सेल्फी विथ कुंभः संसारात रमलेल्या साध्वीची गोष्ट

२० जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!

संध्याकाळचे साडेचार-पाच वाजत नाहीत तोच कुंभ परिसरात बोचरी थंडी जाणवू लागते. सातेक वाजता सगळा अंधार होऊन जातो. गंगा-यमुना संगमाजवळ रामघाट आहे. तिथे पन्नीलकडी वापरून बनवलेल्या बऱ्याच तात्पुरत्या टेन्टमधे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली असते. एका टेन्टजवळ वाळूत त्रिशूळ आणि मायावी जडी पुरून ठेवलेली असते. साध्वीच्या वेशातली एक बाई तीन दगडांची चूल मांडून रात्रीच्या खाण्याचा जुगाड जमावत असते. डोक्यावर पगडी, चंदनाचा टिळा, भगवी वस्त्रं, गळ्यात माळा.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः रिक्षावाल्या सज्जनजींचा कष्टकुंभ

मी थांबते. तिच्या बाजूला काळ्या कपड्यातला एक जटाधारी मला बघून जवळजवळ ओरडतोच, 'क्या चाहिये? क्यू आई हो यहां?' मी शक्य तितका गरीब चेहरा करत म्हणते, 'जी आप महान लोग है. आपसे वार्तालाप करके थोडा ग्यान मिल जाये तो अच्छा!' तरी त्याचा तारस्वर काही खाली येत नाही, 'अरे, तो हमारे पास क्यू आई हो? उधार आखाडोमें जाव. बडे बडे साधू मिलेंगे. नकली हैं सबके सब. पर सरकारतो उन्हीको सिरपे चढाई बैठी है. साधू होना कितना कठीण हैं, हमसे पूछो! खुदको चक्कीमें पिसवाने जैसा.'

तितक्यात साधूबाबांना फोन आला. जरा आत जाऊन ते फोनवर बोलतात तेवढ्यात मी साध्वीजींच्या बाजूला जाऊन बसले. चुलीची उब आणि साध्वीच्या चेहऱ्यावरचं हसू सारखंच उबदार होतं.

मी विचारलं, 'आप व्यस्त हैं, फिरभी थोडीसी बात हो पायेगी?' त्या म्हणाल्या, 'हां बेटी, कहो!' त्यांनी नाव सांगितलं लक्ष्मी राय. बोलताना दुसरीकडं जर्मनच्या पातेल्यात पळीनं ढवळणं चालूच होतं.

म्हणाल्या, 'वो हमारे पती हैं और गुरूभी! थोडेसे शीघ्रकोपी हैं! आप दिलपे ना लो.' मी म्हणाले, 'अच्छा! तो आप संसारमें रहते हुए संन्यासन बन गई! ये मुमकिन हैं?' त्या हसत बोलायला लागल्या, 'हां क्यू नहीं? हिंदू धर्म पानी जैसा है. जिस आकारमें ढालो ढल जाये, जिस आकारमें रंगो, रंग जाये. ऐसा होता हैं न, के कोई उपरी तौरसे संन्यास लेके अंदरसे संसारी रहे. वो तो सब धोखा हो गया. हम उपरसे संसार करके अंदरसे संन्यस्त होनेकी साधना करते हैं! नाथपंथी लोग हैं हम. गोरखपूरसे आये है.'

मी म्हणाले, 'पुरुष चाहे बंधनोसे मुक्त हो जाये आसानीसे. पर एक औरतके लिये संन्यास बहुत कठीण होता होगा ना?' लक्ष्मीजी तांदूळ धुताना नाही म्हणत मान हलवतात. सांगतात, 'औरत तो लवचिकता का नाम हैं! जैसी चाहे वैसी खुदको तोड-मरोडले. एक जिंदगी जाते हुए वो माँ बनकर दुसरी जिंदगीको धरतीपे जन्म देती है. उसकेलिये क्या मुश्किल हो सकता है? मोहमाया तो वो खुद है. और हमारे स्वामी महाकालभीतो हैं. जहां कही हम साधनामार्गसे विचलित हो जाये, वो हमको राह बतायें जाते है.'

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

मी विचारलं, 'तपस्यां क्या होती हैं? क्यो करनी हैं तपस्या?' त्या चुलीत लाकडं सारत सांगू लागतात, 'ये दुनिया तो सतरंगी हैं. हमें तय करना है के कौनसा रंग हम ओढ लेंगे. भूख प्यास हरके तपस्यां करनी है. आखिरमें जो मिल जाये वही भगवान है! इतनीसी बात हैं बस. धर्ममार्तंड उसे जानबुझकर कठिन बना देते है.'

जमदग्नीफेम साधूबाबांचं फोनवरचं बोलणं आटोपलेलं असतं. ते येताना बघून मी घाईघाईत साध्वीजींना म्हणते, 'आपका एक फोटो लेलू?' त्या म्हणतात, 'उनसे पूछो' अनपेक्षितपणे साधूबाबा होकार देत तिला म्हणतात, 'जाव, उधर त्रिशूल लेकर खडी हो जाव.' साध्वीजी सन्यस्त मुद्रेतली मस्त पोज देत फोटो काढून घेतात. लगोलग भात शिजला का बघायला निघून जातात!

 

हेही वाचाः 

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली

सेल्फी विथ कुंभः रिक्षावाल्या सज्जनजींचा कष्टकुंभ

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)