लहानपणीच्या सिरिअल पुन्हा बघाव्याशा वाटतायंत?

२२ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीचा काळ हा कधीच विसरता येत नाही. आणि प्रत्येकाचा हाच दावा असतो की त्यांचा काळ सगळ्यात बेस्ट होता. पण नव्वदच्या दशकातली गोष्टच वेगळी होती. लहानपणीच्या आयुष्यात टीवीची एक खास जागा होती. त्याकाळातल्या सिरिअलनी आम्हाला घडवलं, आमचं निखळ मनोरंजन केलं. तो काळ आपल्याला युट्युबने परत दिलाय. पुन्हा त्या गोष्टी अनुभवण्याची संधीच मिळालीय असं वाटतंय.

सुट्ट्या म्हटलं की सर्वांना मामाचा गाव आणि लहानपण आठवतं. आपल्या लहानपणी काय काय होतं, याची एक नकळत उजळणी मनातल्या मनात होऊन जाते. आपल्या लहानपणीच्या, त्या नव्वदच्या काळातल्या आठवणी काढणारे फक्त आपणच नाही, तर आपल्यासारखे असे बरेचजण आहेत.

या आठणींसाठी रंगवण्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. घरबसल्युद्धा तुम्ही या आठवणीत रममाण होऊ शकता. यासाठी आपल्याला फक्त युट्यूबवर जायचं आहे. सर्चमधे आपल्या आठवणीतल्या सिरिअलचं नावं टाका. मग तुमच्या लहानपणीच्या फेवरेट सिरिअलचे एपिसोड तुमच्या समोर असतील. हो पण, डकटेल्स आणि टेन्सपिन्सच्या हिंदी व्हर्जनच्या सिरीअल्स तेवढ्या युट्यूबवर उपलब्ध नाही.

९०’ज म्हणजे एंटरटेंमेंट विद इन्फोटेंमेंट

९० चं दशक म्हणजे नुसतं एंटरटेंमेंट नव्हतं, तर त्या मालिकांतून बऱ्याच गोष्टींचे कळत नकळत मनावर संस्कार व्हायचे. मग ते जयंत नारळीकरांची ब्रम्हांड सिरिअल असो किंवा जसपाल भट्टी यांचा फ्लॉप शो. ब्रम्हांडमधे तर नारळीकरांसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने काम केलंय. त्यातही ते एक वैज्ञानिक होते. आणि त्यातून त्यांनी भावी पिढीला विज्ञानाचे धडे दिले. तसंच त्यात अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे नेमकं काय ते वैज्ञानिकदृष्ट्या पटवून दिलं. हा एक असा वैज्ञानिक जो कधी कोणत्या बाबा बुआंच्या नादाला लागला नाही आणि कंप्युटरची पूजा केली नाही. 

 त्यानंतर जसपाल भट्टींचा फ्लॉप शो हा शो. पण हा शो इतका हिट आहे की आज जसपाल भट्टी नसतानाही ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवताहेत. पुढे त्यांच्या सिरिअलच्या थिमची अनेक ठिकाणी कॉपी झाली. पण त्यांनी समाजातल्या वाईट गोष्टींवर ज्या खुबीने बोट ठेवलं ते इतर कोणालाही जमलं नाही. त्यानंतर जसपाल भट्टींचा एक शो झी टीवीवर आला होता पण तो फारसा चालला नाही. फ्लॉप शो मात्र अजूनही हिट आहे.

आमच्या लहानपणी काय होतं माहितीए?

सध्या अशा अनेक सिरिअल्स आहेत ज्यांची थिम एक शेजारी दुसऱ्या शाजाऱ्याच्या बायकोवर लाइन मारतो. अनेकदा घासून गुळगुळीत झालेली ही स्त्रीलंपट थीम अजूनही अनेक चॅनलवर या न त्या स्वरुपात बघायला मिळते. मात्र, आपण युट्यूबवर ये जो है जिंदगी सर्च करा. घरंदाज कॉमेडी काय असते हे आपल्या लक्षात येईल. 

सुरभी हा शो संपूर्ण कुटुंब एकत्र बसून रविवारी किंवा शनिवारी रात्री बघायचो. त्यातल्या रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक यांचं अँकरींग म्हणजे आपल्याशी गप्पाच मारतायत असं वाटायचं. मिर्च मसाला आणि सुपरहिट मुकाबला हे दोन शो असे होते ज्यामुळे हिंदी पिक्चर आणि गाण्यांची ओळख बच्चेकंपनीला व्हायची. यातलीही अनेक गाणी आज आपल्याला युट्यूबवर अवेलेबल आहेतच. आताच्या पिक्चरमधे अनेक ९० च्या दशकांतल्या गाण्यांचा रिमेक किंवा रिमिक्स वर्जन बघायला मिळेल.

लहान मुलांचे कार्यक्रम म्हणजे. फुलवारी बच्चों की, अलिफ लैला, मोगली, मालगुडी डेज, मराठीतली गोट्या, बोक्या सातबंडे. मना घडवी संस्कार अशा अनेक सिरिअल्स तुम्हाला युट्युबच्या गुहेत गेल्यावर भेटतील आणि तुम्ही पुरते फ्लॅशबॅक व्हाल. मग, मन नकळत आपल्या बालपणीच्या सुखाच्या काळाची तुलना आताच्या मुलांसाठी असलेल्या बेब्लेट आणि पोकिमॉन सारख्या सिरिअल्सशी होते. पण असा विचार करणारे फक्त आपण नाहीत ते प्रोग्रॅम खालच्या कमेंट वाचल्यावर लक्षात येईल.

९०’ज मधल्या काही गोष्टी मिसिंग 

युट्युबमुळे आपल्याला आपलं लहानपण पुन्हा भेटलं. अनेक गाणी, अनेक आठवणी तज्या झाल्या. या सगळ्या गोष्टी काळाच्या कसोटीवर खऱ्या ठरल्या आहेत. आज आपण आपल्या घरातल्या मुलांना त्या सिरिअल्स दाखवू शकतो. विशेषतः मालगुडी डेज, मोगलीचं ओल्ड व्हर्जन. अलिफ लैला, विक्रम वेताळ, अरेबियन नाइट्स, वागले की दुनिया, भारत एक खोज, मिर्जा गालिब आणि असंख्या अशा गोष्टी ज्या कधीच कालबाह्य होणार नाहीत.

पण यात काही मिसिंग आहेत. बालचित्रवाणीचा फक्तं एकच एपिसोड आहे. एका सरकारी उपक्रमाची व्हावी तीच अवस्था या उपक्रमाची झाली. याचा दुसरा कोणताच एपिसोड युट्यूबवर मिळणार नाही. दुरदर्शनने लहान मुलांसाठी चालवलेला एक चांगला उपक्रम. आता फक्त त्याच्या आठवणीच उरल्यात. शेवटी एक गाणं नक्की आठवंत, ‘मेरे बचपन के दिन कितने अच्छे थे, दिन आज बैठे बिठाये क्यूं याद आ गये.’