हे भारतीय मतदारा, सलाम तुझ्या शहाणपणाला

१३ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


पाच राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालाने सत्तेचा तराजू पुन्हा एकदा समतोल झालाय. भाजपच्या सतत विजयामुळे आणि त्यातून जन्मलेल्या उन्मादामुळे तो अगदीच उजवी झुकला होता. काँग्रेसला हिंदी हार्टलँडमधेच खणखणीत विजय देऊन भारतीय मतदारांनी आपल्या शहाणपणाची कमाल पुन्हा एकदा दाखवून दिलीय. 

११ डिसेंबर. विधानसभा निकालांचा दिवस. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचाही पहिला दिवस. पार्लमेंट हाऊस. टीवी कॅमेरांची रांग उभी. त्याच्यासमोर नेहमीसारखीच बूम माईकांचीही रांग. त्यासमोर पुढारी येणार, प्रश्नांची उत्तरं देणार. ही पत्रकारांसाठी नेहमीचीच गोष्ट. पण अचानक एक नवी गोष्ट घडली. गाडीतून उतरून संसद भवनात शिरण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेरांच्या दिशेने चालू लागले.

ते आले. साडेचार वर्षांत पहिल्यांदाच संसद भवनातल्या कॅमेरांसमोर उभे राहिले. बोलले, `तुमचंही स्वागत आहे. चर्चा व्हायला हवी. संवाद व्हायला हवा. निवडणूक जवळ आलीय, त्यामुळे सभागृहात भरपूर काम व्हायला हवं.` २०१४ला निवडून आल्यानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरवातीला बोलायला हवं, ते आता शेवटच्या अधिवेशनात बोलायला उभे राहिले. 

पत्रकारांच्या खुल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची हिंमत पंतप्रधानांच्या ५६ इंची छातीत कधीच नव्हती. त्यामुळे ते त्यांना हवं ते बोलून प्रश्नांना पाठ दाखवत निघून गेले. पण हेही नसे थोडके. साडेचार वर्षांत पहिल्यांदा मोदींचं विमान जमिनीवर आल्याचं पत्रकार बघत होते, आणि टीवीवरून भारतीय मतदारही. ते काम या त्यांनीच पार पाडलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत भाजपचं काही खरं नाही, याचा अंदाज मोदींच्या या सौम्य सुराने सकाळीच आला होता.

प्रत्यक्षात झालंही तसंच. तेलंगणा आणि मिझोरामबरोबरच छत्तीसगढमधेही भाजपचा निकाल लागला. राजस्थानमधे काँग्रेसला एक्झिट पोल सांगत होते, तितकं यश मिळालं नाही. पण बहुमताचा आकडा गाठला. मध्यप्रदेशात रात्री उशिरापर्यंत रस्सीखेच सुरू होती. तरी तिथेही काँग्रेस भाजपच्या पुढेच गेली. ही लोकसभेची सेमीफायनल होती. ती काँग्रेसने जिंकलीय. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपने १७ पैकी १ जागा जिंकली होती. ती पुढच्या वर्षी हरली तरी फारसा फरक पडत नाही. मिझोरामची एक सीट काँग्रेसकडून मिझो नॅशनल फ्रंटकडे जाऊ शकते. प्रश्न मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांचा आहे. साडेचार वर्षांपूर्वी राजस्थानमधल्या खासदारकीच्या २५ च्या २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मध्यप्रदेशात २९ जागा आहेत. त्यापैकी कमलनाथ यांची छिंदवाडा आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची गुणा या दोनच जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. छत्तीसगढमधे ११ जागा आहेत. त्यापैकी अवघी १ काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रमुख ताम्रध्वज साहू यांनी जिंकली होती. 

या तीन राज्यांतल्या ६५ जागांपैकी ६२ जागांवर भाजपचे खासदार आहेत. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. लोकसभेत मतदार मोदींकडे बघून मतदान करतीलही. तरीदेखील भाजपचा आकडा खाली येणारच. या तिन्ही राज्यांत आता काँग्रेसचं सरकार असेल. वाईटात वाईट आणि बहुमत नसलेल्या नवीन सरकारचाही हनीमून किमान दोन वर्षं तरी टिकतोच. इथे तर अगदी नव्याने नऊ दिवसही सरले नसणार. त्यामुळे एप्रिल मे मधे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांत या तिन्ही राज्यांत काँग्रेसला पूर्वीपेक्षा जास्त सीट मिळतील, हे स्पष्ट आहेच. 

हे भाजपला परवडणारं नाही. दक्षिणेत भाजपचं फारसं काही चालत नाही, हे तेलंगणाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. थोडीफार कर्नाटकात पुण्याई आहे. पण तिथेही काँग्रेस आणि देवेगौडांच्या युतीसमोर भाजपची डाळ शिजणं कठीण आहे. तिथल्या पोटनिवडणुकांनी ते दाखवून दिलंच आहे. अशावेळेस भाजपची सगळी मदार हिंदीभाषक राज्यांवरच आहे. तिथेही फटका बसला तर लोकसभा निवडणुकीत भाजपची परिस्थिती बिकट होऊ शकते. मोदींना हे माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या अहंकाराची जागा अचानक नम्रतेने घेतलीय. आजवर फक्त आपल्याच मन की बात सांगणारे मोदी संवादाची भाषा करू लागलेत. 

मोदींनी पंतप्रधान बनल्यावर पहिल्यांदा संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोकं टेकवून नमस्कार केला होता. नंतर मात्र विरोधकांची भाषणं त्यांनी सभागृहात हजर राहून ऐकली नाहीत. आपल्याला हवं ते बेदरकार बोलत राहिले. विरोधकांना टोचून टोचून खाऊ लागले. अच्छे दिनचं आश्वासन देत ते सत्तेवर आले होते. नोटाबंदीच्या अपयशानंतर ते आपल्या जुन्या ट्रॅकवर आले. मनमोहन सिंगांना देशद्रोही ठरवण्यापासून सोनिया गांधींना काँग्रेस की विधवा म्हणेपर्यंत त्यांचा दर्जा ढेपाळला. आत्मविश्वास गमावल्याची ती लक्षणं होती. 

पराभवाला घाबरणारे कायम जिंकू शकत नाहीत. पराभव हसत हसत स्वीकारणारेच ते करू शकतात. काहीही करून जिंकण्याच्या नादात मोदींनी विश्वासार्हता गमवायला सुरवात केली. हे सारं वास्तव ना ते स्वीकारायला तयार आहेत, ना त्यांचे भक्त. पाकिस्तान, गोहत्या, लव जिहाद, सर्जिकल स्ट्राईक, जेएनयू, सरदारांचा पुतळा, राम मंदिर, हनुमानाची जात हे त्यांचे मुद्दे होते आणि आहेत. त्यांना नेहरू आणि त्यांच्या घराण्याचा बदला घ्यायचाय जणू, अशी भाषा पंतप्रधानाला शोभत नाही. 

हे सारं भयंकर आहे. पण मोदींच्या भक्तांना या सगळ्यात त्यांची मर्दानगी दिसते. तेच देशाचे उद्धारकर्ते आहेत, अशी त्यांना खात्री आहे. ते विष्णूचे अवतार आहेत म्हणे. मोदींनी उद्धार करावा इतका ना आपला देश स्वस्त झालाय, ना विष्णूचे अवतार. काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी लोकांनी मोदींना आणलं. तो त्यांच्या तेव्हाच्या शहाणपणाचा निर्णय होता. आता ते मोदींना त्यांची जागा दाखवून देत आहेत. तर तोही तितक्याच शहाणपणाचा निर्णय आहे. 

काँग्रेसने हुरळून जावं, असे हे विजय नाहीत. त्यांनी पूर्वीचीच थेरं करायला सुरवात केली, तर त्यांना लोळवायला भारतीय मतदार कमी करणार नाहीत. मोदींच्या द्वेषाला राहुल गांधी प्रेमानं उत्तर देत आहेत. मोदींच्या अरेरावीसमोर राहुल यांची नम्रता उठून दिसतेय. त्यामुळे पप्पू पास झालाय. पण सहामाहीत. वार्षिक परीक्षा अजून बाकी आहे. २०१९च्या निवडणुकीत ना भाजप जिंकलं, तरी तो शहाणपणाच असेल. काँग्रेस जिंकलं तरी शहाणपणा असेल. कुणालाही पूर्ण बहुमत मिळालं नाही, तरीही तो मतदारांचा शहाणपणाच असेल. त्यावर विश्वास ठेवायला हवा. 

आपल्या देशातल्या थोर्थोर विचारवंतांपेक्षा, लोकांपासून तुटलेल्या अभ्यासकांपेक्षा आणि टीवीवरच्या टीवीपुरत्या विद्वानांपेक्षाही भारतीय मतदार अधिक शहाणे आहेतच. त्यांनी आपलं शहाणपण आजवर अनेकदा सिद्ध केलंय. कितीही भयंकर घडलं तरी युरोप अमेरिकेतल्या लोकांसारखे ते रस्त्यावर उतरत नाहीत. 

इथली लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ आहे. इथे मतदार आहेत. आपला राग ते मतदानासाठी राखून ठेवतात. ते अखलाखच्या, रोहित वेमुलाच्या, गौरी लंकेशच्या, पहलू खानच्या, जस्टिस लोयांच्या मृत्यूने अस्वस्थ असल्याचं कळत नाही. पण ते मतदानाच्या वेळेस त्यांना श्रद्धांजली वाहतात. पण ते समोरच्याला वेळ देतात. त्यांना कार्यकर्त्यांसारखी बदलाची घाई नसते. स्थित्यंतराची वेळ त्याने ठरवलेली असते. 

आजही भारतीय मतदारांनी मोदींना धडा शिकवलेला नाही, फक्त खणखणीत वॉर्निंग  दिलीय. आताही त्याने मोदींना पूर्णपणे नाकारलं नाहीय. पण आता त्यांना बदलावं लागेल. आता ते अधिकच आक्रमक झाले. अधिकच नकारात्मक झाले. जातीच्या, धर्माच्या, द्वेषाच्या नावावर मतं मागायला लागले. तर त्यांची हतबलता समोर येईल. असा हतबल पंतप्रधान नको, म्हणूनच भारतीय मतदारांनी डॉ. मनमोहन सिंगांसारख्या विद्वान सज्जन माणसालाही घरी बसवलं. मोदी विद्वान किंवा सज्जन आहेत, असं त्यांचा कट्टर भक्तही म्हणणार नाही. 

मोदींसाठी अजूनही वेळ गेलेली नाही. भारतीय मतदार मोदींना ओरडून ओरडून सांगतोय, आता तरी सुधारा. ते सुधारले तर त्यांना संधी आहेच. आणखी बिघडले, तर जितक्या वेगाने वर नेलं, तितक्याच वेगाने खाली आपटायलाही भारतीय मतदार मागेपुढे पाहणार नाही. नम्र राहिलात तर यश आहे, अहंकार असेल तर अपयश. 

त्यामुळे शहाणा भारतीय मतदार जो निर्णय देतो, त्याचा स्वतःला शहाण्या समजणाऱ्या विचारवंतांनी सन्मान करायला शिकायला पाहिजे. आपल्याला सोयीचा निकाल आला की भारतीय मतदार प्रगल्भ ठरतो. निकाल विरोधात आला, तर पोरकट. असं चालत नाही. भारतीय मतदार महात्मा गांधींना शिव्या देतो. पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही. पण त्यांनी आणि त्यांच्या पूर्वसुरींनी त्याला त्याच्या नकळत घडवलंय. ते शहाणपण वाया जाणारं नाही. फक्त साध्या माणसांनीच आपाल्या सामुदायिक  शहाणपणावर विश्वास ठेवायला शिकायला पाहिजे. ये पब्लिक हैं, ये सब जानती हैं.