१०२ वर्षांचे बोथराकाका सांगतायत, त्यांनी केलेल्या १०० मतदानांची गोष्ट

०२ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. त्यावेळी आपण टीवीवर पुखराज बोथरा आणि त्यांच्या पत्नी मुळीबाई हे वृद्ध जोडपं पाहिलं, जे उत्सुकतेनं मतदानाला आलेले. बोथराकाका हे १०२ वर्षांचे असून त्यांनी तब्बल १०० वेळा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी मतदान केलंय. त्यावेळच्या परिस्थिती आणि आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल बोथरा स्वत: सांगतायत.

देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मधे अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी वयाच्या ३५ व्या वर्षी मतदान केल्यानंतर वयाच्या १०२ व्या वर्षी सतराव्या लोकसभेसाठी मतदान करून यवतमाळ जिल्ह्यातील पुखराज उमीचंद बोथरा यांनी नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केलाय.

लोकसभेसाठी झालेल्या १७ निवडणुकांसह विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचयात, बाजार समिती अशा विविध १०० पेक्षा अधिक निवडणुकांमधे न चुकता मतदान करणाऱ्या पुखराज बोथरा यांच्याविषयी कुतूहल वाटलं नाही तर नवलच. 

स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीत केलं मतदान

ऑक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ या चार महिन्याच्या कालवधीत भारतात पहिल्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. देशातलं पहिलं मत २५ ऑक्टोबर १९५१ रोजी हिमाचल प्रदेशमधील किन्नोर या मतदान केंद्रावर नोंदवलं गेलं. या केंद्रावर पहिलं मत टाकणारे श्यामसरन नेगी यांना निवडणूक आयोगाने शोधून त्यांचा नुकताच सत्कार केला. नेगी हेही सध्या १०२ वर्षांचे आहेत. पुखराज बोथरा हेही १०२ वर्षांचेच असून ते महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध एकमेव मतदार असावेत. 

लोकसभा निवडणुकीत विदर्भात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान झालं. पुखराज बोथरा यांनी राळेगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मुलं, नातू, पणतू यांच्या आधाराने मतदान केंद्रावर आलेले पुखराज यांचा प्रशासनानेही सत्कार केला.

अंगमेहनतीची कामं ते स्वत:चा व्यवसाय

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून न चुकता मतदान करीत असल्याने या ६७ वर्षांत झालेल्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले बोथरा आजच्या पिढीसाठी एक संदर्भकोषच आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्याशी केलल्या चर्चेतून काळाच्या उदरात गुडूप झालेल्या अनेक गोष्टी समोर आल्या.

पुखराज बोथरांचा जन्म २ जानेवारी १९१७ मधे झाला. राजस्थानातल्या बिकानेर नजीकचं मोखा हे त्यांचं मूळगाव. मात्र रोजगाराच्या शोधात पूर्वज काही नातेवाईकांच्या आधाराने यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव येथे पोचले. येथेच पुखराज यांचं सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालं. घरातील हलाखीच्या परिस्थतीवर मात करण्यासाठी त्यांनी लहान वयातच विविध व्यवसाय करण्यास प्रारंभ केला. 

सुरूवातीला अंगमेहनतीची कामं करून पैसा गोळा केला. त्यातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून तो विकण्याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू यात त्यांचा जम बसला. त्यानंतर गावात हार्डवेअर, किराणा, कापड विक्री असे खूप व्यवसाय बोथरा परिवाराने सुरू केले. या वयातही उत्तम स्मृती असलेले बोथरा अत्यंत उत्साहाने भूतकाळातील आठवणी सांगत होते.

देशाची परिस्थिती जैसे है वैसा है

त्यांचा लोकशाही व्यवस्थेवर सुरवातीपासूनच विश्वास. देश स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक निवडणुकींची उत्सुकता लागून होती. त्यावेळी काँग्रेस हा एकमेव पक्ष देशात होता. इतर पक्ष असतील मात्र अस्तित्व केवळ काँग्रसचं होतं.  १९४२ च्या चलेजाव आंदोलनापासून काँग्रेस विचारांच्या सान्निध्यात आले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांचं त्यांनाही आकर्षण होतं. 

मात्र फाळणीचा विषय निघाला की, ते हळवे होतात. फाळणीने दोन्ही देशांची सामाजिक आणि राजकीय हानी झाली असं त्यांना वाटतं. स्वातंत्र्यानंतर १९५० मधे राज्यघटना स्वीकारून भारत सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला. तेव्हा दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं.

आता देश स्वयंपूर्ण बनेल, सर्वांना रोजगार मिळेल, उद्योगधंद्यांमधे बरकत होईल, कृषीविकासामुळे शेतकरी स्वयंपूर्ण होतील, अशी अनेक स्वप्नं त्यावेळी आम्ही युवा बघत होतो. मात्र ‘जैसा है वैसा है’, अशी खंत त्यांनी त्यावेळेच्या आणि आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केली. लोकशाहीत सर्व समान आहेत. आता आपल्याला जे काम करतात ते आवडतात, असं ते म्हणाले.

आता निवडणुकीचा पोतच बदललाय

‘लोकसभेची पहिली  निवडणूक चार महिने चालली. त्यावेळी रेडिओ हे एकमेव माध्यम होतं. त्यावरच देशात कुठे काय चाललंय ते कळायचं. गावात वृत्तपत्र कधीतरी यायचं, तेही वर्धा, सेवाग्राम किंवा नागपूरहून. आतासारखा सोशल मीडिया नसल्यानं समाजमन दूषित होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी घोडागाडी, हँडबिल, भोंग्यांवर ओरडून किंवा गावात दवंडी पिटून, गेरू, चुना याने भिंती रंगवून उमेदवार आपला प्रचार करत होते. मात्र लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीतच या देशात कधीच एकपक्षीय किंवा द्विपक्षीय सत्ता राहणार नाही, याची खात्री झाली. 

त्यावेळी पंडित नेहरूंच्या नेतृत्वातील काँग्रेसला देशात कोणाचा विरोध होणार नाही, असं चित्र असताना पहिल्या निवडणुकीत राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, राममोहन लोहिया, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी यांच्यासह कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी काँग्रेसच्या विरोधात आपले उमदेवार उभे केले. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसच सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यावेळी राजकीय वैर हे तत्कालिन असल्याने त्याचा समाजमनावर परिणाम झाला नाही. 

तेव्हा देशासमोर असलेले प्रश्न महत्वाचे होते. देशाला आर्थिक बळकटीसोबतच संरक्षण, शिक्षण, कृषी या सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याचे, इंग्रजांच्या सवयींचा पगडा दूर सारण्याचे आव्हान होते. आता मात्र लोकसभा काय नि ग्रामपंचायत काय, निवडणुकींचा पोतच बदलला आहे. जात आणि भावनिक मुद्यांवर निवडणुकी लढवल्या जातात. देशातली जनताही आपल्या मतदानाच्या अधिकाराचं महत्व समजून न घेता या मुद्यांवर एकमेकांशी लढत आहे, हे लोकशाहीसाठी घातक ठरेल’, बोथराकाका सांगत होते.

पहिल्यांदा मतदान करताना

चार महिने निवडणुका चालल्या. आपण कोणत्या महिन्यात मतदान केलं हे आता आठवत नाही. मात्र निवडणुकीच्या वेळी मी पस्तिशीचा होतो. लग्न झालेलं, मुलंबाळं होती. व्यवसाय स्थिरावला होता. निवडणुकीतल्या उमेदवारापेक्षा ही प्रक्रिया कशी होते याचीच उत्सुकता जास्त होती. 

कुठल्याशा एका सरकारी खोलीत अधिकारी, कर्मचारी कागदं घेऊन बसले होते. समोर उमेदवारांचं चिन्हं असलेल्या लोखंडी पेट्या होत्या. त्यात योग्य पेटीत उमेदवाराचा कागद टाकायचा होता. मतदान ही काय प्रक्रिया आहे, हे तोपर्यंत लोकांना माहितीच नव्हतं. ही काय भानगड आहे, हे पाहण्याच्या उत्सुकतेनेच बैलबंडीतून, छकड्यांवरून लोकं शिदोरी बांधून मतदानासाठी आले होते. या निवडणुकीदरम्यान गांधीजी हयात नसले तरी त्यांचं नाव, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, सरदार पटेल, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई यांची नावं लोकांना माहिती होती. 

पहिल्या निवडणुकीत मतदान केलेला पक्षच सत्तेत आल्याने या प्रक्रियेबद्दल वेगळा विश्वास निर्माण झाला, तो आजपर्यंत कायम आहे. वयाच्या ३५ व्या वर्षापासून सुरू झालेला हा मतप्रवास आजही तेवढ्याच निश्चयाने सुरू असल्याचं बोथरा अभिमानाने सांगतात. आपण सरकार देश चालवायला निवडून देत असतो, आपले घर चालवायला नाही. याचं भान ठेवून प्रत्येकाने घटनेने आपल्याला दिलेल्या मतदानाचा हक्क बजावण्यात कोणताही कसूर न करण्याचं आवाहन बोथरांनी केलं. त्याकाळात स्वस्ताई होती. ‘एक रूपया भी बहोत बडी चीज थी.’ तेव्हा वस्तूला किंमत नव्हती. पैशाला होती. आज पैसा, माणूस आणि भावनेला किंमत नाही, वस्तूला आहे. हा काळाचा महिमा असल्याचंही ते सांगतात.

आजही बोथराकाका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत

बोथरा यांच्या परिवारात किमान २०० जण आहेत. जागेअभावी आता हा परिवार वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र आजही तेच कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या सहमतीशिवाय घरात टाचणीही येत नाही. बोथरांच्या पत्नी मुळीबाई यांचेही वय ९५ वर्षं आहे. हे दोघेही राळेगावातलं आणि जैन समाजातलं सर्वात वयोवृद्ध जोडपं. त्यांना सोहमलाल आणि कनकमल हे दोन भाऊ आहेत. चार मुलं, सुना आणि दोन मुली, जावई आहेत. मोठा मुलगा भवरीलालचे निधन झालं तर भागचंद, कांतीलाल, दिनेश ही मुलं उद्योग, व्यवसाय आणि शेती सांभाळतात. 

विमल आणि रेखा या दोन मुली आहेत. बोथरांची पाचवी पिढी आज कार्यरत आहे. घरातील सर्वात लहान सदस्य तीन वर्षं वयाची दिशा ही पणनात आहे. नातू उत्तम शिकलेत. परिवार वेगवेगळ्या व्यवसायात उतरलाय. मात्र ते आजही न चुकता आपल्या दुकानात जाऊन बसतात. मधुमेह, रक्तदाब असे कोणतेही आजार त्यांना नाहीत. केवळ परिश्रम आणि योग्य आहार यामुळे आपण आजारांपासून दूर असल्याचं ते सांगतात.