रमेश भाटकरः ते कधीच म्हातारे झाले नाहीत

०५ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


दूरदर्शनच्या मराठी सिरीयलवर पोसलेल्या पिढ्यांसाठी रमेश भाटकर आयकॉन होते आणि आहेत. गेले वर्षभर ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज हार्ट अटॅकने तो संघर्ष थांबवला. त्यांचं वय सत्तर असल्याचं बातम्या सांगतात. पण अश्रूंची झाली फुलेचा लाल्या, हॅलो इन्स्पेक्टर किंवा माहेरची साडी मधला फौजी, रुबाबदार रमेश भाटकरना बघितलेल्यांसाठी ते कधीच म्हातारे झाले नाहीत.

रमेश भाटकर म्हणे सत्तर वर्षांचे होते. जन्म ३ ऑगस्ट १९४९ वगैरे. पण त्यांचं वय कधीच लक्षात आलं नाही. फार तर दोन वर्षं झाली असतील, वैभव मांगलेच्या `माझे पती सौभाग्यवती` या सिरीयलमधे त्यांनी भंडारी नावाच्या सेलिब्रेटी प्रोड्युसरची भूमिका केली. या सिरीयलमधलं त्यांचा रोल महत्त्वाचा होता. निगेटिव, पॉझिटिव सगळेच शेड होते त्यात. पण तिथेही ते रुबाबात वावरले, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जितक्या रुबाबाने टीवीवर दिसायचे, तितक्याच रुबाबात. 

आजाराला, वयाला हरवणारा रुबाब

`माझे पती सौभाग्यवती`मधल्या भाटकरांच्या भूमिकेचं नाव, आडनाव भंडारी असं होतं. ते त्या रोलसाठी शोभूनही दिसलं. पण जातीने भंडारी असलेल्या अभिनेत्याला भंडारी हेच आडनाव देणं अनवधानानेही चुकीचंच होतं. एखाद्याची जात कारण नसताना भूमिकेतून सांगणं, तर हिणकस होतं. पण रमेश भाटकर त्याच्या पार पुढे गेलेले होते. तेच त्यांचं मोठेपण होतं. 

त्याच्याच आधी आलेली `तू तिथे मी` असू दे किंवा नंतर आलेली `डायल हंड्रेड`, त्यांचा रुबाब तसूभरही कमी झाला नाही. त्यानंतरही रमेश भाटकर मोठ्या पडद्यावर दिसले. गेल्याच महिन्यात रिलीज झालेल्या `द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर`मधे त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा रोल केला होता. त्याआधी `भावेश जोशी सुपरहिरो` या हिंदी सिनेमातही दिसले होते. कॅन्सरचं निदान झाल्यानंतरही ते `अपराध मीच केला` या नाटकाचे प्रयोग करत होते. सगळीकडे ते नेहमीच्या सहजतेने वावरले. यात कुठेच त्यांचा आजार दिसला नाही आणि मृत्यूचं सावटही. 

नाईंटीजच्या पिढीचा सुपरस्टार 

`अश्रूंची झाली फुले` नाटकात काशीनाथ घाणेकरांनी लाल्या गाजवला होता. पण नव्वदीच्या दशकात मोठ्या होणाऱ्या पिढीसाठी लाल्या म्हणजे रमेश भाटकरच. नंतर `हॅलो इन्स्पेक्टर `आलं. तेव्हाचे ते तेराच एपिसोड बघताना काहीतरी भारी वाटलं होतं. रुबाबदार विजय वर्देने दुनिया भारावली होती. आता ते सगळं बाळबोधही वाटेल. पण तेव्हाचं ते भारावलेपण हा अपघात नव्हता. ते पुढे पुन्हा पुन्हा गिरवलं गेलं, `विक्रम और वेताल`पासून `कमांडर`पर्यंत. 

आजच्या मिलेनियल पिढीला आश्चर्य वाटेल, पण रमेश भाटकर काही पिढ्यांचे आयकॉन होते. तो नव्वदच्या दशकाचा काळ वेगळा होता. दूरदर्शनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यक्रमांची जागा खासगी सिरीयलवाले घेत होते. नाटक आणि सिनेमा या माध्यमांना महाराष्ट्रभर पोचण्यात मर्यादा होत्या. पण टीवीवरच्या या सिरीयल वणव्यासारख्या राज्यभर पोचल्या. एक अख्खी पिढी या सिरीयलवर पोसली गेली. त्यामुळे छोट्या पडद्यावरचे अनेकजण सेलिब्रेटी बनले. रमेश भाटकर त्यातले सुपरस्टार होते.  

शर्टाचं पहिलं बटन उघडंच

नाईन्टीजच्या पिढीसाठी खरे तर ते बरेच सिनियर. पण त्यांनाही ते आपले वाटले. नेहमीच्या गोऱ्यागोमट्या गोड गोड नटांच्या तुलनेत ते फारच देखणे होते. मिळमिळीत मराठीत त्यांची ऐट लाजवाब होती. ते नजरेने बोलायचे. आवाजात जरब होती. मिशी शोभून दिसायची. खेळून कमावलेली तब्येत. त्याचवेळेस त्यांचं हसणं गोड आणि निरागस होतं. हे सारं कॉम्बिनेशन तेव्हा वेगळं होतं, नवीनही होतं. 

शर्टाचं पहिलं बटन रमेश भाटकरांनी कधी लावलं नाही. ती तेव्हाची स्टाईलच होती. रवींद्र महाजनी, अशोक सराफ, विनय आपटेही पहिलं बटन उघडं ठेवायचे. विनय आपटे भाटकरांच्याच धाटणीचे रोल करणारे. पण विनयजींच्या पहिल्या उघड्या बटनामधे त्यांना शोभणारा माज आणि दर्प होता. भाटकरांची तीच स्टाईल त्यांचा खेळकर रगेलपणा आणि बेफिकीरी दाखवायची. 

अलका कुबल यांनी भाटकरांना वाहिलेली श्रद्धांजली अनेक पेपरांतून छापून आलीय. त्यात त्या म्हणतात, `दुःखाच्या प्रसंगात मी ग्लिसरीन वापरायचे. पण रमेशजींना त्याची कधी गरज भासली नाही. त्यांच्या डोळ्यांत इमोशन्स होत्या. कोणताही भाव ते सहज व्यक्त करायचे. त्यांच्या स्वभावाविषयी गैरसमज होते. त्यांना अॅटिट्यूड  आहे, असं म्हटलं जायचं. पण खरं सांगू, त्यांच्यात निरागस लहान मूल दडलेलं होतं.`

मराठी मातीशी जोडलेला कलावंत

रमेश भाटकरांच्या कारकीर्दीत इतिहासात नोंदवलं जाईल, माईलस्टोन ठरेल, असं फारसं काही सापडणार नाही. पण ते तेव्हासाठी महत्त्वाचं होतं. आज मराठी एंटरटेन्मेंट इंडस्ट्री म्हणून जे काही एक जग उभं आहे, त्यात भाटकरांचं छोटं का होईना, पण महत्त्वाचं योगदान आहे. ते कायम जमिनीवर राहिले आणि मराठी मातीशी जोडलेलेही होते. त्यामुळे ते राहिले ते प्रभादेवी असो किंवा त्यांचं मूळ रत्नागिरी, तिथला एक गंध त्यांनी या इंडस्ट्रीत जोडलाय. 

संगीतकार स्नेहल भाटकरांचा मुलगा ही ओळख रमेश भाटकरांच्या करियरला सुरवातीपासून जोडलेली होती. स्नेहल भाटकर होतेच इतके मोठे. `कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी` सारखी अजरामर गाणी त्यांनी दिली. पांढरा लेंगा झब्बा आणि गांधी टोपी घालणाऱ्या या साध्या माणसाने चाळीस ते साठच्या दशकात हिंदी इंडस्ट्रीही गाजवली. पण कोकणातल्या माणसांसाठी ते लाडके भजनसम्राटच राहिले. त्यांनी देशातल्या सगळ्या मोठ्या गायिकांसोबत गाणी गायली. त्याहीपेक्षा आवडीने ते बुवा बनून भजनं गात राहिले. गिरणगावातली जुनी माणसं आजही त्या भजनांच्या आठवणी भारावून सांगताना भेटतील.  

स्नेहल भाटकरांचं साधेपण आणि मातीशी जोडलेपण रमेश भाटकरांनी पुढे चालवलं. सामनामधे दुर्गेश आखाडे यांनी भाटकरांच्या भाट्ये गावाशी असलेल्या कनेक्शनविषयी बातमी दिलीय. रत्नागिरी शहराला लागून असलेल्या भाट्ये गावात त्यांना घर बांधायचं होतं. त्यासाठी स्टारपणे विसरून लोकांमधे वावरणं आणि चुलत पुतण्याच्या लग्नात नाचणं, अशा आठवणी त्यात आहेत. दरवर्षी नाट्यसंमेलनात नाचणारे भाटकर सगळ्यांना माहीत आहेत. पण गावच्या शिमग्यात फाका देत पालखी नाचवणारे वेगळेच भाटकर या बातमीमुळे समोर आलेत. 

पत्नीला जस्टीस बनवणारा नवरा

रमेश भाटकरांशी जवळचे संबंध असणारे ज्येष्ठ पत्रकार सचिन प्रभाकर परब यांच्या फेसबूक पोस्टमधे एक वेगळाच पैलू समोर आलाय. भाटकरांविषयी ते लिहितात, `हा माणूस नातं जपणारा होता. मैत्रीचं, रक्ताचं आणि जिव्हाळ्याचंही. जस्टीस मृदुला भाटकर या रमेश भाटकर यांच्या पत्नी... जळगाव वासनाकांडात रामशास्त्री बाण्यानं न्याय देणाऱ्या भाटकर मॅडमबद्दल बोलताना त्यांचा पती रमेश अतिशय अदबीनं बोलत असे. स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून हुशार पत्नीला शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. पण याची वाच्यता कधीही केली नाही. मृदुला भाटकर यांच्या पदाच्या गरिमेला आपल्यामुळे कोणताही धक्का लागणार नाही, याची काळजी ते सतत घेत.`

७५ साली अश्रूंची झाली फुले सारख्या सुपरहिट नाटकात आणि ७७ साली चांदोबा चांदोबा भागलास का या पहिल्याच सिनेमात अभिनयातली करियर उंचीवर नेणाऱ्या भाटकरांना सगळं सांभाळून नोकरीही करावी लागली. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण बारावीतच सोडावं लागलं. पुढे अत्यंत उत्तम वाचन आणि संगीत, नाटकासह अनेक विषयांच्या अभ्यासाने त्यांनी त्याची कमतरता कधी जाणवू दिली नाही. त्यांनी आपल्या पत्नीला शिकवून त्यांचा सन्मान केला. 

ते आरोप कशासाठी होते?

याच रमेश भाटकरांवर २००७ साली बलात्काराचे आरोपही झाले. त्याविषयी सचिन परब फेसबूक पोस्टमधे लिहितात, `रमेश भाटकर यांच्यावर नको ते आरोप झाले होते. त्यांची पडद्यावरची रफटफ इमेज, सकृददर्शनी जाणवणारा स्वभावातला रोखठोकपणा यामुळे त्या आरोपांची शहानिशा न करताच अनेक जण त्यांना दोषी ठरवून मोकळे झाले होते. त्या दिवसांमधल्या रमेश भाटकर मला आठवतात. अतिशय संयमानं त्यांनी हे प्रकरण हाताळलं. आपल्यावर उडणाऱ्या शिंतोड्यांपेक्षा जज असलेल्या पत्नीला अपमान सहन करावा लागू नये, याची काळजी ते जास्त घेत होते. वरकरणी ठामपणा दाखवत असले तरी आतून ते पुरते हादरले होते. आपण निर्दोष आहोत हे सत्य आहे, सर्वांमसोर येईल, हा विश्वास त्यांना वाटत होता आणि तो खरा ठरला. पण या सर्वांतून बाहेर यायला त्यांना बरेच दिवस लागले... हायप्रोफाइल केसची सुनावणी करणाऱ्या प्रामाणिक न्यायाधीश पत्नीला भावनिकरीत्या गोत्यात आणण्यासाठी ते प्रकरण रचलं गेलं होतं. पण तेव्हा आपल्यावर अनेकांनी अविश्वास दाखवल्याची त्यांची खंत होती.` 

रमेश भाटकरांची कारकीर्द मोठी आणि समृद्ध होती. त्यांनी काळानुसार बदलत वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यात जीव ओतला. समरसून आणि व्यावसायिक शिस्तीत काम केलं. माणसं जोडली. त्यामुळेच त्यांना श्रद्धांजली वाहताना सेलिब्रेटींनी त्यांच्या साधेपणावर आणि माणुसकीवर भर दिलाय. सकाळमधे अशोक सराफ म्हणतात, `तो हरहुन्नरी कलाकार. अभिनयात तो उत्तम होताच. पण त्याहून सर्वोत्तम माणूस होता. सच्चा मित्र गमावल्याचं दुःख मला होतंय.`

अभिनय स्पष्ट आणि शुद्ध 

आज रमेश भाटकरांना श्रद्धांजली वाहण्यात आघाडीवर असणाऱ्या त्यांच्या सहकलाकारांनी आणि समीक्षकांनी त्यांच्या घाईतल्या संवादफेकीच्या स्टाईलमुळे त्यांची कायम टिंगल केली. पण भाटकरांनी त्याची पर्वा केली नाही. त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून घडलेली बोलण्याची नैसर्गिक पद्धत त्यांनी नाकारली नाही. त्याच्यामुळे त्यांचं कधी अडलं नाही. त्यांचा अभिनय कधी उणावला नाही. तरीही उच्चारांची तथाकथित शुद्धता आणि स्पष्टता हाच जणू अभिनयाचा सर्वोच्च मानदंड असल्यासारखं वागणाऱ्यांनी त्यांची हेटाळणीच केली. 

पण रमेश भाटकर हवं ते प्रेक्षकांपर्यंत सहज पोचवू शकत होते, तसं बहुसंख्य स्पष्ट उच्चारवाले अख्ख्या हयातीत पोचवू शकले नाहीत. `फू बाई फू`च्या एका फायनलमधे भाटकरांनी आपल्या आठवणी सांगून प्रेक्षकांना हसवलं होतं. तो वीडियो आजही यूट्यूबवर आहे. त्यात ते विक्रम गोखलेंपासून अमोल पालेकरांपर्यंत अनेकांच्या आवाजाची अप्रतिम नक्कल करताना दिसत आहेत. त्यातून ते तथाकथित स्पष्ट आवाज काढू शकले असते, हे कळतं. पण तो आवाज खोटा असता. 

कष्टकऱ्यांच्या संस्कृतीतली बेदरकारी 

रमेश भाटकर किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्याकडे काय मोलाचं आहे, हे बहुधा त्यांना माहीत नसावं. त्याची त्यांना पर्वाच नव्हती. प्रभादेवीसारख्या कष्टकऱ्यांच्या संस्कृतीतली अनौपचारिक बेदरकारी आणि मोकळेपणा अभिजनी मराठी अभिनयसंस्कृतीत रुजवली. नाईन्टीजच्या पिढीला तीच भावली असावी. त्यांच्या योगदानासाठीच मुलुंडच्या नाट्यसंमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. बाकी त्यांचा सन्मान ऐकण्यात नाही. पण स्नेहल भाटकरांसाठी आपण तेही करू शकलो नाही. त्यांना सरकारने लता मंगेशकर पुरस्कार दिला. पण फार उशिरा. आज रमेश भाटकर नसते, तर स्नेहल भाटकरांची जन्मशताब्दीही आपण विसरूनच गेलो असतो.

आज रमेश भाटकरांच्या जाण्याने दोन पिढ्यांनी जपलेला आणि कलेतून साकारलेला मातीचा मराठी अस्सल रंग हरपल्याचं दुःख आहे. अमेरिकेत शिकलेल्या त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत हा अस्सल मराठीपणा पोचला असेल का? कल्पना नाही.