१ नोव्हेंबर : आजचा इतिहास

०१ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. अरुण कोलटकर, वीवीएस लक्ष्मण, पद्मिनी कोल्हापुरे, नीता अंबानी आणि टीम कूक यांच्याविषयीच्या.

वेरी वेरी स्पेशल लक्ष्मण (जन्म १९७४)

भारताचा डावखुरा फलंदाज वीवीएस लक्ष्मणचा आज ४४वा बड्डे. वंगिपुरप्पु वेंकटा साई लक्ष्मण हे त्याचं पूर्ण नाव. लक्ष्मणचा जन्म १ नोव्हेंबर १९७४ ला हैदराबादला झाला. लक्ष्मणने ८६ वनडेत २३३८ रन काढले. पण तो चमकला ते त्याच्या कसोटीतल्या कारकीर्दीमुळे. लक्ष्मण एकूण १३४ टेस्ट मॅच खेळला. यात १७ शतक आणि ५६ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ८७८१ रन काढले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी २००१ मधे झालेल्या कसोटीत त्याने काढलेल्या २८१ रन ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली. या खेळीमुळे लक्ष्मणला नवी ओळख मिळाली. मात्र, या मॅचमधे भारताला फॉलोऑन मिळाला होता. तरीही भारत जिंकला. ती फक्त भारतीय खेळाडूचीच नाही, तर एकूणच क्रिकेटमधली एक महान खेळी मानली जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या सामन्यात लक्ष्मणच्या बॅटमधून आग ओकल्यासारखं पण धावांचा पाऊस पडायचा. टेस्ट करियरमधल्या १७ शतकांपैकी ६ शतकं, तर वनडेमधे ६ पैकी ४ शतकं त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकली होती. निवृत्तनंतर तो आता आपल्याला कॉमेंटरेटरच्या भूमिकेत दिसतोय.

मराठीतले ग्लोबल कवी अरुण कोलटकर (जन्म १९३२)

जागतिक कीर्तीचे मराठी कवी अरुण बालकृष्ण कोलटकर यांचा आज जन्मदिवस. जेजे स्कूल ऑफ आर्टसमधे शिकलेल्या कोलटकरांचा एक उत्तम ग्राफिक डिझायनर तसंच जाहिरातीतील यशस्वी कलादिग्दशर्क म्हणूनही नावलौकिक होता. मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही त्यांनी कविता लिहिल्या. १९५०-६० च्या दशकात मुंबईतल्या काही विशिष्ट बोली भाषांचा वापर करून कोलटकरांनी कविता लिहिल्या. या कवितांमधून निर्वासित आणि गुन्हेगारी जीवनाचं दर्शन व्हायचं. बोलीभाषेतल्या मै भाभीको बोला, भडक गयी साली, चलावू गोली गांडू या त्यांच्या कविता गाजल्या. ‘जेजुरी’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मराठीत ‘अरुण कोलटकरच्या कविता’, चिरीमिरी, द्रोण, आणि भिजकी वही हे त्यांचे कवितासंग्रह गाजले. २००५ मधे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कोलटकर हे शब्द या लघुनियतकालिकाचे सहसंपादक होते. २५ सप्टेंबर २००४ ला त्यांचं निधन झालं.

पाच दशकांची कारकीर्द पद्मिनी कोल्हापुरे (१९६५)

आज पद्मिनी कोल्हापुरेंचा ५३ वा वाढदिवस. तिचा प्रवास नावाचा नवा मराठी सिनेमा येतोय. त्यानंतर आशुतोष गोवारीकरच्या पानिपत या बिगबजेट सिनेमातही ती आहे. ऐंशीचं दशक गाजवलेली पद्मिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय. 

तिचं घर तसं संगीताशी संबंधित. आजोबा शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव. पंडित दीनानाथ मंगेशकरांची बहीण त्यांना दिलेली. लहानपणी ती गाणंही गात राहिली आणि कॅमेराला सामोरंही जाऊ लागली. तिने वयाच्या पाचव्या वर्षी ‘एक खिलाडी बावन पत्ते’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून प्रवेश केला. ड्रीमगर्लमधे ती लहानपणीची हेमा मालिनी होती तर सत्यम शिवम सुंदरममधली छोटी झीनत अमान. यशोमती मैय्यासे बोले नंदलाला हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं गाजलं आणि तीही. 

बालकलाकार ही तिच्यावरची छाप लवकरच पुसली गेली. कारण होता अरुणा राजेंचा गहराई हा सिनेमा. त्यात पद्मिनीने न्यूड सीन दिला होता. बीआर चोप्रांच्या इन्साफ का तराजूमधे तिच्यावर बलात्काराचा सीन सात मिनिटं चालला होता. आहिस्ता आहिस्ताच्या सेटवर इंग्लंडचा प्रिंस चार्ल्स आलेला असताना तिने त्याचा किस घेतला. त्यामुळे तिची जगभरच्या मीडियात चर्चा झाली. त्यानंतर तिने बोल्डपणाची इमेजही पुसली. ती राज कपूरच्या प्रेम रोगमधल्या तगड्या अभिनयाने. तिला य़ा भूमिकेसाठी १९८३चा फिल्मफेअर मिळाला. त्यानंतर सौतन, विधाता, प्यार झुकता नहीं, वो सात दिन इथपासून ते आजच्या फटा पोस्टर निकला हिरोपर्यंत सिनेमे गाजवले. टीवी आणि मराठी सिनेमांमधेही तिने हजेरी लावली. 

स्टिव जॉब्जचे वारसदार टीम कूक (जन्म १९६०)

जगप्रसिद्ध अॅपलचे सीईओ टीम कूक यांचा आज ५८ वा वाढदिवस. पदवी शिक्षणानंतर त्यांनी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीतून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरवात केली. आयबीएम कंपनीत १२ वर्ष काम केलं. १९९८ ला त्यांनी अॅपल जॉईन केलं. तेव्हा अॅपल कंपनीचे संघर्षाचे दिवस सुरु होते. ऑक्टोबर २०११ ला स्टीव जॉब्जच्या अकाली मृत्यूनंतर अॅप्पलची सर्व सूत्रं कूक यांच्याकडे आली. तेव्हापासून आतापर्यंत टीम कूक अॅपलचा यशस्वीपणे गाडा हाकतायेत. नवनवे प्रयोग करत अत्याधुनिक गॅजेटमधून जगभरातल्या सर्वसामान्यांचं जगणं सोपं करत आहेत.

भारतीय बिझनेसची फर्स्ट लेडी नीता अंबानी (जन्म १९६३)

रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमूख पत्नी नीता अंबानी यांचा आज जन्मदिन. पूर्वाश्रमीच्या त्या नीता दलाल. नीता अंबानींनी एनएम कॉलेजमधून कॉमर्समधे पदवी घेतली. मुकेश अंबानींशी लग्नानंतर शिक्षिका म्हणून काम केलं. २००३ मधे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. पण त्या गाजल्या मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण म्हणून. २०१६ मधे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. अशी निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या. फोर्ब्सने २०१६ च्या यादीत आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली महिला उद्योजक म्हणून नीता अंबानींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.