विराटचं बर्थडे गिफ्ट टीमला भोवणार नाही ना?

०५ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज ५ नोव्हेंबर. विराट कोहलीचा बड्डे. परदेश दौऱ्यांवर आपापल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडना सोबत घेऊन जाण्याची त्याची मागणी बीसीआयने मान्य केलीय. ते त्याच्यासाठी बर्थडे गिफ्टच ठरलंय. त्यामुळे आता इंग्लंड दौऱ्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देताना टीवीवरही दिसेल. पण ते टीम इंडिया उपकारक ठरणार की भोवणार?

रनमशीन, मॉडर्न ग्रेट, धावांचा बादशाह. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीसाठी ही विशेषणं गेल्या काही दिवसांपासून तंतोतंत लागू पडतायत. आपल्या बहारदार खेळीने कोहलीने क्रिकेटप्रेमींच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. त्याची धावांची भूक वाढत चाललीय. दिवसागणिक तो नवनव्या विक्रमाला गवसणी घालत आहे.

विराटच्या पर्पल पॅचवर बीसीसीआय खुश

नुकतंच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्याच्या इतिहासात सर्वात वेगवान दहा हजार धावा ठोकणारा फलंदाज बनण्याचा विक्रम कोहलीने आपल्या नावावर केला. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडला. सचिनने २५९ डावांत दहा हजार धावांचा पल्ला ओलांडला होता तर कोहलीने २०४ व्या डावातच दहा हजारी मनसबदार होण्याचा मान मिळवलाय. क्रिकेटच्या भाषेतच सांगायचे झालं तर कोहलीचा सध्या ‘पर्पल पॅच’ सुरू आहे. प्रत्येक सामन्यागणिक नव्या विक्रमाला तो गवसणी घालतोय.

त्यामुळे क्रिकेट रसिकांसह बीसीसीआयसुद्धा त्याच्यावर भलतीच खूश झालीय. या आनंदाच्या भरात कोहलीचा कोणताही हट्ट पूर्ण करायला बीसीसीआय मागेपुढे पाहत नाही. काही दिवसांपूर्वी तर बीसीसीआयने कोहलीचा एक हट्ट पूर्ण करून त्याला त्याच्या वाढदिवसाचं गिफ्टच दिलं. परदेश दौऱ्यांवर पत्नीला सोबत घेऊन जाण्याची कोहलीची मागणी बीसीसीआयने पूर्ण केलीय. दौऱ्याच्या पहिल्या दहा दिवसांनंतर क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्स त्यांच्यासोबत राहू शकतात असा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.

क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना दौऱ्यावर नेल्यास कोणत्याही अडचणी नसल्याचं सांगत बीसीसीआयने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलाय. याबाबत विराटने अनेकदा केलेल्या विनंतीचा विचार करून बीसीसीआयने हा निर्णय घेतलाय. याआधी परदेशी दौऱ्यावर जाताना पत्नी आणि गर्लफ्रेंडना फक्त दोन आठवडेच सोबत नेण्याची परवानगी होती. मात्र आता दौऱ्याचे पहिले दहा दिवस वगळता क्रिकेटरसह राहण्याची मुभा त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना देण्यात आलीय.

गुरू गॅरींचा सेक्स सल्ला

काही वर्षांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेसाठी क्रिकेटरना पत्नी आणि गर्लफ्रेंडना सोबत नेण्याची परवानगी दिली होती. तेव्हा या धोरणाचा ऑस्ट्रेलियन संघाला फायदा झाला होता. मैदानावरील खेळाडूंची कामगिरी उंचावण्यात सेक्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं विधान भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी काही वर्षापूर्वी केले होतं. त्यावेळी मोठा वादही निर्माण झाला होता. त्यामुळेच आता बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सना पत्नी आणि गर्लफ्रेंडना सोबत राहण्याची मुभा दिल्याने नव्या वादालाही तोंड फुटलंय.

बीसीसीआयचा हा निर्णय किती योग्य, अयोग्य त्याचे फायदे आणि तोटे यावर सध्या जोरदार चर्चा सुरू झालीय. क्रिकेटरना पत्नी आणि गर्लफ्रेंड्ससह राहू देण्याच्या निर्णयाकडे विविध अंगांनी पाहण्याची गरज आहे. एकीकडे क्रिकेटच्या निमित्ताने घरापासून दूर असलेल्या क्रिकेटरच्या पत्नी आणि मुलांना त्यांची गरज असते. तसंच संघासाठीही क्रिकेटरचं योगदान तितकंच महत्त्वाचं असते.

क्रिकेटरांच्या बायका भांडल्या तर

मात्र बीसीसीआयच्या नव्या निर्णयाचे अनेक तोटे असल्याचंही सांगणारे आहेत. बीसीसीआयच्या निर्णयानंतर परदेश दौऱ्याच्या दहा दिवसांनंतर क्रिकेटरच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड क्रिकेटरसह राहत असतील तर तिथे अनेक प्रश्न आणि गंभीर परिस्थितीही निर्माण होऊ शकते. विविध क्रिकेटरच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत आल्या आणि त्यांच्यात काही वाद झाला. त्यात त्यांचे क्रिकेटर पती किंवा बॉयफ्रेंड मित्र या वादात उडी घेण्यीच शक्यता आहेच.

त्यामुळे साहजिकच टीममध्ये दुफळी निर्माण होऊ शकते. अशा वादग्रस्त परिस्थितीत पत्नी गर्लफ्रेंडच्या बाजूने उभं राहायचं, आपल्या सहकाऱ्यांची साथ द्यायची की मग तटस्थ राहायचं, अशा द्विधा मनस्थितीत क्रिकेटर अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या वादाचा संबंधित क्रिकेटरच्या खेळावर परिणाम होणंही स्वाभाविक आहे.

सध्याच्या भारतीय क्रिकेटर्सच्या संघात कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा, शिखर धवनची पत्नी आयेशा, रोहित शर्माची पत्नी रितीका आणि धोनीची पत्नी साक्षी या पत्नींचा वेगळा ग्रुप असल्याचे बोललं जाते. ही क्रिकेटर पत्नींमधली गटबाजी क्रिकेटरसाठीही घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनुष्का सोबतीत विराट फ्लॉप

पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत असल्यामुळे त्यांच्या पतींना त्यांचा खेळ सुधारण्यासाठी नवी प्रेरणा, नवा आत्मविश्वास किंवा नवी उमेद मिळेलही. मात्र त्या सोबत असल्याने खेळापेक्षा इतर गोष्टींवर किंवा प्रेमात अडकून राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कुटुंबीय सोबत असल्याने त्याचा कितपत फायदा किंवा नुकसान होईल हा वादाचा विषय आहेच. मात्र पत्नी, मुलांपासून दूर राहिल्याने त्यांच्या नात्यात कटुता येईलच हे सांगता येणंही कठीण आहे.

याआधी गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा विराट कोहलीने बीसीआयकडून विशेष परवानगी काढत अनुष्का शर्माला ऑस्ट्रेलियाला नेलं होतं. मात्र अनुष्काची उपस्थिती असलेल्या या दौऱ्यात विराटची कामगिरी तितकीशी चांगली झाली नव्हती. विराटच्या खराब कामगिरीसाठी क्रिकेट चाहत्यांनी अनुष्काला जबाबदार धरत सोशल मीडियावर ट्रोलही केले होते.

बीसीसीआयच्या पैशांवर सेकंड हनीमून?

बीसीसीआय विराटच्या हट्टापुढे झुकल्याच्या निर्णयावर सोशल मीडियावरही उलटसुलट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. क्रिकेट चाहते आणि नेटिझन्सनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यावेळी क्रिकेटर त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना परदेशात नेत नव्हते, तेव्हा भारतीय संघ जिंकत नव्हता का अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळते. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यासारख्या दिग्गज क्रिकेटरनी पत्नी आणि कुटुंबियांपासून दूर राहूनचे देशासाठी चमकदार कामगिरी केली. मग विराटला पत्नी जवळ का हवी अशी नाराजी क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केलीय.

काही क्रिकेट चाहत्यांनी तर तीव्र शब्दांत बीसीसीआयच्या निर्णयावर आपला संताप व्यक्त केलाय. खेळाडूंना देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे की त्यांना बीसीसीआय किंवा सरकारी पैशाने दुसऱ्या हनीमूनला जायचं आहे, असा सवाल एका नेटिझननं विचारलाय. जर खेळाडूंना पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबतच राहायचे असेल तर त्यांनी खुशाल राहावं आणि नव्या खेळाडूंना संधी द्यावी अशी मागणीही या क्रिकेट चाहत्याने व्यक्त केलीय.

दुसऱ्या एका क्रिकेट चाहत्याने तर क्रिकेटरना जणू काही आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. देशासाठी आपलं कर्तव्य निभावण्याची ही तऱ्हा योग्य नव्हे, सीमेवर जवानही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या कुटुंबियांपासून दूर राहत कर्तव्य बजावतात. जर खेळाडूंना अशाप्रकारे सवलत दिली जात असेल तर जवानांनाही आपल्या कुटुंबियांसोबत राहण्याची मुभा का मिळू नये, असा सवाल त्या क्रिकेट चाहत्याने विचारला आहे. त्यामुळे बीसीसीआयने विराट कोहलीचा हट्ट पूर्ण केला असला तरी या निर्णयाच्या साईड इफेक्टकडे कानाडोळा करणं योग्य ठरणार नाही.