विनू मंकड महान क्रिकेटर, त्यांना फक्त मंकडिंगसाठी लक्षात ठेवणार?

१२ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आयपीएलचा नवा सीजन सुरू झाला आणि मंकडिंगचा वाद आला. अश्विनने जोस बटलरला आऊट केलं. तेव्हापासून सगळीकडे मंकडिंगची चर्चा सुरू झाली. फक्त त्यासाठीच पद्मभूषण विनू मंकडना आठवणं हा त्यांचा अपमान आहे. कारण त्यांनी देशाच्या क्रिकेटमधे फार मोठं योगदान दिलंय. आज त्यांचा जन्मदिन.

विनू मंकड टीम इंडियामधे ओपनिंग बॅट्समन होते. ते मंकडिंगसाठी प्रसिद्ध आहेत. विनू मंकड यांनी १९५६ मधे एक रेकॉर्ड केला. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमधे मंकड आणि पंकज रॉय यांनी ४१३ रन्सची ऐतिहासिक पार्टनरशिप केली. त्यांचा हा रेकॉर्ड तब्बल ५२ वर्ष कुणी मोडू शकला नाही. त्यांना सगळेच जण अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ओळखतात.

पण विनू मंकड यांनी घेतलेल्या एका विकेटवरून खूप वाद झाला. आणि त्या विकेटलाच मंकडिंग म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

पहिल्यांदा मंकडिंग कधी झालं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९४७ मधे टेस्ट सिरीज झाली होती. या सिरीजमधल्या दुसऱ्या मॅचमधे मुलवंतराई हिंमतलाल मंकड म्हणजे विनू मंकड यांनी बिल ब्राऊनला आऊट केलं. 

बॉलर बॉल टाकण्याआधी जर नॉन स्ट्रायकर बॅट्समन क्रीज सोडून पुढे गेल्यास त्याला रन आऊट पद्धतीने बाद करणं म्हणजेच मंकडिंग. जसं नुकत्याच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आयपीएल मॅचमधे अश्विनने जोस बटलरला बाद केलेल. त्यामुळे मंकडिंग हा शब्द पुन्हा कानावर आला.

त्यावेळी या घटनेवर ऑस्ट्रेलियातल्या मीडियाने सडकून टीका केलेली. हे स्पिरिट ऑफ द गेमच्या विरुद्ध असल्याचं मत मांडलं गेलं. त्यावेळी त्यांनी या घटनेला मंकड कृत्य असं संबोधलं.

हेही वाचा: क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

विकेटला मंकडिंग नाव पडलं

क्रिकेट विषयक नियम तयार आणि दुरुस्त करणाऱ्या मेलबर्न क्रिकेट क्लब संस्थेनं मंकड यांनी घेतलेली विकेट ही नियमांना धरून असल्याचं सांगितलं. एमसीसीनंतर ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनीही याचं समर्थन आपल्या पुस्तकात केलं.

पण या घटनेनंतर अशाप्रकारच्या विकेटला विनू मंकड यांचं नाव कायमच चिकटलं. आजही अशा घटनेला संबोधताना त्यांच्याच नावाने संबोधलं जातंय.

मंकडिंगने होतेय मंकड यांची कुप्रसिद्धी

मंकड नावाची चर्चा अशा वादग्रस्त घटनेबरोबर होणं आणि अशा घटनांना त्यांचं नाव देणं हे काही सुनील गावसकर यांना आवडलं नव्हतं. त्यांनी बऱ्याचदा अशा घटनेला त्यांच्या नावाने ओळख न देण्याबद्दल सांगितलेलं.

एका महान खेळाडूचं नाव अखिलाडूवृत्तीचं दर्शन घडवणाऱ्या विकेटसाठी वापरण्यात येतंय. त्याचबरोबर याची चर्चा पुन्हा सुरु होण्यासाठी एक भारतीय खेळाडू जबाबदार आहे. हेही दु:खद आहे. अश्विनन अशाप्रकारची विकेट यापूर्वी २०१२ साली इंड़ीया विरुद्ध श्रीलंका मॅचमधे घेतली होती. मात्र त्यावेळी सचिन  आणि सेहवागने विकेटची अपिल मागे घेतली होती. त्यामुळे मंकडिंग विकेट घेऊनही बॅट्समन आऊट झाला नाही.

हेही वाचा: मदतीला धावून येणाऱ्या टीम मॅनेजमेंटकडून नंतर वासीम जाफरने पैसेही घेतले नाहीत

यामुळे  विनू मंकड यांचं नाव एकप्रकारे अखिलाडूवृत्तीच्या घटनेशी जोडण्याचं समर्थनच.

मंकड यांची रेकॉर्डब्रेक कामगिरी

विनू मंकड यांचा लौकिक भारताचे उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून राहिला. ते टेस्टमधे भारताकडून सगळ्यात आधी १ हजार रन आणि १०० विकेट घेणारे प्लेअर ठरले. त्यांनी ही कामगिरी फक्त २३ मॅचमधे केलीय. तसंच टेस्टमधे ५२ वर्ष अबाधित राहिलेला सर्वोच्च भागिदारीचा विक्रमही त्यांच्याच नावावर राहिला.

मंकड यांच्या नावाने बीसीसीआय ज्युनियर खेळाडूंसाठी स्पर्धा भरवतं. त्यांच्या गौरवशाली इतिहासाने तरूण खेळाडू प्रभावित होतात. त्यांचा फोटो पॅवेलियनमधल्या खेळाडूंना उर्जा देतो. 

लॉर्ड्सवर १९५२ मधे झालेल्या टेस्टमधे विनू मंकड यांनी पहिल्या डावात ७२ आणि दुसऱ्या डावात १८४ रन काढले. याच टेस्टमधे त्यांनी ५ विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचं नाव लॉर्ड्सच्या प्रसिद्ध दोन्ही ऑनर बोर्डवर कोरलं गेलं. इंग्लंडचे खेळाडू सोडून अशी कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंपैकी एक नाव विनू मंकड यांचं आहे.

हेही वाचा: आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही

विजयासाठी युक्ती वापरणं बदनामकारक ठरतं

ऑस्ट्रेलियन खेळाडू अखिलाडूवृत्ती म्हणून गळा काढतात. पण ते आणि त्यांचे सिनियर खेळाडू काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमधे न्यूझीलंड जिंकू नये म्हणून ग्रेग चॅपेलने अंडर आर्म बॉलिंग केलेली. हे नियमात बसल्याने त्यावर कुणीही काही म्हटलं नाही.

महाभारतातही या छळकपटाचे दाखले सापडतात. भीमाचा मुलगा घटोत्कच हा दानव गटात मोडणारा. त्याने रात्रीचा फायदा घेऊन कौरव सेनेचा संहार केला. तसं बघितलं तर सुर्यास्तानंतर युद्धविराम असतो. पण हा नियम फक्त मानवांना लागू होतो दानवांना नाही. त्यामुळे तो संहार धर्माला म्हणजे नियमाला धरुनच होता असं म्हटलं गेलं.

जिंकण्यासाठी बायपास वापरणाऱ्यांची कमतरता नाही. पण अशा घटना या फक्त युक्त्या वापरणाऱ्यांची बदनामी करतात. असे विजय इतिहासात गौरवशाली विजय म्हणून गणले जात नाहीत.

हेही वाचा: पुरे झाली आता विराट कोहलीची कॅप्टनशिप?

मंकडिंग शब्द न वापरण्याची खबरदारी घ्या

भारतीय क्रिकेटचा इतिहास समृद्ध करणाऱ्या लिजंड खेळाडूचं नाव वादग्रस्त आणि अखिलाडूवृत्तीच्या संबोधल्या जाणाऱ्या विकेटला अनधिकृतरित्या जोडलं जावं याच्यासारखी शोकांतिका दुसरी नाही. म्हणूनच गावसकर प्रत्येकवेळी या घटनेला मंकडिंग, मंकडेड असं संबोधण्याच्या विरोधात आहेत.

या नावाचा उल्लेख अशाप्रकारे कधीही होऊ नये यासाठी भारताच्या नव्या पिढीतल्या बॉलर्सनी अशा प्रकारे  बॅट्समनला बाद करणं बंद केलं पाहिजे. जाणत्या क्रिकेट रसिकांनी, हर्षा भोगलेसारख्या उत्तम जाण असलेल्या जाणकारांनी अशा कृतीचं कधीही कुठेही समर्थन करु नये. तरच मंकडिंग शब्द इतिहासजमा होईल.