११ नोव्हेंबरः आजचा इतिहास

११ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ११ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

एकतेचा दीपस्तंभ मौलाना अबुल कलाम आझाद (जन्म १८८८)

स्वातंत्र्यानंतर आपला देश धर्मांधतेच्या गर्तेत न अडकता आधुनिकतेच्या दिशेने सरसावला यामागची एक महत्त्वाची प्रेरणा म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद. त्यांचं मूळ नाव मोहिउद्दीन अहमद. अबुल कलाम म्हणजे विद्वान अशा अर्थाची पदवी आहे. आझाद हे त्यांचं टोपणनाव. त्यांचा जन्म मक्केला झाला. धार्मिक शिक्षण घेतानाच त्यांना आधुनिक विचारांनी झपाटलं. अरब देशांतील प्रवासाने त्यात भर घातली. त्यामुळे ते स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले. अवघ्या पंधराव्या वर्षांपासूनच एक पत्रकार म्हणून त्यांची लेखणी तळपू लागली. चोविसाव्या वर्षी त्यांनी सुरू केलेलं साप्ताहिक अल हिलालने देशभरातल्या मुस्लिमांमधे जागृती केली. त्यातल्या लिखाणासाठी त्यांना तुरुंगवास भोगला. खिलाफत आंदोलनापासून ते गांधीजींशी जोडले गेले ते कायमचेच. १९२३ साली आणि १९३९ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यलढ्यातले ते आघाडीचे नेते होते. उत्तम वक्ते होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. फाळणीचे ते कट्टर विरोधक होते. महंमद अली जिना मुस्लिमांसाठी वेगळा देश मागत असताना आझाद सर्वसमावेशक भारताचे प्रतिनिधी बनले. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ब्रिटिशांशी झालेल्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत भाग घेतला. स्वातंत्र्यानंतर ते मृत्यूपर्यंत शिक्षणमंत्री होते. त्यांनी देशाच्या प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचा पाया रचला. पहिली आयआयटी आणि यूजीसीच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा होता. त्यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे त्यांची विद्वत्ता कायम दुर्लक्षित राहते. प्लेटो, अरिस्टॉटल आणि पायथागोरस यांच्या योग्यतेचा विद्वान म्हणून गांधीजींनी त्यांचं महत्त्व सांगितलं. इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र गाजलं. शिवाय तरजुमानुल कोरान या त्यांनी लिहिलेल्या कुराणच्या सटी उर्दू नुवादामुळे ते अजरामर आहेत. मराठीसाठी ज्ञानेश्वरी महत्त्वाची तितकी उर्दूसाठी कुराणावरची टीका महत्त्वाची मानली जाते. आज त्यांची १३०वी जयंती आहे.

 

समतेचे सारथी राजारामशास्त्री भागवत (जन्म १८५१)

`ब्राह्मणत्वाचा अभिमान आम्हास काही कमी आहे, असं नाही. पण ब्राह्मणापेक्षा सत्याचा आणि महाराष्ट्रपणाचा अभिमान अधिक आहे`, असं खुलेआम सांगणारे राजारामशास्त्री भागवत एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरवातीला महाराष्ट्राच्या विचारविश्वावर बॉम्ब टाकत असत. त्यांचा जन्म कोकणातल्या इतिहासप्रसिद्ध केळशी गावात झाला. मॅट्रिकनंतर ते तीन वर्षं डॉक्टरकी शिकले. ते अर्धवट सोडून ते संस्कृत शिकायला लागले. पुढे ते झेवियर्स कॉलेजमधे संस्कृतचे प्राध्यापक बनले. बॉम्बे हायस्कूल आणि मराठा हायस्कूलच्या स्थापनेत पुढाकार घेतला. मुंबई युनिवर्सिटीत ते विल्सन भाषाभ्यास अध्यासनाचेही प्रमुख बनले. त्यांच्या विद्वत्तेविषयी कुणालाच शंका नव्हती. पण ज्यांना आवाज नव्हता, त्या बहुजन समाजाची ठाम बाजू घेतली. वारकरी परंपरेचं सत्व आधुनिक समाजाला समजावून सांगितलं. श्रुती स्मृतीपेक्षाही महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा महत्त्वाची असल्याचं सांगितलं. पसायदानाकडे महाराष्ट्राचं लक्ष पहिल्यांदा वेधून घेण्याचं श्रेयही त्यांनाच. वेदोक्त पुराणोक्त वादात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची बाजू हिरीरीने मांडली. लोकमान्य टिकळांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवावर टीका केली. अशा भूमिका घेताना ते लोकप्रियतेच्या मागे लागले नाहीत. त्यामुळे त्यांना विक्षिप्त ठरवलं गेलं. पण आजही त्यांचं लिखाण महत्त्वाची ठरत आहेत. दुर्गा भागवतांनी त्यांच्या या आजोबांचं साहित्य सहा खंडांत संपादित केलंय.  

 

विनोदाचा बादशाह जॉनी वॉकर (जन्म १९२०)

जॉनी वॉकर यांचं मूळ नाव बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी. बाजी या सिनेमात त्यांनी बेवडा इतका जिवंत रंगवला की गुरुदत्त यांनी त्यांना जगप्रसिद्ध दारूचा ब्रांड जॉनी वॉकरचं नाव त्यांना दिला. हसवणं हा त्यांचा पेशा किंवा मुखवटा नव्हता. तो त्यांचा स्वभावच होता. पण दारुड्याची भूमिका जगणाऱ्या जॉनी वॉकरनी यांनी दारूला हात कधीच लावला नव्हता. त्यावर अनेकांना विश्वास बसायचा नाही. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. ते बेस्टमधे बस कंडक्टर होते. तिथे ते प्रवाशांना हसवायचे. ते अभिनेते बलराज साहनींनी पाहिलं. त्यांना सिनेमात घेऊन गेले. पदार्पणाच्याच वर्षी त्यांना बाजीने यश दिलं. मधुमती, सीआयडीसारखे सिनेमे त्यांनी गाजवले. त्यांनी साडेतीनशे सिनेमे केले. त्यांची लोकप्रियता इतकी जबरदस्त होती की काही सिनेमांत त्यांना नायकाचीही भूमिका मिळाली. जॉनी वॉकर नावाचा सिनेमाही आला. सत्तरच्या दशकात त्यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर आनंद आणि चाची ४२० हेच दोन सिनेमे त्यांनी केले. सर जो तेरा चकराएं आणि ये हैं बंबई मेरी जा ही दोन गाणी त्यांच्यासाठी लक्षात राहतात. २९ जुलै २००३ ला त्यांचं निधन झालं.

 

नाईंटीजची आयकॉन डेमी मूर (जन्म १९६२)

नाईंटीजमधे हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री डेमी मूर. पण तिच्या अभिनयापेक्षाही बिनधास्तपणामुळे ती तरुणाईचा आयकॉन बनली. मेक्सिकोत जन्म. आई आणि सावत्र वडिलांच्या भांडणांत बालपण कुरतडलं. त्यामुळे सोळाव्या वर्षी शिक्षण सुटलं. छोट्या नोकऱ्या केल्या. अठराव्या वर्षी फ्रेडी मूर या रॉक संगीतकाराशी लग्न केलं. एकोणिसाव्या वर्षी ते टीवी सिरियलमधे काम सुरू केलं. त्याच तीन वर्षं ड्रग्जच्या व्यसनाने वेढलं. त्यानंतर त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर आली. ती ड्रग्जपासून ठामपणे दूर राहिली. त्यामुळे ती आदर्श ठरली. पण वॅनिटी फेअर मॅगझिनमधली तिची नग्न पोझ जास्त चर्चेत राहिली. एकदा तिने संपूर्ण शरीर रंगवलेलं होतं. तिच्या या बर्थडे सूटचा प्रभाव बॉलीवूडपर्यंत पोचला. पूजा भट्टनेही तशाच रंगवलेल्या नग्न शरिराचा कवर फोटो दिला. तसंच सातव्या महिन्याची गरोदर असतानाही डेमीचा संपूर्ण नग्न फोटो वॅनिटी फेअरच्या कवरवर आला. नव्वदच्या दशकात घोस्ट, इनडिसेंट प्रपोजल, डिस्क्लोजर हे सिनेमेही जगभर सुपरहिट ठरले. त्या दशकावर तिने आपला ठसा उमटवला.

 

तेजाबची तिशी (रिलीज १९८८)

तेजाब रिलीज झाला त्याला आज तीस वर्षं होत आहेत. तेजाबच्या एक दो तीन या गाण्याने बॉलीवूडला माधुरी दीक्षित नावाची सुपरस्टार दिली. तेजाबमधल्या मुन्ना देशमुख या रोलने अनिल कपूर हा नवीन अँग्री यंग मॅन घडवला. एन. चंद्रा म्हणजे चंद्रकांत नार्वेकर या मराठी डायरेक्टरला सलग तिसरा हिट दिला. चंकी पांडेला पुढच्या कित्येक सिनेमांत मरावं लागलं. फिल्मफेअरला कोरियोग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शनासाठी पुरस्काराची नवी कॅटगरी बनवायला लावली. जॉनी लिवरला कॉमेडियन म्हणून एस्टॅब्लिश केलं. सुहास जोशी, सुलभा देशपांडे, विजय पाटकर, अच्युत पोतदार, जयवंत वाडकर, रवी पटवर्धन अशा अनेक मराठी कलाकरांना प्रकाशात आणलं.  तेजाबच्या स्टोरीत काहीच नवीन नव्हतं. तरीही तो वेगळा ठरला. त्याने बॉलीवूडवर ठसा उमटवला. म्हणूनच तर आज तीस वर्षांनीही त्याची आठवण काढली जातेय.