कवीच्या जाण्याने काय गेलं, काय उरलं?

०५ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


औरंगाबादेत राहणारे कवी अरुण गोपाळ कुलकर्णी यांचं ४ जानेवारीला अकाली निधन झालं. तसं माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल वाईट न बोलणं हा शिष्टाचार आहे. मात्र अरुण कुलकर्णी यांच्यासारखा कविमनाचा माणूस खरोखर किती नितळ निर्मळ जगला हे अनेकांनी उदाहरणांसकट लिहिलं, सांगितलं. एक कवी जातो तेव्हा आपल्यातून काय निघून जातं आणि मागं काय उरतं याचा हा लहानसा धांडोळा.

कवी अरुण कुलकर्णी गेल्याचं काल कळालं, तेव्हा मला माझ्याच कवितेच्या ओळी आठवल्या,

 

शायर मरतो तेव्हा 

रस्त्यावरची वाहती गर्दी 

थबकत नाही;

क्षणभरही.

सेन्सेक्स कोसळत नाही,

किंवा 'शहर बंद' ची हाकही देत नाही कुणी.

 

...मात्र शायर मरतो तेव्हा 

कायमचे अनाथ होतात 

कितीतरी शब्द... 

विपर्यासाच्या भीतीनं 

कोंडून घेतात स्वत:ला 

मौनाच्या काळोख्या तळघरात.

पुढं हळूहळू विझत जातात 

अर्थाच्या शुभ्र पणत्या, 

आणि धुमसत राहतात 

अनर्थाचे अनौरस वणवे 

सभोवार.’ 

-शर्मिष्ठा 

अस्वस्थतेनं भरून व्यापलेल्या काळात एक कवी जातो, तेव्हा होणारी पडझड अदृश्य असेल, पण ती जबर असते. मात्र हृदयविकाराचा झटका येऊन कवी अरुण कुलकर्णी गेले तेव्हा आणि त्यानंतरही त्यांच्या आतल्या पडझडीची कल्पना क्वचितच कुणी करू शकेल. आत तीव्र संवेदनेची जखम सतत भळभळून वाहत असेल, तरच बाहेर कागदावर काहीतरी वाचनीय उमटू शकतं. पण ती जखम वागवणं, जपणं याची किंमत कुणी कशी आणि किती काळ मोजणार?

अरुण कुलकर्णी नावाचा कवी साहित्य चळवळीतला किती ताकदीचा, मूक कार्यकर्ता आणि दिलदार माणूस होता याचा काही श्रद्धांजलींवरूनही अंदाज लावता येईल.

ज्येष्ठ लेखक, कवी सतीश काळसेकरः

अरुणच्या अकाली निधनाची बातमी आत्ताच कविमित्र संदीप जगदाळेनं दिली. आणि मी पुरता हादरून गेलो. अरुणचं वय तसं जाण्याच नव्हतंच. पण त्याचा न थकणारा उत्साही चेहरा आणि सच्ची धावपळ यामुळं तो याक्षणी साक्षात माझ्यासमोर उभा आहे. मी कधीही औरंगाबादला उतरावं आणि अरुण मला घ्यायला आलेला, माझ्यासाठी ताटकळत उभा असावा. त्यानंतर औरंगाबादमधे मी असेन तितके दिवस त्याचा तरुण आणि उत्साही वावर माझ्याभोवती असायचा.

एकप्रकारे दीर्घायुष्य हा निदान माझ्यासाठी तरी शापच होत चाललाय! दीर्घायुष्याचे फायदे काय असतील ते असो, पण माझ्याहून धाकट्यांची मरणं मला सातत्यानं बघावी लागताहेत.

अरुण नुसताच लेखक नव्हता, तर लिहिण्यापलीकडं जाऊन आपुलकीनं आपल्या आणि इतरांच्या लेखनासंबंधी उत्साहानं बोलणारा होता. माझ्या आणि त्याचा परिचय फार उशिरा आणि अपघातानंच झाला. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ आणि ‘आपले वाड्मयवृत्त’ या दोन माध्यमातून माझ्या लेखनाचे प्रयत्न चालले होते. त्यावर अरुण नेहमीच लक्ष ठेऊन होता. वेळोवेळी स्वत:च्या धावपळीतून उसंत काढत तो माझ्याशी जमेल तितका संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.

याआधी रमेश राऊतचं अकाली निधन झाल्यावर त्याच्या ‘साक्षात’ प्रकाशनाची उरलेली कामं उरकण्याचा प्रयत्न अरुणनं केलेला होता. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ नंतर माझ्या दुसऱ्या गद्यलेखनात, ‘पायपीट’मध्ये, अरुणचा वाटा खूप जास्त होता. ‘पायपीट’चं संपादन हे खरं तर त्याच्या श्रमाचंच फळ होतं. त्याला ग्रंथरूप मिळाल्याचं श्रेयही त्याचंच!

काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना अरुण खूप अस्वस्थ वाटला. कौटुंबिक आघातानं हादरलेला होता. मी माझ्या परीनं दिलासा द्यायचा प्रयत्न केला. पण त्या आघाताला न पचवता आल्यानंच कदाचित, हृद्यविकाराच्या धक्क्यानं अरुण निघून गेला. त्याच्या आजवरच्या लेखनाचं त्यानं काय केलंय आणि त्याचं पुढं काय होणार हे मला माहीत नाही. पण अरुणनं जमवलेले त्याच्या वडिलांच्या लेखनासंदर्भातले काही कागद मी पाहिले होते. आता अरुणच्या मित्रांनी त्याच्या कामाला संकलित, संपादित करावं असं मला तीव्रतेनं वाटतं. यात माझी मदत लागली तिथं करीनच. अरुणच्या प्रेमळ आठवणींना मी मन:पूर्वक अभिवादन करतो!

साक्षात प्रकाशनाच्या माधुरी रमेश राऊतः

माझे पती रमेश राऊत आणि आमच्या एकूण कुटुंबाशीच अरुण कुलकर्णींचा खूप जिव्हाळा होता. अगदी परवाच ऑफिसला आले होते. मासिकाचं आणि प्रकाशनाचं कसं चाललंय यावर त्यांचं सतत लक्ष असायचं. रमेशजी गेल्यापासूनच ‘साक्षात’ मासिकाचं संपादन, प्रकाशनाची पुस्तकं यात सर्व पातळ्यांवर मदत करायचे.

आधीही या कामांमध्ये दोघं सोबतच असायचे. दोघांमध्ये वैचारिक चर्चा, वादविवाद व्हायचे. पण मग कुणातरी एकाच्या मुद्द्यावर सहमती होऊन काम पुढं जायचं. साक्षातनेच त्यांचा ‘बुजगावणं’ हा कवितासंग्रह काढला. ‘रिमझिम’ हा ललित लेखसंग्रहही आला. अरुणजी आमच्या कुटुंबातलेच एक सदस्य होते.

कवी श्रीधर नांदेडकरः

अरुणच्या जाण्याचं आम्हा मित्रांना प्रचंड दुख आहे. कारण असं, की मोजता येणार नाही इतक्या वर्षांपासून आम्ही एकत्र होतो. किती आठवणी सांगू असं झालंय. केवढा लाघवी स्वभावाचा होता! मिळून मिसळून राहणारा. कवी म्हणूनच्या आठवणी आहेतच. पण त्याचं माणूसपण ठळकपणे समोर येतंय आत्ता.

मित्रांना मदत करणारा. सुखदु:खात उत्कटपणे सहभागी होणारा. सगळ्यांवर प्रेमच केलं त्यानं. तेही निरपेक्ष भावनेनं. अरुण अंतर्मुख, तीव्र संवेदनेचा कवी होता. लोकांसाठी तसा अबोलच. पण आमच्या काही मित्रांजवळ मन मोकळं करायचा. वडिलांच्या मृत्यूचा खूप मोठा आघात झालेला त्याच्यावर. बोलताना कधीही आठवण निघाली की त्याचे डोळे भरून यायचे. मधल्या काळात भावाचं निधन झालं. आईही गेली. हे सगळे धक्के मोठे होते त्याच्यासाठी. 

मधल्या काळात अजूनच अबोल झालता. ‘साक्षात’च्या रमेश राऊतांसोबत त्याची खूप जवळीक होती. रमेश अकाली गेल्यावरही अरुण वर्षभर सावरला नव्हता! माझ्या संग्रहाच्या प्रकाशनावेळी त्यानं प्रचंड लगबग केलती. त्याचं वाचन अफाट होतं. आमच्या कुणाहीपेक्षा त्याच्याकडे खूप मोठा पुस्तकांचा संग्रह आहे. आणि कुणालाही, अगदी नव्या पोरांनाही मोकळेपणाने पुस्तकं द्यायचा. त्याची अनेक पुस्तकं अजूनही माझ्याकडे असतील! मोठ्या मनाचा माणूस होता!

कवी रवी कोरडेः

आमची ओळख १५ वर्षांपासूनची. कवितेमुळे झालेली. श्रीधर नांदेडकर, सुदाम राठोड, संदीप जगदाळे आणि अजून काहीजण मिळून एखादा जुना कवी लेखक असेल, त्याच्या घरी जायचो. तिथे मराठीतल्या महत्त्वाच्या कविता वाचायच्या. चर्चा करायची. तिथे दिवस घालवायचा. उस्मानाबादला उत्तम लोकरे यांच्याकडे गेलतो. कुर्डूवाडीला एक जुन्या काळातले कवी राजीव म्हणून आहेत. तिकडेही आम्ही गेलेलो.

अरुणच्या कवितेतून अतिशय तरल भावविश्व समोर यायचं. त्यांनी ललित लेखनही केलंय. कोणताही वाङ्मयव्यवहार निकोप आणि राजकारणविरहीत असावा, अशी त्यांची धारणा होती. साहित्यिकांचा दांभिकपणा त्यांना खटकायचा. एखाद्याने लेखक म्हणून नाव मिळवतानाच माणूस म्हणूनही मोठं झालं पाहिजे, ही त्यांची आग्रही भूमिका होती.

नव्या कवींच्या पाठीमागं आवर्जून उभं रहायचे. वाङ्मयीन चळवळींना ते आर्थिक मदत करायचे. नियतकालिकांवर त्यांचं विशेष प्रेम. जवळपास सगळी मराठी हिंदी नियतकालिकं त्यांच्याकडे यायची. मोजक्या पण प्रामाणिक कविता त्यांनी लिहिल्या. त्यांचं हिंदी मराठी साहित्याचं वाचन अफाट होतं. त्यांचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह आहे. त्यांचा वावर कायमच साधासरळ असायचा. कुणाच्याही आजारपणात, अडचणीत ते खंबीरपणे उभं राहायचे. एखाद्या विषयावर स्वत:च्या शैलीत मतं मांडायचे. बोलताना कायम त्यात एक करुणेचा धागा असायचाच. 

कवी अरुण गोपाळ कुलकर्णी गेल्यावरही त्याच्या असण्याचे खरेखुरे भास जिवंत ठेवणाऱ्या त्याच्या लिहिण्यातून या दोन कविता -  

१.

लिहून झाल्यावर

शुभ्र कागदावर काळा निळा दगड होऊन 

अहिल्येसारखी पडून राहते कविता 

आतुरलेली असते ती 

वाचकाचा स्पर्श होऊन 

पुन्हापुन्हा जिवंत होण्यासाठी 

 

येथे तर 

कागदावर उतरण्यापूर्वीच 

अधांतरीच मरून पडताहेत पटापट ओळी 

आणि या पोकळीत 

स्पर्श पोहोचण्याची शक्यतादेखील 

वारंवार धूसर होत चाललीय 

 

बैल

मुंगसं बांधून

भूक तुडवतांना मी हतबल

मी खळ्यातला बैल

 

पुन्हापुन्हा प्रारंभाला

डोळे झाकून परीघचाल

मी घाण्याचा बैल

 

पुढं जातो तोंडाकडून

माघार घेतो पाठीकडून

पुढंमागं मागंपुढं अशी घालमेल

मी मोटेवरचा बैल

 

खुडल्या शिंगांना रंग

वळ झाकण्याला पाठीवर झूल

वरपांगी आलबेल

मी पोळ्याचा बैल

मी बैल... नुस्ता बैल

हेही वाचाः 

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

दीडशे वर्षांनंतरही मराठी कवितेत गालिब जिवंत

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता

‘अरुणा ढेरेंचं मराठी साहित्यातलं योगदान मानदंडासारखं’

फ्रेंच सरकारने लुई ब्रेल यांचा मृतदेह कबरीतून बाहेर का काढला?

(लेखिका मुक्त पत्रकार आणि कवयित्री आहे.)