गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ कुठून मिळतं?

११ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज दत्तजयंती. अनुसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी ऋषी अवतार घेतला आणि त्यातून दत्त गुरू अवतरले. गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढल्यावर दत्त गुरुंच्या पावलांचं दर्शन होतं. पर्वत चढताना छोटी छोटी मंदिरं लागतात. एकदा पावलांचं दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन जातं. दत्त गुरुंवरच्या श्रद्धेतून संपूर्ण पर्वत चढण्याचं बळं मिळत असावं, असं वाटतं.

दत्तगुरूंना गुरूंचे गुरु मानलं जातं. ब्रम्हा, विष्णू, महेश हे तिनही देव या अवतारात एकत्र आल्यानं त्यांची शिकवण अलौकिक ठरणारी. असं असूनही दत्त गुरूंनी ४२ गुरू केले. त्यातून त्यांनी हेच दर्शवलं की माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो आणि आपण सर्वज्ञानी असल्याचा अहंकार करू नये.

स्वनार्जनासाठी अनेक क्षेत्र आहेत. अनेक कला, विद्या अस्तित्वात आहेत. या सगळ्यात पारंगत होणं अशक्य असतं. म्हणून कुणीही स्वतःला ज्ञानी समजू नये. गुरूच्या मार्गदर्शनाविना ज्ञान संपादन करणं कठीण असते. म्हणूनच मात, पिता यांच्या खालोखाल गुरुला महत्व लाभलंय. 

माहूरला झाला दत्तगुरुंचा जन्म

दत्तगुरू हे विनम्र, शांत आणि प्रसन्न अवतार आहेत. या अवतारात भक्तीचा महीमाच त्यांनी वर्णिला. जो मनुष्याला परमार्थिक सुख देतो. या त्रिदेवांची निर्मिती सती अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी झाली. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया हिचं सत्व बघण्यासाठी हे तिनही देव तिच्या घरी गेले आणि अतिथींचा सत्कार केला गेल्यावर त्यांनी भोजनाची इच्छा व्यक्त केली. पण हे भोजन अनुसूयेने वस्त्रहीन होऊन वाढायचे अशी अट घातली गेली. अनुसयेपुढे पेच पडला. तिने मनोमन प्रार्थना केली आणि आपले पतिव्रतेचे बळ एकवटले. तिच्या या बळामुळे तिन्ही देव चक्क बालक झाले आणि अनुसूयेचे पतिव्रत झळाळलं.

पुढे हे तिन्ही देव एकत्र येऊन झालेला अवतार तो गुरुदत्त बनला आणि अनुसूया त्यांची माता झाली. दत्त गुरूंनी आपल्या अवतार कार्यात भरपूर तपश्चर्या केली आणि सर्वत्र संचार केला. त्यांची स्थानं त्यामुळे अनेक ठिकाणी आढळतात. त्यापैकी काही विशेष मानली गेली आहेत. महाराष्ट्रात यापैकी नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर ही क्षेत्रं येतात.

माहूरला अत्री अनुसया हीचा आश्रमही आहे. तिथं दत्त जन्म झाल्याचं मानलं जातं. पण गुजरातमधेसुद्धा दत्त्स्थानं आहेत. त्यापैकी एक आहे गुजरात, राजस्थान सीमेवरील आबू डोंगरावरचं गिरीशिखर. तर दुसरं आहे जुनागढ मधला गिरनार पर्वत. गिरीशिखर मधून दत्तगुरू गिरनारला आले. तिथल्या निसर्गरम्य पर्वतवारी पाहून तिथंच थांबले आणि तपश्चर्येला बसले. तिथं त्यांनी बारा हजार वर्ष तप केल्याची श्रद्धा आहे. माता अनुसूयेने हाक मारल्याचा आभास झाल्यानेच त्यांची समाधी भंगली. ते तपस्येतून बाहेर आले. पण त्यांचा त्यांच्या कमंडलूला धक्का बसला आणि तो कमंडलू भंग पावला.

हेही वाचा : आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

डोलीतून जाण्यासाठी दहा हजार रुपये

गिरनार पर्वताची यात्रा खरोखर कठीण आणि संयमाची परीक्षा घेणारी आहे. पर्वत चढायला पहाटेच सुरवात करावी लागते. पहिल्या पायरीवर एक कमान आहे. तिथून प्रारंभ होतो. पायऱ्या खूप असल्या तरी चांगली गोष्ट अशी की या सर्व पायऱ्या भक्कम बांधलेल्या ऐसपैस, लांबरुंद अशा असल्यानं कुठेही घसरण्याची, पडण्याची भीती राहत नाही. प्रश्न फक्त दमछाकीचा उरतो.

वृद्ध मंडळींसाठी डोलीची व्यवस्था पूर्वापार तिथं चालत आलेलीय. आज या डोलीसाठी दहा हजार रुपये घेतले जातात. पंचवीसेक वर्षांपूर्वी हजार रुपये आकारले जात होते. हा दर अव्वाच्या सव्वा आधी वाटतो. पण आपण यात्रा पूर्ण केल्यावर समजते की डोलीवाले खरोखर त्यांच्या कष्टाचा मोबदला घेतात. त्यांचे हात पाय थकलेत. मोठे आजार आहेत. त्यांनी या यात्रेच्या फंदातच पडू नये.

गिरीनार पर्वतावर सिंहाचाही वावर

सुमारे अडीच हजार पायऱ्यांवर छोटी छोटी देवळं दिसतात. इथं जैनांचीही मंदिरं आहेत आणि पहिलं तीर्थावर नेदीनाथ यांचंही मंदिर दिसतं. इथली शिल्पं अप्रतिम आहेत. एवढ्या दुर्लक्षित ठिकाणी ही शिल्पे कशी घडवली असतील याचं आश्चर्य वाटतं. चार हजार पायऱ्यांनंतर भव्य जैन मंदिर लागतं. 

पाच हजार पायऱ्यानंतर अंबा मंदिर आहे. हे मंदिरही भव्य आहे आणि वास्तू कलेचा नमुना आहे. बरेच पर्यटक इथं विश्रांती घेतात. साडेपाच हजार पायऱ्या झाल्यावर गोरखनाथ यांचं स्थान लागतं. नाथ संप्रदाय हा दत्तगुरूंचा गोतावळा समजला जातो. गोरखनाथांनी इथंच आपल्या भक्तांना प्रबोधन केल्याचं बोललं जातं.

आपण दहा हजार पायऱ्या पादाक्रांत करतो तेव्हा एक छोटा चौथरा दिसतो. या ठिकाणी मधोमध दत्तगुरूंच्या पावलाचे ठसे आहेत. आम्ही गेलो होतो तेव्हा हा चौथरा पूर्ण उघडा होता. आता आजूबाजूला बांधकाम झालंय. इथं झेंडा फडकावत ठेवला आहे. या टोकावरून संपूर्ण गिरनारचं दर्शन होतं. सुप्रसिद्ध गीर जंगल इथंच आहे. यामुळे या गिरनारवर अधनंमधनं सिंहाचा वावरही होत असतो.

हेही वाचा : अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

दहा हजार पायऱ्या चढण्याचं बळ श्रद्धेमुळे मिळतं

एकदा का गुरुपाद दर्शन घेतलं की सगळा थकवा दूर होतो. इथं दिलं जाणारं पाणीसुद्धा गोड लागते. मन प्रसन्न होतं. ते ठिकाण नक्कीच तपसाधनेसाठी योग्य असल्याचं मनोमन जाणवतं. सुमारे दहा ते सात तास आपल्याला दहा हजार पायऱ्या चढायला लागतात. साधारण दहा वाजल्यानंतर सूर्याचा ताप वाढतो आणि गोरखनाथ ते पुढचा अंतिम टप्पा असलेला डोंगर हा जरा सरळ असल्याने चालताना अधिकच दमछाक होते.

काही वर्षापूर्वी इथं कसलीही सोय नव्हती. पाणी, ताक, सरबत असला दुकानंही जवळपास नव्हती. आता मात्र बऱ्याच सोयी झाल्यात. दुकानं आहेत, मुख्य म्हणजे इथं निवास करणाऱ्या साधुमुनींनी आश्रम बांधलेत आणि तिथं अव्याहत अन्नछत्र सुरु असतं. एवढ्या कठीण ठिकाणी खाण्यापिण्याची सोय करणं खरंच पुण्याचं काम म्हणावं लागेल.

पर्वत उतरतेवेळी एवढा थकवा जाणवत नाही. खूपच कमी वेळात पहिल्या पायरीला येतो. खाली उतरेपर्यंत दुपार टळून गेलेली असते. पण एकदा का आपण खाली उतरलो की जाणवतं खरंच ही यात्रा केवढी कठीण होती. आपल्या इच्छेला दैवी शक्तीचं पाठबळ लाभल्यानेच ती पूर्ण झाली असावी असा समाधानाचा अनुभव नक्कीच येतो. नेहमी गिरीभ्रमण करणाऱ्यांनी जरूर एकदा तरी गिरनारला जायला हरकत नाही. आता तर बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. सोयी झाल्यात. आजही इथं बरेच साधू तप करायच्या इच्छेनं इथं राहतात, असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष गुरुदत्तांनी जिथे दीर्घकाळ वास केला तिथं भक्तीचा मळा फुलणारच हे काय सांगायला हवं.

हेही वाचा : 

शिवाजी पार्कवर निळा समुद्र भरून आला होता तेव्हा

स्वतःशी संवाद साधण्यासाठी करावं हरतालिकेचं व्रत

दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट

घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण