द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

२७ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


नेटफ्लिक्सवरची 'द सोशल डायलेमा' ही फिल्म सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडिया कंपन्यांचं वर्तन अनेकांना समस्या वाटतच नाही, अशांसाठी ही फिल्म डोळे उघडणारी आहे. सोशल मीडिया प्रत्येक युजरचं वर्तन जाहिरातदारांना विकत असतो.

'बिग ब्रदर इज वॉचिंग यू', हे जॉर्ज ऑर्वेलच्या १९८४ या कादंबरीतलं एक गाजलेलं वाक्य. कादंबरीतल्या दमनकारी व्यवस्थेत एक अदृश्य बिग ब्रदर आहे, जो नेहमीच लोकांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतो. आजच्या काळात सोशल मीडिया कंपन्याही युजरशी तेच करतायत. 

आपल्याला हे वरवर माहिती आहे. पण त्याची व्याप्ती, त्याची भयानकता आणि संभाव्य परिणाम आपल्याला माहिती नाहीत. ते नेटफ्लिक्सवरच्या जेफ ऑर्लोवस्कीनं दिग्दर्शित केलेल्या 'द सोशल डायलेमा' या डाक्युड्रामा फिल्ममधून समोर येतंय.

फिल्ममधे नेमकं काय?

गूगल, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर, अमेझॉन, प्रिंटरेस्ट, रेडइट, यू ट्युब, मोजिला या जगातल्या टॉपच्या टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत. या कंपन्यांमधले माजी कर्मचारी आपल्याला सोशल मीडियाची काळी बाजू दाखवून देतात. 

सोशल मीडिया कंपन्या काम कसं करतात, त्याचं डिझाईन कशा पद्धतीने केलं गेलंय, त्यांचा अल्गोरिदम किंवा आर्टिफिशियल इंटलिजन्स कशा पद्धतीने युजरला त्यांच्या जाळ्यात ओढतो, त्यामागचं अर्थकारण किती मोठंय याची माहितीही देतात आणि त्याबद्दल सतर्कही करतात. 

अनेक डेटा शास्त्रज्ञ, सोशल मीडिया तज्ञ, लेखक यांच्याही मुलाखती यात आहेत. यातून सोशल मीडियाने सध्याच्या मानवी संस्कृतीसमोर कसा पेच निर्माण केलाय, युजर कसा या कंपन्यांच्या हातातलं बाहुलं बनलाय, आणि वेळीच सावरलो नाही तर ते किती धोकादायक ठरू शकतं, अशी या सर्वांची मतं आणि जोडीला एका कुटूंबातला सोशल मीडिया अ‍ॅडिक्ट झालेल्या तरूणाची कथा, अशा सगळ्यातून ही फिल्म उलगडत जाते.

हेही वाचा : कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'

युजरना नादी लावलं जातं

आजघडीला जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे. तर सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या ३६० कोटी म्हणजे जवळपास निम्मी आहे. यातले ३२ कोटी वापरकर्ते भारतात आहेत. सोशल मीडिया हे एक प्रकारे ड्रग्जच आहे. अनेकजणांना याचं व्यसन लागलंय. 

पण यात केवळ युजरची चूक नाही. त्यांचं तसं कंडिशनिंग करण्यात आलंय. प्रसंगी लाईक, कमेंट, शेअर, सजेशनद्वारे युजरला उत्तेजित करून त्याचा स्क्रीनटाईम वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.

यात जनरेशन झेड म्हणजेच १९९६ नंतर जन्माला आलेले आणि विशेषतः टीनएजरची संख्या मोठी आहे. एवढंच काय, पण फिल्टर केलेल्या फोटोमधे आपण कसे दिसतो, तसंच दिसता यावं, असा मानसिक विकार अनेकांना झाला आहे. स्नॅपचट डिसमॉर्फिया असं त्याचं नाव. 

सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या या जाळ्यातून लहान मुलंही सुटणार नाहीत. कारण लहान मुलांसाठीची वर्जन येताहेत. उदाहरणार्थ यूट्युब किड्स. एकप्रकारे सगळ्याच युजरना नादी लावलं जातंय.

आपण सोशल मीडिया वापरतो, असं आपल्याला जरी वाटत असलं तरी वस्तुस्थिती हीच आहे की सोशल मीडियाकडून आपणच वापरले जात असतो. 

कंपन्यांच्या डेटाचं बिजनेस मॉडेल

सोशल मीडिया हे यूजरसाठीचं टूल नाहीय. तर त्याची स्वतःची उद्दिष्ट आहेत. ती पूर्ण करण्यासाठी युजरच्या मानसिकतेचा वापर युजरविरोधात केला जातो. युजर हा सोशल मीडियाचा ग्राहक नसून प्रॉडक्ट आहे. 

सोशल मीडियाचे खरे ग्राहक आहेत जाहिरातदार आहेत. म्हणूनच सोशल मीडिया वापरण्यासाठी आपल्याला पैसै मोजावे लागत नाहीत. आपल्याला एखादं उत्पादन फुकट मिळतं, तेव्हा आपण स्वतःच उत्पादन बनलेले असता. हीच समस्या आहे. माणूस त्याच्याही नकळत सोशल मीडियाच्या हातातलं बाहुलं बनून जातो. 

या प्रॉडक्टच्या वर्तनावर आणि भावनांवर प्रभाव टाकला जातो. त्यासाठी सोशल मीडियातले रेकमेंडेशन गोबेल्सप्रमाणे काम करतात. या टेक कंपन्यांनी डेटातून त्यांचे बिजनेस मॉडेल विकसित केलेत. 

कंपन्या त्यांच्या जाहिरातदारांना युजरच्या वर्तनाची खात्री देतात. त्यासाठी कंपन्यांना युजरबद्दल अत्यंत योग्य आडाखे, अंदाज वर्तवावे लागतात आणि त्यासाठी गरज असते प्रचंड प्रमाणात डेटाची. अब्जावधी रूपयांची उलाढाल असलेल्या या नव्या बाजारपेठेत माणसाचं भविष्य विकलं जातं. 

एकप्रकारे शेयर मार्केटमधल्या फ्युचर ऑप्शन सारखाच हा प्रकार आहे. या कंपन्यांसाठी प्रत्येक युजर हा माणूस नसून केवळ एक डेटा असतो. इतका निर्विकार आर्थिक विचार या मागे आहे.

हेही वाचा : हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

सोशल मीडिया आपल्याला बदलावतो

व्यावसायिक उद्दिष्टपूर्तीसाठी युजरच्या वर्तनात कसा बदल घडवून आणता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात. किंबहुना कंपन्यांना जसं वाटतं तसं युजरनं वागावं अशी परिस्थिती अल्गोरिदमद्वारे निर्माण केली जाते. 

सोशल मीडिया एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चालवला जातो. एआयला तुमची सर्व माहिती आहे, तुम्ही पुढे काय कराल याचाही अंदाज आहे आणि म्हणून ही खूपच एकतर्फी लढाई आहे. सोशल मीडियात पाहतोय ते युजर सत्य मानतो पण आपल्या ऑनलाइन फ्रेंड सर्कलमधल्या कॉमन आवडीवरून तशी न्यूज फीड आपल्याला पुरवली जातात. 

ही प्रक्रिया वारंवार होते. त्यातून एक वेळ अशी येते की, आपल्याला सहज मॅनिप्युलेट करता येतं. अत्यंत कमी खर्चात मॅनिप्युलेटेड नरेटिव लोकांपर्यंत अत्यंत सहज पोचवला जातो. सोशल मीडियाचा अल्गोरिदम त्याच पद्धतीने काम करतो. 

त्यातून निर्माण होतात फेक न्यूज. ज्याचा वापर कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून होऊ शकतो. फेक न्यूज सहापट वेगाने पसरतात. आजघडीला एखाद्या देशातल्या लोकांवर नियंत्रण ठेवायचं तर त्यासाठी फेसबूकपेक्षा चांगली गोष्ट दुसरी नाही. 

लोकांना प्रभावित करण्यासाठी फेसबूकवरच्या एखाद्या ग्रुपमधून पृथ्वी सपाट आहे, असं मानणार्‍या १०० जणांना निवडून कॉन्स्पिरसी थिअरी पसरवता येते. त्यातून पृथ्वी सपाटच आहे, हे मानणारे आणखी एक हजार लोक फेसबूक तुम्हाला मिळवून देऊ शकतं. त्यांचा वापर आणखी कॉन्स्पिरसी थिअरीज पसरवण्यासाठी होतो. हे सगळं, अत्यंत प्रभावी सादरीकरणातून या डाक्युड्रामातून उलगडलं आहे.

फिल्म डोळे उघडणारी ठरावी

माहितीच्या या अशा इकोसिस्टममधून धार्मिक ध्रुवीकरण, दंगली, यादवी, अराजक माजण्याची शक्यता खूप आहे. लोकशाहीविरोधी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळणं संपूर्ण मानवजातीसाठी घातक ठरू शकतं. 

हे असंच सुरु राहिलं तर पुढच्या २० वर्षात आपण मानवी संस्कृतीच नष्ट करून टाकू, असा इशाराही या डॉक्युड्रामातून दिलाय. आता हे सगळं कळल्यावर अवतीभोवतीच्या घटनांचा अर्थ लक्षात येऊ शकतो. 

कसा एखादा उद्योगपती आपल्या कंपनीमार्फत लोकांना मोफत इंटरनेट पुरवतो? एखादी ऍक्टर सोशल मीडियातून बेताल वक्तव्य करत राहतेे? एखाद्या दंगलीसाठी हेट स्पीच थिअरी कशी वापरली जाऊ शकते? एखादा देश प्रतिस्पर्धी देशाच्या निवडणुकीत कसा हस्तक्षेप करू शकतो? वगैरे. 

आवडता, नावडता राजकीय पक्ष, नेता यांविषयीची टोकाची मतं हे सर्व याचाच भाग आहे. आता प्रश्न आहे, मग करायचं काय? मुळात समस्या सोडवण्यासाठी समस्या आहे हे मान्य करावं लागतं.  

सोशल मीडिया कंपन्यांचं वर्तन अनेकांना समस्या वाटतच नाही. त्यांच्यासाठी ही फिल्म डोळे उघडणारी आहे. या कंपन्यांवर नियंत्रणासाठी सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे. किमान ऑनलाईन स्क्रीन टाईम, १६ वर्षांपर्यंत सोशल मीडिया वापरायला बंदी, सजेशन्सबाबत दक्षता, हे आपण करू शकतो. मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर शेवटी तंत्रज्ञान हे माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही, हे विसरता कामा नये.

हेही वाचा : 

जॉर्ज ऑरवेल : सत्तेच्या खेळाचा चिरंतन भाष्यकार

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

कोरोनाच्या या काळात आपल्याला विचित्र स्वप्नं का पडतात?

तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?