आई आपल्या पिल्लासाठी संघर्ष करते तेव्हा

१३ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते. आपलं लेकरू कसंही असलं तरी त्याला स्वत:च्या पायांवर उभं करण्यासाठी ती धडपडते, मेहनत घेते. पण जोपर्यंत तिच्या प्रयत्नांना यश येत नाही तोपर्यंत थांबत नाही. अशीच आरती काळे-नातू यांची माय. आपल्या कर्णबधीर मुलीला स्वयंसिद्ध बनवलं. आईच्या या जिद्दीची गोष्ट आरती सांगतेय.

माझी आवडती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आईच आहे. जन्माला आल्यापासून माझ्या चांगल्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. मी एक कर्णबधीर मुलगी असूनसुद्धा आईने कधीच जिद्द सोडली नाही. मी साधारण तीन वर्षाची असताना आई मला कासेगावातून मुंबईला कर्णबधीर मुलांच्या शाळेत घेऊन गेली. माझ्या मुलीला बोलता आले पाहिजे अशी जणू तिने आस धरली होती. ती एक वर्ष मुंबईला राहिली. तिथे दिवस, रात्र, उन्हाळा, पावसाळा या कशाचीच फिकीर न करता मुंबईतल्या गर्दीत ट्रेनने प्रवास करत एकही दिवस शाळा न चुकवली नाही. मला तर शिकवलेच पण तीही ते सारं शिकली. 

मग गावात परत आलो. शाळेत जायला सुरवात केली. मला शाळेत काय शिकवतात हे फारसं कळायचं नाही. पण मी शाळेत शिकवलेलं कळत नाही असं आईला सांगितल्यावर आईने स्वत;हून अभ्यासाला सुरुवात केली. आणि मी कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे अर्धा दिवस शाळा आणि अर्धा दिवस आईबरोबर अभ्यास असं माझं वेळापत्रक होतं. या साऱ्या काळात माझ्या आईच्या चेहऱ्यावर मी कधीच राग किंवा कंटाळा बघितला नाही. आई दिवसभर घरातली सगळी कामं करुन माझा अभ्यास घ्यायची, जवळपास सगळे विषय शिकवायची. माझी आई इतर मुलांच्या शिकवण्याही घेत होती. तिच्या आणि माझ्या कष्टाचे फळ म्हणूनच मला दहावीत चांगले मार्क मिळाले.

हेही वाचा : शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

मला इतर मुलांबरोबर गणित शिकता यावं म्हणून आईने स्वत: रोज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत गणिताच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. तिथे मला गणिताची आवड निर्माण झाली. नववीत असताना मी गणिताचा पेपर देऊन आल्यानंतर आईला मला अंदाजे ७५ पेक्षा जास्त मार्क्स मिळतील असं सांगितलं. आई संध्याकाळी फिरायला जात असे. माझ्या गणिताच्या शिक्षिका आईच्या ओळखीच्या होत्या, म्हणजे त्या दोघी मैत्रिणीच होत्या. त्या आईला म्हणाल्या की, तुमच्या मुलीला गणितात कमी मार्क पडले आहेत. आईचा विश्वास बसेना. 

तिने मला घरी आल्यावर आईने पेपर अवघड होता का असं विचारलं, तेव्हाही मला ७५ पेक्षा जास्त मार्क्स मिळतील याची खात्री होती. तसं मी आईला पुन्हा एकदा सांगितलं. पण आपल्याला कमी मार्क्स मिळाले या कल्पनेने मला रडू आलं, वाईट वाटलं. थोड्या वेळात आई त्या शिक्षकांच्या घरी जाऊन माझा पेपर बघून आली आणि ज्या मुलीला कमी मार्क पडले होते तिचं आणि माझं अक्षर वेगळं होतं, त्यामुळे तो गुंता सुटला. त्यादिवशी आईला माझा आणि मला आईचा अभिमान वाटला. 

हेही वाचा : भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी

आईबरोबरच बाबांनीही मला खूप पाठिंबा दिला. मला ऐकू येत नसल्याने मला दुचाकी गाडी शिकवण्याचा काही उपयोग नाही. गाडीमुळे कदाचित माझा अपघाताच होईल असं गावातील लोक आणि काही बायका आई बाबांना सांगत. पण अशा वेळीही मी कशातही मागे पडता नये या हेतूने मला बाबांनी गाडी शिकवली आणि मी आमच्या घरापासून १५ किलोमीटरवर असलेल्या कराडपर्यंत गाडी चालवू लागले. यामुळे माझ्यात एक हिंमत आली. आजही पुण्यात मी गाडी चालवते. आज मी पुण्यात केवळ आईच्या जिद्दीच्या जोरावर येऊ शकले.

संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घरी येण्याचा माझ्या आई आणि आजीचा कटाक्ष होता. त्यामुळे मलाही तशी सवय लागली. लहानपणी एकदा मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेले असताना मला उशीर होऊ लागला आणि आठ वाजले तसे आई ओरडेल की काय अशी भीती वाटू लागली. मी घरी आल्यावर दादा ओरडला पण आई काहीच बोलली नाही. ‘एक दिवस असं झालं तर हरकत नाही. तिने वाढदिवसाला जात आहे हे मला सांगितलं होतं, तिच्यासोबत मैत्रिणी होत्या’ असं म्हणत आईनेच उलट माझी बाजू घेतली.

हेही वाचा : आईचं बदललेलं रुप: चार भिंतीतली आई ते स्मार्ट मॉम

आई तिच्या परिस्थितीमुळे फार शिकू शकली नाही. पण तेवढ्यावरच तिने हिंमत हरली नाही, तिने मला कायम शिक्षणासाठी पाठिंबा दिला, माझ्यासाठी शिकवण्या घेतल्या. तिच्या आणि घरातील इतरांच्या पाठींब्याच्या जोरावरच मी दहावी आणि बारावी करत सर्वसाधारण मुलांच्या बरोबरीने बी.कॉम झाले. एम. कॉम करताना नोकरी करण्याची इच्छा मी आईला बोलून दाखवली. गुरुकृपेने मला सहा महिन्यात कराड अर्बन बँकेमधे मनासारखी नोकरी लागली.

हेही वाचा : ...पण मुख्यमंत्री बनलेलं बघायला आई नव्हती

आज माझं लग्न झालं आहे. मी पुण्यात कराड अर्बन बँकेच्या शाखेत आहे. माझ्या मुलीलाही आजीची आवड लागली आहे. ती सुट्टीत आणि इतर काळातही तिच्या आजीकडे मस्त राहते. त्यामुळे मी निर्धास्तपणे माझं काम करु शकते. आईच्या जीवनातला हा संघर्ष मला नेहमीच प्रेरणा देतो.

हेही वाचा : दिल्लीत जिंकण्यासाठीच नाही तर दुसऱ्या नंबरसाठीही लढाई