असं झालं अंबाजोगाईचं प्रति साहित्य संमेलन 

१३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजूनही नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचंच सावट आहे. त्याचा निषेध झाला. इतकंच नाही तर अनेक शहरांत निषेधाचे आणि भाषण वाचनाचे कार्यक्रम झाले. गेली अनेक वर्षं शहराचं साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या अंबाजोगाई शहरात तर प्रतिसंमेलनाचं यशस्वी आयोजन झालं. त्याचा हा वृत्तांत.  

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे सुरू आहे. या संमेलनाच्या नियोजित उद्घाटक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका नयनतारा सहगल यांना येऊ नये असा मेल आयोजकांनी पाठवला. अपेक्षेप्रमाणे साहित्य, कला, पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली. सर्वच स्तरातून याचा जबरदस्त विरोध झाला. ही चीड आणणरी ही घटना होती. इंग्रजी भाषेच्या लेखिका आहेत म्हणून विरोध, असं वरवर भासणारं प्रकरण तितकं सोपं नव्हतं.

असं ठरलं प्रतिसंमेलन

तोपर्यंत सहगल यांचं भाषण सोशल मीडियावर वायरल झालं. त्यामुळे निमंत्रित कवी, वक्ते आणि इतरांनी बहिष्कार केला. कारण तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न होता. निषेध म्हणून सहगल यांच्या भाषणाचं जाहीर वाचन अनेक ठिकाणी झालं. प्रतिसंमेलनाच्या घोषणा ठिकठिकाणी झाल्या. साहित्यप्रेमींनी वेगवेगळ्या भागात प्रतिसंमेलनं घेऊन सहगल यांचं भाषण वाचण्याचे कार्यक्रम घेतले.

अंबाजोगाईला सहगल यांचं उद्घाटकीय भाषण सन्मानपूर्वक वाचलं जाईल आणि प्रतिसंमेलन घेऊ, अशी औपचारिक घोषणाच मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य दगडू लोमटे यांनी जाहीर केली. त्याला अंबाजोगाईची मसाप शाखा, अक्षर मानवची अंबाजोगाई शाखा आणि मानवलोक मनस्विनी प्रकल्प यांनी संयुक्तपणे प्रतिसंमेलन घेण्याचं ठरवलं. त्यात ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ तिवारी आणि अमर हबीब, परिसंवादावर बहिष्कार घातलेले नियोजित वक्ते बालाजी सुतार, दगडू लोमटे, प्रा. शैलजा बरूरे, प्रा. अरूधंती पाटील आणि मुजीब काजी हे नियोजित वक्ते ठरले.

११ जानेवारीला संध्याकाळी विलासराव देशमुख सभागृहात हे प्रतिसंमेलन भरलं. प्रा. अरूधंती पाटील यांनी नयनतारा सहगल यांचे भाषण वाचून दाखवले. त्यानंतर वक्त्यांची भाषणं आणि उपस्थितांची प्रतिक्रिया असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं. दगडू लोमटे प्रास्ताविकात घटनेचा क्रम सांगून सहगल यांचा अपमान ही महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतीच्या परंपरेचा अपमान करणारी घटना असल्याचं सांगितलं.

निमंत्रण वापसी संस्कृती, धर्माच्याही विरोधीः प्रा. रंगनाथ तिवारी

प्रा, रंगनाथ तिवारी हे प्रसिद्ध साहित्यिक आणि ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेत. त्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश आहे. देवगिरी बिलावल, बेगम समरू, गुरुदेव या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्यात. अनेक पुरस्कारांनी सन्मानित आणि मराठवाड्याच्या सांस्कृतिक विश्वावर आपल्या सात्त्विक परखडपणाचा प्रभाव असणाऱ्या तिवारी सरांनी मांडलेल्या मनोगतातले हे काही मुद्देः

परखड मत मांडणार्‍या नयनतारा सहगल यांना संमेलनाचं निमंत्रण नाकारणं, हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण जोपासतो अशा स्थितीत झालेला हा प्रकार निंदनीय असून सत्य स्वीकारता आलं पाहिजे.  

सत्तेच्या बळावर लोकांना हतबल करू नका. दुराग्रह आणि झुंडशाही पुढे कातडी बचाऊपणा न करता व्यवस्थेच्या विरूद्ध ठामपणे उभं राहिलं पाहिजे.

नयनतारा यांच्या पाठीशी त्यांचे बांधव ठामपणे उभे आहेत. ते अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाकारणार नाहीत. समाजातील वाढती निर्भयताच झुंडशाहीला आव्हान देईल. जातधर्माच्या नावावर जी अडवणूक सुरू आहे,  त्याविरूद्ध सामूहिकपणे आवाज उठवला पाहिजे. कोणताही धर्म मानवतेची शिकवण देतो. तुम्ही धर्म पाळता, तर मग मानवता का सोडता?

कुणाचंही अस्तित्व पुसता येत नाहीः बालाजी सुतार

प्रसिद्ध कवी आणि ललित लेखक बालाजी सुतार हे एका परिसंवादासाठी वक्ते म्हणून यवतमाळच्या साहित्य संमेलनात आमंत्रित होते. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. निमंत्रण वापसीनंतर त्यांनी लगेचच बहिष्काराची घोषणा फेसबूकवरून केली. त्यानंतर एकामागून एक बहिष्काराच्या घोषणा होत राहिल्या. ते म्हणाले,

कुणाचंही अस्तित्व सहज पुसता येत नाही. हाच प्रकार सहगल यांना निमंत्रण नाकारून साध्य करण्याचा प्रकार झाला. या घटनेचा निषेध म्हणून आपण यवतमाळ येथील संमेलनातील परिसंवादाचे निमंत्रण नाकारलं. माणसाला बोलू न देणारी यंत्रणा कुचकामी ठरते. राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती ही संकल्पना मोडीत निघत आहे.

प्रा. शैलजा बरुरे म्हणाल्या, सत्य दडपण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. असे सांगुन राष्ट्रपुरुषांचा द्वेष करण्याची भावना दिवसेंदिवस वाढीला लागलीय. नेहरू आणि गांधी यांना खलनायक ठरवणारे लोक समाजासाठी घातक आहेत. नयनतारा यांना पाठबळ देण्यासाठी सगळ्या साहित्यिकांनी मिळून आपला आवाज उठवला पाहिजे.

संमेलनं लोकाश्रितच असायला हवीतः अमर हबीब

आणीबाणीच्या विरोधात तुरुंगवास भोगलेले पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते  अमर हबीर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. शेती प्रश्नाचे अभ्यासक, शेतकरी नेते म्हणून त्यांनी सुरू केलेलं किसानपुत्र आंदोलन सध्या महाराष्ट्रभर गाजतंय. सहजसोप्या शैलीतली त्यांची पुस्तकं नाते, कलमा, आकलन ही पुस्तकं लोकप्रिय ठरलीत. त्यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितलं,

संमेलन हे संस्कृतीचं प्रतीक आहे. संस्कृतीत नयनतारा यांना नाकारून संमेलनाने सभ्यता सोडलीय. हा सुरू असलेला प्रकार म्हणजे आणीबाणीशी साधर्म्य आहे. संमेलन म्हणजे पैसा, ही अपप्रवृत्ती बळावत चालली आहे. यातून नालायक लोकांचे वर्चस्व वाढलंय. संमेलनं साधी असली तर अशा अपप्रवृत्तींचा शिरकाव वाढणार नाही.

संमेलनं लोकाश्रित झाली पाहिजेत. तरच संमेलनातील विकृती दूर होईल. साहित्य चळवळ भरकटत चालली असून सामान्य माणसांचा आवाज त्यांना दाबता येणार नाही. समाजात स्त्री, शेतकरी, कलावंत आणि साहित्यिक यांना गृहित धरलं जातं. सत्तेची ही विचारधारा निषेधार्ह आहे.

प्रतिसंमेलनात झालेला ठराव असा,

यवतमाळ येथे होत असलेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून विख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण दिल्यानंतर त्यांचं भाषण पाहून त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. ही घटना सभ्यतेला धरून नाही. या असभ्यतेचा आम्ही जाहीर निषेध करतो.

लोकशाहीत मतभेद असणारच. ते स्वीकारणं हेच लोकशाहीचं लक्षण आहे. परंतु या घटनेत ते तत्व पायदळी तुडविण्यात आलंय.  भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील स्वातंत्र्य सैनिकांनी जी मुल्यं सांभाळली आणि जी आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली, तिची पायमल्ली करण्यात आलीय. म्हणून अंबाजोगाई येथील हे प्रति साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कृतिबद्ध होण्याचा संकल्प करत आहे.

याशिवाय, राजेन्द्र रापतवार, अनिता कांबळे, अमृत महाजन, वीरेंद्र चव्हाण यांनी  प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आभार मुजीब काजी यांनी व्यक्त केले. गेली अनेक वर्षं एका शहराचं साहित्य संमेलन उत्साहाने आणि यशस्वीपणे आयोजित करणाचा आदर्श घालून देणाऱ्या अंबाजोगाईतले अनेक मान्यवर आवर्जून या प्रतिसंमेलनाही उपस्थित होते.