एका रात्रीत आरेतली तब्बल अडीच हजार झाडं तोडल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला. पण पंढरपूरजवळच्या चिंचणी या पुनर्वसित गावानं झाडं तोडणीचा निषेध म्हणून ११०० झाडं लावण्याचा निर्धार केलाय. जपानी तंत्रज्ञानानुसार ही झाडं लावण्यात येताहेत. झाडं तोडण्याचा भन्नाट मार्ग निवडणाऱ्या भन्नाट गावाची ही गोष्ट.
मुंबई मेट्रो प्रशासनाने आरे कॉलनीतली झाडं तोडायली सुरवात केली असल्याची बातमी शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईतल्या घराघरात पोचू लागली. ‘आरे’विषयी सहनुभूती असणारे हजारो तरूण, लहान मुलं, म्हातारी माणसं सगळे आरेजवळ जमले आणि झाडं तोडण्याला विरोध करू लागले. याचे पडसाद हळूहळू फेसबुकवरही दिसू लागले.
एका रात्रीत फेसबुक ‘आरे’मय झालं. मुंबईतलेच नाही तर महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यात राहणारे असंख्य लोक मेट्रो प्रशासनाच्या दमदाटीविरूद्ध सोशल मीडियावर लिहू लागले. आरेतली झाडं तोडतानाचा, झाडं वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे असे वेगवेगळे विडिओ फेसबूक, व्हॉट्सअपवर फिरू लागले. आणि बघताबघता वातावरण तापलं. आरे आणि पर्यावरणाविषयी आपुलकी वाटणाऱ्या जवळजवळ सगळ्यांनीच प्रशासनाच्या अतितत्परतेने झाडं तोडण्याच्या या कृतीचा कडाडून निषेध केला.
पण या सगळ्यात एक गाव मात्र शांतपणे काहीतरी वेगळीच योजना आखत होतं. आपल्या सोलापूरच्या पंढरपूरमधलं चिंचणी नावाचं हे गावं. आरेतल्या वृक्षतोडीविरोधात राज्यातून संताप व्यक्त होत असतानाच चिंचणील्या गावकऱ्यांनी निषेधाचा वेगळाच मार्ग शोधून काढला.
आरे कॉलनीतून कापलेल्या २००० झाडांना प्रतिकात्मक उत्तर म्हणून चिंचणीतल्या गावकऱ्यांनी ११०० नवीन रोपं लावण्याची योजना सुरू केली. ‘आरे... झाडं लावा, झाडं जगवा’ अशा घोषणा देत त्यांनी एका दिवसात चक्का अडीचशे जंगली झाडं लावण्याची कामगिरी फत्ते केली.
हे चिंचणी गाव भारी इंटरेस्टिंग आहे! हे सगळच्या सगळं गाव पूर्वी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरच्या पायथ्याशी वसलं होतं. महाबळेश्वरचा परिसर म्हणजे तसं हिरवाईनं नटलेलं हे गाव होतं.
इथली माणसं, कुटुंबं आणि मागच्या कित्तीतरी पिढ्या अशा निसर्गसौंदर्यात वाढलेल्या. झाडांची गर्द सावली, नदीचं पाणी आणि हवेतला गारवा याची इथल्या नागरिकांना सवय. पण कण्हेरी धरण प्रकल्पाच्या प्रस्तावात हे गाव बुडीत क्षेत्रात आलं.
हेही वाचा : शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन
नाईलाजानं गावातल्या सगळ्यांना ही हिरवाई सोडून सरकारने दिलेल्या जागेवर पुनर्वसन करावं लागलं. आणि इतकी वर्ष निसर्गाच्या कुशीत वसलेलं अख्खच्या अख्ख गावं सोलापूरच्या ओसाड, खडकाळ आणि उंचवट्याच्या जागेवर जाऊन राहू लागलं.
पण गावकरी भारी चिवट! आपल्या निसर्गसंपन्नतेच्या आठवणी जागवत या खडकाळ, ओसाड जागेवरही चिंचणीकरांनी मोठ्या जिद्दनं वृक्षराजी फुलवली. गेल्या १० वर्षांत गावकऱ्यांनी गावाच्या आजुबाजुला ४ हजार झाडं लावलीत.
हे गाव मुळातच निसर्गप्रेमी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखा प्रकल्प गावात यशस्वीपणे चालतो. पावसाच्या पाण्याच्या एकही थेंब गावकरी वाया जाऊन देत नाहीत. पण मुळातच पाऊस नसेल तर पाणी येणार कुठुन? गेल्या उन्हाळ्यात संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळानं होरपळला. त्याची थोडीशी झळ चिंचणीलाही पोचलीच. पण अशा कसोटीच्या प्रसंगातही गावानं आधी झाडांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि मग उरलेलं पाणी गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी वापरलं, असं चिंचणीचे रहिवासी, श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं.
चिंचणी गावात एकूण ६५ कुटुंब राहतात. म्हणजे गावाची लोकसंख्या जेमतेम साडेतीनशेच्या आसपास असेल. झाडांमुळे संपूर्ण गाव झाकलं गेलंय. परिसरातले पक्षी या गावात स्थायिक झालेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात निरव शांतता, थंडगार हिरवी सावली आणि पाखरांची किलबिल असं स्वर्गीय आनंद देणारं वातावरण असतं.
या पाखरांसाठी ग्रामस्थांनी पाणवठे तयार केलेत. झाडांवर तांदूळ, गव्हाच्या प्लेट्स लटकवलेल्या दिसतात. एवढंच नाही तर पाखरांनी गाव सोडू नये म्हणून कोणत्याही कार्यक्रमासाठी फटाके फोडण्यावर गावकऱ्यांनी स्वतःच स्वतःवर निर्बंध घालून घेतलेत.
हेही वाचा :आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?
निसर्गप्रेमातूनच आता गावकऱ्यांनी नवीन प्रकल्प चालू केलाय. ‘आरेतली झाडं तोडल्याचा प्रचंड राग गावकऱ्यांच्या मनात होता. पण आता कापलेली झाडं परत जोडता येणार नाहीत. मग आदळआपट करून फायदा काय? असा विचार आम्ही सगळ्यांनी मिळून केला,’ असं अनपट म्हणाले.
निषेधाचा काहीतरी सकारात्मक मार्ग शोधला पाहिजे गावकऱ्यांना वाटत होतं. तेव्हा जितकी झाडं तोडली ती सगळी परत लावूया, असा तोडगा निघाला आणि ‘आरे रे रे.. आपण झाडंच लावूया ना!’ अशा घोषणांनी चिंचणी गावातली शनिवारची सकाळ दुमदुमून गेली.
आरेतल्या तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून गावानं ११०० झाडं लावायचं ठरवलं. त्यातली २५० झाडं शनिवारी एका दिवसांत लावून झालीसुद्धा! परवा, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी गावकऱ्यांनी ४०० झाडं लावण्याचा विक्रम केला. आता उरलेली सव्वाचारशे झाडं येत्या दोन, तीन दिवसांत लावून आपला निर्धार पूर्ण करण्याचं गावकऱ्यांनी पक्कं ठरवलंय.
हेही वाचा : रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली
झाडं लावण्यासाठी सगळे गावकरी एकत्र आले. यात महिला, पुरूष, म्हातारे-कोतारे, लहान मुलं, तरूण सगळ्यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला. यासाठी लागणारा सगळा पैसा गावकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून दिला. गावाजवळच असणाऱ्या सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीमधून ४० रूपयाला एक याप्रमाणे रोपं आणली. त्यात सगळ्यात जास्त म्हणजे ४०० झाडं जांभळाची आहेत. याशिवाय रामफळ, चिंच, चेरी, पेरू, आवळा, सिताफळ अशी जंगली फळझाडं लावली, अशी माहिती अनपट यांनी दिली.
गंमत म्हणजे आरेसाठी नुकसान भरपाई म्हणून ही झाडं लावण्यासाठी गावकऱ्यांनी जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला. जपानमधे अकीरा मियावाकी नावाचे मोठे वनस्पतीशास्त्रज्ञ होते. माणसं जशी समुहानं, एकमेकांना धरून राहतात तसं झाडंही राहतात. म्हणूनच, एकट्या दुकट्या झाड्यापेक्षा जंगलातली झाडं लवकर वाढतात आणि त्यामुळे जंगलात दाट झाडी असते, असं संशोधन मियावाकी यांनी केलं. त्यांच्या नावावरून या तंत्रज्ञानाला मियावाकी तंत्रज्ञान असं म्हणलं जाऊ लागलं.
चिंचणीमधे आरेची नुकसान भरपाई म्हणून लावलेली झाडं याच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन दाटीवाटीनं, जवळजवळ लावण्यात आलीत. दोन झाडांमधे फक्त ४ फुटांचं अंतर राहील, अशी काळजी गावकऱ्यांनी घेतलीय. अशा पद्धतीनं झाडं लावली तर येत्या ३ वर्षांतच तिथं घनदाट जंगल उभं राहील,’ असा विश्वास मोहन अनपट यांनी व्यक्त केला.
ही झाडं गावाच्या बाहेर असणाऱ्या उताराच्या जमिनीवर लावलीत. ही पडीक जमीन आहे. तिथे काही वर्षांत अतिक्रमण होणार हे गावकरी ओळखून होते. म्हणूनच मियावाकी तंत्रज्ञान वापरून तिथं जंगल तयार करायचं ठरलं. एकदा जंगल झालं की कोणीही सहज अतिक्रमण करू शकणार नाही, असं इथल्या ग्रामस्थांना वाटतं.
‘या झाडांची काळजीही आम्ही स्वतःच घेणार आहोत. ट्री गार्डवर पैसे खर्च करण्यापेक्षा आम्ही दर रविवारी सकाळी ६ ते ८ असे दोन तास या कामासाठी राखून ठेवलेत. यावेळी झाडांना आळी घालायची, पाणी द्यायचं, हवं नको ते बघायचं. पाणी द्यायचं अशी सगळी कामं गावातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे जण करतील,’ असंही अनपट म्हणाले. लवकरच या झाडांसाठी गावात ठिबक सिंचन योजना राबवली जाणार आहे.
हेही वाचा : प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?
या सगळ्यासाठी आता मोठा निधी लागणार आहे. शिवाय चिंचणी गाव कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचंय आणि गावातल्या तरूणांना रोजगार मिळवून द्यायचा, अशी गावकऱ्यांची योजना आहे. पण यासाठी चिंचणीला सरकारचा एक रुपयाही नको. ‘आरेला शासनाची मदत होती, तरीही त्याचं व्हायचं ते झालंच ना? शिवाय या सगळ्या प्रक्रियेत अडकून पडलं की मुख्य काम थांबतं,’ असं अनपट म्हणाले.
सरकारकडूनच नाही तर एनजीओ किंवा समाजसेवी संस्थांकडूनही पैसे घ्यायचे नाहीत, असं गावकऱ्यांनी ठरवलंय. त्याऐवजी गावाच्या विकासासाठी आता १ लाख रूपये गुंतवा आणि आठ वर्षांनी त्याच्या दुप्पट परत घ्या, असं आवाहन गावकरी करतायत. गाव पूर्णतः स्वावलंबी करण्याचा त्यांचा हेतू आहे.
झाडं लावा आणि झाडं जगवा याचा खरा अर्थ चिंचणीकरांना उमगलाय. म्हणूनच तर झाडं लावून, ते जगवून त्यावर पक्षी रहायला यावेत इथपर्यंतच्या इकोसिस्टीमचा ते विचार करू शकतात. एका माणसामागे १ झाड असलं पाहिजे असं म्हटलं जातं. पण एका माणसामागे एक नाही, दोन नाही तर १५० झाडं लावली की मगच हे चिंचणीकर शांत बसणार आहेत.
हेही वाचा :
जगभरातल्या तरुणांना दोस्ती शिकवणारी फ्रेंड्स पंचविशीत
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी
भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!