काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचं भवितव्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलं गेलंय. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली विधानसभा निवडणूक ही काँग्रेसची लिटमस टेस्ट आहे. राजकीयदृष्ट्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेमचेंजर ठरेल की नाही, हे सांगता येत नाही; पण एक विश्वासार्ह राजकारणी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यात या यात्रेमुळे निश्चित यश आलंय.
कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?
आगामी विधानसभा निवडणुकांमधे रिमोट वोटिंग सिस्टीमचा प्रयोग करण्यात येणार आहे. मतदार कुठंही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असला तरी ईवीएमबद्दल साशंकता व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या याबद्दलही काही शंका आहेत. त्याचं निवडणूक आयोगाने निरसन करुन ही यंत्रणा निर्दोष असल्याचं सिद्ध करायला हवं.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं.
ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचं नुकतंच निधन झालंय. काँग्रेसच्या उच्चवर्णीय राजकारणाला छेद देत देशात इतर मागासवर्गीयांचं जे राजकारण उभं राहिलं त्याला शरद यादव यांच्या रूपाने एक चेहरा मिळाला होता. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करवून घेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. विद्यार्थी चळवळीतून आलेल्या या नेत्यानं समाजवादी विचारांशी असलेली घट्ट बांधिलकी शेवटपर्यंत सोडली नाही.