१० नोव्हेंबरः आजचा इतिहास

११ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १० नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

धर्मसुधारक मार्टिन ल्युथर (जन्म १४८३)

पंधराव्या शतकात एका साध्या खाणमजुराच्या घरी जन्मलेल्या मार्टिन ल्युथर यांनी ख्रिश्चन धर्मात सुधारणेचा नवा प्रवाह निर्माण केला. त्यांनी पोपच्या अधिपत्याखालील पारंपरिक कॅथलिक धर्माच्या रुढींच्या विरोधात बंड केलं. त्यामुळे फक्त धर्मातच नाही, तर युरोपीय समाजाच्या विज्ञानासह सर्वच क्षेत्रांत सुधारणांचं नवं पर्व सुरू झालं. तोवर केवळ लॅटिन भाषेत असणारं बायबल त्यांनी जर्मनी या लोकभाषेत आणलं. तेव्हापासून आधुनिक युरोपियन भाषांच्या विकासाचीही सुरवात झाली. ख्रिस्ती धर्माच्या प्रोटेस्टंट या सुधारणावादी पंथाचा पायाही मार्टिन ल्युथर यांनीच रचला. धार्मिक असूनही धर्मात सुधारणा घडवता येऊ शकतात, याची प्रेरणा त्यांनी जगाला दिली.

 

राजस्थानचे शेक्सपियर विजयदन देथा (निधन २०१३)

साहित्यातलं नोबेल कुणाला मिळणार, याच्या संभाव्य यादीत २०११ साली विजयदन देथा उर्फ बिज्जी यांचं नाव वाचून देशभरात अनेकांना धक्का बसला. ८००हून अधिक कथा आणि शंभराच्या घरात पुस्तकं असूनही राजस्थानच्या बाहेर त्यांची फारशी कुणाला माहिती नव्हती. कारण ते कधी राजस्थानच्या बाहेर रमले नाहीत आणि राजस्थानीशिवाय त्यांनी कधी लिहिलं नाही. पण हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांत त्यांचं साहित्य अनुवादित मात्र झालं. गाणी गात गावोगाव फिरणाऱ्या चारण परंपरेत जन्मलेल्या देथांना कहाण्यांची शैली घरातूनच मिळाली. चार वर्षांचे असताना भाऊबंदकीत वडील आणि भावाचा मृत्यू झालेला असतानाही त्यांनी त्याची कटुता जवळ केली नाही. शिक्षण घेऊन त्यांनी पारंपरिक कथांना आधुनिक रूप दिलं. बातां रा फुलवारी म्हणजे गोष्टींची बाग या नावाने त्यांनी पारंपरिक लोककथांचे १४ खंड लिहिले. कथा टिपत राजस्थानभर फिरत राहिले. एसटीच्या प्रवासात जगभरातलं साहित्य वाचत राहिले. सतत लिहिते राहिले. जगाला अस्सल भारतीय लोकसाहित्याची ओळख करून दिली. त्यांच्या कथांवर चरणदास चोर, परिणती, दुविधा, पहेली असे सिनेमेही आले. पद्मश्री, साहित्य अकादमी सारखे पुरस्कारही त्यांना मिळाले.

 

विचारक संघटक दत्तोपंत ठेंगडी (जन्म १९२०)

जमिनीवर संघटन करणारा कार्यकर्ता हा अनेकदा वैचारिकतेपासून दूर असतो आणि विचारवंत जमिनीवर संघटनासाठी क्वचितच उतरतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा  देशभऱ विस्तार करणाऱ्या महत्त्वाच्या पूर्णवेळ प्रचारकांपैकी एक दत्तोपंत बापूराव ठेंगडी यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी इथला. भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंच यांचे संस्थापक ही त्यांची ओळख. लहानपणापासूनच संघाशी निगडीत असूनही त्यांनी काँग्रेसच्या वानरसेनेत सामील होऊन स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. अशा व्यापकतेमुळेच संघाच्या ठराविक पठडीबाहेरही त्यांचा संचार राहिला. केरळ, बंगाल आणि आसाम इथे संघाचा पाया त्यांनी रचला. काँग्रेसच्या इंटक या संघटनेत अनुभव घेतल्यानंतर त्यांनी १९५५ला भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. आज ही देशातल्या मोठ्या युनियनपैकी एक आहे. भारतीय किसान संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ग्राहक पंचायत, सामाजिक समरसता मंच आणि सर्व पंथ समादर मंच या संघटनांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. ते १९६४ ते १९७६ या कार्यकाळात राज्यसभेवर होते. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजीत १०४ पुस्तकं लिहिली. या पुस्तकांतून त्यांनी हिंदुत्ववादी विचारांची सविस्तर मांडणी केली. आरएसएस समजून घेण्यासाठी अभ्यासकांसाठी ही पुस्तकं फारच मोलाची आहेत. २००४ साली त्यांचं निधन झालं.

 

पुरोगामी शाहिरीचा डंका आत्माराम पाटील (निधन २०१०)

`संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा`, हा आत्माराम पाटील यांचा पोवाडा. शेकडो भाषणांनी जी जागृती घडवली नाही ती या एका पोवाड्याने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाबरोबर चले जाव, गोवा मुक्ती संग्राम, चीन आणि पाकिस्तानविरुद्धची युद्धं यात त्यांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला. त्यांचा जन्म मुंबईजवळच पालघर जिल्ह्यातल्या कपासे या गावात ९ नोव्हेंबर १९२४ला झाला. ते फक्त गाणारे नाही, तर कवनं लिहून त्यांना चाली लावून गाणारे शाहीर होते. महात्मा फुलेंच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी पोवाडे, लावण्या, समरगीतं, समूहगीतं, स्मरणगीतं असं भरपूर लिखाण केलं. ‘मिसळ झाली मुंबई रे बाबा’ हे त्यांचे मुंबईवरचे कवन प्रचंड गाजलं. जातविसर्जनाच्या त्यांच्या लावणीत महाराष्ट्रातल्या ११८ जातींचं वर्णन होतं. त्यांनी सरकारी मदत नाकारत स्वाभिमानी बाणा जपला. त्यांनी शाहिरांचं संघटन केलं. मात्र त्यांच्या कार्याच्या तुलनेत त्यांचा सन्मान झाला नाही. त्यांचं म्हातारपण उपेक्षित होतं.

 

अमृताहुनी गोड गळ्याच्या माणिक वर्मा (निधन १९९६)

घननिळा लडिवाळा, जाळीमधी पिकली करवंदं, क्षणभर उघड नयन देवा, निघाले आज तिकडच्या घरी, अशी एकाहून एक मधुर अशी गाणी गाणाऱ्या माणिक वर्मा यांचा जन्म १६ मे १९२६चा. त्यांच्या माहेरी दादरकरांच्या घरात गाणं होतंच. त्यांच्या आई हिराबाई या गाजलेल्या शास्त्रीय गायिका होत्या. माणिकबाईंनी लहानणीच विविध घराण्यांचे संस्कार पचवून स्वतःची गायनशैली विकसित केली. नाट्यगीतं, भावगीतं, चित्रपटगीतांपासून शास्त्रीय संगीतापर्यंत सर्वत्र त्यांची मुशाफिरी सुरू होती. मूळ गीतरामायणातही त्यांनी काही गाणी गायली. माणिकबाईंनी फिल्म्स डिविजनमधल्या  अमर वर्मा यांच्याशी लग्न केल्यानंतर मराठी कलाविश्वात खळबळ माजली. त्यावर पुलंनी केलेली कोटी गाजली. ते म्हणाले, माणिकने वर्मावर घाव घातला की’. भारती आचरेकर, वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि अरुणा जयप्रकाश या त्यांच्या चार मुली त्यांचा कलाजगतातला वारसा चालवत आहेत. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं.