि सार्त्र आयुष्याचे जोडीदार होते तसंच ते तत्त्वज्ञानाचेही जोडीदार झाले. अस्तित्ववादाची मांडणी करताना जिथे सार्त्र कमी पडला तिथे त्याला सावरून घ्यायला सिमोन पुढे आली आणि अस्तित्ववादाला भक्कम आधार देऊन त्याचा डोलारा सांभाळण्याचं महत्वाचं काम तिने केलं. हे काम सिमोनने केलं नसतं तर विचारवंतांना सार्त्रच्या अस्तित्ववादावर अवास्तवादाचा शिक्का मारून मोकळं होता आलं असतं.

हेही वाचा : हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

माणूस दांभिकतेत जगतो

‘माणूस आधी जन्मतो, स्वतःला चाचपतो, हळूहळू जग बघतो आणि मग स्वतःचं स्वरूप ठरवतो’ असं सार्त्रनं त्याच्या ‘अस्तित्ववाद म्हणजेच मानवतावाद’ या निबंधात म्हटलंय. जन्माला यायचं आहे की नाही हे माणसाला कुणी विचारत नाही. त्याला या जगात अक्षरशः ढकललं जातं आणि एकदा माणूस या जगात आला की त्याला आपलं आयुष्य कसं असेल हे स्वतःला ठरवावं लागतं. हे ठरवण्याची ताकद माणसाकडे असते कारण माणसाकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं. माणूस नको म्हटला तरी हे स्वातंत्र्य त्याच्याकडे असतं आणि असतंच! उपजत, जन्मतःच हे स्वातंत्र्य माणसाला मिळालेलं असतं, असं सार्त्रचा मानवतावादी अस्तित्वाद सांगतो.

‘माणसाला स्वतंत्र असण्याची शिक्षाच मिळालेली असते’ असं सार्त्र म्हणतो. जन्माला आल्यावर माणूस निवड करून स्वतःचं आयुष्य कसं असेल हे ठरवतो. आपली प्रत्येक कृती कशी असेल हे माणूस ठरवू शकतो. हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याच्याकडे असतं म्हणूनच त्या कृतींच्या परिणामांची जबाबदारी त्या माणसाची असते. परिणाम चांगले झाले तरीही त्याची जबाबदारी आपलीच आणि वाईट झाले तरीही त्याची जबाबदारी आपलीच!

अनेकदा आपण करत असलेल्या बऱ्यावाईट कृतीचे परिणाम आपल्याला माहीत नसतात. कधी कधी ते अनाकलनीय असतात. तरीही त्या परिणामांसाठी आपणच जबाबदार असतो असं सार्त्र म्हणतो. पण जबाबदारी घ्यायला माणसाला भीती वाटते आणि त्यामुळे तो ही जबाबदारी नाकारतो. आपल्याला निर्णय स्वातंत्र्यच नाही असं माणूस म्हणू लागतो. पण प्रत्यक्षात असं कधीच नसतं. हरएक क्षणी निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य माणसाला असतंच.

जेव्हा मी कोणताही निर्णय घेणार नाही असं माणूस ठरवतो तेव्हाही खरंतर तो निर्णय न घेण्याचा निर्णयच घेत असतो आणि त्याचीही जबाबदारी त्या माणसाचीच असते. या जबाबदारीची माणसाला भीती वाटते. आणि म्हणून माणूस मला निर्णय स्वातंत्र्यच नाही असं म्हणू लागतो. तेव्हा माणूस दांभिकतेत म्हणजेच सार्त्रच्या भाषेत ‘बॅड फेथ’ मधे असतो.

मग महिला, गुलामही दांभिक होतील!

‘माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. हे मला करावंच लागलं’ असं एखादा माणूस म्हणतो तेव्हाही सार्त्रसाठी तो माणूस बॅड फेथमधे असतो. आपल्या आयुष्याचे निर्णय माणूस दुसऱ्याला घेऊ देत असेल तेव्हाही तो बॅड फेथमधे जगत असतो. कारण आपले निर्णय दुसऱ्याला घेऊ देणं हासुद्धा आपण घेतलेला एक निर्णयच असतो. त्याची जबाबदारी आपली असते. पण माझे निर्णय दुसरा घेतोय तर त्या निर्णयाची जबाबदारीही त्या दुसऱ्याचीच असं माणूस म्हणू लागतो आणि त्यामुळे तो दांभिकतेनं जगत असतो.

सार्त्रसाठी बॅड फेथमधे जगणं म्हणजे अस्सल जगणं नाही. त्यामुळे माणसांनी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेतले पाहिजेत. स्वतःचं अस्तित्व स्वतः ठरवलं पाहिजे, असं सार्त्रला वाटतं. सार्त्रचा हा नियम विषमतेने भरलेल्या समाजावर लावला की फार घोळ होतो. विषमतेनं भरलेल्या समाजात अनेक उतरंडी असतात. कुणीतरी कुणाच्यातरी हाताखाली काम करत असतं. गुलामगिरीत गुलामांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं. तसंच पितृसत्तेत महिलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं.

पण सार्त्रच्या म्हणण्यानुसार, गुलाम दांभिक जगत असतात. महिलासुद्धा दांभिकतेत जगत असतात. इतकंच काय, सार्त्रचा नियम भारतीय समाजव्यवस्थेला लावायचा ठरला तर भारतातल्या जातीव्यवस्थेला तथाकथित खालच्या जातीतले लोकच कारणीभूत आहेत, असं म्हणावं लागेल. महिला, गुलाम, दलित दुसऱ्याचं वर्चस्व मान्य करतात, आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्याला घेऊ देतात, असा सार्त्रच्या या तत्त्वज्ञानाचा अर्थ होतो.

सार्त्रने पहिलं आणि दुसरं महायुद्ध फार जवळून बघितलंय. कोणत्याही प्रकारच्या विषमतेबद्दल त्याच्या मनात चीड होती. त्यामुळे महिलांबद्दल, गुलामांबद्दल तो असा विचार नक्कीच करत नसणार. पण त्याच्या तत्त्वज्ञानात राहिलेली कमतरता एखाद्या अभ्यासकाला या टोकाच्या विचारापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि त्यामुळे अस्तित्ववादासारखी परिणामकारक विचारसरणी एका झटक्यात मोडीत काढता येऊ शकते.

हेही वाचा : खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

सिमोनची मांडणी मती गुंग करणारी

म्हणूनच सिमोन इथं महत्त्वाची ठरते. बाई असल्यामुळे सिमोनला समाजातून सार्त्रपेक्षा वेगळे अनुभव आले असावेत आणि म्हणूनच ती महिला, गुलाम यांच्याबाबतीत सहानुभूतीने विचार करू शकते. महिलांना नेमक्या कोणत्या प्रसंगातून जावं लागतं याची आंतरिक जाणीव सिमोनला आहे. सार्त्रच्या बॅड फेथ संकल्पनेतून येणारी कमतरता ती भरून काढते आणि अस्तित्वावादाला कोसळण्यापासून वाचवते.

महिला आणि गुलाम यांना कधीही त्यांच्या स्वतंत्र असण्याची जाणीवच करून दिली जात नाही. बाई ही पुरुषासाठी ‘पर’ म्हणजे वस्तूसारखी असते. त्या दर्जाने खाली असतात. त्यांचं आयुष्य आपण ठरवायचं असतं, असं पुरुषसत्ता पुरुषांना सांगते. बाईसुद्धा पुरुषसत्तेतच वाढत असते. त्यामुळेच लहानपणापासून आपलं आयुष्य लग्नाआधी वडलांनी आणि लग्नानंतर नवऱ्याने नियंत्रित करायचंय हेच बाईला सांगण्यात आलेलं असतं.

गुलामांच्या बाबतीतही हेच होतं. आपण जन्मतःच असे आहोत असं गुलामांना वाटत असतं. तसं त्यांना वेळोवेळी सांगितलं जातं. भारतीय समाजरचनेत याचा विचार करू. गेल्या जन्मी आपण वाईट काम केलं म्हणून या जन्मी आपण दलित म्हणून जन्मलो. सवर्णांच्या पायाखाली राहणं हे तर आपलं इतिकर्तव्य आहे, अशी मांडणी आपल्याकडंच्या जातीयवादाचं समर्थन करणाऱ्या तत्वज्ञानात सापडते.

आपल्या ‘एथिक्स ऑफ एब्युग्युइटी’ या पुस्तकात सिमोन मिस्टिफिकेशनची संकल्पना मांडते. मिस्टिफिकेशन म्हणजेच मती गुंग होणं. सिमोन म्हणते बाई आणि गुलाम हे मिस्टिफाईड झालेत. त्यांची मती गुंग झालीय. त्यामुळेच आपण स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो, आपलं आयुष्य कसं असणार हे ठरवू शकतो याची जाणीवच त्यांना नाही. त्यांना ही जाणीव होईल तेव्हाच ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतील आणि त्या नंतरच त्यांना स्वतःच्या आयुष्यासाठी जबाबदार धरता येऊ शकेल हे सिमोनने ठासून सांगितलं.

सिमोनने खूप मोठं काम केलं. तिची ही मांडणीच आता अभ्यासकांची मती गुंग करते. पण तत्त्वज्ञानात सिमोनपेक्षा सार्त्रलाच जास्त मान्यता मिळालेली दिसते. सिमोनचा 'द सेकंड सेक्स' हा ग्रंथ स्त्रीवादाचं बायबल मानला जातो. महिलांच्या जगाचा एवढ्या वेगवेगळ्या अंगाने सिमोननंतर आजवर कुणीही अभ्यास केलेला नाही. म्हणूनच तिच्या अंत्ययात्रेला जमलेल्या माणसांच्या तोंडात एकच वाक्य होतं. ‘समस्त महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!’

हेही वाचा : 

...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

फुले दांपत्याचं काम फक्त बाई शिक्षणापुरतंच आहे?

रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते