शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

१९ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


समुद्रातल्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर हवेत की घोड्याशिवाय, यावरून सध्या वाद पेटलाय. पण शिवरायांच्या मूळ चित्रांचा शोध मात्र घेण्यात कुणाला रस नाही. हॉलंडमधे शिवरायांचं मूळ चित्र काढणारा चित्रकार आणि त्याने काढलेलं चित्र आहे, असं सांगून सांगून त्याच्या दंतकथा पिकवण्यातच आपण खुश होतो. पण असा कोणताच चित्रकार हॉलंडमधे नसल्याचं आता सिद्ध झालंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ चित्र कुठे आहे? असं कुणा शिवरायांच्या अभ्यासकाला विचारलं, तर उत्तर असतं, हॉलंडमधे. फक्त आजच नाही, तर गेली जवळपास नव्वद वर्षं ही गोष्ट सांगितली आणि वारंवार सांगितली जातेय. वारंवार सांगितल्यामुळे ती खरीच वाटते. पण त्याच्या खरेपणाचा शोध कुणीतरी घ्यायला हवा ना?

कसा सुरू झाला शोध?

हा हॉलंड नावाचा देश आहे युरोपात. खरं तर आता त्याचं नाव हॉलंड नाही, तर नेदरलँड असंय. पण त्याचा उल्लेख आजही हॉलंड असाच होतो. आणि तिथे राहणाऱ्यांना डच असं म्हणतात. याच देशातल्या द हेग या शहरात भास्कर हांडे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार, शिल्पकार, कवी राहतात. त्यांचा एक पाय महाराष्ट्रात तर दुसरा युरोपात असतो. महाराष्ट्र संस्कृतीचे जाणकार अभ्यासक म्हणूनही त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातली संतपरंपरा आणि वारी यांना जगभर पोचवण्याचं काम त्यांनी आपल्या चित्र, शिल्प आणि संशोधनातून केलाय.

विद्यार्थी असल्यापासूनच भास्कर हांडे हॉलंडमधे आहेत. तिथेच उच्चशिक्षण घेतलं आणि कलेतलं यशस्वी करियरही केलं. ३० जुलै २०१८च्या चित्रलेखात त्यांची सक्सेस स्टोरी प्रकाशित झालीय. जगभर यशाची पताका फडकवतानाच त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट संबंध कायम ठेवले. त्यामुळेच जागतिक कलेच्या इतिहासाचा बारकाईने अभ्यास केलेल्या हांडेंना हॉलंडमधल्या शिवरायांच्या मूळ चित्राचा शोध घ्यावासा वाटणं स्वाभाविक होतं.

शिवरायांच्या चित्राच्या शोधाविषयी ते सांगतात, `गोष्ट १९९०च्या दशकाच्या सुरवातीची आहे. डॉ. सदानंद मोरे तेव्हा संत तुकारामांच्या महाराष्ट्रावर असणाऱ्या प्रभावाविषयी लेखमाला चालवत होते. त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना हॉलंडमधल्या शिवचित्राच्या शोधाचा विषय सांगितला. त्यांनी त्यात खूपच रस दाखवला. त्यांनी त्यांचा पुणे विद्यापीठातला पीएचडी किंवा एमफीलचा एखादा विद्यार्थी हॉलंडला पाठवावा. मी त्याला मदत करेन आणि तो इथल्या चित्राचा सखोल शोध घेईल, असं ठरवलं. पण अनेक वर्ष प्रयत्न करूनही ते शक्य झालं नाही. शेवटी मोरेंनी मलाच ते करायला सूचवलं.`

मांडी घालून बसलेले शिवराय कुठले?

तो काळ हांडेंच्याही करियरचा संघर्षाचा काळ होता. जगभर फिरणं सुरू होतं. नवनव्या कल्पना ते प्रत्यक्षात आणत होते. त्या धामधुमीत हा शोध राहून गेला. पण अचानक दोन तीन अगदी साध्या प्रसंगातून तो विषय पुन्हा ऐरणीवर आला. त्याविषयी ते सांगतात, `२००२ मधे आम्ही काही चित्रकार मित्र पन्हाळ्याच्या सहलीला गेलो होतो. तिथे काही मित्रांनी शिवरायांचं चित्र डच चित्रकाराने काढल्याची कहाणी रंगवून सांगितली. मला ते पटणारं नव्हतं. मग मी जमेल तसं त्याच्या मागावर राहिलो. शिवरायांच्या मुद्राचित्रांच्या झेरॉक्स कॉपी आमच्या पुणे इथल्या वैश्विक आर्ट गॅलरीत कायमस्वरूपी प्रदर्शनात मांडल्या.`

हा शोध पुढे जाण्यासाठीही पुण्यात आणखी एक प्रसंग घडला. या प्रसंगाविषयी ते सांगतात, `२०१४ ला माझ्या एका मित्राने मला त्याच्या हॉटेलमधे बोलावलं. त्याने त्याच्या हॉटेलचं रिनोवेशन केलं होतं. त्याने अभिमानाने मला हॉटेलच्या मध्यभागी लावलेलं चित्र दाखवलं. सांगू लागला की महाराजांचं हे चित्र डच चित्रकाराने काढलेलं आहे. त्याची ही प्रतिकृती आहे. मी आश्चर्यचकीत झालो. मला वाटलं कदाचित रशियन किंवा इतर परदेशी पर्यटकाने काढलं असेल. खुर्चीचा बाज असलेलं सिंहासन आणि खुर्चीवर मांडी घालून बसलेले महाराज. हे कुठेच जमणारं नव्हतं. मी ठरवलं, आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच.`

दरम्यान हॉटेलमधे पाहिलेल्या चित्राच्या मूळ प्रतीविषयी लोकसत्तात आलेली एक बातमी हांडेंच्या वाचनात आली. चित्रकार वासुदेव कामत यांनी काढलेलं हे चित्र युती सरकारच्या काळात वांद्रे इथल्या म्हाडाच्या हेड ऑफिसमधे लावलंय. बातमीत त्या चित्राच्या कॉपीराईटविषयी झालेल्या वादाचा विषय होता. त्याच विषयावर १८ जुलै २०१४च्या साप्ताहिक लोकप्रभाला दिलेल्या मुलाखतीमधे आपल्या चित्राची महती गाताना कामतांनी शिवरायांच्या मूळ डच चित्राच्या दिशेनेच अंगुलीनिर्देश केलाय.

हे कमी होतं म्हणून की काय, हांडेंना पुण्यात काही हिंदुत्ववादी इतिहास संशोधक भेटले. त्यांनी हॉलंडवरून शिवरायांचं अस्सल चित्र विकत आणल्याचा दावाही केला. वारंवार मागे लागूनही त्यांनी ना ते चित्र दाखवलं, ना हॉलंडमधला त्याचा पत्ता सांगितला.

ही आपली सांस्कृतिक दिवाळखोरी

या गोंधळाविषयी भास्कर हांडे सांगतात, `ही सगळी आपली सांस्कृतिक दिवाळखोरीच आहे. शिवजयंतीचा आपण बट्ट्याबोळ केलाच आहे. तसाच शिवाजी राजांच्या व्यक्तिचित्राचाही करतोय. चित्रकार स्वतःच्या मार्केटिंगसाठी या दंतकथा सांगत आहेत. हे थांबायला हवं म्हणून मी हॉलंडला गेल्यापासून त्याचा शोध घ्यायला लागलो. चित्राचा अस्सलपणा तपासताना एखाद्या मर्डर केसमधे असतात तसे पक्के पुरावे लागतात. सांगोवांगी दंतकथा तिथे चालत नाही.`

हॉलंडमधल्या मूळ शिवचित्राची सर्रास सांगितली जाणारी दंतकथा अशी आहे, शिवाजी राजांनी १६६१ला सुरतवर स्वारी केली. मोगलांच्या ताब्यात असणाऱ्या सुरत बंदरावर तेव्हा डच, ब्रिटिश, पोर्तुगीजांच्या वखारी होत्या. सुरत मोहिमेची देखरेख करत असताना डच वखारीतला एक व्यापारी आणि चित्रकार त्यांना पाहत होता. त्यामुळे तो प्रभावित झाला आणि त्याने शिवाजी महाराजांचं चित्र काढलं. 

शिवचरित्रात्मक कादंबऱ्यांतही अनेकांनी लिहिलेल्या या कथेनुसार हॉलंडमधलं चित्र शोधायला लागल्यावर हांडेंच्या हाती वेगळीच माहिती लागली. त्याचा शोध घेत ते प्रख्यात इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंपर्यंत पोचले. १९३३ साली बेंद्रेंनी शिवचित्राचं एक पोस्टर न. चिं. केळकरांच्या उपस्थितीत प्रकाशित केलं होतं. ( हे चित्र ३ नंबरने दाखवलंय.) त्यावर त्यांनी इंग्रजीत लिहिलं होतं, `सुरत लुटीनंतर वॉन वॅलेंटाईन याने काढलेल्या मॅकेन्झी कलेक्शनमधल्या चित्राची प्रत लंडनच्या इंडिया ऑफिसच्या सौजन्याने.`

बेंद्रेंनी प्रकाशित केलेल्या शिवचित्राचं मूळ

बेंद्रेंच्या या चित्राविषयी भास्कर हांडे सांगतात, `बेंद्रेंचा काळ पाहता तेव्हा उपलब्ध असणारी माहिती आणि ते मिळवण्याचे स्रोत कमीच होते. तरीही ते शिवचित्राचा शोध घेत लंडनपर्यंत धडकले, ही गोष्ट महत्त्वाचीच होती. त्यांनी इंग्रजी इतिहासकारांच्या माहितीवरून पोस्टर प्रकाशित करताना वॉन वॅलेंटाईनला चित्रकार ठरवलंय. वॅलेंटाईन हा डच होता, पण तो चित्रकार नव्हता. तर एक महान इतिहासकार आणि धर्मप्रसारक होता. त्याचं नाव डोमेनी फ्रान्सिस्कस वॅलेंटाईन होतं.`

वॅलेंटाईनचं मूळ शोधत हांडे २००४ला हॉलंडच्या रॉयल लायब्ररीत गेले. तिथे जुनी पुस्तकं आहेत. तिथे त्यांना वॅलेंटाईनने डच भाषेत लिहिलेले १७२७ ला छापलेले `ऑड एन निऊस ऊस्ट इंडेन` अशा नावाचे आशियाच्या इतिहासाचे सहा खंड सापडले. त्यापैकी सहाव्या खंडातल्या चौथ्या प्रकरणात मुगलकालीन भारताचा इतिहास येतो. त्यातच शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे. त्यात १४८ नंबरच्या पानावर पाव भागात मावेल असं छोटं शिवरायांचं चित्र आहे. 

हे चित्र इंडिया ऑफिसच्या सौजन्याने छापत असल्याचा उल्लेखही प्रकाशकाने पुस्तकात केलाय. ते चित्र छापण्यासाठी एक मुद्राचित्र म्हणजे प्रिंट किंवा छाप तयार केला होता. ते मुद्राचित्र इंडिया ऑफिसमधे वा. सी. बेंद्रेंना सापडलं. त्याच्या आधारे त्यांनी भारतात पोस्टर प्रकाशित केलं. पण त्याचा मूळ डच चित्रकार त्यांना सापडलाच नाही. कारण तसा कुणी चित्रकार हॉलंडमधे नव्हताच.

वॅलेंटाईनच्या पुस्तकातलं शिवचित्र कुठून?

मग प्रश्न उरतो की हा चित्रकारच नव्हता, तर हे मुद्राचित्र आलं तरी कुठून? या चित्रकाराविषयी गूढ तयार झालं. बेंद्रेंनी सांगितलेलं मूळ शिवचित्र आणि त्याचा चित्रकार कोण असेल, यातून दंतकथा, आख्यायिका तयार झाल्या. पण चित्रकाराचा, चित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न १९३३ पासून झाला नाही. त्या दंतकथा तपासून पाहिल्या नाहीत. उलट महाराष्ट्रातल्या सध्याच्या चित्रकारांनी आपल्या चित्राची प्रसिद्धी व्हावी, म्हणून या दंतकथांचा वापर केला. 

भास्कर हांडे यांना डच भाषा उत्तम येते. त्यांनी वॅलंटाईनच्या डच ग्रंथातला शिवरायांविषयीचा भागही मराठीत अनुवादित केलाय. शिवाय त्यांना युरोपियन चित्रकलेचा इतिहास तसंच छपाईतंत्रांविषयीही उत्तम जाणकारी आहे. त्यामुळे त्यांना हा गुंता उलगडवणं शक्य झालं. 

भास्कर हांडे या मुद्राचित्राविषयी सांगतात,`एक स्पष्ट झालं होतं की वॅलेंटाईन हा त्या चित्राचा चित्रकार नव्हता. कारण तो चित्रकारच नव्हता आणि त्याचा जन्मच सुरतेच्या मोहिमेनंतर झालाय. त्याने ते चित्र त्याच्या पुस्तकात छापलंय. त्यासाठीचा छाप त्याने हेच काम करणाऱ्या स्थानिक चित्रकाराकडून तयार करून घेतला असावा. त्यासाठी संदर्भाला घेतलेलं चित्र आज ब्रिटिश म्युझियममधे आहे. त्याच चित्राच्या आधारे स्थानिक चित्रकाराने स्क्रॅपबोर्डवर चित्राचा छाप तयार केला असावा. आणखी एक गोष्ट नोंदवायला हवी, ती म्हणजे ब्रिटिश म्युझियममधल्या मूळ चित्रावरच्या नोंदी मूळ डच भाषेतच आहेत.`

गोवळकोंड्यातून ब्रिटिश म्युझियमपर्यंत

आता हांडेंना पुढे जाऊन ब्रिटिश म्युझियममधल्या मूळ चित्राचा शोध घ्यायचा होता. हे चित्र तसं प्रसिद्धच होतं. त्याच्याविषयी भास्कर हांडे सांगतात, `गोवळकोंडा दरबारातलं हे चित्र बहुदा चोरमार्गाने ब्रिटिश खजिन्यात पोचलं होतं. आता ते ब्रिटिश म्युझियममधे आहे. तिथल्या नोंदीनुसार या चित्राचा काळ १६८० ते ८७ असा आहे. 

हे जलरंगातलं अगदी छोटं चित्रं आहे. (ते सोबत १ नंबरने दाखवलंय.) १४.७ सेंमी उंच आणि फक्त ७ सेंमी रुंद. दखनी लघुचित्र शैलीतली ही चित्रं आहेत. एका लिफाफ्यात शिवरायांसारख्या २६ भारतीय राजांची एकाच आकाराची आणि सारख्या शैलीतली छोटी चित्रं त्यात आहेत. ती मोठी चित्र काढण्याआधीची रेखाचित्र असावीत, असा कयास आहे. त्यामुळे हे शिवाजी राजांच्या समोर बसून काढलेलं चित्र नाहीय, हे स्पष्ट होतं.`

गोवळकोंड्याचा कुतुबशहा हा शिवाजी महाराजांचा चाहता होता. त्यामुळे त्याच्या दरबारात शिवरायांचं चित्र सापडणं, हे स्वाभाविकच मानायला हवं. औरंगजेबाने १६८७मधे कुतुबशाही नेस्तनाबूत केली. त्यानंतरही ही चित्रं कुठे गेली, हे माहीत नाही. ती एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला सापडली असावीत आणि ती ब्रिटनमधे पोचली. 

मॅकेन्झी नावाच्या माणसाने व्यक्तिचित्रांचा तो अल्बम ब्रिटिश लायब्ररीला दान केल्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे त्याला मॅकेन्झी कलेक्शन म्हटलं जातं. 

वॅलेंटाईनच्या इतिहासाचे खंड छापणाऱ्या प्रकाशकाने ही चित्रं मिळवून पुस्तकात छापली. १७२७ला छापलेल्या त्याच्या इतिहासाच्या खंडांत ही चित्रं छापली आहेत. १६८७ ते १७२७ हा काळ लुटालुटीचाच असल्याने चोरीच्या मार्गानेच ती इंग्लंडमधे पोचली असावीत. 

लंडनचं चित्रही मुंबईतल्या चित्रावरूनच

वॅलेंटाईनच्या पुस्तकात छापल्याने या चित्राचं भाग्य उजळलं. कारण तो युरोपात लिहिला गेलेला भारताचा पहिला सविस्तर आणि बऱ्यापैकी तटस्थ इतिहास होता. पुढे युरोपातल्या दुसऱ्या भाषांमधे भारताचा इतिहास लिहिताना या वॅलेंटाईनच्या पुस्तकाचा आधार घेतला गेला. त्यामुळे शिवरायांच्या चित्रांच्या नकला जर्मन, रशियन वगैरे देशातल्या लोकांनी केल्या. मात्र त्या फार चांगल्या नाहीत. 

हांडेंनी या चित्राचा इथवर माग घेतल्यानंतर पुढचा शोध होता, तो मूळ चित्राच. ब्रिटिश लायब्ररीतलं गोवळकोंडा दरबारचं हे चित्र शिवरायांच्या समोर बसून काढलेलं नाही. तर मग ते कोणत्या चित्राच्या आधारे काढलं, ते शोधावंच लागणार होतं. तो शोध कुठे दूर परदेशात नाही, तर भारतात मुंबईपर्यंत घेऊन आला. मुंबईतलं जुनं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात शिवरायांचं मूळ चित्र प्रसिद्ध आहे. (ते सोबत २ नंबरने दाखवलंय.) 

भास्कर हांडे सांगतात, `ब्रिटिश लायब्ररीतलं शिवचित्र हे सध्या मुंबईत असणाऱ्या मूळ विजापूर दरबारातल्या शिवरायांच्या पूर्णाकृती चित्रावरून तयार केलंय, हे सिद्ध करता येतं. ज्याला मिरर इमेज म्हणतात किंवा ट्रेसिंग पेपरवर ठेवून चित्र काढावं, तसं लंडनमधलं चित्र मुंबईतल्या चित्रावरून तयार केलंय. दोन्ही चित्र एकाच दखनी लघुचित्र शैलीतली आहे. दोन्ही चित्रांतली अंगरख्यावरची नक्षी तशीच आहे. चेहऱ्याची ठेवण, कपडे आणि जिरेटोपाची पद्धत काही तपशील वगळता सारखे आहेत. फक्त मूळ चित्रातले शिवराय डावीकडे बघताहेत आणि दुसऱ्या चित्रातले शिवराय उजवीकडे बघत आहेत.` 

लंडनचं चित्र गाजलं, मुंबईचं नाहीच

आता मुंबईच्या म्युझियममधे असलेलं चित्र हे विजापूर दरबारच्या संग्रहातलं आहे. औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर शिवराय विजापूरच्या आदिलशाहीसह दक्षिणतेल्या सर्वच राज्यांचे रक्षणकर्ते बनले होते. त्या दरम्यान विजापूरमधे हे चित्र तयार केलं असावं. हे चित्रही छोटं आहे. २२.३ सेंमी उंच आणि १४.५ सेंमी रुंद असा साधारणपणे एफोर आकाराच्या कागदाइतका त्याचा आकार आहे. हे चित्र शिवाजी राजांच्या निधनाआधी पाच वर्षं म्हणजे १६७५च्या दरम्यानचं मानलं जातं. 

या चित्रात शिवाजी महाराजांनी लांब अंगरखा घातलाय. कंबरेला शेला, शेल्यावर धातूचा कंबरपट्टा आणि त्यात डाव्या बाजूला खोवलेली कट्यार आहे. उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात दांडपट्टा आहे. चेहरा शरीराच्या प्रमाणात लहान आहे आणि कंबरेचा आकार, अंगरख्याचा घोळ फारच मोठा आहे. दख्खनी शैलीतल्या कलाकारांमधे प्रमाणबद्धता नसायची. त्यामुळे या चुका झाल्यात. ते हिरवळीवर टेहळणी करत उभे आहेत, असा त्यांचा पवित्रा आहे. शिवाय त्यांचा जिरेटोप नाटक, सिनेमांत दाखवतात तसा नसून तो शिखांच्या पगडीसारखा केस उंचावर घट्ट बांधलेला आहे.

भास्कर हांडे दोन्ही चित्रांची तुलना करताना सांगतात, `विजापूर दरबारचं मूळ चित्र भारतातच राहिलं. त्यामुळे त्याचा जगभर प्रसार झाला नाही. गोवळकोंड्याचं चित्र मात्र युरोपात गेल्याने त्याचा अधिक सन्मान झाला. त्याच्या प्रतिकृती बनल्या. त्यातून दंतकथा बनल्या. पण मूळ चित्र असूनही विजापूर दरबारच्या मुंबईत राहिलेल्या चित्राला दंतकथेचं ग्लॅमर मिळालं नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आमची परिस्थिती झाली.`

अधिकृत चित्र ठरवतानाही शहानिशा नाही

सरकारदरबारीही विजापूर चित्रापेक्षाही गोवळकोंडा चित्रालाच अधिक महत्त्व मिळालं. सरकारने कोणतीही शहानिशा केली नाही. वा. सी. बेंद्रेंच्या पोस्टरच्या आधारे १९६२ साली जी. कांबळे यांच्याकडून तैलरंगातलं शिवाजी राजांचं चित्रं बनवून घेतलं. (ते सोबत ४ नंबरने दाखवलंय.) जी. कांबळे म्हणजे गोपाळराव कांबळे हे मूळ कोल्हापूरचे महान चित्रकार होते. व्ही. शांतराम यांच्या राजकमल स्टुडियोत ते कलादिग्दर्शक होते. सध्या ते महाराष्ट्र सरकारचं अधिकृत चित्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची प्रत सगळ्या सरकारी ऑफिसांमधे असते.

सूरतच्या स्वारीमधे शिवाजी महाराज कसे खडकावर एक पाय देऊन उभे होते. त्यांची तेजस्वी मुद्रा कशी दिसत होती. शत्रू त्यांच्यासमोर कसा नतमस्तक होत होता आणि ते पाहणारा एक डच चित्रकार त्यामुळे कसा दिपून गेला. त्याने शिवरायांचं चित्र काढलं. असा सारा माहौल दंतकथांतून शिवरायांच्या मूळ चित्राचं गूढ वाढवण्यासाठी सांगितला गेला. पण मुळात तसं काहीच नव्हतं. ते फक्त शब्दांचे बुडबुडे होते. त्याची वस्तुस्थिती हॉलंडमधे राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या पोराने शोधून काढली. नाहीतर आपण नसलेल्या डच चित्रकाराचं हॉलंडमधलं नसलेले मूळ चित्र शोधत राहिलो असतो. आणि शिवरायांच्या चरित्रांच्या कहाण्या सांगणारे, त्या कहाण्या सांगून आपली चित्र विकणारे आपल्याला गंडवत राहिले असते.

(साभार साप्ताहिक चित्रलेखा.)