शिवाजी आंबुलगेकरः भरजरी बोलींचा धनी

२७ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना आज मुंबईत ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी भाषा शिक्षक पुरस्कार’ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडी तांड्यावरच्या विद्यानिकेतन आश्रमशाळेवर ते मराठीचे शिक्षक आहेत. मराठीला अभिजनी कचाट्यातून बाहेर काढत पारधी, घिसाडी, वडार जमातीच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या बोलींशी त्यांनी तिला जोडलं. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले.

‘आभाळाकडं डोळे लागलेत कुणब्यांचे. मिरगाची आस लागली होती... पर मिरगानं काही आंडू गाळलं नाही. सारं नकितंर कोरडं - कोरडंच गेलं; म्हणून मिरगाची मासोळी खाण्यात काही नूरच राहिला नाही. पार मांगोड्यापासून सडकंपस्तोर गौळाचा भोई   ‘मासोळ्या...मासोळ्या’ म्हणून बोंब मारीत गेला पर त्याला तुर्ळकच गिऱ्हाइक गटलं. आन् मग काय नुस्तं हातं हालवित गेलं ते!

पेरणी... सालभर, दोन टैमाच्या रोटीची सायसोय. सालभरातलं सम्द्यात मोठ्ठं काम. घरात मडं पडलं असलं तरी ते झाकून ठेवावं पर आधी पेरणी सारावं; असा बुजुर्गायचा म्हणवा. वटीचा आन् मुठीचा फरक असतो म्हणतात. तिफनीच्या चाड्यावर असलेल्या मुठीतलं बी नळ्यातून घरंगळत - घरंगळत मातीत पडतं... पर वटीतल्या बियाचं नशीब काय सांगावं?’

शिवाजी आंबुलगेकर यांच्या एका ललित लेखातला हा छोटासा भाग. मराठी भाषेचा प्रयोगशील शिक्षक म्हणून त्याला मिळणारा पुरस्कार किती सार्थ आहे हेच वाचणाऱ्याला सांगणारा. कारण एकाच एका भागातली, विशिष्ट उच्चारांची अभिजनी मराठीच शुद्ध, श्रेष्ठ मराठी असं म्हणणाऱ्यांची अघोषित मक्तेदारी आता संपलीय. आणि शिवाजी हा त्याच बोलीभाषेचा वाहक आहे. शिक्षक म्हणून आणि माणूस म्हणूनही.

साधेपणातली मायंदळ थोरवी

शिवाजीचा चांद्यापासून बांद्यापर्यंत गोतावळा. या गोतावळ्यात मी सामील झालो त्याला कित्येक साल झालेत. काहींना असण्याहून दाखवण्यात दिसण्यात अधिक रस असतो आणि शिवाजीसारखी माणसं मायंदळ थोर असूनही साधेपण जपण्यात आनंद घेतात. बडेजाव हा शब्द पठ्ठ्याला कधीच स्पर्शला नाही. घेतलेला वसा जीवजतन जपायचा ही शिवाजीची खरी ओळख!

मंचीय जगणं आणि सामान्यांत वागणं यातला असामान्य फरक रसिकांना समजतोच. या न्यायाने शिवाजी म्हणजे राजा माणूस. नाहीतरी परिवारात राजा हे टोपण नाव त्याचं आहेच!

आपल्या गणगोतचा लाभ शाळेतल्या मुलांना देण्यासाठी शिवाजी ढोर मेहनत घेणारा माणूस. दूरदूरच्या लेखक-कवींना बोलावून विद्यार्थ्यांना साक्षात अनुभव देण्यात शिवाजीसारखा दुसरा कुणी मित्र शोधणं अवघड.

बोलीभाषेत साकारला गावचा भूगोल

दोन व्यापारी भेटले की घरातल्या, व्यापारातल्या चढउताराची चर्चा करतात. दोन शेतकरी भेटले की पिक शेतीची चर्चा करतात. मात्र दोन शिक्षक मित्र भेटले की विद्यार्थी, अभ्यासक्रम, शाळा याऐवजी राजकारण, प्रशासन अशीच चर्चा होताना मी अनुभवलेलं.  शिवाजी मात्र याला अपवाद. जेव्हा भेटेल तेव्हा शाळेतल्या उपक्रमांची चर्चा.

शाळेतल्या एकाहून एक गुणी मुलांचं कवतुक. अवतीभवती प्रतिकुलाचं अमाप पीक असूनही शिवाजीने लेकरांच्या कौतुकाचा धागा कधीच ढिला पडू दिला नाही. म्हणूनच कमळेवाडीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला माझ्या गावचा भूगोल, आणि पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा बोलीभाषेत केलेला अनुवाद हा शिवाजीच्या डोळस उपक्रमशील तेचं उदाहरण. 

माझी मुलं पुस्तकातल्या कवितांचा आपल्या बोलीत अनुवाद करत आहेत. माझी मुलं त्यांच्या गावाचा भूगोल तयार करताहेत, या गोष्टी सुरवातीला अनेकांना गमतीच्या वाटल्या. मात्र जेव्हा हे सगळं थेट सातासमुद्रापार पोचलं तेव्हा शिवाजी अगदी शांतिनिकेतनसारखं किती मूलगामी शिक्षणाचं काम करीत आहे याची जाणीव झाली.

लालकंधारी शब्दकळेचा धनी

शिवाजी आमच्या मुलखात सर्वांना माहीत होताच पण एक उपक्रमशील, अस्सल शिक्षक म्हणून त्याच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. तीसेक वर्षांपूर्वी शिवाजीची कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाली होती. शिवाजीचं ललितलेखन तितकंच भारदार, बहरदार. त्याची खास गावरान लालकंधारी शब्दकळा या लेखनाला खमंग घमघमाट देणारी.
 
शिवाजीची ‘तुका म्हणे ऐशा नरा’ ही दांभिकावर आसूड ओढणारी एकांकिका आली. या लेखनाला राज्य शासनाच्या ‘मामा वरेरकर पुरस्कारा’ची राजमान्यता पावली. दुसरी आवृत्तीही निघाली.  पण पठ्ठ्याचा अजून एकही कवितासंग्रह प्रकाशित नाही याची खंत वाटते. चिठोऱ्यावरील  कविताही  कवी किती जपून ठेवतात.  मात्र  राजा माणूस आपली कवितेची वहीच हरवून बसला होता. तुकोबांचे  अभंग इंद्रायणी ने दिले तसे शिवाजीच्या मित्रांनी त्याच्या कविता मिळवून दिल्या. डझनावर कवितासंग्रह पुस्तकं नावावर असणारी माणसं फारशी रसिकांना माहीतही नसतात पण कवितेचं एकही पुस्तक नावावर नसताना अभिजात कवी म्हणून शिवाजी अनेकांच्या काळजात जागा आहे. 

मैत्र जगणं काय असतं हे शिवाजीकडून शिकावं. पोटच्या लेकरासाठी जीव तुटावा तसा शिवाजीचा मित्रांसाठीही तुटतो. कुणी कधी अडला नडला तर खिसा रिकामा होईपर्यंत मोकळा करणारा हा दिलदार. हा अनुभव माझ्यासह अनेकांना आला असेल. मोत्यासारखं अक्षर, फोटोग्राफीचा चा नाद, जुन्या गाण्यांचं वेड... काय काय नाही या माणसात. असा हरहुन्नरी, दिलदार माणूस माझा यारदोस्त आहे, अजून कुठलं धन मी मागू?

(लेखक हे कवी आणि शिक्षण विस्तार अधिकारी आहेत.)