पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा? यंदा नेमकी हवा कुणाची आहे?
लोकसभेची पहिली फेज आजपासून बरोबर १५ दिवसांवर आहे. आणि डोक्यात एकच प्रश्न आहे की या इलेक्शनची हवा कुठाय? म्हणजे, एवढी मोठी इलेक्शन आता फक्त दोन आठवड्यावर आहे, असं आजूबाजूला बघितल्यावर का वाटत नाही? गेल्या वेळेला वातावरणात जे भारलेपण होतं तेवढं सोडा पण २००९ इतकासुद्धा उत्साह कॉमन मॅनमधे दिसत नाही आहे.
यासंबंधी पत्रकारांच्या पोस्ट, काही लोकांशी बोलल्यावर त्यांचंही असंच मत दिसलं. राजकारणाशी संबंधित लोक सोडले तर बाकी काही हलचल दिसत नाही. याहून सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या इलेक्शनचे सर्वात मोठे स्टार प्रचारक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन जाहीर झाल्यापासून काहीच बोलले नाहीत. कालचा अपवाद वगळता गेले १८-१९ दिवस ते पब्लिक डोमेनमधे दिसलेच नाहीत. या सगळ्यांमागंच नक्की लॉजिक काय? गेल्यावेळी मोदींनी अख्खा देश पिंजून काढला होता. या सगळ्यातून नक्की काय अर्थ काढायचा?
यात एक तर्क असा लावता येईल की, सगळं सांगून झालंय आणि प्रचाराला काही उरलं नाही! म्हणजे, गेल्या पाच वर्षात एकुणातच मोदींनी मिळेल त्या मार्गाने जनतेशी जो थेट संवाद साधायचा तो साधून झालायहे. त्यामुळे आता परत काही वेगळं सांगायला नाहीच आहे. सोशल मीडियामुळे झालेलं हे ओवर कम्युनिकेशन असू शकतं.
पण त्यामुळे लोकांचं जे काही आहे ते ठरलेलंय. एकतर ते मोदींना मत देतील किंवा नाही देणार, पण त्यात प्रचाराने फारसा काही फरक पडणार नाहीय. बाकी लोकल पातळीवरची गणितं तिथले उमेदवार बघतीलच. दुसऱ्या बाजूला काँग्रेस काहीएक नरेटिव उभा करायचा प्रयत्न करतेय. पण, तो काही जनमानसाची नस पकडताना दिसत नाही. नाहीतर एव्हाना अँटीमोदी चर्चेला चाल मिळाली असती. काँग्रेसने राफेलच्या मुद्यावर प्रमाणापेक्षा जास्त वेळ घालवला, असं वाटतं.
याच तर्काची पुढची स्टेप अशी, की जर का एकूणच हवा कमी असेल तर त्याचा मतदानाच्या टक्यावर विपरीत परिणाम होईल आणि काही प्रमाणात ते घटेल. असं झालं तर त्याचा फायदा भाजपाला होईल असं वाटतं. कारण तो एक केडरबेस्ड पक्ष आहे. आणि त्यांची लोकांना मतदानाला बाहेर काढायची यंत्रणा तयार आहे. शक्ती केंद्र प्रमुख वगैरे त्यांची तयारी झालीय. अशी तयारी विरोधी खेम्यात झालेली दिसत नाही किंवा झाली असेल तर निदान ती पब्लिक डोमेनमधे नाही.
पण एकुणातच मतदान कमी झाल्यावर त्याचा भाजप म्हणजे एनडीएला फायदा होतो हे प्रणव रॉय यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात दिलेल्या आकडेवारीमधून दिसून येतेच. सो, लोकांच्यात उत्साह नसणं ही सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षासाठी धोक्याची घंटा आहे हे मात्र नक्की.
दुसरी शक्यता अशी की प्रचार सुरु आहे. पण तो जमिनीवर दिसत नाही. वॉट्सअप, टेलिग्राम, शेअर चॅट, हॅलो अशी विविध चॅटिंग अॅप सध्या भारतात फेमस आहेत. आणि यावर चालणाऱ्या प्रचाराचा ट्रॅक ठेवणं किंवा समग्र अंदाज घेणं हे अशक्य आहे. मग या अॅपवरती प्रचार चालूय का? की जो दिसत किंवा सापडत नाहीय त्यातून काही अंडरकरंट्स तयार होताहेत का? ही शक्यता नाकारता येत नाही.
कारण माढा आणि कोल्हापूर अशा दोन ठिकाणी असे अंडरकरंट्स दिसताहेत. पण ते तात्कालिक वाटतात. देशभर स्ट्रॅटेजी म्हणून असं काही चालू असेल का याचा शोध घ्यावा लागेल. असं असेल तर ही इलेक्शन सर्वाथाने सोशल मीडियाने फिरवलेली इलेक्शन असेल एवढं नक्की. चॅट इंजिन्समुळे घडणारं मॅन टू मॅन मार्किंग ही यावेळची खासियत ठरू शकते. त्याला सिनेमा, वेब सिरीज आदींची जोड मिळू शकते.
मोदींच्या आजच्या विडीओकडे याच कॉटेंक्स्टमधे बघायला हवं. आपण जे बोलतोय, ते कॉमन मॅनच्या फारशा गरजेचं नाही. त्यांना कळणारं नाही हे त्यांना नक्की माहीत असणार. पण आय एम जस्ट देअर म्हणजे मी आहे बरं का आणि काम करतोय एवढंच सांगायला त्यांनी आजचा एक्सरसाईज केला असणार असं वाटतं.
कारण कॉमन मॅनच्या मनात मोदींनी काहीतरी केलं एवढंच आत गेलं असणार. त्यांच्या मनात जे काही परसेप्शन आहे ते घट्ट करण्यासाठी आजचा त्यांचा डाव फायद्याचा ठरेल असं वाटतं. विरोधकांचं नरेटिव बाद करण्यासाठी सुद्धा हे सगळं सुरू आहे असं दिसतं.
गरिबीमुक्तीच्या ‘न्याय’च्या नरेटिवला उत्तरच न दिल्याने तो आपोआपच खाली आला आणि आता सगळे विरोधक सोशल मीडियावर आजचं भाषण कसं अयोग्य आहे हे सांगण्यात गुंतलेत. म्हणजे त्यांची एनर्जी ही डिवाईड झालीय. हे म्हणजे बॅट्समनने टाकलेले सगळे बॉल एखाद्या कसोटीपटूसारखं सोडून देणं आणि हळूच कुठेतरी बाईज मिळवण्यासारखं झालंय.
मुद्दा इतकाच की अजून १५ दिवस आहेत. आणि या १५ दिवसात गेम चेंज होऊ शकतो. आज फक्त मोदी देशापुढे येणार म्हटल्यावर लोकांच्या मनात जी धाकधूक होती किंवा मनातल्या मनात जे विचार येऊन गेले त्यावरून मोदी स्वतःकडे ट्रम्प कार्ड ठेऊन आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
आज मोदी मेरठमधे लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली सभा घेताहेत. त्यानंतर काय होतंय बघूया. पण सध्या तरी हवा कुठाय? का इलेक्शन संपलीय? हेच प्रश्न डोक्यात आहेत. बाकी पाहत राहू, समजून घेत राहू.
(लेखक हे आयटी तज्ज्ञ, उद्योजक आहेत.)