संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव

२४ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


२२ मार्चच्या रविवारी सामनात शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक या सदरात लिहिलेला `देवांनी मैदान सोडले` हा लेख सध्या गाजतोय. `कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले`, असं सांगणारा हा लेख मुद्दामून कोलाजच्या वाचकांसाठी देतोय. कोलाजच्या स्टाइलबुकनुसार केलेले काही बदल वगळता हा लेख सामनानुसार जशाच्या तसा आहे. यातली सबहेडिंग मात्र आम्ही दिलीत.

कोरोना वायरसच्या विळख्यात जग तडफडताना दिसत आहे. जगाची इतकी तडफड दुसऱ्या महायुद्धातही दिसली नव्हती. स्वतःला ‘सुपर पॉवर’ समजणारे बहुतेक सर्व देश कोरोना वायरसपुढे हतबल झाले आहेत. चंद्रावर आणि मंगळावर ‘पाय’ ठेवणाऱ्या अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती आणि आणीबाणीच जाहीर केली आहे.

साऱ्या जगावर एकेकाळी राज्य करणाऱ्या ग्रेट ब्रिटनने तर स्वतःला कोंडून घेतलं आहे. सम्राज्ञी एलिझाबेथ यांना त्यांच्या राजप्रासादातून ‘वेगळं’ केलं आहे. अनेक मोठ्या देशांत हे घडत आहे.

देवांना विषाणूंपासून संरक्षणाची वेळ

निसर्गाने मानवी अहंकाराचा, देवधर्माचा केलेला हा पराभव आहे. संकटकाळी माणूस देवाला शरण जातो. कोरोनामुळे उलटंच झालं आहे. धर्म हा तर सध्याच्या राजकारणाचं सगळय़ात मोठं भांडवल झालं आहे, पण कोरोना प्रकरणात स्वतः देवांनाच विषाणूंपासून संरक्षण द्यायची वेळ आली.

हिंदू, इस्लामी, बुद्ध असे सर्वच धर्मीय देश जणू मरून पडले आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ‘देवळे’ कोरोनाच्या भीतीने बंद करावी लागली. भक्तांचा ओघ आहे म्हणून मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होतं. भक्तांचा ओघच थांबला. त्यामुळे कसले देव आणि कसले देवत्व?

महाराष्ट्रात कोरोना वायरस वाढू नये म्हणून सिद्धिविनायक मंदिर बंद केलं. तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, पुण्यातलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, त्र्यंबकेश्वरचं मंदिर बंद केलं आहे. शिर्डीत शुकशुकाट आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर बंद करण्यात आलं आहे. देवांनी अनेक असुरांचा वध केला असं पुराणात सांगितलं गेलं, पण एक विषाणू देवांवर भारी पडला.

हेही वाचा : पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

संकटात देवच मैदान सोडतो

मक्केपासून वॅटिकनपर्यंत आणि बालाजीपासून बुद्धगया मंदिरापर्यंत ‘कोविड-१९’ म्हणजे कोरोनाने सिद्ध केलं की माणसांवर येणाऱ्या प्रत्येक संकटप्रसंगी ईश्वर सगळ्यात प्रथम मैदान सोडून जातो, असं तस्लिमा नसरीनने नुकतंच म्हटलं आहे.

मक्केत सर्व काही ठप्प आहे. पोपचा ईश्वराशी संवाद सध्या बंद आहे. पुजारी मंदिरातील मूर्तींना मास्क लावून धर्मकांड करीत आहेत. सर्वच धर्मांनी आणि त्यांच्या ठेकेदारांनी कोरोना वायरसने भयभीत मानवांना असहाय्य अवस्थेत निराधार करून सोडून दिलं आहे.

आता इस्लाम खतरें में कुठे?

त्याच धर्मासाठी हिंदुस्थानसह जगभरात रक्तपात आणि हिंसाचार होतो, पण कोरोनाच्या हल्ल्यातून एकही धर्म वाचला नाही. यातून कोणी शहाणपण घेईल काय? मदिनेत पैगंबर मोहंमदांचं जिथं दफन झालं तिथली ‘तीर्थयात्रा’ स्थगित केली आहे. या वेळी हजयात्राही कोरोनामुळे होईल काय ही शंकाच आहे.

अनेक मशिदींत जुम्माचा नमाज स्थगित केला आहे. कुवेतमध्ये विशेष अजान करून लोकांना घरीच ‘इबादत’ करण्याचा आग्रह केला आहे. मौलवीसुद्धा आता ‘इस्लाम खतरे मे’ची बांग देताना दिसत नाहीत आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी मशिदीत जाऊन अल्लाकडे दुवा मागा असं सांगत नाहीत.

कारण त्या सर्वच धर्मांच्या ठेकेदारांना आता खात्री पटली आहे की ‘अल्ला’ आता आपल्याला नॉवेल कोरोना वायरसपासून वाचवायला येणार नाही. फक्त वैज्ञानिकच वाचवू शकतील. जे वायरसवर लस शोधण्याची शर्थ करीत आहेत.

हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

गाडगेबाबा खरे ठरले

कोरोनाशी सामना करण्यात नवसाचे देवही तोकडे पडले. ‘गोमांस’ घरात ठेवणं हा धर्मद्रोह आहे असं ठरवून माणसं मारण्यात आली, पण जे गोमांस खात नाहीत तेसुद्धा कोरोनाचे शिकार झाले. महाराष्ट्रात गाडगेबाबांनी जे सांगितलं तेच शेवटी खरं ठरलं.

नवस, आवस, देवधर्म खरा नाही. मानवता हाच धर्म आहे हे सांगणारे गाडगेबाबा खरे. देवळात जाऊ नका. मूर्तीची पूजा करू नका. देवापुढे पैसा, फूल ठेवू नका. तीर्थी धोंडा पाणी। सत्यनारायण पुजू नका. पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका. प्राण्यांची हत्या करू नका. दारू पिऊ नका. सावकारांचं कर्ज काढू नका. आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या, असं गाडगेबाबा कीर्तनात सांगत.

देव दगडाचा, माणूसच खरा

गाडगेबाबांनी कोणत्याही मूर्तीपुढे कधीच मान तुकवली नाही. ते विज्ञानवादी संत होते. नवसआवस करून महामारी पळत नाही, हे त्यांनी सांगितले. ते पुन्हा पुन्हा खरे ठरले. येशूनेही चमत्कार केला नाही. मक्का मदिनाने चमत्कार केला नाही आणि देवही लोकांपासून वेगळे झाले.

शेवटी विज्ञान आणि वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर माणसेच कोरोनाशी लढत आहेत. लोकांना घरी बसावे लागलं. लोकांचा रोजगार गेला. देवाच्या दानपेटीतला पैसा कमी झाला हे सत्य आहे. पण लोकांच्या मदतीला धर्माची कोणतीही शक्ती आली नाही. तोंडास फडकं बांधावंच लागलं आणि सॅनिटायझर नावाच्या द्रवाने हात सतत साफ करीत काम करत राहावं लागलं. शेवटी देव दगडाचाच आणि माणूसच खरा!

हेही वाचा : भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

दीड कोटी लोकांना फटका बसेल

कोरोना वायरसमुळे जगभरात एकूण दीड कोटी लोकांना फटका बसेल. मृत्यू मोठ्या प्रमाणात होतील. मंदी आणि आर्थिक अराजकातून खून, भूकबळी, गुन्हे वाढतील. अमेरिका, चीन, युरोपसारखे देश हतबल होतील. हिंदुस्थानात आर्थिक स्थिती डबघाईला येईल.

निसर्गावर विज्ञानाने मात करणे अशक्य आहे. एक अज्ञात गूढ शक्ती विश्वाचं नियंत्रण करत आहे. ती शक्ती म्हणजे ट्रम्प, मोदी किंवा चीनचे सत्ताधीश नाहीत. चीनच्या एका मासळी बाजारातून पसरलेला हा विषाणू जगाला भारी पडला आहे आणि हे सर्व देश अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रं यांच्या स्पर्धेत धन्यता मानत आहेत.

मोदी देशात, हाच फायदा

कोरोना वायरस सुरू झाल्यापासून आपले पंतप्रधान मोदी यांना हिंदुस्थानातच अडकून पडावं लागलं ही त्यातल्या त्यात लाभाची गोष्ट घडली. देशात संपत्ती नाही म्हणून देश भिकारी होतो किंवा देशात संपत्ती असूनही समान वाटणी झाली नाही म्हणजे देश भिकारी होतो. आता कोरोना या एका विषाणूमुळे देश आणि जग भिकारी बनताना दिसत आहे.

देश, माणसे आणि आपापल्या धर्माचे सर्वोच्च देवही गरिबीच्या संक्रमणावस्थेतून जात आहेत. कोरोनामुळे शेअर बाजार साफ कोसळले. त्यात अंबानींपासून अदानीपर्यंत श्रीमंत थोडे गरीब झाले. तसे आमचे जगभरचे देवही गरीब झाले.भक्तांशिवाय नेते आणि देवांनाही श्रीमंती नाही. सिद्धिविनायकापासून तुळजापूरपर्यंत, मक्केपासून वॅटिकनपर्यंत देवांच्या दारी सन्नाटा आहे. कोरोना, हे काय केलेस?

हेही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघांना बिग थँक्यू

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

(साभारः दैनिक सामना, saamana.com )