२ नोव्हेंबर : आजचा इतिहास

०२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. अरुण शौरी, आबासाहेब गरवारे, अन्नू मलिक, योगेशवर दत्त आणि ईशा देओल यांच्याविषयीच्या.

अरुण शौरी (जन्म १९४१)

पत्रकार, लेखक आणि राजकारणी असलेल्या अरुण शौरी यांनी सध्या केंद्र सरकारला पळता भुई थोडी करून सोडलीय. राफेल प्रकरणात त्यांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिंह आणि वकील प्रशांत भूषण यांच्यासोबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. इंडियन एक्स्प्रेसचे संपादक असताना आणीबाणीतही त्यांनी इंदिरा गांधी सरकारविरोधात थेट भूमिका घेतली. आज अरुण शौरी यांचा ७७ वा वाढदिवस. सिराक्यूज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवल्यावर त्यांनी जागतिक बँकेत अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलं. टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेसमधे पत्रकारिता केली. शौरी यांच्या आरोपामुळे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. अरुण शौरींना दोनदा भाजपतर्फे राज्यसभेवर पाठवलं होतं. वाजपेयींच्या मंत्रिमडळात शौरींकडे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची धूरा होती.

अन्नू मलिक (जन्म १९६०)

संगीतकार आणि गायक अन्नू मलिकचा आज ५८ वा वाढदिवस. अन्नू मलिकचं पूर्ण नाव अनवर सरदार मलिक. १९७७ ला ‘हंटरवाली’ सिनेमातून करियरची सुरवात केली. यानंतर त्यानी अनेक सिनेमांना संगीत दिलं. १९९३ ला आलेल्या ‘बाजीगर’ सिनेमातल्या ‘ये काली काली आखी’ या गाण्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. बाजीगर सिनेमासाठी त्याला १९९४ ला बेस्ट म्यूजिक डायरेक्टरचा फिल्मफेअर मिळाला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, त्यांच्यावर गाण्याची चाल चोरतात, असे आरोप होऊ लागले. इंडियन आयडल या गाण्याच्या रिअलिटी शोसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम केलं.

योगेश्वर दत्त (जन्म १९८४)

कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा आज ३६ वा वाढदिवस. योगेशवरने २०१२ च्या लंडन ऑलिंम्पिकमध्ये ६० किलो वजनी गटात भारताला ब्राँझपदक मिळवून दिलं. कुस्तीत पदक मिळवणारा योगेश्वर हा तिसरा कुस्तीपटू. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समधे ६५ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीत त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली. लहानपणापासून योगेश्वर कुस्ती खेळतोय. आपल्या कारकिर्दीत योगेश्वरने अनेक स्पर्धा तसेच पदकं जिंकलीत. योगेश्वरच्या कामगिरीसाठी त्याला २०१२ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, तर २०१३ ला पद्मश्रीने गौरवण्यात आलं.

आबासाहेब गरवारे (मृत्यू १९९०)

प्रसिद्ध भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे हे प्रसिद्ध उद्योगपती होते. त्यांचा आज स्मृतीदिन. १७ व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर त्यांनी ऑटोमोबाईल्सचा स्वत: चा व्यवसाय सुरु केला, त्यानंतर एजंट म्हणून त्यांनी सेकेंड हँड गाड्या विकल्या. तेव्हापासून त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. गरवारे मोटर्स, नायलॉन्स, प्लास्टीक, वॉल रोप्स अशा अनेक कंपन्यांची त्यांनी स्थापना केली. आपण समाजाचं देणं लागतो, या जाणिवेतून त्यांनी आपल्या नफ्यातील काही हिस्सा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी दिला. त्यांच्या नावानं पुण्यात आबासाहेब गरवारे महाविद्यालय आहे. त्यांच्या एकूणच कामगिरीसाठी त्यांना १९७१ ला पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

ईशा देओल (जन्म १९८१)

अभिनेत्री ईशा देओलचा आज ३७ वा वाढदिवस. ती धर्मेंद-हेमा मालिनी यांची मुलगी आहे. २००२ ला ‘कोई मेरे दिल से पुछे’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर एलओसी कारगिल, युवा, धूम, इंसान, काल, मै ऐसा ही हुं, नो एंट्री, शादी नंबर-1, कैश आणि जस्ट मेरिड यासारख्या सिनेमात तिने काम केलंय. हिंदीसोबतच ईशाने तमिळ, तेलगू सिनेमातही आपली कलाकारी दाखवलीय. पदार्पणातच ‘कोई मेरे दिल से पुछे’साठी तीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१५ ला रोडीज X2 या मालिकेत गँग लीडरच्या भूमिकेत ती दिसली.