हिरवाणी आणि शोधन : वाढदिवस सारखा आणि नशीबही

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज १८ ऑक्टोबर २०१८ला पहिल्या इंटरनॅशनल मॅचमधे १६ विकेट घेणाऱ्या नरेंद्र हिरवाणीचा पन्नासावा वाढदिवस. आज दीपक शोधन असते तर तेही ९० वर्षांचे झाले असते. त्यांनी त्यांच्या पहिल्या इंटरनॅशनल मॅचमधे शतक ठोकलं होतं. गुणवत्ता असूनही कॅप्टनशी पंगा घेतल्याने दोघांचीही कारकीर्द अल्पजीवी ठरली

आज नरेंद्र हिरवाणीचा पन्नासावा वाढदिवस. विराट कोहलीच्या जमान्यातील मुलांना त्याचं नाव माहीतही नसेल. पण ज्यांनी १३ जानेवारी १९८८च्या सकाळी साक्षात विवियन रिचर्डसची गुगलीवर काढलेली विकेट पाहलीय, त्यांना नरेंद्र हिरवाणी विसरणं शक्य नाही.

हिरवाणी : पहिल्याच टेस्टमधे १६ विकेट

मद्रास टेस्टचे ते पाच दिवस वेस्ट इंडिजच्या टीमवर हिरवाणी नावाची संक्रांत आली होती. वयाची वीस वर्षंही पूर्ण झालेली नसताना त्याने आपल्या पहिल्याच टेस्टमधे पहिल्या डावांत ६१ रन देत ८ विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याचा धडाका इथेच संपला नव्हता. दुसऱ्या डावात ४१६ रनचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचा सगळा संघ ४० ओवरमधे गारद झाला. त्यात हिरवाणीने ७५ रन देत ८ विकेट घेतल्या. पदार्पणाच्या टेस्टमधेच १३६ रन देत १६ विकेट घेत हिरवाणी त्याच्या पिढीच्या मनात कायमचा जाऊन बसला.

त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टेस्टमधेही हिरवाणीने २० विकेट घेतल्या. पण त्याच्या फिरकीची जादू फिकी पडू लागली. १९८९-९०च्या विडींज दौऱ्यात फिरकीसाठी अनुकूल खेळपट्ट्यांवरही हिरवानी संघर्ष करत राहिला. तिथूनच त्याच्या छोट्याशा क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा लागली. पुढे कामगिरीतील सातत्याचा अभाव आणि दुसरीकडे लेगस्पिनर म्हणून अनिल कुंबळेचा भारतीय क्रिकेटमधील उदय यामुळे हिरवाणी संघाबाहेर फेकला गेला.

पण हिरवाणीने हार मानली नाही. तब्बल चार वर्षांनंतर संघात दमदार पुनरागमन केलं. न्यूझीलंडविरूद्ध ५९ रनच्या बदल्यात ६ विकेट घेतल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्यांना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळाली. पण त्यात तो प्रभाव दाखवू शकला नाही. भारतीय संघात नसतानाही तो रणजीत खोऱ्याने विकेट खेचतच राहिला. त्यामुळे २००१मधे त्याला पुन्हा दौऱ्यात संधी मिळाली. पण त्याला अंतिम ११ मधे खेळवलं गेलं नाही. त्याचा राग येऊन त्याने तत्कालीन कॅप्टन सौरव गांगुलीवर टीका केली. गांगुलीवर पक्षपाताचा आरोप केला. तेव्हाच त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कारकीर्द कायमची संपुष्टात आली. तेव्हा त्याच्या नावावर १७ टेस्टमधे ६६ विकेट आणि १८ वनडेमधे २३ विकेट होत्या.

पण रणजी सामन्यांत त्याने ढिगाने विकेट काढल्या. १६७ फर्स्ट क्लास मॅचमधे त्याच्या तब्बल ७३२ विकेट आहेत. २०१४ला मध्य प्रदेश संघाचा निवड समिती अध्यक्षही झाला. त्याचा लेक मिहीर यानंही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं. मात्र आजही हिरवाणी म्हटलं की फक्त त्याची पहिली मॅचच आठवते.

दीपक शोधन : पहिल्या मॅचमधे सेंच्युरी

नरेंद्र हिरवानीप्रमाणेच आणखी एक भारतीय क्रिकेटमध्ये कॅमेऱ्याच्या फ्लॅशप्रमाणे चमकलं आणि लगेचच क्रिकेटच्या इतिहासाच्या पुस्तकात हरवलं. हे नाव म्हणजे दीपक शोधन. हिरवाणीसारखाच त्यांचा जन्मही १८ ऑक्टोबरचाच. पण १९२८ सालचा. आज ते असते, तर ९० वर्षांचे असते. 

१२ डिसेंबर १९५२ ला पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमधे शोधननी पदार्पण केलं. विजय हजारे खेळू शकत नसल्याने शोधन यांची अंतिम अकरामधे निवड झाली. या टेस्टमधे इतर भारतीय बॅट्समनना दोन अंकी धावसंख्या करणं कठीण जात होतं. त्याच कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या डावखुऱ्या शोधन यांनी ११० धावांची अविस्मरणीय खेळी केली. सलग दोन चौकार ठोकत शोधन यांनी आपलं शतक ठोकलं.

लाला अमरनाथ यांच्यानंतर पहिल्याच टेस्टमधे शतक ठोकणारे शोधन हे दुसरे भारतीय ठरले. यानंतर विडींजविरुद्धच्या कसोटीत ४५ आणि ११ रन त्यांनी केले. त्यानंतरच्या तीन टेस्ट शोधन खेळू शकले नाहीत. पाचव्या टेस्टमधे त्यांना खेळण्याची संधी मिळाली मात्र त्याचवेळी ते आजारी पडले. मात्र अशा परिस्थितीतही दुसऱ्या डावात त्यांनी दहाव्या क्रमांकावर खेळत नाबाद खेळी केली. हीच खेळी त्यांच्यासाठी अखेरची ठरली. यानंतर शोधन यांची भारतीय संघात निव़ड झाली नाही.

पहिल्याच कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम करणाऱ्या शोधन यांची क्रिकेट कारकीर्द तीन सामन्यांतच संपुष्टात आली. शोधन यांच्या निवडीवरून मोठं महाभारत घडलं होतं. त्यांच्या भारतीय संघात निवड न होण्यामागे विनू मंकड विरूद्ध विजय हजारे वाद असल्याचं बोललं गेलं. एकदा मंकड यांनी शोधन यांना विचारलं की तू कोणत्या गटाचा? मंकड की हजारे? त्यावेळी शोधन यांनी प्रामाणिकपणे ‘मी भारताचा’ असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर कॅप्टन बनलेल्या मंकडने शोधनला संघात येऊ दिलं नाही. तरीही शोधन यांचं नाव भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचं जाऊन बसलं ते एका शतकामुळे.

१८ ऑक्टोबरलाच जन्मलेले आणखी दोघे : सोढी आणि उनडकट

भारतीय क्रिकेटमध्ये कितीतरी नावं चमकतात आणि लगेचच विस्मरणात जातात याची आणखी दोन उदाहरणं म्हणजे रितिंदरसिंग सोधी आणि दुसरं म्हणजे जयदेव उनादकट. पंजाब-दा-पुत्तर असलेल्या रितिंधरनं कमी वयातच अष्टपैलू कामगिरीनं जगाच्या नजरा आकर्षित केल्या. या कामगिरीमुळे भविष्यातील कपिल देव म्हणून रितिंदरकडे पाहिलं जाऊ लागलं. त्याच्याच नेतृत्वात भारताने अंडर-१५ वर्ल्ड कप जिंकला. तर तो उपकर्णधार असताना भारताने अंडर-१९ वर्ल्ड कपही जिंकण्याचा पराक्रम केला. याच कामगिरीच्या जोरावर रितिंदरसिंगची भारतीय वऩ डे टीममधे निवडही झाली. मात्र या निवडीला आपल्या कामगिरीनं न्याय देण्यास तो सातत्याने अपयशी ठरला. १८ वऩ डेमधे फक्त २८० रन आणि ३ विकेट अशी त्याची आकडेवारी होती. या निराशाजनक कामगिरीने त्याची कारकीर्द अवेळी संपली. आता तो  कारकिर्द फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सामनाधिकारी आणि समालोचक म्हणून दिसतो.

आयपीएल क्रिकेट २०१८ च्या हंगामासाठी क्रिकेटर्सची नव्याने बोली लागली. त्यात चर्चेचं आणि आकर्षणाचं केंद्र ठरला तो डावखुरा जयदेव उनडकट. राजस्थान रॉयल्स संघाने उनडकटवर तब्बल साडेअकरा कोटींची बोली लावत त्याला संघाकडून खेळण्यासाठी निवडलं. या हंगामातला तो सर्वाधिक बोली लागलेला क्रिकेटर ठरला. जयदेवने सौराष्ट्रकडून रणजी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आठ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं. २०१० ला सेंच्युरीयन कसोटीत दक्षिण आक्रिकेविरुद्धच्या कसोटीत पदार्पण केलं. मात्र यांत एकही विकेट टिपण्यात त्याला यश आलं नाही. त्यानंतर २०१३ ला झिम्बाब्वेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. मात्र सात वनडे सामन्यांत तो केवळ आठ विकेट घेऊ  शकला. मात्र त्याचवेळी टी-२० आयपीएलमध्ये खेळताना त्याचं नशीब फळफळलं. या छोट्याशा फॉर्मटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.

विशेष म्हणजे आपल्या गुणवत्तेला न्याय न देऊ शकलेल्या सोढी आणि उनडकटचाही वाढदिवस आजच म्हणजे १८ ऑक्टोबरला आहे.