६ नोव्हेंबर : आजचा इतिहास

०६ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. दिनकर पाटील, भालबा केळकर, जयराम शिलेदार, बस्ती वामन शेणॉय आणि डेट्रॉईट शहर यांच्याविषयीच्या.

‘पाटलाचं पोर’ दिनकर पाटील (जन्म १९१५)

मराठी सिनेमांचे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक दिनकर पाटिल यांचा आज११३ वा वाढदिवस. कोल्हापूर जिल्ह्यातील बेनाडी गावात जन्मलेल्या दिनकर पाटलांना लहानपणापासूनच नाटक, सिनेमात आवड होती. कोल्हापूरातून डिग्रीचं शिक्षण घेतल्यावर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
१९५० ते १९९० या काळात त्यांनी ६० हून अधिक मराठी सिनेमांचं दिग्दर्शन, लेखन आणि संवाद लिहिले. याशिवाय मंदिर, घरबार या दोन हिंदी सिनेमांचं दिग्दर्शनही केलं. त्यांची ‘पाटलाचं पोर’ ही आत्मकथा गाजली. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

‘प्रोफेसर बल्लाळ’ भालबा केळकर (स्मृतीदिवस १९८७) 

मराठी लेखक, नाट्यअभिनेते भालचंद्र वामन केळकर ऊर्फ भालबा केळकर यांचं आज निधन झालं. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधे केमिस्ट्रीचे प्राध्यापक असतानाच प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था उभारली. बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडले. त्यांच्या संस्थेने रंगमंचावर आणलेलं ‘प्रेमा तुझा रंग कसा' हे नाटक गाजलं. त्यातील ‘प्रोफेसर बल्लाळ’ हे पात्रही त्यांनी रंगवलं होते. वेड्याचे घर उन्हात, तू वेडा कुंभार या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केलं. नाट्यनिर्मितीत उत्स्फूर्तता महत्त्वाची की शिस्त यावरून भालबा आणि श्रीराम लागू यांच्यात मतभेद झाले. 

‘गंधर्वभूषण’ जयराम शिलेदार (स्मृतीदिवस १९९२)

चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांमधे तितकीच चमकदार कामगिरी करणाऱ्या जयराम शिलेदार यांना ‘गंधर्वभूषण’ म्हणूनही ओळखलं जातं. आज त्यांचा स्मृतीदिवस घरात सराफी धंदा असताना त्यांनी संगीत क्षेत्रात आपली कारकीर्द गाजवली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत नाट्यकलेचे धडे गिरवायला सुरवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर त्यांना नायकाची भूमिका करायला मिळाली. ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, जयमाला शिलेदार यांच्यासोबतची त्यांची कारकीर्द गाजली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. 'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९५० मधे जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांनीही संगीत नाटकाला स्वतःचं जीवन समर्पित केलं. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. 

बस्ती वामन शेणॉय (जन्म १९३४)

वर्ल्ड कोकणी सेंटरचे संस्थापक बस्ती वामन शेणॉय यांचा आज ८४ वा जन्मदिवस. कोकणी भाषेसाठी लढणारे प्रसिद्ध कार्यकर्ते शेणॉय यांना विश्व कोंकणी सरदार नावानंही ओळखलं जातं. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात जन्मलेल्या शेणॉय दहावीपर्यंत शिकले. शिक्षक बनण्याचं त्यांचं स्वप्न कुटुंबाच्या गरीबीमुळे पूर्ण झालं नाही. काहीकाळ त्यांनी कॅनरा बँकेतही काम केलं. १९५४ ते १९६२ या काळात त्यांनी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या कामगार संघटनेचे कार्यकर्ते म्हणून काम केलं. 

डेट्रॉईट उभारणी (१९९८)

आजपासून तीस वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अमेरिकेतल्या डेट्रॉईट शहराला ‘ऑटोमोबाइल राष्ट्रीय स्मारक क्षेत्र’ म्हणून जाहीर केलं. देशाच्या औद्योगिक विकासात या क्षेत्राचं महत्त्व अधोरेखित करणं हा यामागचा उद्देश होता. डेट्रॉईट शहर दहा वर्षापूर्वी आलेल्या जागतिक मंदीच्या काळात दिवाळखोरीत निघालं होते. त्यावेळी या शहराची खूप चर्चा झाली होती. ऑटोमोबाईल क्षेत्र जाहीर केवल्यामुळं इथल्या जमीनीच्या वापरावर काही निर्बंध आणले गेले. इथं उभ्या राहिलेल्या कार कंपन्यांनी देशाचा इतिहास, अर्थव्यवस्था आणि संघटित कामगार क्षेत्रात मोठं योगदान दिलं.