तेलंगणात टीआरएसचा चमत्कार, समजून घेऊया १० मुद्द्यात

१२ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


मुदतीआधीच सभागृह बरखास्त करून निवडणूक घेण्याचा जुगार अटलबिहारी वाजपेयींपासून नारायण राणेंपर्यंत अनेकांच्या अंगलट आला होता. मात्र तेलंगणा राष्ट्रसमितीचे के. चंद्रशेखर राव त्याला अपवाद ठरले. जमिनीवर घट्ट पकड असल्यामुळेच हे शक्य होऊ शकलं.

आज पाच राज्यांच्या मतमोजणीत सगळ्यात आधी चित्र स्पष्ट झालं ते तेलंगणात. तेलंगणाच्या जनतेने पुन्हा एकदा तेलंगणा राष्ट्रसमिती म्हणजे टीआरएसच्या बाजूने कौल दिला. वेगळं राज्य झाल्यानंतर तेलंगणात विधानसभेसाठी दुसऱ्यांदाच निवडणूक झाली. आंध्र प्रदेशमधून वेगळं झालेल्या तेलंगणात २०१४मधे लोकसभेसोबत निवडणूक झाली होती. यंदा मात्र के. चंद्रशेखर राव यांनी आठेक महिने आधीच विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचं आता सिद्ध झालंय.

१. टीआरएसचा एकहाती विजय

सगळ्या एक्झिट पोलपेक्षा कितीतरी पुढे जात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रसमिती तब्बल ८८ जागा जिंकल्यात. २०१४मधे टीआरएसला ११९ सदस्यांच्या विधानसभेत ६३ जागा मिळाल्या होत्या. २१ आमदार असलेली काँग्रेस १९ जागीच विजयी होताना दिसतेय. वेगळ्या तेलंगणाला विरोध केल्यानंतरही १३ जागा जिंकणाऱ्या तेलुगू देसम पार्टीला फक्त २ जागा जिंकता आल्यात. 

केंद्रातल्या सत्तेच्या जीवावर तेलंगणात किंगमेकर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या भाजपला केवळ एकच जागा जिंकता आलीय. गेल्यावेळी भाजपकडे पाच जागा होत्या. या निकालांनी दक्षिण भारतात कट्टर हिंदुत्वाचं कार्ड स्पष्ट विजय मिळवून देण्यात अपयशी ठरत असल्याचं पुन्हा स्पष्ट केलंय.

पहिल्या विधानसभेत मिळालेल्या एकहाती सत्तेच्या जोरावरच के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसने विरोधी पक्षांचे आमदार फोडले. यातूनच आपली सदस्यसंख्या ६३ वरून ९० वर नेली. चारच वर्षात काँग्रेसचे १२, टीडीपी १३, वायएसआर काँग्रेस ३ आणि बीएसपीचे २ आमदार टीआरएसमधे गेले. आता टीआरएस त्या संख्येच्या जवळ पोचलेत.

२. काँग्रेसची पीपल्स फ्रंट निकालात

तेलंगणाच्या जनेतने काँग्रेस, तेलगू देसम पार्टी म्हणजे टीडीपी, तेलंगणा जन समिती म्हणजे टीजेएस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन बनवलेल्या पीपल्स फ्रंट आघाडीला तेलंगणाच्या जनतेने धुडकालंय. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचा फटका बसलाय. 

तेलंगणातल्या या भाजपविरोधी पीपल्स फ्रंटकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अनेक वर्षांपासूनचा भाजपसोबतचा घरोबा सोडलेल्या टीडीपीचे प्रमुख आंध्र प्रदेशचे सीएम एन. चंद्राबाबू नायडू यांनी या फ्रंटमधे खूप रस घेतला होता. पण त्यांचेही आमदार कमी झालेत. बाकीच्या पक्षांना तर भोपळाही फोडता आला नाही.

३. एमआयएमचा गड शाबूत

टीआरएसला पाठिंबा देत निवडणूक रिंगणात असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमने सात जागांवर विजय मिळवलाय. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने हैदराबादचा बालेकिल्ला शाबूत ठेवलाय. राजधानी हैदराबादच्या हिंदूबहूल मतदारासंघात एमआयएमच्या पाठिंबावर टीआरएसनेही बाजी मारलीय.

राज्यात मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी सत्ताधारी टीआरएससोबतच काँग्रेसनेही कंबर कसली होती. आज आलेला निकाल बघता एमआयएमच्या पाठिंब्यावर मुस्लिमांची मतं खेचण्यात टीआरएसला यश आलंय, असं म्हणावं लागेल. राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास १२ टक्के एवढी आहे.

४. किंगमेकर भाजपचं स्वप्न धुळीला

राज्यात भाजपने खूप आक्रमक प्रचार केला. योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवून धार्मिक ध्रुवीकरणाचीही चाल रचली. एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांना हैदराबाद सोडून पळून जावं लागेल, असा दावाच योगींनी केला होता. पण भाजपला त्याचा फायदा न होता, उलट नुकसान झालंय.

केंद्रासोबतच वेगवेगळ्या २० राज्यांमधे सरकार असणं आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा तन, मन, धनाने असलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपण तेलंगणात सन्मानजनक संख्याबळ मिळवू असं वाटत होतं. पण इतके दिवस टीडीपीचा हात धरून आंध्रच्या राजकीय रिंगणात असल्यामुळ  भाजपचं संघटन अजूनही कमजोर असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपने संघाच्या नेटवर्कच्या जोरावर हुकमी हिंदुत्वाचं कार्डही बाहेर काढलं. सत्ता आल्यास हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करण्याचं आश्वासन देऊनही भाजपच्या पदरी निराशाच आली.

भाजप आणि एमआयएम हे एकमेकांचे पक्के वैरी म्हणून सगळ्यांना माहीत आहेत. पण केसीआरचा विषय आल्यावर मात्र दोन्ही पक्ष मूग गिळून गप्प बसतात. केसीआर यांनी एकाचवेळी दोघांचाही दोस्त होण्यात यश मिळवलंय. त्यांच्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या मदतीने एकाच वेळी सगळ्या धर्मांना खूश केलंय.

५. मध्यावधीचा निर्णय फायद्याचा

काँग्रेसने टीआरएस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या मौनानेही या आरोपाला बळ मिळालं. टीआरएस आणि भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती करणात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच केसीआरनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांतच केसीआर यांनी तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला.

मध्यावधीच्या निर्णयामागे मोदींचा हात असल्याची चर्चा त्यावेळी झाली. मात्र केसीआर यांना भीती होती, ती लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक झाल्यास प्रचारात तेलंगणाचा मुद्दा राहणार नाही. मोदीच प्रचाराचे मुद्दे ठरवतील आणि आपल्याला मिळणारी सहानुभुती तेच खाऊन जातील. त्यामुळे अनेकांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर निर्माण झालेल्या तेलंगणाची पहिलीच विधानसभा मुदतीपूर्वी बरखास्त केली. केसीआर यांच्यासाठी मध्यावधीचा हा निर्णय आत्मघातली ठरला नाही.

६. केसीआर यांचं साम्राज्य कायम

गेल्या वेळी तेलंगणाच्या अस्मितेचा मुद्दा करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या टीआरएसपुढे यावेळी आव्हान होतं ते स्वतःचं राजकीय साम्राज्य टिकवून ठेवण्याचं. केसीआर यांच्यावर काँग्रेसने सुरवातीपासून घराणेशाहीचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात केसीआरच्या घराणेशाहीवर टीका केली.

केसीआर यांची खासदार मुलगी कविता पक्षाचं काम बघते. मुलगा आणि पुतण्या सरकारमधे मंत्री आहेत. चळवळीतून नेता झालेल्या केसीआर यांनी आपल्या घराण्याचं राजकीय बस्तान बसवून घेतलंय. केसीआर यांना घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनच विरोधी पक्षांनी सगळ्यात जास्त टार्गेट केलं. पण आजच्या निकालाने केसीआर यांच्यावरचे घराणेशाहीचे आणि आमदार फोडण्याचे आरोप धुवून निघाले.  

७. ईवीएमभोवती संशय

२०१४ नंतर प्रत्येक निवडणुकीत वादग्रस्त ठरलेला ईवीएमचा मुद्दा यावेळीही चर्चेत आलाय. पाच राज्यांपैकी तेलंगणातच इवीएमभोवती संशयाचं धुकं जमलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी टीआरएसचा हा विजय ईवीएममधल्या फेरफारामुळे झाल्याचा आरोप केलाय. त्यामुळे सगळ्या जागांवर ईवीएमऐवजी वीवीपॅट पेपरची मतमोजणी करण्याची मागणी काँग्रेसने केलीय. यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे जाण्याचाही भाषा केलीय.

८. कल्याणकारी योजनांचं गुलाबी चित्र

सध्या देशात रंगांच्या राजकारणाचे दिवस आहेत. लोकांना मूळ मुद्यापासून दूर नेण्यासाठी हे राजकारण सगळ्याच पक्षांना फायद्याचं ठरतं. भगवा आणि हिरव्या रंगाचा आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापर सुरू आहे. पण केसीआर यांनी या दोन्ही रंगांना फाटा देत आपलं गुलाबी चित्र रंगवलंय. त्यामुळेच यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढूनही त्यांना गुलाबी चित्रावर कुठंही ओरखडा ओढता आला नाही.

केसीआर सरकारने अख्ख्या तेलंगणाला गुलाबी रंगाने रंगवलंय. गुलाबी रंगाने रंगवलेल्या भिंतीवर काळ्या अक्षरात आपल्या सरकारने कायकाय केलंय हे त्यांनी सांगितलंय. कल्याणकारी योजनांच्या प्रचाराचं हे गुलाबी चित्र तेलंगणाच्या मतदारांना भावल्याचा आता निकालानंतर स्पष्ट झालंय.

मुस्लिम मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची मदत देणारी शादी मुबारक आणि इतर समाजांसाठी कल्याण लक्ष्मी योजना त्यांनी राबवली. गरीबांसाठी दोन बेडरूमचं घर देण्याची योजना त्यांनी सुरू केली. यासाठी त्यांनी नावही खूप कॅची दिलं. टू बीएचके योजना. केसीआर किट नावाने हॉस्पिटलमधून घरी येणारी महिला आणि नवजात बाळासाठी तीने महिन्यांपर्यंत वापरता येतील असे कपडे आणि स्वच्छतेचं सामान देण्यात येत. सोबतच खेळणीही असतात. तेलंगणात शेतकरी आत्महत्येची समस्या खूप गंभीर आहे. त्यावर उपाय म्हणून टीआरएस सरकारने रैयतू बंधू योजना सुरू केलीय. तेलंगणातल्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येक पिकासाठी एकरी ४००० रुपयांची मदत दिली जाते.

९. तेलंगणा प्राइड पुन्हा जोरात

काँग्रेसला मजबूत आघाडीच्या जोरावर आपण तेलंगणाचा किल्ला सर करू असं वाटायचं. यासाठी काँग्रेसने तेलंगणा अस्मितेचा मुद्दाही प्रचारात आणला. आपल्या युपीए सरकारमुळेच तेलंगणा वेगळं राज्य होऊ शकलं, असं काँग्रेसचे नेते प्रचारात सांगायचे. पण टीडीपीशी असलेली सत्तासोबत त्यांना अडचणीची ठरली. टीडीपीने वेगळ्या तेलंगणाला प्रखर विरोध केला होता, हे तेलंगणाचा लोक अजून विसरलेले नाहीत.

तेलंगणाच्या लोकांनी दिलेला हा कौल म्हणजे केसीआर यांचा कल्याणकारी कार्यक्रम आणि तेलंगणा प्राइड या दोन्ही मुद्द्यांचा एकत्रित परिणाम आहे. दोन्हींमुळे पक्षाचा या निवडणुकीत विजय झाला, अशी प्रतिक्रिया केसीआर यांची मुलगी खासदार कविता यांनी दिली.

धर्म, राष्ट्रवाद यासारखे मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर कळीचे बनवले जातायंत. केसीआर यांनी मात्र या मुद्यांना बगल दिलीय. त्यांनी कल्याणकारी योजनांसोबतच तेलंगणा अस्मितेच्या मुद्द्याला हात घातला. तेलंगण अस्मितेचा हा मुद्दा हिंदुत्वाचं राजकारण करणारी भाजप वापरू शकते ना तेलंगणाला विरोध करणाऱ्या टीडीपीचा समावेश असलेली पीपल्स फ्रंट.

तेलंगणाच्या अस्मितेचा मुद्दा चालल्यामुळेच तेलंगणाला विरोध करणाऱ्या टीडीपीला सोबत घेऊन निवडणूक लढवणं काँग्रेसच्या विरोधात गेलं. केसीआर यांनी चंद्राबाबू नायडू यांचा उल्लेख राज्याचा शत्रू असा केला होता. नायडू हे मागच्या दाराने राज्यात घूसण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही केसीआर यांनी केला. यामुळे पीपल्प फ्रंटविरोधात वातावरण तयार झालं.

१०. आता लक्ष्य देशाचं राजकारण

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आपलं अपयश झाकण्यासाठी पीपल्स फ्रंटलाच हायजॅक केलं. या विजयानंतर केसीआर आता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्हींसाठी पर्याय म्हणून राष्ट्रीय राजकारणावर लक्ष देणार आहेत, असं केसीआर यांची मुलगी कविता यांनी निकालानंतर सांगितलं. देशाच्या राजकारणात जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना या निकालांनी मोठा फटका बसलाय. हीच संधी साधून केसीआर आता येत्या काळात चंद्राबाबूंवर कुघोडी करताना दिसतील.