कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

०५ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.

इंग्लंडमधे झालेल्या वर्ल्डकपनंतर भारतात एकच चर्चा होती ती म्हणजे विराटला कॅप्टनशीपवरुन हटवण्याची. पण आता ती चर्चा होत नाही. कारण विराटने नुकतेच कॅप्टन म्हणून भारतातील सर्व यशस्वी कॅप्टनचे सारे विक्रम मागे टाकलेत.

विशेष म्हणजे काही जाणकारांच्या मते त्याच्या कारकिर्दीतल्या विक्रमांमधे वनेडेतल्या विक्रमांची संख्या मोठी असेल. पण नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घालत आपण आता सर्वच स्तरावर परिपक्व होतोय, याची प्रचिती दिली.

हेही वाचाः लोक म्हणतील पोलिस असे असतात, वकील तसे असतात. पण मुद्दा तो नाहीच

वयासारखा प्रगल्भपणाही वाढतोय

आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करतोय. स्टायलिश दाडी हळूहळू पिकू लागलीय तसा आता तो एक १९ वर्षांचा खट्याळ मुलगा राहिला नाही. तो आता परिपक्व होतोय. तसंही टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन होणं म्हणजे सौरव गांगुलीसारखं डोक्याची केसं घालवून घेणं आणि माहीसारखं दाडी पिकवून घेणंच असतं.

विराट कोहलीची आकडेवारी, त्याच्या विक्रमांचं सुसाट सुटलेलं मीटर हे त्याच्या प्रत्येक चाहत्याला तोंडपाठ आहे. त्यामुळे त्याची उजळणी करण्यात अर्थ नाही. पण विराट आता वयाची तिशी पार करतोय. या वयात सगळ्यांचाच वात्रटपणा कमी होऊन ते काहीअंशी प्रगल्भ होण्याकडे वाटचाल करत असतात. विराटही अशीच वाटचाल करतोय का?

गेल्या काही घटनांकडे पाहता विराट आता परिपक्व होतोय, असं दिसतं. उदाहरणचं सांगायचं झालं, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मॅचवेळी स्टीव स्मिथला काही प्रेक्षक चिडवत होते. त्यावेळी विराटने त्या प्रेक्षकांना गप्प करत स्मिथच्या कमबॅकला पाठिंबा दर्शवला. तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विराट आणि स्मिथ एकमेकांचे स्पर्धक आहेत. पण विराटने आपल्या स्पर्धकाला कठीण काळात पाठिंबा देत स्पोर्ट्समनशिप काय असते याचं उदाहरण घालून दिलं.

विराट एक वात्रट मुलगा

विराट एक वात्रट मुलगा आहे. त्याची मैदानावरची अतिआक्रमकता हाच त्याचा मुळचा स्वभाव असल्याची टीका विराटवर होते. पण त्याने आपली ही आक्रमकता मैदानावरची स्ट्रॅटेजी असल्याचं सांगितलं ही टीका खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. चांगली कामगिरी करण्यासाठी ही आक्रमकता प्रेरित करते, असं त्याचं म्हणणं आहे. सध्या त्याची ही आक्रमकता थोडी कमी झाली असल्याचं दिसतं.

काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचे माजी खेळाडू फारुख इंजिनिअर यांनी कमी अनुभवाच्या मुद्द्यावरुन निवड समितीवर टीका केली होती. पण ही टीका करताना त्यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला मधे ओढत निवड समितीने वर्ल्डकप दरम्यान अनुष्काला फक्त चहाचे कप आणून देण्याचं काम केल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचा रोख हा निवड समिती विराटच्या इशाऱ्यावर काम करत असल्याकडे होता.

पण यात अनुष्काला ओढल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं. अनुष्काने यावर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली. त्यानंतर फारुख इंजिनिअर यांना अनुष्काची माफी मागायला लागली. विशेष म्हणजे या प्रकरणात विराटने एक अवाक्षरही न काढता आपल्यालेखी या वादाची काय किंमत आहे हेच अधोरेखित केलं.

हेही वाचाः सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

मानसिक संतुलन राखण्याचं आव्हान

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट वर्तुळात मानसिक संतुलनाची चर्चा होतोय. इंग्लंडची प्रसिद्ध आणि विक्रमी विकेट किपर सारा टेलरने मानसिक कारणामुळे आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल यानेही याच कारणास्तव क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला. 

दोन्ही खेळाडू मैदानावर हसऱ्या चेहऱ्याने वावरत होते. त्यामुळे त्यांना मानसिकदृष्ट्या काही अडचण असेल असं जाणवलं नाही. या दोन उदाहरणांवरुन व्यावसायिक खेळाडूंवर किती मानसिक दबाव असतो याची कल्पना लोकांना येऊ लागलीय.

याच दृष्टीकोणातून भारताचा तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन असलेल्या व्यक्तीवर किती दबाव असेल याची जाणीव होते. भारताच्या १०० कोटींच्या वर असलेल्या क्रिकेटवेड्या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरं उतरायचंय. मीडियाचा उतावळेपणा, लहरीपणा सांभाळायचा, सोशल मीडियावरली अनसोशल घटकांची डोकेदुखी तर रोजचीच असते. सेलिब्रेटी पत्नी असल्याचे साईड इफेक्टही सहन करायचे.

स्वतःचाच स्वतःशी संवाद

एवढं सगळ करताना मानसिक दमछाक होणार हे नक्की असतं. यात भरीस भर म्हणजे टीम इंडियाच्या टाईट शेड्यूलमुळे येणारा ताण वेगळाच. पण विराटने हे समर्थपणे सांभाळलंय. त्याबाबतीत हॅट्स ऑफच. विराट हा मानसिकदृष्ट्या कणखर का आहे याचं उत्तर त्याने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःलाच लिहिलेल्या पत्रातून मिळतं.

विराटने स्वतःलाच स्वतःच्या जडणघडणीविषयी पत्र लिहिण्याची गोष्ट खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याने स्वतःलाच यशस्वी होण्यासाठीच्या टिप्स सांगितल्यात. यातील काही मुद्दे सर्वांसाठीच उपयुक्त आहेत.

खेळाडू म्हणून तुम्ही कुठंपर्यंत पोचता यापेक्षा तुम्ही कसा प्रवास करता हे महत्वाचं असतं असं त्याने लिहिलंय. हे सूत्र सामान्य माणसाच्या सामान्य आयुष्यातही लागू होतं. ज्याला हे कळाले त्याचा छोट्या मोठ्या गोष्टी मिळाल्या किंवा नाही मिळाल्या तरी त्याचा प्रवास सुरुच असतो. यामुळे तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळवू शकता. विराट लिहितो, ‘सगळेच जण अपयशी ठरतात. पण त्यानंतर उभारी घेणं महत्वाचं असतं. सतत प्रयत्नवादी असाल तर यश मिळतंच.’

हेही वाचाः स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

विराट कामगिरीच्या सदिच्छा

पत्राच्या दुसऱ्या भागात त्याने आपल्या वडिलांविषयी लिहिलंय. वडिलांनी आपल्याला हवे असलेले शूज घेऊन दिले नाहीत म्हणून नाराज होऊ नको. यापेक्षा वडलांनी आपल्याला सकाळी प्रेमाने मिठी मारण्यापुढे काहीच नाही, असं तो लिहितो. यावरुन विराटने पुढच्या पिढीला संदेश देताना गिफ्ट्सपेक्षा आपल्या आईवडलांचं प्रेम महत्वाचं असतं हे सांगितलं. 

आपण उगाचच त्याला त्याच्या आक्रमकपणामुळे बालिश आणि वात्रट म्हणत होतो. हे पत्र गांभिर्याने वाचलं तर विराट इतका दबाव झेलूनही कसा यशस्वी होतो. त्याला नैराश्य का येत नाही किंवा तो नैराश्यातून लगेच बाहेर कसा पडतो याचं गणित उलगडू लागतं. यावरून विराट कामगिरी करणाऱ्या विराटची पुढची कारकीर्द कशी असेल याचीही झलक दिसते. विराटने आता तिशी पार केलीय. त्याला खूप शुभेच्छा आणि तो अशीच विराट कामगिरी करुन इतरांना प्रेरणा देत राहो, ही सदिच्छा.

हेही वाचाः 

विराट पोरा, हे वागणं बरं नव्हं!

पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

विराटचं बर्थडे गिफ्ट टीमला भोवणार नाही ना?

रोहित विराटच्या पुढं जाऊ शकत नाही, कारण…

सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल?