सेल्फी विथ कुंभः साधुंना कशाला पाहिजे लक्झरी, फिरंगी बाबाचा सवाल

२३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!

कुंभातल्या रस्त्यानं चालताना दिसणारे फिरंगी साधू हा काही लक्षवेधी विषय नसतो. पण एखादा चेहरा थबकायला लावतो. आज दुपारी भेटलेला मच्छिंद्रनाथ त्यातलाच! त्याचं 'जुनं' नाव त्यानं टाकून दिलंय. ते त्याला मलाही सांगायचं नाहीय.

ताडमाड उंची, नितळ अस्मानी रंगाचे डोळे, गोरा फिरंगी वर्ण, अंगाला भस्म, कमरेला एक भगवं वस्त्र, गळ्यात टाकलेली दोन उपरणी, काही माळा, कपाळाला कुंकू-चंदनाचा टिळा, पायात चप्पल आणि हातात त्रिशूल. त्याला एक मानवी कवटीचं प्रतीक अडकवलंय.

जुनं गाव मात्र मच्छिंद्रनाथ सांगतो. तो मूळचा चेक रिपब्लिकचा आहे. बोलतो, 'मला शाळेत असल्यापासूनच गूढ गोष्टींचं वेड होतं. पुढं ते वाढत गेलं. एकीकडं शिक्षण सुरूच होतं. अर्थशास्त्राची पदवी आणि पीएचडी घेतली. इटली, युरोपात कुठंकुठं प्राध्यापकाच्या नोकऱ्याही केल्या. पण त्या सगळ्यात मन रमेना. मग वयाच्या तिसाव्या वर्षी घरदार, देश सगळं सोडून थेट नेपाळला गेलो.

घरच्यांना नव्या काळात धक्का बसला. पण नंतर ते सरावले. तिथे पशुपतीनाथ मंदिराच्या आसपास १० वर्ष राहिलो. राजपुरोहित लोक भेटले. पूर्वीच्या काळात गोरखनाथांचं वास्तव्यही नेपाळमधे होतंच. त्यांचं जगणं अभ्यासलं. चार वेगवेगळे गुरू केले. कौलतंत्र परंपरेचा सखोल अभ्यास केला. तांत्रिक विद्येनं मला खूप आकर्षून घेतलं. मी मच्छिंद्रनाथांच्या संप्रदायाचा अनुयायी बनलो. आम्ही चहा पीत-पीत अजून काय काय बोलतो. जगणं, समाज, संस्कृती. आमचा सगळा संवाद इंग्रजीतच झाला.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

च्छिंद्रनाथच्या मते, कुंभ भारतीय समाजाचंच प्रतीक आहे. कुंभमेळ्याची मूळ कल्पना थोरच आहे. पण नंतर आलेल्या लोकांनी, अंध अनुयायांनी तिला विकृत, प्रदूषित करून टाकलं. कर्मकांडाचं अवडंबर माजवलं.

मच्छिंद्रनाथ म्हणतो, 'आता बघ, या साधू म्हणवणाऱ्या लोकांना कशाला पाहिजेत इतक्या महागड्या गाड्या, स्मार्टफोन्स?' तो त्याच्या लहानशा बॅगेतून नोकियाचा ११०० मॉडेलचा मोबाईल दाखवत म्हणतो, 'हे बघ मी अजूनही हा फोन वापरतो. तोही अनेकदा दिवसेंदिवस स्विच ऑफ असतो! हा फोनसुद्धा 'लग्झरी' वाटते मला!'

स्वत:ला कुठलाच कायमचा पत्ता नसल्याचं तो सांगतो. प्रवास करणं म्हणजे कुठंच स्वत:ची अटेचमेंट होऊ न देणं, आसपासचं सगळं क्षणभंगूर आहे, असं स्वत:ला सांगत, बजावत राहणं. साधना शिकायची असेल तरच एका जागी तेवढ्यापुरतं राहतो, पुन्हा नवा मुक्काम.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः अकाली प्रौढ करणारं 'अध्यात्म'

ही सगळी धडपड कशासाठी? असं विचारल्यावर मच्छिंद्रनाथ स्पष्ट सांगतो, 'मला मोक्षाची ओढ लागलीय. तो मिळवायचा रस्ता माझ्यापुरता सापडलाय. प्रत्येकासाठी तो तसाच असेल असंही नाही. ज्याचा त्याचा प्रत्येकानं शोधावा.' 

मच्छिंद्रनाथची दिनचर्या विचारल्यावर हसतो. म्हणतो, 'पण हे सगळं तुझ्या वाचकांना का जाणून घ्यायचंय?' मी म्हणते, 'कारण त्यांना तुझ्याविषयी कुतूहल आहे, की असा कसा तू सगळी भौतिक सुखं आणि तुझा देश सोडून जीव दु:खात घातलास!'

तो अजून हसतो, म्हणतो, कुणासाठी असलेलं दु:ख माझं तर सुख आहे. मी सकाळी तीन वाजता उठतो. एक तास हठयोग, प्राणायाम आणि त्यानंतर दोन तास तंत्रपूजा करतो. दिवसभर वाचन, चिंतन आणि संध्याकाळी कालीभैरव आणि चामुंडापूजा.'

या फिरंगी साधूच्या मते भारतीय लोक दुर्दैवी आहेत. त्यांच्याकडे अध्यात्म आणि ज्ञानाचा खजिना असूनही ते पाश्चात्य संस्कृतीच्या मोहात अडकलेत. पाश्चात्य संस्कृतीत ७० टक्के अधर्म भरलाय असं तो म्हणतो. निरोप घेताना मी त्याला म्हणते 'बेस्ट लक फॉर युवर मोक्ष!' मच्छिंद्र हसतो आणि उत्तर देतो, 'सेम टू यु!'

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

हेही वाचाः

सेल्फी विथ कुंभः संसारात रमलेल्या साध्वीची गोष्ट

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली