सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली?

१७ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


'हमने कमलको वोट दिया. अब मोदी, योगीजीने हमसे मुह क्यो फेरा?' असं त्वेषानं विचारणारे फेरीवाले, त्यांचे बालबच्चे काल रात्री मेला प्राधिकरणाविरोधात घोषणाबाजी करत होते. प्रयाग इथल्या अर्धकुंभला यंदा योगी सरकारने कुंभसारखं भव्यदिव्य स्वरूप दिलंय. बुवाबाबांचीही भरपूर सरबराई करण्यात आलीय. पण या सगळ्यात सामान्य माणूस नाराज होतोय.

काल रात्रीचे अकरा वाजले होते. कडाक्याच्या थंडीत झोपायच्या तयारीत असतानाच मला टेंट कॉलनीच्या बाहेर गोंधळ आणि घोषणाबाजी ऐकू आली. काय चाललंय ते बघायला मी कॉलनीबाहेर आले तर बाजूच्या मीडिया कॉलनीसमोर तीसेक लोकांचा जमाव जमला होता. त्यातले काहीजण 'मेला प्राधिकरण मुर्दाबाद'चे नारेही देत होते. या जमावात महिला, लहान मुलं, तरुण आणि काही म्हातारी माणसंही होती.

काय झालं असं एका बाईला मी विचारलं तशी ती आणि तिच्या आसपासचे लोक बोलायला लागले. 'हम ठेलेवाले लोग है. पुलिसवाले रातको नौ बजे आये और हमारी सेक्टर एकमें लगी अस्थायी झुग्गीझोपडीयां और दुकानें तहसनहस कर गयी. बहोत गालियांभी दे रही थी. हमारा बन रहा खाना फेंक दिया. भर रखा पानी झोपडीयोमें बहा दिया. कल जेसीबी लेकर आनेकी धमकीयां दी.'

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

काही बाया बोलता बोलता रडू लागलेल्या. तरुण मुलं 'हमने कमलको वोट दिया. अब मोदी, योगीजीने हमसे मुह क्यो फेरा?' असं त्वेषानं विचारत होती. माहिती कार्यालयाच्या दोन-चार लोकांनी आप उधार डीआयजीसे मिलीये. यहां कुछ नाही होगा असं सांगत त्यांना शांत केलं.

या लोकांच्या म्हणण्यानुसार, हे सगळे चहा, चिवडा, प्रसाद यांचे ठेले लावणारे किरकोळ विक्रेते आहेत. दरवर्षी माघमेळ्याला या परिसरातच रस्त्यावर हातगाड्या, लहान दुकानं लावतात. कुंभमेळा जिथे होतोय तो सगळा भाग भारतीय सैन्याच्या अखत्यारीत येतो. मात्र या विक्रेत्यांच्या सांगण्यानुसार कधीच पोलिसांनी किंवा सैन्याने मेळ्याच्या काळात असा त्रास दिला नाही.

यावेळी ३० डिसेंबरपासून त्यांनी इकडे ठेले लावले. पोलीस प्रशासनाने आधार कार्डची तपासणी करत त्याचे क्रमांक नोंदवून घेतले. इकडे ठेले लावलेत तर काही हरकत नाही असं पोलिसांनी सांगितलं. मात्र १० तारखेपासून पोलिस प्रशासन आम्हाला त्रास देतंय, असा आरोप या ठेलेवाल्यांनी केलाय.

विशेष म्हणजे काही जणांच्या तक्रारीनुसार, हे पोलीस दिवसभर ठेल्यांवर येऊन काहीबाही खातात. चहा पितात. त्याचे पैसे कधीच देत नाहीत. मात्र रात्री त्यांच्या तात्पुरत्या झोपड्या उद्ध्वस्त करत त्यांना शिवीगाळ करतात. हे लोक मागच्या सातआठ दिवसांपासून रोज कुंभमेळा प्राधिकरण, एसपी ऑफिस अशा अनेक ठिकाणी जाऊन दाद मागत आहेत. पण त्यांना कुणीच उभं करत नाहीय.

चहावाले, भेळवाले, प्रसाद, प्लास्टिकची खेळणी, मोमो विकणारे असे बरेच लोक यात आहेत. कुंभमेळ्यात येणारी बहुसंख्य कनिष्ठवर्गीय जनता पाहता त्यांना याच लोकांचा आधार असतो.

हे सगळे मुख्यतः यूपीतल्याच लहानलहान गावांतून आलेले लोक आहेत. सोबतच बरेच मध्य प्रदेश, बिहारचेही आहेत. यातल्या काही लोकांनी माझ्यासमोर हिशेबाची बिलं धरली. त्यांच्या म्हणण्यानुसार, गावातल्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या ठोक व्यापाऱ्यांकडून उधार किंवा १० टक्क्यांवर माल आणि पैसे घेऊन हे इथे किरकोळ धंदा करायला आलेत.

दरवर्षीसारखंच यंदाही ठेला लावून काही फायदा कमावता येईल, असा आडाखा त्यांनी बांधला होता. यातले काही लोक गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी इथे नियमित ठेले मांडणारेही आहेत. मात्र हे असं याचवर्षी घडत असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

एक तरुण म्हणतो, 'वर्दी चढातेही पुलिस भगवान बन जाती है. हम छोटे दुकानदार हैं. मेलेमें बडे दुकानदारोंने पच्चीस हजारसे एक लाखकी रकम भरकर दुकाने लगायी है. ये तो हमारे बसकी बात नहीं. चलो कुंभ चले कहके सरकारने पुरी दुनियाको कुंभ बुलाया है. पर हमारेजैसे गरिबोंकी यहा कोई जगह नही. गरिबी बहोत बुरी चीज होती है. हम मेहनत करके खाना चाहते हैं. पर वोभी पुलिस करने नहीं देती.'

सेक्टर एकमधे रात्री एक वाजता पोचल्यावर यांच्या झोपड्या तोडलेल्या होत्या. काही झोपड्यांच्या आतली जमीन ओली होती. बाजूलाच काही सफाई कर्मचाऱ्यांनाही तंबू ठोकून दिलेले दिसले. एका दलदलीच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांच्या बाजूला हे लोक आणि मेळ्याचे अधिकृत सफाई कर्मचारी राहत आहेत.

अनेक म्हातारेकोतारे लोक लहान मुलांना झोपवत उघड्यावर जागे होते. काही जमिनीवरच झोपले होते. एकानं मला सैन्य प्रशासनाचं बंद गेट दाखवलं. त्याच्या म्हणण्यानुसार हे गेट कायम बंद असतं आणि सैन्याच्या लोकांनी त्यांना विशिष्ट अंतर सोडून पुढे तात्पुरत्या झोपड्या लावायला परवानगी दिलीय. शिवाय पोलिसांचीही याला परवानगी होती. मग अचानक असं काय झालं की हरेक रात्र यांना कडाक्याच्या थंडीत जागून, गयावया करत काढावी लागतेय?

रात्री १२ वाजता या लोकांचा जमाव वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या, डीआयजीच्या कार्यालयासमोर गेला. मी त्यांच्यासोबतच होते. एका पोलिसानं विचारणा केली असता आम्हाला वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना भेटायचंय असं हे लोक म्हणाले. या लोकांनी पोलिसांशी बरीच हुज्जत घातली. तेव्हा डीआयजी के पी सिंग त्यांच्या गाडीतून तिथं आले.

त्यांनी अतिशय तारस्वरात या जमावाला सुनावलं, 'यहां क्यू आई? तुम्हे कोई आवंटन बाटा गया था? गांव जाकर लगाव ना ठेला! पुलिसने तुम्हारी जिम्मेदारी नहीं उठा राखी.' एक महिला म्हणाली, 'साहब हमारे छोटेछोटे बच्चे हैं. उनाका पेट कैसे पाले?' यावर सिंग ओरडले, 'पालना नहीं आता तो पैदा क्यो किये बच्चे?

अंशू मालवीय इलाहाबादचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. 'शहरी गरीब संघर्ष मोर्चा' ही त्यांची संघटना गेल्या ३० वर्षांपासून सफाई कामगार आणि फेरीवाल्यांच्या हक्कासाठी संघर्ष करते.

मालवीय सांगतात, खरंतर हा अर्धकुंभ आहे. पण त्याला कुंभ म्हणत युपी सरकारनं या मेळ्याला मेगाइवेंट बनवलंय. एकीकडे ३२ हजारपर्यंतचा किराया आकारून फाइव स्टार टेंट कॉलनी बनवलीय. पथारी पसरून खेळणी, प्रसाद, चहा, भांडी विकणारे लोक दरवर्षीच इथे असतात. कालपासून सगळ्यांना हटवलंय. आम्ही मग धरणं दिलं. प्राधिकरणाने पुन्हा फेरीवाल्यांना मान्यता दिली. पण पोलिसांचा त्रास अजूनही थांबलेला नाही.

‘इस बारका कुंभमेला एक बडा इवेन्ट बना हैं. हर रोज कोई बडा नेता आ रहा है. मुख्यमंत्री खुद अठरा बार आ चुके. सामान्य लोगोंकी इसमें बहुत ज्यादा असुविधा हुई जा रही है. सफाई कामगारांना नालीच्या बाजूला राहायला भाग पाडलं जाऊ नये. ते ज्या सेक्टरमधे काम करतात तिथंच त्यांना राहायला मिळावं, त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचे नावे टेंट खरेदी करण्यात यावेत या मागण्या आम्ही यंदा केल्या होत्या. त्याबाबतही मेला प्राधिकरणानं शेवटपर्यंत केवळ आश्वासनं दिली. प्रत्यक्षात सफाई कामगारांवर अत्यंत वाईट अवस्थेत मेळ्यात राहण्याची वेळ आलीय, असं मालवीय सांगतात.

मालवीय यांच्या सांगण्यानुसार, संगम क्षेत्राच्या आसपास १७ ते २१ झोपडपट्ट्या आहेत. दारागंज, काळा सडका, चुंगी परेड, कुष्ठ आश्रम ही काही वस्त्यांची नावं. २००१ मधे प्रशासनानं या झोपडपट्ट्यांना नोटीस दिली की तुम्ही इथली जागा रिकामी करा. तेव्हा आम्ही संघटनेतर्फे धरणं दिलं होतं. आम्ही इलाहाबाद हायकोर्टात 'संगम क्षेत्र मालिन बस्ती संघ' या नावानं एक रिट याचिकाही केली होती. १० वर्ष केस चालली. २०१० मधे हायकोर्टानं निर्णय दिला की 'पर्यायी जागा मिळत नाही तोवर यांना हटवता येणार नाही.' तरीही दरवर्षी माघ मेळ्याच्यावेळी पोलिसवाले यांना त्रास देतातच. पण यावेळी तर कुठलीच नोटीस न देता पोलीस झोपडपट्ट्यांना उठवायला लागलेत. मग आम्ही पुन्हा कोर्टात गेलो. रस्ता रुंदीकरणात अडचण येत असेल तर या लोकांना फक्त थोडंसं बाजूला करा पण हटवता येणार नाही.' असं कोर्टानं पुन्हा सांगितलं.

आज राष्ट्रपती येणार म्हणून सेक्टर एकमधल्या सगळ्या फेरीवाल्यांच्या झोपड्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यात.

शहरातल्या झोपडपट्ट्या आणि गावांतून आलेल्या या फेरीवाल्यांचा मुख्य आक्षेप आहे, 'इस तीर्थमें सालभर प्रसाद और दुसरे ठेले लगाकर सेवा हम देते है. पर जब ये सालका बडा कुंभ आयोजित हो रहा हैं तो हमारा कमानेका मौका छीनकर प्रशासन बाहरके बडे व्यापारीयोंसे ज्यादा रकमका डिपॉजिट लिये उनको दुकाने लगाने दे रही है. ये हम क्यू मान ले?’

एकीकडे 'भव्य-कुंभ दिव्य कुंभ' म्हणत पाचेक हजार कोटी रुपयांची उधळण युपी सरकारसह केंद्र सरकारनं या अर्धकुंभावर केलीय. परदेशी नागरिकांना कुंभाकडे खेचायला शहर आणि ३२ हजार हेक्टरचा मेला परिसर प्रचंड प्रेक्षणीय बनवलाय. पण या एवढ्या मोठ्या तामझाममधे सर्वसामान्य माणूस मात्र दुर्लक्षित झालाय. 

हायटेक तंत्रज्ञान वापरून रस्त्यांवर दिवसरात्र चालवलेल्या चित्रफिती, दर पाच पावलांवर सरकारच्या विकासकामांची मोठमोठी होर्डिंग्ज, डोळे दिपवणारी रोषणाई, बुवाबाबांच्या श्रीमंती आणि कडेकोट सुरक्षेच्या पालख्या-ताफे, युनेस्कोनं यंदाच्या कुंभाला दिलेला 'इंडियन कल्चरल हेरिटेज'चा दर्जा या सगळ्यात फेरीवाल्यांचा सवाल कुठल्याकुठे लाथाडला गेलाय. ते विचारताहेत, 'हमतो यहांके मेहनतकश मूलनिवासी है, योगी सरकार हमारा कमानेखानेका हक क्यू छीन रही है?'

 

हेही वाचाः 

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)