कविता महाजन @ फेसबुक

१३ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १२ मिनिटं


कविता महाजन. पुस्तकातून जितकं व्यक्त होत होत्या. त्याहीपेक्षा फेसबुकवर व्यक्त होत होत्या. सोशल मीडियाला, फेसबुकला नावं ठेवणाऱ्यांनी कविता महाजनांच्या पोस्ट वाचायलाच हव्यात. साहित्य, वाङ्मय वगैरे म्हणतात, ते यापेक्षा काही वेगळं असतं का?

कविता महाजन गेल्या. फेसबूकवर त्या मनात आलेलं त्या त्या क्षणी लिहायच्या. त्यातून त्यांचं मन, मतं, भूमिका, मूड हे सारं सारं आपल्यापर्यंत पोचत होतं. त्यांची भिंत पाहिली, तरीही आज सगळं जिथल्या तिथं आहे. तिथलंच वेचलेलं हे काही.

***

काही गोष्टी काळाच्या ओघात मागे टाकून दिलेल्या असतात, एखाद्या निमित्ताने पुन्हा उसळून आठवतात.

माझं शिक्षण नांदेड आणि औरंगाबाद या शहरांत झालं. बी.. नंतर मी एम.. करण्यासाठी औरंगाबादला आले. ते करत असतानाच मराठवाडा विद्यापीठातून बाहेरून एम.. पूर्ण केलं. नंतर नांदेडला एक वर्ष आणि मुंबईत एक वर्ष अशी दोन वर्षं प्राध्यापकी केली. नेट पास झाले. हरसाल नोकरीसाठी अर्जं, मुलाखती वगैरे सुरू होतं.

एका महाविद्यालयातून मुलाखतीनंतर पुन्हा ओरिजनल पेपर्स घेऊन बोलावण्यात आलं. निवड झाल्याचं आणि रीतसर पत्र पाठवलं जाणार असल्याचं तिथल्या एकानं सांगितलं. दुसर्या दिवशी तिथला एक कारकून जॉब कंटिन्यूएशन वगैरेचे फॉर्म भरून घेऊन गेला. मी पत्राची वाट बघत थांबले, पण ते आलंच नाही. दुसरीच चक्रं फिरली होती आणि दुसऱ्या कुणाची नेमणूक झाली होती, असं प्राचार्यांना फोन केल्यावर समजलं.

मुलाखत घेणाऱ्यामध्ये एक वसंत पाटणकर होते.

मी त्यांना फोन केला. नेमकं बिनसलं कुठे, हे जाणून घ्यायचं होतं.

त्यांनी आधी थोडी टाळाटाळ केली, पण मग धाडकन सांगून टाकलं. म्हणाले, ‘मुंबईत नोकरी हवी तर मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवा. शहाण्या असाल तर पुन्हा इथून बी.., मग एम.. करा. अगदीच अपवाद म्हणून आम्ही एकवेळ पुणे विद्यापीठातला उमेदवार निवडू. तुमच्या त्या मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीला इथं विचारतंय कोण?’

ऐकून मी चकीत झाले. म्हटलं, ‘पुन्हा पाच वर्षं तेच शिकावं असा सल्ला देताय?’

ते म्हणाले, ‘हो. त्यानंतर नोकरी मिळणार असेल तर काय हरकत आहे?’

मी फोन ठेवला.

काही दिवसांपूर्वी समजलं की, माझीभिन्नही कादंबरी मुंबई विद्यापीठाने बी..साठी अभ्यासक्रमात लावलीये. इथले प्राध्यापक आता ती शिकवतील. लेखिकेचा परिचय वगैरेही अर्थातच करून देतील.

हसू आलं. काळ बदलतो आणि दिवस तसेच राहत नाहीत, हे खरं.

***

हेही वाचाः तिची कविता, कवितेतली ती

डहाकेसर म्हणाले

असाच पाऊस राहिला तर कादंबरी लवकरच पूर्ण होईल, पण पावसावर विसंबू नये, कादंबरीचेच म्हणणे ऐकावे!’

मी म्हटलं, ‘जिथं जिथं पाऊस असेल तिथं तिथं आपलं बाड घेऊन फिरत राहिलं पाहिजे खरंतर. पण कादंबरीला पाऊस हवा असताना, कवितेला उन्ह हवं असेल, तर घोळ.’

तर सर म्हणाले, ‘कवितेला पावसात भिजवावं, कादंबरीला उन्हात हिंडवावं!’

***

विजय तेंडुलकरांवर आज बऱ्याच जागी काय काय लिहून आलं आहे. इथंही कुणी-कुणी लिहिलं आहे.

मी त्यांना अगदीच मोजून तीन वेळा भेटले होते. त्यांच्या घरी दोनदा आणि एकदा डॉक्टरकडे तेही आलेले तर अचानक भेटले.

ब्र वाचून त्यांनी मला पत्र पाठवलं होतं म्हणे, ते २६ जुलैच्या पावसाच्या धांदलीत माझ्यापर्यंत पोहोचलंच नाही. मी उत्तर दिलं नाही, म्हणून विचारायला प्रकाशक माजगावकरांचा फोन आला, तेव्हा समजलं. मग मी तेंडुलकरांना फोन केला, त्यांनी भेटायला घरी बोलावलं.

ते स्वत: अत्यंत कमी बोलत होते आणि शांतपणे एकेक प्रश्न विचारत होते. आपण उत्तर देताना भेदक नजरेने न्याहाळत राहायचे. ते फार अस्वस्थ करणारं असायचं. एका प्रश्नाचं उत्तर देताना तर मला रडू कोसळलं, मात्र ते त्यांच्या खास खुर्चीत बसूनरडून झालं की नीट सांगम्हणाले. मग रडू आपोआप थांबलं आणि मी उत्तर दिलं.

दुसर्यांदा त्यांचा फोन आलाफिरकत नाहीसम्हणून. त्यांचा मठ तयार झालेला होता. नवीन लोकांनी यावं वाटायचं त्यांना. तेव्हा पुन्हा एकदा गेले, पण मला सहसागप्पा’, ‘दुहेरीसंवाद आवडतात, एकेरी प्रश्नोत्तरं नाही. मग जाण्याची,  भेटण्याची आतून ओढ वाटत नाही हे जाणवलं. ते त्यांनाही कळलं असावं. त्यांनी पुन्हा बोलावलं नाही, मी पुन्हा गेले नाही.

तिसरी भेट अचानक झाल्याने दोघांचेही डोळे चमकले.

थोडं बोललो. ‘स्वत:ची काळजी घेते आहेस, ही चांगली गोष्ट आहेअसं म्हणाले. डॉक्टर हसले. मगनवीन काय लिहिते आहेस?’ हा नेहमीचा प्रश्न आला.

मी उत्साहानं सांगितलं, ‘दुसरी कादंबरी.’

डोळे बारीक करून बघत तेंडुलकर मजेशीर खवचटपणे म्हणाले, ‘हिचंही नाव एकाक्षरी ठेवणार का?’

म्हटलं, ‘नाव अजून नक्की ठरायचं आहे, पण एकाक्षरी नसणार बहुतेक. हां... आत्मचरित्राचं शीर्षक मात्र एकाक्षरी असेल.’

खवचट टोनची जागा लगोलग उत्सुकतेने घेतली, ‘काय बरं? सांग पटकन.’

.’ मी म्हटलं.

क्षणभर शांतता होती. मग मीच पुन्हा म्हटलं, ‘प्रत्येक परीक्षेत नापास होणारी बाई... म्हणून ढ.’

ते म्हणाले, ‘यावर तर माझा कॉपीराईट आहे. मला देऊन टाक.’

मी म्हटलं, ‘मला सुचलंय ना, मग कॉपीराईटही माझाच.’

मग हातांची घडी घालत, नाकावर घसरलेला चष्मा वर सरकवत, त्यांनी ठाम आवाजात निर्णय दिला... ‘आपण दोघं मिळून आत्मचरित्र लिहू... आणि त्याचं नावदोन ढअसं ठेवू.’

चालेल.’ मी हसून म्हटलं.

ते दवाखान्याच्या पायर्या हळूहळू उतरून निघून गेले. मी वळले.

अजून वळलेलीच आहे. कधीतरी त्यांच्याकडे फिरून पाहायला हवं.

***

हेही वाचाः थिंग्ज फॉल अपार्ट

एका कामाच्या फोनवर बोलत होते,

तर दरम्यान तब्बल सात मिस्डकॉल एकाच नंबरवरून दिसले. तो फोन संपताच हा लावला. आवाज खास मराठवाडी. वर्गातल्या एका मुलाकडून नंबर घेतला म्हटल्यावर मी, आता आधी नाव सांग रे बाबा... असं म्हटलं, तर ते चक्क त्या मित्राचे बाबा निघाले...

काई नाई माय, मुंबईला आल्तो, तर तुजी आठोन झाली. कशी हाईस बेटा? आता फार मोठी झाली म्हना तू... पन माज्यासाठी लेकीवानीच की... तुजे दिव्य मराठी पेपरात लेख येतेत न माय, ते समदे कापून ठिवतो बगा मी. मी वाचतो... येनाऱ्या जानाऱ्याला वाचायला देतो... हां... म्होरं बसून वाचायला लावतो... आनंद वाटतो बगा... येकडाव तुझ्या घरला आलतो वसईला, आठोते का तुला? आमची माय जात ऱ्हायली गेल्या म्हईन्यात, मग मुलगा मनाला या हिकडं चार दिवस... आलो. पन करमना बगा... तुला किती फोन करू लालतो, लागंचना... बरी हाईस ना माय?’

ऐकत राहिले, मधून एखादा शब्द बोलत...

आपल्या मातीतला आवाज, आपल्या बोलीतले शब्द, आपल्या गावातली माया... आणि ते खासमायम्हणणं...

कितीही दूर गेलं, तरी गाव तुटत नाहीच कधी.

***

व्यक्ती खऱ्या अर्थाने तेव्हाच लोकप्रिय होतात,

जेव्हा लोकप्रियतेमागून लोकअप्रियताही आयुष्यात प्रवेश करते. लक्ष देण्यासोबत काही लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. चांगल्या टिकेमागोमाग वाईट, असभ्य टिंगलटवाळ्या, गॉसिप वगैरे होऊ लागतं. टोकाचं प्रेम करणारे पंखेही जीव हैराण करतात आणि टोकाचा मत्सर, द्वेष करणारे सुमार लोकही चकित व्हावं इतकं आयुष्यात लक्ष घालतात. डोक्यावर घेणं आणि पायदळी तुडवणं समांतर होऊ लागतं. हळूहळू गुंतलेला जीव इतका सुटतो की, चांगली वा वाईट कोणतीच माणसं नकोत आयुष्यात, निखळ एकांत हवा, असं वाटू लागतं. मग फायदे-तोटे दूरस्थ होत जातात आणि केवळ कलाकृतीशी नातं शिल्लक उरतं. लोकांना हा कलावंताचा माज वाटू शकतो, प्रत्यक्षात ते शिखरावरचं एकाकीपण असतं... जिथं वाऱ्याशिवाय काही ऐकू येत नाही, धुक्याशिवाय काही दिसत नाही, प्रत्येक वस्तूचा स्पर्श गोठलेला असतो... जिथून परतलं तरी ते परतणं नसतंच.

***

हेही वाचाः डॅडी भेटे बापूंना

रोटी - बेटी व्यवहार या शब्दात एक गोची आहे. रोटीला मन-बुद्धी-मर्जी-स्वभाव-वृत्ती वगैरे काहीच नसतं, पण बेटीला असतं.

आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय, आंतरराष्ट्रीय, आंतरभाषीय, आंतरवर्गीय वगैरे लग्नं व्हायला हवीत यात वाद नाही. (ज्यांना लग्नंच करायची नाहीत, त्यांची गोष्ट निराळी; हा मुद्दा ज्यांना करायची आहेत, त्यांच्यासाठीचा आहे.)

लग्नं साधारणपणे दोन पद्धतींनी होतात - ठरवून आणि प्रेमातून.

प्रेमातून जे कुणी अशी लग्नं करताहेत, त्यांना फार तररिस्कव्यवस्थित समजावून सांगाव्यात आणि दोघांनीही ही जोखीम निभावून लग्न यशस्वी व्हावं म्हणून काय केलं पाहिजे हेही समजावून सांगावं. विरोध करू नये, हेही मान्य.

जे ठरवून लग्न करणार आहेत, त्यांनी आधीच या चौकटी जाहीर न करता पर्याय खुले ठेवावेत; हेही मान्य.

मात्र हाव्यवहारआहे, म्हणून आपल्या घराच्या मुलीद्याव्यात’, त्यांच्या घरच्याकरून आणाव्यातहे सांगणं अमान्य.

अशी लग्नंतुम्ही करून दाखवाहे अविवाहित, विधुर / विधवा, घटस्फोटित व्यक्तींना सांगणं मान्य; मात्रतुमच्या मुलांची लग्नं अशी करून दाखवाहे सांगणं अमान्य!

मुलांना - मुलींना स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ द्यायला आपण कधी शिकणार आहोत?

***

मी : आई, हे कुणालाही सांगू नकोस....

आई : हो...

फोन १ : दिशासोबत काय झालं माहिते...

फोन २ : दिशा असं म्हणाली...

फेसबुक : त्यादिवशी दिशासोबत असताना काय किस्सा झाला...

प्रत्यक्ष भेटलेले १७६० लोक : पर्वा दिशा काय म्हणाली माहितीये...

मी : आई हे कुणालाही सांगायचं नाही असं म्हंटलं होतं ना मी???

आई : हो...

***

मी : दिशा, पुस्तकं ठेवायला अजून एक कपाट करून घेऊ.

दिशा : कुठे ठेवणार?

मी : कपाटं ठेवायला मोठं घर घेऊ.

दिशा : बरं.

मी : तिथं चित्रं काढायलासुद्धा वेगळी खोली असेल.

दिशा : बरं.

मी : अंगणसुद्धा पाहिजे... नातवंडं होतील तेव्हा खेळायला जागा नको का...

दिशा : पुस्तकांवरची धूळ पुसून घे आधी.

मी : चष्माही पुसला पाहिजे.

***

हेही वाचाः शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

कशाचीच काही खात्री नाही.

दिवसा रात्री जमिनीवर आकाशात

सर्वत्र भरलेली आहे अनिश्चितता

निश्चित!

 

***

शरीर बऱ्याचशा जखमा आतल्या आत स्वत:हूनच दुरुस्त करून टाकत असतं. काहींसाठी मात्र बाहेरून प्रयत्न करावे लागतात. दरवेळी काही हवंय, जिंकायचंय म्हणून संघर्ष करावे लागतात असं नाही; अनेकवेळा निव्वळ बचावासाठी झडप घालावी लागते. रंगरूप कितीही स्वर्गीय सुंदर असलं, तरी बीभत्स वाट्याला येणं चुकत नाही कोणत्याच जीवाला...

झेपाडा मारावाच लागतो उंच उडून खालती...

***

लोकांचे खांदे दुखायला लागल्यावर कळतं... आपण किती जड आहोत!

***

प्रश्न: जाड बाईने हत्तीच्या नक्षीची साडी नेसली, तरी मैत्रिणी हसतात आणि फुलपाखरांच्या नक्षीची साडी नेसली तर अजूनच जास्त हसतात. काय करावे?

उत्तर १. साडी न नेसता दुसरे कपडे वापरावेत.

उत्तर २. न हसणाऱ्या बायकांशी मैत्री करावी.

उत्तर ३. हत्तीच्या सोंडेवर बसलेली फुलपाखरे, अशा नक्षीची साडी नेसावी.

उत्तर ४. आपणही मैत्रिणींसोबत हसावे.

उत्तर ५. पदरावरचे जिराफ पाहिले नाहीत का, असे विचारावे.

इत्यादी.

***

म्याडम, वळखलंत का?

तुमच्याच जिल्ह्यातला हावो मी. तुमच्या म्हायेरच्या. तुम्हाला भेटलो होतो बगा... तवा फोन नंबर घितल्येला. जर्न्यालिझमला नंबर लागत नवता ना...’

हां आठवलं... बोला... काय काम काढलंत?’

मी आता *** सायबांकडं चिकटलोय. तर तुमच्याकडं येक काम होतं.’

सांगा ना...’

तुमच्या पुस्तकांची नावं पायजे हुती. पयली कादंबरी कंची तुमची?’

ब्र.’

आजूक यकांदं सांगा... म्हण्जे कादंबरी नको, दुसरं काईतरी.’

कवितासंग्रह सांगू... मृगजळीचा मासा.’

इत्कं आवघड नको ताई, काई सोपं सांगा की. आणि कवितासंग्रह नकोच...’

रजई... अनुवादित आहे.’

ते आनुवादित म्हण्जे दुसर्याचं हासतंय ना. तसं नको. वरिजनल सांगा येकदम. तुमचं तुमी सोत्ता लिव्हलेलं.’

ग्राफिटी वॉल... लेखसंग्रह आहे.’

इंग्रजी नको ना ताई. बोलायला ताप व्हते.’

जोयानाचे रंग... ते सोपं आहे.’

थ्यांक्यु बरं का ताई. तुम्हांला तसदी दिली.’

काय पुस्तकं विकत घेऊन वाचायचा विचार आहे की काय? यादी घेताय एकदम.’

नाही ताई. आम्ही तसलं काही करत नाही. काय्ये... साहेबांकडे पत्रकार येणार आहेत आत्ता. उद्या पुस्तकदिन आहे तर साहेबांची आवडती पुस्तकं कोण्ती ते विचारायला... बरं ताई, आजून येक हेल्प करणार काय?’

अजून कुणा लेखकाचा फोन नंबर पाहिजेय का?’

तसं नाही ताई. येकच पुरे. तुम्ही फकस्त या पुस्तकात काय लिवलंय त्ये सांगता का जरा... साहेब सांगणार का तुम्ही आवडत्या ल्येखिका हायेत तर म्हाईती पायजेल ना...’

***

माणसं गेली की, उत्सुकतेने ढीगभर काव्यात्म श्रद्धांजल्या वाहणारे आपण...

जी माणसं हयात आहेत त्यांच्यासाठी कधी, कुठे आणि किती असतो?

 

उत्सुकतेचं भाषिक कवच काढून फेकलं तर आत काय सापडतं? दुटप्पीपणा सापडला तर आपण स्वत:चं काय करतो?


***

पुरावे

पोलिस स्टेशनवर पोहोचले, तेव्हा पाय लटपटत होते. काही खाकी वर्दीवाले पूर्ण दुर्लक्ष करत होते, तर काही अगदी रस घेऊन एकटक नखशिखान्त न्याहळत होते. मी एका टेबलासमोरच्या खुर्चीत जाऊन बसले.

कशावरून?’ खुर्चीतला खाकी वर्दीवाला म्हणाला.

माझ्याकडे पुरावे आहेत.’ मी धीर एकवटून पुटपुटले.

कोणते पुरावे?’ त्याने गुर्मीत विचारलं.

मी माझ्या शरीरात हात घातला आणि एक योनी काढून त्याच्या टेबलवर ठेवली. ती चिरफाळलेली होती. मग काही रक्ताचे ओघळ टेबलवर ठेवले आणि वीर्याचे काही थेंब. माझ्या नखांत काही त्वचेचे सूक्ष्म तुकडे अडकले होते आणि मुठीत काही केस उपटून आले होते, ते मी टेबलवर ठेवले आणि ओरखड्यांच्या काही जुड्या.

चुरगळलेले कागदी बोळ्यासारखे स्तन, चावून मांसाच्या धांदोट्या झालेले ओठ ठेवले. माझे दुखावलेले लांबलचक आतडे काढून ठेवले, तेव्हा तर टेबल पूर्ण भरून गेले. तरी थोडी जागा शोधून मी माझी जीभ अत्यंत काळजीपूर्वक टेबलवर ठेवली - तिच्यावर जबानीचे सगळे शब्द न लडखडता ठाम पाय रोवून उभे होते.

मी खाकीवर्दीवाल्याकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर एक बारीकशी आठी उगवली आणि विरली.

त्यानं डावा हात उचलून टेबलावरच्या मी ठेवलेल्या सगळ्या गोष्टी गोळा केल्या आणि

खुर्चीजवळच्या कचराडब्यात टाकल्या.

मी पाहिलं की तो कचराडबा एखाद्या कृष्णविवरासारखा खोल होता. विज्ञानकथांमध्ये मी अशा विवरांविषयी वाचलं होतं की ते कसं त्याच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट क्षणार्धात गिळंकृत करतं आणि नंतर ती या जगात कुणालाही कधीही दिसत नाही. त्यात गेलेला प्रकाशदेखील पुन्हा बाहेर पडत नाही.

खुर्चीतला खाकीवर्दीवाला पांढर्या रुमालाला हात पुसत मला म्हणाला, ‘कुठे आहेत पुरावे?’

***

हेही वाचाः कथाः पिकलेल्या आंब्याची उगवलेली झाडं

इस्मत चुगताई यांची आज १०७ वी जयंती.

त्यांच्या निवडक कथा मराठीत अनुवादित करत मी माझ्या गद्यलेखनाचा पाया घातला. ‘रजईला अनुवादाचा साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला खरा; मात्र मागाहून समजलं की, परीक्षकांमध्ये यावरून वाद झाले की, इस्मत चुगताई यांच्या कथांसाठी हा पुरस्कार द्यावा की देऊ नये! ‘ब्रस्पर्धेत होतं तेव्हाही हेच वाद झालेले. लेखिका असलो तरी अखेर आम्हीबिघडलेल्याबायका आहोत, हे अधिक सत्य!

मी पुस्तकांना सहसा मनोगतं वगैरे लिहीत नाही, प्रस्तावनाही मला अनावश्यक वाटतात. ‘रजईचा अपवाद ठरवला. मलाब्रलिहिण्याची हिंमत या कथांनी दिली, त्यामुळे ते लिहिणं आतून गरजेचं वाटलं. ते मनोगत आज या निमित्ताने इथं देतेय.

लहानपणापासून अनेक प्रश्न मनात उगवत होते.उत्तरं सापडली नाही; तेव्हा काही विरून जायचे, पण काही मात्र तग धरून वाढायचे विस्तारायचेसुद्धा! सोबत बर्याच गोष्टींविषयी कुतूहल असायचं, उत्सुकतादेखील! वाढत्या वयासोबतच्या शरीरातल्या घडामोडी आणि बरोबरीने बदलत जाणार्या मानसिक वृत्ती, विचारांवर सतत मात करणार्या भावना... असं बरंच काही होतं. आपलं स्वतःचं, मैत्रिणींचं, घरादारातल्या - आजूबाजूच्या बायकांचं जग... कितीतरी गोष्टी मनात घुटमळत असायच्या. पण हे काहीही लिहिण्याची माझी कधीही हिंमत झाली नाही.

कथेच्या तुलनेत संदर्भांची धूसरता असणार्या कविता लिहितानासुद्धा धाकधुक असायचीच. कशातून काय अर्थ काढले जातील आणि त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याच्या नुसत्या कल्पनेनेच भीती वाटायची. मनात तयार झालेले शब्दबंध मनातच स्वतःकडूनच चुरगाळून टाकले जायचे... आणि जर यदाकदाचित चुकून काही असं लिहिलं गेलंच, तर ते इतर कुणाच्याही नजरेस पडण्याआधीच फाडून टाकलं जायचं.

याच वळणावर मला इस्मत चुगताई यांची कथा भेटली. तोवर अतिशयोक्तीनं नटलेल्या, रोमँटिक उर्दू गजलमध्येच मी स्वतःचा मुटका करून निवांत पहुडलेली होते; या कथांमुळे जन्म झाल्यासारखी सटकन् बाहेर आले. रक्तात संवेदनशीलता, भावुकता वाहती ठेवून बाहेरच्या वास्तवाचा स्वीकार करण्याची क्षमता मला याच कथांनी दिली.

माझ्या आजीच्या पिढीतली एक बाई, तीही मुस्लीम समाजातली... त्या काळात हे सर्व लिहिण्याची हिंमत ठेवते... ही गोष्टच माझ्यासाठी आत्यंतिक अप्रुपाची होती. ती कोण... कुठली... कशी आहे? कुठल्या भाषेत लिहिते आणि कोणत्या समाजाच्या संदर्भात? आज ती हयात आहे किंवा नाही? - असे प्रश्न माझ्या मनात तेव्हा उद्भवलेसुद्धा नाही.

तिच्या शब्दांमधून ती होतीच जिवंत... माझ्या आसपास आणि माझ्या आतआतही!

...आणि मग अनुवादाच्या निमित्तानं का होईना, पण जे शब्द मी कधीच लिहिले नसते ते लिहिले जातील आणि कदाचित मग ते सवयीचे झालेले शब्द वापरण्याची हिंमत माझ्यातही येईल; म्हणून काही कथा मराठीत केल्या.

उर्दूतून मराठीत आणलेल्या या शब्दांचं बळ माझ्याप्रमाणे अजून काहीजणींना निश्चित मिळेल!

बर्फाचे खडे चघळत, पलंगावर पालथं पडून, लहान मुलांसारखं पाय नाचवत लिहिण्याची त्यांची सवय होती... हे उगाच आठवलं, फोटो शेअर करताना. बर्फ खात हॉट लिहिणं हे थोरच!

***

अनिल साबळे यांची आजच्या महाराष्ट्र टाम्स मधली कविता अप्रतिम आहे. आवर्जून वाचा. नव्या पिढीतला हा एक खूप वेगळा कवी यासाठी आहे की, अनेकांनी न पाहिलेलं / अनेकांच्या कक्षेत नसलेलं एक जग तो कवितेतून स्वच्छ मांडतो. ज्यांना हे जग थोडंबहुत परिचित आहे, त्यांनाही अनिलच्या नजरेतून हे जग पाहताना नक्कीच एक विलक्षण, थरारक जाणीव होते. ‘खेळच्या नव्या अंकातल्या त्याच्या कविताही अशाच विशेष आहेत. केवळ त्याच्या कवितेवरच नव्हे, तर त्याच्यातल्या माणसावरही प्रेम करावं असा हा आपला वाटणारा कवी आहे.

अनिलच्या भिंतीवरची छायाचित्रं आवर्जून पहा... त्यासोबत त्याने लिहिलेला मजकूरही महत्त्वाचा आहे, तो वाचा.

लिहिणारी ही मुलं खूप मोठी होवोत... ती जी कामं करताहेत, ती करण्यासाठी त्यांना हजार हत्तींचं बळ लाभो... त्यांच्या सोबतीला असंख्य हात येवोत!

असे होवो!

***

हेही वाचाः गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?

आज वाचून पूर्ण केलेलं पुस्तक आहे : अंगिका और कुछ अन्य कहावतें; चयन एवं संपादन : कृष्ण मुरारी सिंहकिसान’. प्रकाशक आहेत : साहित्य अकादेमी आणि किंमत रु. १०० /-

अंगिका खेरीज यात छत्तीसगडी, मेवाडी, भोजपुरी आणि मगही म्हणी देखील आहेत. मजा आली वाचताना.

वानगी दाखल काहींचे हे अर्थ :

. दुष्ट माणूस मेल्यावरही त्रास देत राहतो, तो खराखुरा घातक.

. आईचा जीव गायीचा, मुलाचा जीव कसायाचा.

. भीक मागायलाही वेशभूषा करावीच लागते.

. गव्यांच्या लढाईत जंगल वैराण होतं.

. शांत झोप लागणार्याचं बिछान्यावाचून अडत नाही.

. तलवारीनं होत नाही, ते तराजूनं होतं.

. ओळख ना देख, म्हणे तू माझा मामा

. मासोळ्यांच्या झुंडी पाहून बगळा झाला आंधळा

. गुरू गुळ, तर शिष्य साखर

१०. आंधळ्याला इच्छा दोन्ही डोळ्यांची असते.

***

एक होडी

पाण्यानं भरलेली होती

वाळूनं भरलेल्या

नदीसारखीच

होती तिची मन:स्थिती

नदीच्या

प्रवाहाच्या इच्छा

वाळूत रुतलेल्या

होडीच्या

प्रवासाच्या इच्छा

पाण्यात बुडालेल्या

दोघींना प्रतीक्षा

एकीला पावसाची

दुसरीला

पाण्याची वाफ होण्याची.

***

एकटं

अन्

एकाकी

दोन्हीही एकाच वेळी असू

अशी वेळ दुर्मिळ

अवघड असली

तरीही दुर्मिळ

यापुढे

कितीही वर्षं

कदाचित

मरेस्तोवर

टिकू शकतो हा क्षण

ज्या क्षणी

आहे

एकटी

अन्

एकाकी

या पृथ्वीवर

आहे का कुणी अजून असं

माझ्यासारखं

असल्यास

संपर्क साधावा

पत्ता फोन मन शोधून

तोवर

या आकाशगंगेत

डुबकी मारून

होऊ पाहीन

पापमुक्त

आहेय कुणी

फासाची गाठ मारून देणारं

दोर खेचणारं?

उतरवणारे काय ते

नोकरी म्हणूनही उतरवतील

कर्तव्य उरकत

आहेय कुणी

मांडी देणारं?

आहेय? आहेय? आहेय?

निदान

दुसर्या आकाशगंगेत...

आहेय?

हाक पोहोचत नाही

आणि मी टेकते डोकं

असंख्य जाग्या रात्री

अश्रूंनी भिजून

ओल्या झालेल्या कुबट

उशीवर

ती उशी

जाळा

माझ्यासोबत

जळायला

कितीही वेळ लागला तरीही

थांबा जळेपर्यंत

जा

आपापल्या जगात

कवटी

वाजल्यावर

***

शत्रूहूनही घातक असतो

दुखावलेला यार

त्याला आरपार

माहीत अस्तोय आपण

आईहून जास्त बापाहून जास्त

सहज क्रौर्याने

नक्षीदार मुठीची दातेरी सुरी

पोटात खुपसून गर्रकन फिरवतो तो

फिरवत राहतो

आतल्या आत आतल्या आत

आतड्याचा पीळ कापत

हजारो तुकडे करतो

धारदार यार

शत्रूवर पलट वार

करता येतो

याराकडे फक्त बघता येतं

दुखावलेल्या नजरेने

 

***

 

किती एकाकी या अवकाशात अंतर राखून असलेले एकेक तारे

किती एकाकी कोसळत उल्का होणार्या एकेक चांदण्या

किती एकाकी मातीखाली एकेका वृक्षाची मुळं

किती एकाकी न रुजलेल्या बिया कुजण्याचं भविष्य दिसलेल्या

किती एकाकी पाखरू स्थलांतर करून आलेलं

किती एकाकी हा विंचू पाठीवर बिर्हाड वाहणारा अथक

किती विलक्षण बाराखडी ही क ची जी

वाहतेय प्रश्नार्थक चिन्हांची ओझी अकारण

कधी कशाला कसं का किती कुणी कुठे वगैरे

पायातलं कुरूप

मोठं होत चाललंय पायाहून

कोरायला काटा नाही कोरणाराही नाही कुणी किती एकाकी या

अवकाशात मी ही

***

कपडे उतरवता येतात

कातडी उतरवता येते

भिंती उतरवता येतात

आणि

उंबरे तर नसतातच आजकाल

फक्त

या विशाल पोकळीत

एकही

हाक

ऐकू येत नाही

तेव्हा

मरून गेलेलं माणूस

चांदणी बनलेलं नाही

हे कळतं

कळून चुकतं

पुन्हा एकदा

आणि हयात असलेल्यांच्या यादीत

आपलं नाव डिलीट झालेलं असतं

हेही समजतं.

***

हेही वाचाः कृतीच त्यांची भाषा होती