पाकिस्तानातही महाशिवरात्रीला घुमतो ‘बम बम भोले’चा गजर!

२१ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्र साजरी होतेच. पण सीमापार पाकिस्तानातही एका ९०० वर्षं कटासराज देवळात बम बम बोलेचा गजर होतो. पाकिस्तानचं सरकारी वक्फ बोर्ड तिथे भाविकांची व्यवस्था करतं. नवाज शरिफांपासून लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेकांनी या देवळाला भेट दिलीय. सोनिया आणि प्रियंका गांधी तर दर महाशिवरात्रीला पूजासामग्री पाठवतात.

ब्रम्हा, विष्णू आणि महेश म्हणजे शंकर हा त्रिलोकांमधला तिसरा देव मानला जातो. ब्रम्हदेव विश्वाची निर्मिती करतात. विष्णू विश्वाचं रक्षण करतात तर शंकर विश्वाचे विनाशक आहेत असं हिंदू पुराणांमधे सांगितलं जातं. निळ्या अंगाचा, भस्म लावलेला कैलासावर राहणाऱ्या महादेवाची भारतात सगळीकडेच मनोभावे पूजा केली जाते. विशेषतः उत्तर भारतात उठता बसता महादेवाचं म्हणजे शिवजींचं नाव घेतलं जातं.

आज महाशिवरात्री. समुद्रमंथन झाल्यावर बाहेर आलेलं हलाहल विष महादेवांनी प्राशन केलं. त्या विषामुळे त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला आणि तो शांत करण्यासाठी महादेवांनी तांडव नृत्य केलं. त्यांचा दाह शांत होईपर्यंत सगळ्या देवी देवतांनी रात्र जागून काढली आणि भजन, गाणी म्हणत महादेवांचं मनोरंजन केलं. ही रात्र म्हणजे महाशिवरात्री. म्हणूनच आजच्या दिवशी संपूर्ण भारतातल्या एकूण एक महादेवाच्या मंदिरात रात्र जागवली जाते. पूजाअर्चा केली जाते. भजनं गायली जातात.

पण खास गोष्ट अशी की महादेवाची मंदिरं फक्त भारतात नाहीत तर पाकिस्तानातही आहेत. महाशिवरात्रीसाठी या देवळांमधेही मोठी धामधूम असते. इथंही रात्र जागवली जाते. त्यातलं सर्वात प्रसिद्ध आहे कटासराज मंदिर. लाहोरपासून जवळपास ३७० किलोमीटर लांब असणारं हे देऊळ तर ९०० वर्ष जुनं आहे.

हेही वाचा : दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट

महादेवाच्या अश्रूचं बनलं सरोवर

प्रजापती दक्ष याची मुलगी देवी सती हिने यज्ञात आहुती दिल्यानंतर तिचा मृत्यू बघून महादेवांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातून पडलेला अश्रू पृथ्वीवर कटास इथं पडला. त्यातून एक सरोवर तयार झालं. त्याभोवती महादेवांचं मंदिर बांधलं गेलं. हेच ते पाकिस्तानातलं कटासराज मंदिर.

पाकिस्तानातल्या चकवाल या गावापासून ४० किलोमीटरवर असलेल्या कटास नावाच्या एका डोंगरावर हे देऊळ आहे. त्यातल्या सरोवराला अमृतकुंड असं म्हणतात. १५० मीटर लांब आणि ९० मीटर रूंद असं हे सरोवर आहे. या सरोवरातात किंवा तळ्यात दोन रंगाचं पाणी असतं. तळ्याच्या किनाऱ्यापाशी असणाऱ्या पाण्याचा हिरवट रंग दिसतो. तळ्याच्या मध्यभागी पाणी निळ्या रंगाचं दिसतं. 

महाभारतात सांगितलेल्या एका कथेनुसार यक्ष आणि युधिष्ठीर यांच्यातला  संवादही याच सरोवरापाशी झाला होता. पांडव वनवासाला गेले असता एकदा वनात भटकताना त्यांना तहान लागली होती. म्हणून त्यांनी या सरोवराचं पाणी प्यायलं. पण हे सरोवर यक्षाचं होतं. पाणी आणायची जवाबदारी सहदेवाकडे होती. तो पाणी आणायला गेला तेव्हा यक्षानं त्याला अडवलं. पण यक्षाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सहदेवानं सरोवरातलं पाणी उचललं. यक्षानं सहदेवाचा जीव काढून घेतला. नकुल, अर्जुन आणि भिमाचंही असंच झालं. 

शेवटी आपले भाऊ परतले नाहीत म्हणून युधिष्ठीर सरोवराजवळ गेला. तेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तुझ्या भावांचे जीव परत करेन असं यक्षानं सांगितलं. यक्षाने युधिष्ठीराला जगण्याबद्दलचे काही मुलभूत प्रश्न विचारले. त्याची समाधानकारक उत्तरं युधिष्ठीरानं दिली. म्हणून हा यक्ष युधिष्ठीर संवादही खूप प्रसिद्ध आहे.

गांधी कुटुंबीय पाठवतात पूजेचं साहित्य

पण पवित्र हिंदू मंदिर एवढीच या मंदिराची ओळख नाही. अमृतकुण्ड तळ्यापासून थोड्याशा अंतरावर गुरूद्वाऱ्याचे अवषेश सापडतात. गुरूनानक पृथ्वीची भ्रमंती करत होते तेव्हा वेगवेगळ्या धर्मांच्या पवित्र स्थांनाना भेट देत होते. तेव्हा ते या कटासराज मंदिरात राहिले असावेत, असं म्हटलं जातं. 

शिवाय राम आणि हनुमानाचीही मंदिरं कटासराज मंदिराच्या आसपास दिसतात. त्यातल्या राम मंदिराच्या शेजारी महाराज रणजित सिंग यांच्या लष्करात काम करणारे प्रसिद्ध जनरल हरी सिंग नलवा यांची हवेली आहे. या हवेलीतील कोरीव काम आणि सुंदर चित्र रंगवलेली दिसतात. या हवेलीच्या मागे बौद्ध स्तूप आढळतात. अशोकाच्या काळात हे बांधले गेले असावेत. ११ व्या शतकात हिंदू धर्माचा पाश्चिमात्य देशात प्रचार करणारा मुस्लिम अभ्यासक अल बिरूनी हाही हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी कसाटराज मंदिरात राहिला असावा.

मंदिरातल्या या सरोवरामागे पौराणिक कहाण्या असल्यानं हिंदू धर्मात हे मंदिर फार महत्त्वाचं मानलं जातं. महाशिवरात्रीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष्या सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधीही या मंदिरात पूजेचं साहित्य पाठवतात. महाशिवरात्रीला पाकिस्तान आणि भारतातले हिंदू भाविकही या मंदिरात येतात. या पवित्र अमृतकुंडात आंघोळ करतात. महाशिवरात्र धरून सलग तीन दिवस मोठ्या सोहळ्याचं आयोजन या मंदिरात केलं जातं.

हेही वाचा : स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत

वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता मिळावी

फाळणीनंतर गेली अनेक वर्ष पाकिस्तान सरकारकडून या मंदिराकडे दुर्लक्ष होत होतं. पण २००५ मधे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी या देवळाला भेट दिली. या मंदिराची नीट काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर इथं महाशिवरात्री साजरी केली जाऊ लागली. मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात जाऊ लागले. २००८ मधे मुंबई हल्ला झाल्यावर पाकिस्तान भारत संबंध बिघडले आणि भाविकांची गर्दी ओसरली.

२०१६ मधे पाकिस्तान सरकारने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी स्वतः या मंदिराला भेट दिली आणि मंदिराचं पुनरुज्जीवन केलं जाईल अशी घोषणा केली. पुढच्याच वर्षी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यावरून अमृतकुंडामधलं पाणी बदललं गेलं होतं.  

या मंदिराचा सगळा खर्च पाकिस्तान सरकारच्या वक्फ बोर्डाकडून केला जातो. महाशिवरात्रीसाठी मंदिरात येणाऱ्या हिंदू भाविकांना काही सुविधाही पुरवल्या जातात. शिवाय या ९०० वर्ष जुन्या मंदिराला युनेस्कोनं हेरिटेज साईट म्हणून मान्यता द्यावी यासाठीही पाक सरकार प्रयत्न करतंय.

कटासराज सारखीच महादेवाची अनेक मंदिरं पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानची राजधानी कराचीमधेच १५० वर्ष जुनं महादेवाचं मंदिरं सापडतं. चित्तीमधल्या मनसहेरा मंदिरातलं शिवलिंग तर २ हजार वर्ष जुनं असल्याचं म्हटलं जातं. यातली अनेक मंदिरं फाळणीनंतर बंद करण्यात आली होती. मात्र हळूहळू पुन्हा ती सुरू झाली. उमरकोट मधलं १ हजार वर्ष जुनं महादेवाच्या मंदिराचे दरवाजे फाळणीनंतर यावर्षी पहिल्यांदाच उघडलेत. त्यामुळे यंदा भारताबरोबरच पाकिस्तानच्याही महादेव मंदिरात ‘बम बम भोले’ चा नारा घुमेल!

हेही वाचा : 

महाशिवरात्री कशासाठी साजरी केली जाते?

देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया