खय्याम गेले, तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत

२३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


संगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.

एका मुलाखतीमधे गीतकार जावेद अख्तर यांनी लता मंगेशकरांना एक प्रश्न विचारला, 'तुम्ही आजपर्यंत हजारो गाणी गायली. यामधे तुमचं सर्वात जवळचं गाणं कोणतं?'

लतादीदींनी सांगितलं, 'मला खूप गाणी आवडतात. पण मी एकटी असते किंवा प्रवासात असते तेव्हा मला 'रझिया सुलतानमधलं 'ए दिल-ए- नादां' हे गाणं गुणगुणायला खूप आवडतं.'

लताबाईंच्या या उत्तराने जावेद अख्तर खुश झाले. आणि म्हणाले, 'बाप तो आखीर बाप ही होता हैं.' म्हणजे हे गाणं त्यांच्या गीतकार वडलांचं. जां निसार अख्तर यांचं होतं. आणि या गाण्याला संगीतबद्ध केलं ते खय्याम यांनी.

ये क्या जगह हैं दोस्तो

एका अवॉर्ड फंक्शनमधे खय्याम यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार दिला रेखाच्या हस्ते. रेखाच्या करियरला चार चांद लावले ते 'उमराव जान' या सिनेमाने. आजही हा सिनेमा फक्त रेखा आणि त्यातल्या गाण्यांसाठीच आठवतो.

फंक्शनमधे रेखा म्हणाली, 'उमराव जानमधली सगळी गाणी अगदी 'दिल चीज क्या हैं', 'इन आंखो की मस्ती के' आणि 'जिंदगी जब भी तेरी बज्म मे' बेहतरीन आहेतच, पण एक गाणं गुणगुणल्याशिवाय तिलाही चैन पडत नाही. ते म्हणजे,

ये क्या जगह हैं दोस्तो, ये कौनसा दयार है 

बुला रहा कौन मुझको चिलमनों के उस तरफ़ 

मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है 

ये क्या जगह है दोस्तो

हे गाणं म्हणताना गायिका नसणाऱ्या रेखाचा आवाज असा काही लागला की वाटलं, वर्षानुवर्षे आपल्या पोटात ठेवलेल्या वेदना अशा ओठांवर येतात, त्या वेदनेचे सूर लेवूनच येतात.

हेही वाचा: खय्यामांच्या या गाण्याला लतादीदी नकार देऊ शकल्या नाहीत.

एकमेकांत गुरफटलेले दोघे जण

एक-दोन वर्षांपूर्वी खय्याम आणि त्यांच्या पत्नी गायिका जगजीत कौर यांची मुलाखत ऐकली. मुलाखतीचं निमित्त होतं, खय्याम यांची नव्वदी. या वयातही त्यांचं भविष्यात करायच्या कामाचं प्लांनिंग चालू होतं. एकुलता एक मुलगा गेल्यामुळे आपल्या पैशांचा होतकरू संगीतकारांना फायदा व्हावा म्हणून एक ट्रस्ट काढायचा विचार होता.

मुलाखतकाराने जगजीत कौर यांना एक प्रश्न विचारला, 'तुम्ही इतक्या मोठ्या गायिका पण त्यामानाने तुमचं काम कमी आहे. असं का? आणि तुम्हाला याच वाईट वाटत नाही?'

यावर जगजीत कौर यांनी सांगितलं की , 'मला काम करू वाटायचं पण खय्याम यांच्या कामात मीही इतकी गुरफटून गेले की मला सवडच मिळेना. त्यामुळं मोजकीच गाणी करता आली. पण मला त्याचं काही वाटत नाही. दिल में कुछ मलाल नही हैं।'

अपनी निगहबानी मुझे दे दो

त्यांना मुलाखतकाराने त्यांचं एक सुपरहिट गाणं गुणगुणायचा आग्रह केला. तेंव्हा वयाची ऐंशी पार केलेल्या जगजीत लाजतच गुणगुणू लागल्या. 'शगुन' सिनेमातलं खय्याम यांनीच संगीत दिलेली ही अवीट गझल गायल्या,

तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो

तुम्हें ग़म की क़सम, इस दिल की वीरानी मुझे दे दो

मुखडा गुणगुणून त्या शांत झाल्या. तेव्हा खय्यामसाब म्हणाले, ' याचा एक अंतरा खूप बेहतरीन आहे. साहिरचे बोल खूप छान आहेत. म्हण गं जरा.'

जगजीत कौर पुन्हा गुणगुणू लागल्या,

मैं देखूँ तो सही, दुनिया तुम्हें कैसे सताती है

कोई दिन के लिये, अपनी निगहबानी मुझे दे दो

कुछ दिन की निगहबानी मागितलेल्या जगजीत कौर यांना खय्याम साहेबांनी पूर्ण आयुष्याचं 'निगहबान' बनवलं. तोच अंतरा का गायला लावला त्याचं उत्तर आपसूकच मिळालं.

हेही वाचा: मी देशभक्त का नाही?

खय्याम आहे तो जगजीतमुळे

आता हा निखारा पदरात पदरात बांधून घेतलाय म्हणल्यावर पदर जळू न देता निखारा तर धुमसता ठेवला पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या करियरवर पाणी सोडायचीही हिम्मत दाखवली. आणि या निखाऱ्याला थोडी न थोडकी ६५ वर्षं साथ दिली. निखाऱ्याला फुलवत ठेवलं.

त्या मुलाखतीत खय्याम साहेबांनी स्वतःहून एक गोष्ट मान्य केली की, जगजीत नसत्या तर ते काही करू शकले नसते.

हेही वाचा: टॉलस्टॉयची बायको मेल्यावर आपल्या डायरीमुळे झाली लोकप्रिय

सिनेमे पडेल, गाणी अजरामर

खय्याम यांना तेव्हा भरपूर ऑफर्स यायच्या. पण उगाच करायचं म्हणून काम करायचं नाही. ते सिनेमा स्वीकारताना बॅनर किंवा स्टार कास्ट बघायचे नाहीत. तर गाणी, गीतकार बघून निवडायचे. त्यामुळे त्याच्या हाती मोजकंच काम यायचं. पण ते काम अगदी एकदम बावनकशी. कित्येक सिनेमे तर बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. पण लक्षात राहिली ती त्यातली गाणी. त्यातलं संगीत.

राज कपूरच्या 'वो सुबह कभी तो आयेगी' मधलं शीर्षक गीत, धर्मेंद्र आणि तरला मेहताच्या 'शोला और शबनम'मधलं 'जीत ही लेंगे बाजी हम तुम',

वहिदा रहमान आणि कमलजीत सिंगच्या शगुन मधलं 'परबतों के पेडों पर शाम का बसेरा हैं’ आणि 'तुम अपना रंजो गम'.

राजेश खन्नाच्या 'आखरी खत' मधलं 'बहारो मेरा जीवन ही सवारो’,

शंकर हुसैन मधलं 'आप यूँ फ़ासलो से गुजरते रहे’,

'चंबल की कसम मधलं 'सिमटी हुई ये घड़ियां फिर से ना बिखर जाए',

नाखुदा मधलं 'तुम्हारी पलकोंके चिलमनोमे ये क्या छुपा है', दर्द मधलं 'प्यार का दर्द है मीठा मीठा'

अजून कितीतरी पडेल सिनेमे लक्षात राहिले त्यांच्या गाण्यामुळेच.

हेही वाचा: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?

कभी कभी मेरे दिल में

हिट सिनेमे आणि खय्याम यांचं वावडं होतं असं काही नाही. १९७६ ला आलेल्या 'कभी कभी' मधल्या गाण्यांनी त्यावेळचे सगळे रेकॉर्डस मोडले. अमिताभने साकारलेला हळवा प्रियकर आजच्या पिढीच्याही लक्षात आहे. तो 'कभी कभी मेरे दिल मे खयाल आता हैं'मुळेच.

यानंतर आलेले 'त्रिशूल', 'खानदान’, ‘नुरी’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘रझिया सुलतान’ आणि ‘बाजार' सारख्या सिनेमांमधली गाणी गुणगुणली नाही असा  माणूस सापडणारच नाही. स्मिता पाटील आणि नसरुद्दीन शाहच्या 'बाजार' सिनेमात खय्याम साहेबांच्या गाण्यांनी चार चांद लावले. यात एकापेक्षा एक सरस गाण्याची लयलूट होती.

'देख लो आज हमको जी भर के', 'दिखाई दिये यू', 'करोगे याद तो हर बात याद आयेगी', 'फिर छिडी रात बात फुलोंकी' अजूनही यातलं कोणतंही गाणं ऐका दिल खुश हो जाता हैं.

क्यो कोई मुझको याद करें

एरवी आपल्याकडे गल्लाभरू आणि चोरीच्या चाली उचलणाऱ्यांची काही कमी नाही. पण खय्यामांच्या गाण्यांतून अगदी बावनकशी सोनं चमकतं.

परवा खय्याम साब गेल्यानंतर अंतिम दर्शनासाठी बोटावर मोजण्याइतके लोक आले. पण जो माणूस जन्मभर मनस्वी जगला त्याला गेल्यानंतर कोणाच्या येण्या न येण्यानं काय फरक पडतो? एरव्ही कोणत्याही अवॉर्ड फंक्शन किंवा इतर कार्यक्रमांना हजेरी न लावणारे गुलजार विशाल भारद्वाजच्या सोबत मात्र आले.

हे बघून खय्यामसाब 'कभी कभी' मधली 'मै पल दो पल का शायर हूं' मधल्या या ओळी गुणगुणत जन्नतमधे पोहचले असतील.

कोई मुझको याद

क्यो कोई मुझको याद करें

मश्रूफ जमाना मेरे लिये

क्यों वक्त अपना बरबाद करे

हेही वाचा: 

मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?

फेसबूकर्स पूरग्रस्तांसाठी कशी मदत करतात, याचं कुबेर ग्रुप हे उदाहरण