लाखमोलाच्या टाटा नॅनोचं नॅनो लाईफ

१६ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘मैंने देश का नमक खाया है’ ही टॅगलाइन ऐकल्यावर आपल्याला सहज टाटा नमकची अँड आठवते. ते स्वाभाविकच आहे. कारण रतन टाटा आणि त्यांचे वडील जेआरडी टाटांनी देशाच्या प्रगतीचा विचार करत लोकोपयोगी गोष्टींची निर्मिती केली. आजच्याच दिवशी अकरा वर्षांपूर्वी लाखमोलाची टाटा नॅनो बाजारात आली. पण ती अल्पायुषी ठरली. टाटा नॅनोच्या नॅनो प्रवासाचा हा धावता आढावा.

रतन टाटा एकदा त्यांच्या गाडीने जात होते. त्यांना हम दो हमारे दो आकाराचं एक चौकोनी कुटुंब मोटारसायकलवरून जाताना दिसलं. हे बघून रतन टाटांच्या मनात चौकोनी कुटुंब सहज विकत घेऊ शकेल अशी कार बाजारात आणण्याचा विचार आला. चार लोकांचा हा प्रवास धोकादायक आहे. कारण मोटरसायकल दोन लोकांना विचारात ठेवून डिझाइन केलीय. मात्र भारतीय कुटुंबं त्या मोटरसायकलवरून प्रवास करतात. जीव धोक्यात घालून असा प्रवास करणं हे आपण भारतातच करतो.

रतन टाटांच्या डोक्यातली आयडिया

भारतात सर्वात स्वस्त गाडी म्हणून ओळखली जाणारी मारुती ८०० त्यावेळी दोन लाख रुपयांना मिळत होती. त्याहीपेक्षा कमी किमतीची गाडी रतन टाटांना बनवायची होती. या संदर्भात एका पत्रकाराने टाटांना विचारलं की या गाडीची किंमत किती असेल? त्यावेळी टाटांनी या गाडीची किंमत एक लाख रुपये असल्याचं सांगितलं. आणि ही हेडलाइन झाली. देशभरात टाटा फक्त लाखभर रुपयांत गाडी देणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्याहून महत्वाचं म्हणजे ही कल्पना स्वतः रतन टाटांची होती.

टाटांची अनेक उत्पादन देशातच नाही तर परदेशातही फेमस आहेत. दर्जा आणि गुणवत्तेसाठी त्यांचे प्रोडक्ट ओळखले जातात. अशावेळी जॅग्वारसारखी महागडी गाडी बनवणाऱ्या टाटांनी लोकोपयोगी गाडी बनवण्याचा निर्णय घेतला. नॅनो तंत्रज्ञानाचा लोकांसाठी उपयोग व्हावा हाही हेतू रतन टाटांचा होता. तसंच अनेक क्षेत्रांत टाटांची उत्पादन त्यांचं नाव राखून आहेत. म्हणूनच त्यांनी लाखभर रुपयांत लोकांना गाडी देण्याचं स्वप्न बघितलं.

कारखान्याला प्रचंड विरोध

रतन टाटांनी पश्चिम बंगालमधील सिंगूर इथे या गाडीचं प्रोडक्शन करण्यासाठी प्लांट सेट केला. मात्र तिथले शेतकरी आणि स्थानिक लोकांनी प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं. लोकांचा विरोध मावळावा म्हणून त्यांनी तब्बल दोन वर्षं वाट बघितली. मात्र, लोक या प्लांटला विरोधच करत होते. तसंच उद्घाटनाच्या आठवडाभर आधी ऑफिसच्या बाहेर तब्बल लाखभर लोकांनी एकत्र येत विरोध केला होता. 

लोकांचा वाढता विरोध बघून टाटांनी हा प्लांट गुजरातमधल्या साणंदला हलवला. उद्घाटनाच्या तोंडावरच प्रकल्प हलवल्यामुळे नॅनोचं काम सुरू व्हायला आणखी एक वर्ष लागला. हे काम किती जिकरीचं होतं, हे नॅनोच्या कर्मचाऱ्यांनी नॅशनल जिओग्राफिकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.

त्यानंतर टाटा नॅनोपुढे आणखी मोठी आव्हानं उभी होती. गुजरातमधे  स्किल्ड मॅन पावर उपलब्ध नव्हतं. त्यांना पाच वर्षांचं ट्रेनिंग द्यावं लागलं. त्यानंतर इथले कर्मचारी एक कार बनवण्यास सक्षम होणार होते. पण हेही आव्हान त्यांनी सहज पेललं.

गांधीयन इंजिनिअरिंगचा वापर

ही गाडी सर्वसामान्य लोकांना लक्षात ठेवून बनवण्यात आली. गाडीसाठी फार खर्चिक उपकरणं वापरण्यात येणार नव्हती. म्हणून इंजिनिअरिंग टीमने या प्रोजेक्टला गांधीयन इंजिनिअरिंग डिझाइन म्हटलं. सुरवातीला या गाडीच्या फक्त ड्रायलर सीटलाच आरसा होता. तसंच एकच वायपर ब्लेड आहे. या सगळ्यांमुळे गाडी बनवण्याचा खर्च कमी झाला. तसंच ही गाडी सर्वात कमी प्रदुषण आहे. फक्त एका लिटरमधे २४ किलोमीटर चालते.

टाटा नॅनो लाँच करण्यापूर्वी टाटा मोटर्सने टाटा एस नावाचा एक लहान ट्रक बाजारात आणला होता. या गाडीच्या डिझाइनसाठी टाटा मोटर्सने एस डिझाइन करणाऱ्या गिरीश वाघ यांना बोलावलं. त्यांनी या गाडीच्या डिझाइनमधे काही बदल सुचवले.

ही गाडी कमी किमतीत तर होणार होतीच मात्र, तिचं डिझाइन आणि सुरक्षितता या दोन गोष्टींवर सर्व अधिकाऱ्यांना भरपूर विचार करावा लागला. सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीचं इंजिन मागच्या सीटखाली बसवण्यात आलं. मात्र तिथे इंजिनचा फार आवाज येता होता. मग त्यावर अनेक प्रयोग करत त्याचा आवाज कमी करण्यात आला.

तसंच रिसर्च टीमने या गाडीला दोनच दरवाजे असावेत, असं सुचवलं होतं. मात्र रतन टाटांना या गाडीला चार दरवाजे द्यायचे होते. दोन दरवाज्यांची कार भारतीय लोकांना आवडणार नाही, असं रतन टाटांचं ठाम मत होतं. शेवटी इंजिनिअरिंग टीमने गाडीला चार दरवाजे बसवले. ही गोष्ट दोन दरवाजांच्या संकल्पनेच्या तुलनेत अधिक खर्चिक होती.

नॅनोबद्दल प्रचंड गुप्तता

टाटाच्या अनेक गाड्या आपण भारतासह जगभर बघतो. मात्रं वीस हजार लोक ज्याठिकाणी काम करत होते त्या साणंदच्या प्लांटवर या प्रोजेक्टसंदर्भात गोपनियता पाळण्यात आली होती. फक्त डिझायनर आणि काही ठराविक इंजिनिअर वगळता फारसं कोणालाच या प्रोजेक्टबद्दल माहीत नव्हतं. या प्रोजेक्टला कर्मचाऱ्यांमधे एक्स थ्री या कोड नावाने ओळखलं जात होतं.

नॅनो बाजारात लाँच झाल्यावर काही दिवसांतच तिच्यामधे  आग लागल्याची बातमी आली होती. मग लगेचच टाटांनी एक्सपर्ट लोकांची टीम जमवून आग का आणि कशी लागली हे शोधले. यासाठी त्यांनी थेट ब्रिटनवरून काही एक्सपर्ट बोलवले. काही भारतातले जाणकारीही होते.

सर्व गोष्टींची पडताळणी केल्यावर त्यांनी गाडीच्या डिझाइनमधे कोणतीच चूक नसल्याचं सांगितलं. ज्या गाडीमधे आग लागली होती तिच्या वायर सेक्शनमधे कपडा ठेवत छेडछाड करण्यात आली. त्यामुळे ही आग लागली होती. पुढे फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमधेही ही गोष्ट स्पष्ट झाली. 

लोकांनीच मिळवलं स्वप्न धुळीस

साणंद इथे या गाडीचे उत्पादन केलं जात होतं. त्यासाठी तिथे २० हजार लोक काम करत होते. तसंच १३० रोबोट्स गाडीच्या जोडणीचं काम बघायचे. इथल्या प्रोजेक्टची वर्षाला साडेतीन लाख गाड्या तयार करण्याची क्षमता होती. मात्र सुरवातीचा काळ सोडल्यास या गाडीचं फारसं उत्पादन झालं नाही.

२०१७ मधे ७५ हजारांच्या आसपास नॅनो बनवण्यात आल्या होत्या. २०१८ मधे तर फक्त एकच गाडी बनवण्यात आली. त्यानंतर टाटांनी आपण या गाडीचं उत्पादन थांबवणार असल्याचं जाहीर केलं. टाटा पिक्सल आणि युरोपा या नावाने ही गाडी युरोपमधे  लाँच करण्यात येणार होती. मात्र पुढे टाटा मोटर्सने याबाबतही कोणतंच सुतोवच केलं नाही.

टाटांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून २००८ मधे तयार करण्यात आलेल्या नॅनोचं लाइफ अगदीच नॅनो ठरलं. मोठं ध्येय ठेवून अनेक आव्हानांना तोंड देत टाटांनी नॅनो साकारली. पण लोकांनी ती गरिबांची कार म्हणून हिणवून टाटांचं स्वप्नच मातीत मिसळलं. लोकांनी लोकांचीच कार मोडी काढली.