बोली नाही तर भाषा नाही

२९ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : १६ मिनिटं


खानदेशापासून मराठवाडा आणि मध्य प्रदेशातल्या निमाडपर्यंत बोलली जाणारी तावडी ही मराठीची एक महत्त्वाची बोली. बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे यांच्यासह अनेक साहित्यिकांची ती मायबोली. तावडीचं पहिलं राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं भरतंय. रविवारी ३० डिसेंबरला ही एक राज्यातली महत्त्वाची सांस्कृतिक घटना होतेय. त्यातलं ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचं अध्यक्षीय भाषणही मोलाचं आहे. या लिखित भाषणातला हा संपादित अंश.

‘तावडी बोली’भाषक, तसंच तिच्यावर प्रेम करणार्‍या बंधू-भगिनींनो!

मायबोलीच्या प्रेमापोटी आपणा सर्वांचा या संमेलनातील स्वयंस्फूर्त सहभाग सुखावणारा आहे.  मी जामनेर तालुक्यातल्याच सुनसगाव खुर्द गावचा. २२ घरांचं आणि दोनशे लोकवस्तीचं हे गाव. ते मी ६२ वर्षांपूर्वी शिक्षण आणि नोकरीसाठी सोडलं. गावाचं रूपांतर आता निमशहरात झालेलं आहे. त्याला आधुनिकतेचा स्पर्श झालेला आहे.  नेत्रदीपक अशी भौतिक आणि सांस्कृतिक समृध्दी लाभलेली आहे. तथापि आपली बोलीभाषा अद्यापही जामनेरने टिकवून ठेवलेली आहे.

समृद्ध परंपरांचा प्रदेश

आज आपल्या मायबोलीचं पहिलं संमेलन इथं जामनेरला होतंय. जामनेर हे आपल्या तालुक्याचं ठिकाण. परिसराची बाजारपेठ. अजिंठ्याच्या डोंगररांगांमधून उगम पावणार्‍या आणि या परिसरातच वाघूर नदीमध्ये समर्पित होणार्‍या कांग नदी तीरावर वसलेलं हे गाव. संत तुकोबांचे अवतार मानले गेलेले गोविंद महाराजांचं पावन वास्तव्य जामनेर आणि जवळच्या पाळधी गावात राहिलेलं. त्यांनीच इथं विठ्ठल मंदिर निर्माण करून घेतलं. रथोत्सव सुरू केला. ती परंपरा जामनेरात अखंड सुरू आहे. 

जामनेर सभोवतालच्या परिसरालाही समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेला आहे. त्यातील शेंदुर्णी हे एक उल्लेखनीय गाव. वाचकांना आणि श्रोत्यांना थरारून टाकणारी ‘मराठ्यांची संग्राम गीते’ लिहिणार्‍या दुर्गाप्रसाद आसाराम तिवारीचं वास्तव्य शेंदुर्णीला राहिलेलं. एकेकाळी क्रिकेटचं विश्व उजळून टाकणार्‍या अजित वाडेकरांची शेंदुर्णी जन्मभूमी, त्रिविक्रम महाराज आणि कडोबा महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या शेंदुर्णीला त्यांच्या स्मरणार्थ वार्षिक रथोत्सवाची अखंड परंपरा सुरू आहे.

एकेकाळी शेंदुर्णी हे गाव केळी उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर होतं. शेंदुर्णी फ्रूटसेल सोसायटीचा देशविदेशात लौकिक होता. येथील केळी उत्पादनाची वाहतूक करण्यासाठी अस्तित्वात आलेली पी. जे. ही अवघ्या ५६ किलोमीटर अंतराची नॅरोगेज रेल्वे, हेही या भूभागाचं वैशिष्टयं.

आपल्या बोली पट्टयातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या शेंगोळा यात्रोत्सवातच या परिसरानं गाडगे महाराजांची प्रबोधनात्मक कीर्तनं ऐकली. देवपिंप्रीचा व्यंकटेश रथोत्सव, केकतनिंभोर्‍याचा इंदासिनी यात्रोत्सव, सुनसगावाच्या भवानीचा नवरात्रोत्सव इत्यादी छोट्या-मोठ्या लोकोत्सवांच्या माध्यमातून लोकजीवनातील रूढी, परंपरा आणि संस्कृतीचं जतन केलं जातं.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचं सांस्कृतिक वैभव

खानदेशचं आकर्षण ठरलेला जळगावचा श्रीराम रथोत्सव याच बोलीपट्टयातला. ‘सुवर्णनगरी’ म्हणून जळगांवचा देशात लौकिक झालेला. तथापि त्याची पायाभरणी केली आपल्या जामनेरकरांनी. जळगाव जवळचे आसोदा हे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरींचे माहेर, याच जळगावात नारायण नरसिंह फडणीस यांनी ‘काव्यरत्नावली’ नियतकालिक सुमारे अर्धशतक निष्ठेने चालवलं.

जामनेरचा परिसर महानुभाव भक्तिसंप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी आणि त्यांच्या शिष्या महदंबा यांचं भ्रमणक्षेत्र आणि ‘अवस्थान’ म्हणून पुनीत झालेला जामनेरच्या पूर्वेला तापी- पूर्णा नद्यांचा संगम. संत कवयित्री मुक्ताबाई हिचे  अनुग्रहित चांगदेव वाटेश्वर यांची चांगदेव ही तपोभूमी. 

आपल्या बोली पट्टयातलं मराठवाडा भूभागातलं सोयगाव हे गाव. या परिसरातील नाट्यपंढरी. नाटयवेड्या नटवर्य स्व. लोटू पाटलांचं हे गाव. ते नेहमीच या परिसरासाठी नाट्यस्फूर्ती स्थान राहिलेलं. त्याला लागूनच बोलीच्या सीमावर्ती भागातलं पळसखेड हे गाव. आधुनिक मराठी साहित्याला ललामभूत ठरलेल्या कविवर्य ना. धों. महानोर यांचं निवासस्थान. साहित्य क्षेत्रात मुशाफिरी करु पाहऱ्यांसाठीचं प्रेरणास्थान त्याच्या लगतचं वाकोद. जैन इरिगेशनच्या माध्यमातून या परिसराला जगाच्या नकाशावर नेणार्‍या स्व. भवरलालजी जैन यांची ही जन्मभूमी. अशी समृद्ध परंपरा या परिसराला आहे.  

आज आपण संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहोत. या स्थितीत साहित्य, संस्कृती आणि भाषा यांच्या भवितव्यासंबंधी संवेदनशील मन अस्वस्थ आहे. इंग्रजी भाषेला आलेल्या आत्यंतिक महत्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलींच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आलाय. वास्तविक एकूणच मानवी जीवनात भाषा ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

भाषा केवळ संवादाचं साधन नसतं. ते ज्ञानग्रहणाचं आणि संचयाचंही महत्वाचं साधन असतं. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा संस्कृतीची वाहक असते. पिढीमागून येणारी पिढी भाषेच्या माध्यमातनं जोडली जाते. भाषा आपल्याला व्यावहारिक गोष्टी शिकवते. पण त्यापलीकडच्या आत्मिक गोष्टीही शिकवते. 

बोली हा प्रमाण भाषेचा मूलस्रोत

प्रमाण भाषेच्या परिघात एखाद्या विशिष्ट भूभागात लोक जी भाषा बोलतात तिला ‘बोली’ म्हणतात. महाराष्ट्रात मराठी ही प्रमाण भाषा आहे. आणि तिच्या परिघात वर्‍हाडी, नागपुरी, हळबी, डांगी, मालवणी, कुडाळी, आगरी, झाडी, डांगणी, माणदेशी, मराठवाडी, भिलोरी, पोवारी, अहिराणी, तावडी इत्यादी अनेक बोली आहेत. आपण जेव्हा ‘खानदेशातील बोली’ असं म्हणतो तेव्हा त्यास खानदेशात बोलल्या जाणार्‍या मराठीच्या बोली असा अर्थ अभिप्रेत असतो.

खानदेशात मुख्यतः अहिराणी आणि तावडी ह्या दोन बोली लोक बोलतात. याखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. गुजर बोली, भिलांची बोली, वंजार्‍यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत.

प्रमाण मराठीपेक्षा ‘बोली’ भिन्न का ठरतात? याचं कारण असं की काही लोकाचार, रितीभाती, परंपरा, प्राण्यांना वा वस्तूंना वापरली जाणारी नावं त्या बोली परिसरातच अस्तित्वात असतात. हे काही शब्दच बघा. गळ अर्थात गयः विहिरीत पडलेली बादली काढण्याचं काही कड्या एकत्र अडकवून तयार केलेलं लोखंडी साधन. धावः मोटेचे बैल ज्या पट्ट्यावर पुढे जाऊन मागं सरतात तो पट्टा. तिवयः खळ्यात धान्य उपण्यासाठी तीन लाकडी पायांचं उंच लाकडी साधन. हाड्याः कावळा, रोट हा पारंपारिक सण. वहीः कानबाई लोकोत्सवप्रसंगी गायला जाणारा लोककाव्य प्रकार. ह्या नामांचा वापर बहुधा आपल्या परिसरातील ‘तावडी बोली’तच होत असावा. 

भाषा श्रेष्ठ, बोली कनिष्ठ, असं काही नसतं

बोली नाही अशी भाषा असू शकत नाही. आणि भाषा नाही अशी बोली असू शकत नाही. म्हणून कोणतीही भाषा श्रेष्ठ असत नाही. आणि बोली कनिष्ठ वा हिणकस ठरत नाही ती भाषा असते. त्यामुळे कोणत्याही भाषेला नाकारणं हे काही प्रतिष्ठेचं लक्षण मानता येणार नाही. हे नाकारणं त्या बोली भाषक समूहाच्या संस्कृतीवरच आघात ठरतो.

व्यवहाराची भाषा म्हणून मराठी माणसाला प्रमाण मराठी अवगत असली पाहिजेच.  पण त्याचबरोबर हेही विसरता येणार नाही, की प्रमाण मराठीला तिच्या परिघात बोलल्या जाणार्‍या बोली समृद्ध करीत असतात. या संदर्भात प्रमाणभाषा बोली भाषांची ऋणको असते, असं म्हणावयास हरकत नाही. प्रमाण मराठीचा मूल स्रोतच तिच्या बोलींमध्ये असल्यानं बोलींमधलं शब्दभांडार आणि त्या शब्दांमधलं शहाणपणाचं संचित अत्यंत मोलाचं आहे. उदा. आधोडी - भुकेली. म्हणी - भजनाले दहा, खायाले साठ. 

एखाद्या शब्दात सूचकतेची किती अर्थवलयं साठलेली आहेत. बकाबका खाणार्‍या स्त्रीला उद्देशून आधोडी शब्द वापरला जातो. त्यात दारिद्रय, त्यातून झालेली उपासमार, कित्येक दिवसांनी खायला मिळणं, त्यामुळे अधाशीपणानं खाणं, त्यातून तिचा सामाजिक आणि कौटुंबिक स्तर असं कितीतरी सूचित होतं. म्हणून बोली नष्ट होणं म्हणजे आपल्या मागच्या अनेक पिढ्यांनी कष्टानं मिळवलेलं आणि बोलीतील शब्दात साठवून ठेवलेलं ज्ञान वाया घालवणं आहे. प्रमाण मराठीचा हा मूल स्रोत आटला तर प्रमाण मराठी कोरडी आणि दरिद्री होईल. 

तावडी बोलीः स्वरूप आणि परिसर

प्रमाण मराठी आणि तिच्या बोलीतील परस्पर संबंध या पार्श्वभूमीवर आपल्या तावडी मायबोलीकडे वळू या. आपली ही बोली एक खानदेशी बोली आहे. परंतु अभ्यासकांचं आणि साहित्यिकांचं तिच्याकडे लक्ष न गेल्याने ती दुर्लक्षित राहिली. खानदेशी बोली म्हणजे केवळ अहिराणी बोली हा समज याला कारणीभूत ठरला असावा.

‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाला आचार्य अत्रे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. बहिणाबाईंच्या या कवितेत ‘तावडी बोली’चा आविष्कार विपुलतेने आलेला आहे. तथापि खानदेशी बोली म्हणजे अहिराणी बोली या समजापोटी त्या बोलीचा अहिराणी बोली असा उल्लेख अत्र्यांनी केलेला आहे.

खानदेश या नावानं ओळखल्या जाणार्‍या भूभागात जळगाव आणि धुळे या दोन जिल्हयांचा अंतर्भाव होतो. या भूभागात अधिक प्रमाणात अहिराणी ही लोकबोली आहे हे खरं. तथापि ती एकमेव बोली नाही. अहिराणीखेरीज अन्य बोलीही लोक वापरतात. विशिष्ट भूभागांपुरतं त्यांचं अस्तित्व असलं तरी त्या मराठीच्या भाषाभगिनी आहेत. त्या त्या भागातल्या लोकबोली आहेत.

‘तावडी बोली’ ही त्यातील महत्वाची बोली. या बोलीच्या अस्तित्वाच्या खुणा शब्द आणि वाक्यप्रयोगाच्या रूपात ‘लीळा चरित्र’ या मराठीतील पहिल्या गद्यग्रंथात बर्‍याच ठिकाणी आढळून येतात. तथापि आधुनिक काळात झालेल्या आणि अलीकडच्या काळात मराठी साहित्यात होत असलेल्या वापरामुळे अभ्यासकांचं तावडी बोलीकडे लक्ष वेधलं. काही लेखक आणि अभ्यासकांच्या प्रयत्नातून वापराबरोबरच लोकजागरही वाढत गेला. आजच्या संमेलनाचा आपण मांडलेला घाट हेही एक लोकजागरच आहे.

तावडी बोलीची पताका

मायबोली ही आपली पहिली भाषा असते. तिचं ऋण फेडणं म्हणूनच सुसंस्कृत माणसाचं कर्तव्य ठरतं. मायभाषेच्या संपूर्ण ऋणातून मुक्त होणं शक्यच नसतं. परंतु तसा प्रामाणिक प्रयत्न करण्यानं आपण कृतार्थता आणि कृतज्ञता अनुभवू शकतो. या क्षणी आपणा सर्वांच्या मनात हीच भावना आहे.

आपल्या तावडी मायबोलीचा मराठी साहित्यात झालेला आणि सातत्यानं होत असलेला वापर डॉ. किसन पाटील, डॉ. कैलास सार्वेकर आणि डॉ. अशोक कोळी यांच्या अभ्यासू आग्रहातून सुरू झाला. खानदेशातील एक महत्त्वाची बोली म्हणून ‘तावडी बोली’ या नावानं जाणकारांच्या कुतूहलाचा विषय ठरली. डॉ. अशोक कोळी हा तर तावडी बोलीची पताका खांद्यावर घेऊनच वावरत आहे. 

‘भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण’ या सर्वेक्षण मालिकेचे मुख्य प्रवर्तक थोर भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचंही तिच्याकडे लक्ष वेधलं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘महाराष्ट्रातील बोलीभाषांचं लोक सर्वेक्षणाचं’ अरुण जाखडे यांनी संपादन केलं. या महत्त्वपूर्ण ग्रंथात ‘तावडी बोली’चा समावेश झाला. त्यामुळे ‘तावडी बोली’ व्यापक स्तरावर बोलीभाषा अभ्यासकांसमोर आली.

या ग्रंथात ‘तावडी बोली’चा भाषिक आणि भूभागीय परिचय देताना डॉ. अशोक कोळी यांनी म्हटलंय ‘ही बोली जळगाव जिल्ह्यातील पूर्वेकडील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर या तालुक्यात प्रामुख्याने बोलली जाते. पश्‍चिमेकडील जळगाव, पाचोरा, एरंडोल या तालुक्यातील अर्धा भाग, दक्षिणेकडील मराठवाड्यातील सोयगाव, सावळतबारा, जाईचादेव, तसंच पुर्वेकडे विदर्भातील मोताळा, पिंपळगाव देवी, धामणगाव बढे, उत्तरेकडे मध्य प्रदेशातील थेट बर्‍हाणपूर, शहापूर आणि अंतुर्लीपर्यंतचा विस्तृत भूभाग या तावडी बोलीच्या परिप्रेक्षात येतो. असं असलं तरी जामनेर तालुका आणि त्याच्या भोवतीच्या सीमावर्ती परिसरात तावडी बोली आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.’

तापाडपट्टीत बोलली जाणारी बोली

या बोली पट्टयाचं भौगोलिक रचना वैशिष्ट्य सांगताना अशोक कोळी म्हणतात, ‘रामायण काळातील दंडकारण्याचा प्रदेश एकेकाळी घनदाट अरण्याचा होता. नापीक जमिनीचा हा प्रदेश कायम दुष्काळी राहिलाय. येथील जमिनीच्या भूपृष्ठावर काळ्या आणि भुरकट खडकाचे आवरण असल्यानं तो ‘तापाड’ राहिलेला आहे. या भागात एखाद्याला ताप आला तर ‘ताव’ आला असं म्हटलं जातं. या अनुषंगानं ‘तापलेली’ वा ‘तापाड’ जमीन असलेला हा भूभाग आहे. या अर्थानं हा ‘तावडी’ प्रदेश होतो. या प्रदेशात बोलली जाणारी बोली म्हणून ‘तावडी बोली’ ठरते. 

या भूभागातली जमीन बरीचशी बरड आणि लाल मातीची आहे. या भागात कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. रणरणत्या उन्हानं तापणारी येथील ‘तापाड पट्टी’ अशी या भूभागाची ओळखच निर्माण झालेली आहे. या पट्टी पलीकडचे लोक या भूपट्टीला ‘तावडी पट्टी’ म्हणतात. या तापाडपट्टीत बोलली जाणारी बोली म्हणूनच ‘तावडी बोली’ या नावानं ओळखली जाते. ही बोली प्रादेशिक, भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपत आपलं स्वतंत्र अस्तित्व या भूभागात टिकवून आहे.’

डॉ. कैलास सार्वेकर यांना तावडी बोलीत मराठवाड्याच्या उत्तरेकडील बोली भाषेची आणि पूर्वेकडील वर्‍हाडातील बोली भाषेची वैशिष्ट्यं अधिक जाणवतात. तेही हा खानदेशातील बोलीचा एक स्वतंत्र प्रकार मानतात. ही ‘तावडी बोली’ अहिराणीच्या प्रभावातली बोली नसल्याचं सांगतात. अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनीही तावडी बोली ही खानदेशातील एक स्वतंत्र बोली असल्याचं निरीक्षण नोंदवलंय.

समीक्षक डॉ. किसन पाटील यांच्या मते, तापणार्‍या जमिनीचा भूभाग म्हणून ‘तपाड’ म्हणजे ‘तापाड प्रदेश’ आणि या प्रदेशाची बोली म्हणून ‘तावडी बोली’ असं या पट्टयाच्या पलीकडच्या लोकांनी या बोलीला संबोधलं असावं. हे पटणारं आहे. कारण लोकव्यवहारात अशी नावं दिली जातात. आपल्याकडचे लोक तापी नदी पलीकडच्या पट्टयाला ‘पारपट्टी’ म्हणतात. त्या भागातील ‘लेवा गण समूहा’ ला ‘पाजणे लोक’ आणि त्यांच्या बोलीला ‘पाजणी बोली’ संबोधतात. थोडक्यात ‘तापाड’ भूभागात बोलली जाणारी ही आपली बोली आहे. म्हणून ती ‘तावडी बोली’.

व्याकरणाचं भानही हवंच

या बोलीला भाषिक व्यवहारात प्रतिष्ठा लाभण्यासाठी व्यापक प्रमाणावर भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बदलतं भाषिक वास्तव आणि जीवन व्यवहाराच्या संदर्भात अभ्यास होणं गरजेचं आहे. या अभ्यासात व्याकरणिक अंगाचं भानही ठेवावं लागेल. अर्थात हे केवळ व्यक्तिगत काम नसून अभ्यासकांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विशेष अभ्यास कक्षाच्या संदर्भातही प्रयत्न करता येतील.

तावडी बोलीची मौखिक परंपरा प्राचीन आहे. ग्रांथिक आविष्कार मात्र यादव काळात महानुभाव वाङ्मयात झालेला दिसतो. महानुभाव साहित्याची सर्जनभूमी तावडी बोली भूभागाला लागूनच असल्यानं तिची अनेक भाषिक रूपं महानुभाव साहित्यात आढळतात. मधल्या काळात ही बोली बोलीच्या रूपात लोकवाङ्मयात ओवी, झोक्यावरची गाणी, कानबाईच्या वह्या, गोंधळी कथा, लग्नाप्रसंगीची गीतं, फुगडीची गाणी, जात्यावरच्या ओव्या, मोटेवरची गाणी इत्यादी रूपात वावरतांना दिसते.

खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांचं प्रत्यक्ष वास्तव्य ‘तावडी बोली’ पट्टयातलं. अहिराणी बोलीच्या प्रभाव क्षेत्रापलीकडचं. ‘लेवा बोली’ ही बहिणाबाईंची मायबोली. ही बोली तावडी आणि वर्‍हाडी बोलीच्या प्रभावातली. त्यामुळे तावडी बोलीची भाषिक रूपं बहिणाबाईंच्या कवितेत विपुलतेनं आलेली आहेत.

लेखकांची मांदियाळी

‘लेवा गण बोली’ परिसरातील के. नारखेडे, श्रीराम अत्तरदे, संत विजयराज, वि. भा. नेमाडे, प्रभाकर चौधरी, भानू चौधरी, भगवान सपकाळे, काशिनाथ भारंबे, सीमा भारंबे इत्यादी लेखक, कवींच्या साहित्यातही ‘तावडी बोली’ च्या विविध रूपांचा आढळ होतो. या संदर्भात सध्याचं महत्त्वाचं नाव म्हणजे भालचंद्र नेमाडे. त्यांचं सर्जनशील तसंच देशीपणाचं आग्रह धरणारं तात्त्विक साहित्य ‘तावडी बोली’ लेखक, कवींना नेहमी प्रेरक तसंच अनुकरणीय राहिलेलं आहे. 

‘तावडी बोली’ च्या वाङ्मयीन आविष्कारातील सामर्थ्याचं आणि सौंदर्याचं दर्शन घडतं, ते ना. धो. महानोरांच्या साहित्यात. महानोरांच्या एकूणच साहित्याची अनुभवभूमी तावडी बोली पट्टयातील सीमावर्ती भाग. पार्श्वभूमी याच मातीची. निसर्गही या पट्टयातलाच. त्यांनी आविष्कारात तावडी बोलीचा सहज, चपखल आणि कलात्मक असा वापर केला. तथापि आपल्या व्यक्तित्वाला आणि निर्मितीला बोलीचं लेबल लावून सीमित केलेलं नाही.

कलाकृतीतून व्यक्त होऊ पाहणार्‍या आशयाची अपरिहार्य मागणी म्हणून तावडी आणि मराठवाडी बोलीची रूपं अढळपणे त्यांच्या साहित्यात आलेली आहेत. आशय आणि अभिव्यक्तीची येथील एकरूपता पाहून ‘शब्दै सहितौ काव्यम्’ या संस्कृत भारतीय साहित्य शास्त्रकार भामराच्या ‘काव्यलक्षणा’ ची प्रतीती यावी इतकं शब्दार्थांचं एकजिवीकरण तिथं आहे. 

        कापूस वेचिता
        तिने थबकून ऐकियेले होते.
        दांडाचे गवत
        पाण्याच्या कानाशी काल काहीबाही     
        चावळीत होते. 

अशी कवितेत सहज बोली रूपं येतात. कवितेप्रमाणेच ना. धों. महानोर यांच्या कथनात्मक साहित्यातील शब्दभांडार बोली भाषेतीलच आहे. परंतु बोलीरूपं योजनेत कुठंही अट्टाहास, बटबटीतपणा वा उपरेपणा नाही. ती सभोवतालची, लोकजीवनातील जगण्याची भाषा आहे. जीवनभाषा आहे. साहित्यातून जे काही व्यक्त होऊ पाहतंय त्याचं अभिन्न अंग आहे.

या बोलीच्या अस्मितेतूनच त्यांचं ‘पळसखेडची गाणी’ हे लोकगीत संकलन जन्माला आलं. त्यात अभिनिवेश नसून मायबोली विषयीची उत्कट आस्था आहे. व्रतस्थ सेवा आहे. 

याच ठिकाणी त्या काळातील एका महत्त्वपूर्ण काव्यविषयक उपक्रमाचा उल्लेख आवश्यक ठरतो. तो असा. तो काळ साहित्यक्षेत्रात सत्यकथेच्या प्रभावाचा काळ होता. परंतु आपल्या मायबोलीत लेखन करणार्‍या ना. धों. महानोर, राजा महाजन, एकनाथ देशमुख, मधू पांढरे, रमेश सैतवाल, दिलीप देशपांडे, विठ्ठल काळे आणि इतर काही कवी लेखक मंडळी एकत्र येऊन साहित्याविषयी चर्चा करत. रविकिरण मंडळाचं स्मरण व्हावं असा तो उपक्रम होता. विशेष म्हणजे ही मंडळी ‘शब्दझंकार’ या नावाचं बोलीभाषेतून नियतकालिकही काढायचे. हा उपक्रम आपल्या मायबोलीतून लेखन करू पाहणार्‍यांसाठी निश्‍चितच प्रेरक आणि दिशादर्शक आणि आत्मबल देणारा ठरला.

त्यात भगवानराव देशमुख, मधू पांढरे, रवींद्र पांढरे, विनायक पाटील, चंद्रकांत मोरे, अशोक कोळी, एकनाथ देशमुख, दीपध्वज कोसोदे, अ. फ. भालेराव, डी. डी. पाटील, आत्माराम कुंभार, पांडुरंग सुतार, जयवंत बोदोडे, प्रकाश सपकाळे, नामदेव कोळी, सुभाष किन्होळकर, राहुल निकम, विश्वास पाडोळसे, विनोद जाधव, प्रकाश किनगावकर, गोपीचंद धनगर, सुरेश पाटील, प्रफुल्ल पाटील, विजयालक्ष्मी वानखेडे, किशोर काळे, जगदीश पाटील इत्यादींचा उल्लेख करावा लागेल.

विशेष म्हणजे ही सारी मंडळी ‘तावडी बोली’ पट्टयातील विविध भूभागातील आणि स्तरातली आहेत. या सर्वांनी आपल्या कथा, कविता, कादंबरी लेखनातून केलेला मायबोलीचा आविष्कार स्तुत्य आहे. काहींच्या लेखनात साहित्यिक कसदारपणा आहे. तथापि त्यावर आत्मसंतुष्ट राहणं पुरेसं नाही. साहित्यिक कालभान ठेवून आपल्या नव्या वाटा शोधाव्या लागतील. त्यासाठी साधना मात्र आवश्यक आहे. 

नाटक या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात एकनाथ देशमुख यांचं ‘जग नावाचा अंधार’, दत्ता कुलकर्णी यांचं ‘सारे प्रवासी प्रीतीचे’, अरविंद चौधरी यांचं ‘फुटपाथ’ अशोक कोळी यांचं ‘जागले’ इत्याचा अपवाद वगळता नाटकाशी आपण भिडलेलोच नाही. आत्मचरित्राबाबतही एखादं दुसराच अपवाद सांगता येईल. सकस आणि विपुल साहित्य निर्मितीतून समीक्षा व्यवहार  जन्मतो. त्यामुळेच प्रभाकर चौधरी, कैलास सार्वेकर, डॉ. किसन पाटील, डॉ. शिरीष पाटील, मनोहर सुरवाडे, डॉ. विजयेंद्र पाटील, डॉ. संदीप माळी यांच्या अल्प स्वल्प समीक्षा लेखनावरच समाधान मानावं लागतं.

समीक्षा म्हणजे भलावण नव्हे, याचं भान ठेवून तरल रसिकतेनं आणि गंभीर वृत्तीनं आपल्याला समीक्षेच्या वाटेनं जाणं श्रेयस्कर ठरणारं आहे. त्यासाठी मराठी आणि तिच्या अन्य बोलीतील साहित्य व्यवहाराच्या सातत्यपूर्वक धांडोळाच उपकारक ठरेल, असं मला नम्रपणे वाटतं. चौफेर आस्वादातच आपल्या ठिकाणी असलेल्या उपजत प्रतिभेची नखं अधिक तीक्ष्ण होण्याच्या शक्यता दडलेल्या असतात, असं पूर्वसुरी सांगत आलेले आहेत.

परंपरेत नवता आणण्याचा प्रयत्न हवा

मित्रांनो, केवळ बोलीभाषेतलं वा बोलीभाषेतील भाषिक रूपांची योजना केलेलं लेखन म्हणजे साहित्य नव्हे. प्रत्येक साहित्य प्रकाराची एक परंपरा असते. आशयानुसार अभिव्यक्तीची मागणी असते आणि म्हणूनच सवंग लोकप्रियतेच्या आहारी न जाता परंपरेत नवता आणण्याच्या प्रयत्नात आपलं आणि आपल्या मायबोलीचं हित सामावलेलं आहे. विशेषतः नवोदितांच्या बाबतीत हे भान ठेवणं गरजेचं आहे. मग काही हौशी लेखक मंडळी शत्रू होण्याची जोखीमही पत्करायला हरकत नाही.

माझं आणखी एक निरीक्षण नोंदवण्याचा मोह अनिवार होतो. ते असं की, आपल्या साहित्य, संस्कृती मंडळात काही महिला सदस्य असल्याचा आनंद जरूर आहे. परंतु त्या आणि तालुक्यातील अन्य महिला लिहित्या होण्यात अधिक आनंद आहे.  या संदर्भात महात्मा फुल्यांनी म्हटलंय, ‘आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व स्त्रियास अगर पुरुषास एकंदर सर्व मानवी हक्कांसंबंधी आपले पाहिजे तसे विचार, आपली पाहिजे तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे’.

या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातल्या पहूर गावच्या माहेरवाशिणी ख्यातनाम कवयित्री अनुराधा पाटील यांचा सन्माननीय अपवाद वगळता अन्य लक्षणीय नाव नाही. या परिसरात वावर झालेल्या महदंबेच्या धवळ्यांचा आणि परिसरालगतच राहिलेल्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ लिहिणार्‍या ताराबाई शिंदेंनी निर्माण केलेल्या परंपरेचं आपण स्मरण ठेवायला हवं. स्त्रियांना मोकळं होऊ द्या. त्यांनी लिहितं होण्यासाठी त्यांना अनुकूल आणि प्रेरक वातावरण देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

बोलीत व्हावी साहित्यनिर्मिती

मित्रांनो, बोली टिकून राहण्यासाठी तिचा भाषिक अंगाने अभ्यास होणं जसं गरजेचं असतं, तसं बोलीत कसदार साहित्य सातत्यानं निर्माण होणंही गरजेचं आहे. निर्मितीच्या अंगानं विचार करता कलाकृतीतील आशयाची संपूर्ण अभिव्यक्ती संपूर्ण बोलीमधूनच व्हावी, या समजातून काही मित्रांनी बाहेर यायला हवं. केवळ बोली हेच कलाकृतीचं आविष्कार माध्यम असेल आणि आस्वादक जर प्रमाण मराठी वा अन्य बोलीभाषक असेल तर मला वाटतं त्याचा आस्वाद निर्विघ्नं होणं अवघड आहे. म्हणून मला सुचवावसं वाटतं की कलाकृतीतील कथनात्म निवेदन प्रमाण भाषेत आणि आशयाची अटळता म्हणून बोलीची योजना झाल्यास निर्विघ्न रसप्रचिती येऊ शकेल.

बोलीभाषेतील आपल्या लेखनाला मौलिकता, देशीपण आणि संस्कृतीनिष्ठता लाभण्यासाठी नव्या मंडळींनी आपल्या परिसरातल्या प्रभावी परंपरा, त्यात कालमानानुसार होत गेलेले बदल, लोकजीवनावरील त्याचे परिणाम या बाबतीतही जिज्ञासक असलं पाहिजे. इथल्या मातीत असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, कीर्तनातून होणारं लोकप्रबोधन, माणसांचं माळकरी रितीभातीला अनुसरणं, कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन माणूसपणानं जगणं, ही परंपरा आणि तिच्यात होत असलेली परिवर्तनं, काहींचं लोप पावणं आणि त्याचा लोकजीवनाच्या जगण्यावर होत असलेला परिणाम बोली साहित्यानं टिपला तर ते या मातीतलं साहित्य ठरेल.

पूर्वीची माणसे, फिरस्ते, भटके इत्यादी मंडळीचं लोकसंस्कृतीत एक विशिष्ट स्थान राहिलेलं आहे. ती लोकजीवनातील लोकांची आत्मीय मंडळी. त्यांचा जिज्ञासक शोध आणि त्यांच्यातील जीवन परिवर्तनाला शब्दरूप देता आलं तर आपल्याला लोकसंस्कृतीला उजाळा देता येईल.

प्रभावी लोकसांस्कृतिक जीवनदृष्टीतच बोलीभाषेतील कसदार साहित्य निर्मितीच्या शक्यता असतात. त्यामुळेच आपल्या मातीतील वेगळ्या माणसांचं वेगळं जगणं शोधता येतं. अशा माणसांच्या निवडीतूनच ‘माणदेशी माणसं’ वा ‘मालगुडी डेज’ सारखं समृद्ध लेखन जन्माला येतं. 

सावध! ऐका पुढल्या हाका!

मित्रहो, आपली मायबोली गोड आहे. ती उच्चारणं, बोलणं, तिचा विचार करणं म्हणजे आपणच आपल्या मातीचं गुणगाण करणं आहे. आपली बोली आपल्या बोलण्यात आणि लेखनात वापरणं हा आपला हक्क आहे. एक आनंददायी अनुभव आहे. प्रमाण भाषा आत्मसात करणं भाषिक व्यवहारासाठी आवश्यकच आहे. परंतु उगवत्या पिढीच्या भावविश्‍वाबाहेर आपली मायबोली ठेवू नका. प्रमाणभाषा शुद्ध आणि बोली भाषा अशुद्ध हे मुलांच्या मनावर बिंबणार नाही, याची आपण खबरदारी बाळगू या.

मित्रांनो, आपली मराठी आणि मायबोली टिकून राहण्यात मी निराशावादी नाही. आवश्यकता आहे आपली उदासीनता झटकण्याची. स्वतःपासूनच प्रयत्नशील होण्याची. त्यासाठी जनआंदोलन उभारून त्यात कृतीशील सहभाग देऊ या. मराठी माध्यमाच्या शाळांच्या अस्तित्वासाठी, शालेय तसेच पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमात मराठीच्या अंतर्भावासाठी आग्रही राहू या. आपल्या मुलांच्या हाती चांगली पुस्तकं पडतील असं घरात आणि समाजात वातावरण ठेवू या.

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रंथरुची निर्माण करू या. शक्य असेल त्यांनी विशेषतः शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी स्वतःचा निवडक ग्रंथसंग्रह करणं आणि दर्जेदार नियतकालिकांचं वर्गणीदार होणं सद्यस्थितीत परवडण्यासारखं नाही असं नाही. छोट्या मोठ्या सामूहिक प्रयत्नातून मराठी आणि त्याचबरोबर तिच्या बोलींचं अस्तित्व सुरक्षित राहण्यास आपला सहभाग देता येईल. त्यासाठी होऊ या प्रयत्नशील.

मित्रहो, आपल्या मायबोलीच्या आणि तिच्यातील साहित्याच्या गौरवार्थ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टपूर्वक हा सोहळा घडवून आणला. मायबोलीच्या अस्तित्वाच्या चिंतेने आपल्याला ग्रासलेलं आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आपल्या बोली विषयीची आस्था निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो, तरी संमेलन हेतू सफल झाला, असं मानता येईल. 

मित्रहो, आपल्या अंतःकरणातील आशय प्रकट करण्याची धाटणी वा शैली म्हणजे भाषा.  ती प्रमाण भाषा असेन वा बोली भाषा. स्वतःला लेखक-कवी म्हणवर्‍यांचा सदोदित भाषेशी संबंध येतो. म्हणूनच महाकवी तुकोबांनी ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन’  असं म्हटलं आहे. आपण आपल्या मायबोलीतलं शब्दधन जपू या. आपल्या बोलीचं पावित्र्य सांभाळत प्रतिष्ठा वाढवू या.

काही सोसण्याची तयारी ठेवून निष्ठापूर्वक मायभाषेचं ऋण फेडण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न करू या. प्रमाण मराठीशी सुसंवाद साधत मायबोलीतून लिहित राहू या.  त्यातच मायबोलीचं हित आणि प्रमाण मराठीची समृध्दी सामावलेली आहे.  मी आपणास केशवसुतांच्या शब्दात कळकळीची विनंती करेन. ‘सावध! ऐका पुढल्या हाका!’