सगळ्या पक्षांना धडे शिकवणारा नगरी निकाल  

११ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


एकीकडे धुळ्यात दणदणीत मिळवत असताना अहमदनगर महानगरपालिकेत मात्र भाजपला यश मिळू शकलं नाही. दुसरीकडे शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यांचाच महापौर असेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. नगरी मतदारांनी सगळ्या पक्षांना धडा शिकवलाय.

महापालिका निवडणुकांमधे शहरी मतदारांचा कौल हा राज्यभरात भाजपच्या बाजुने लागतो, असा ट्रेंड असताना अहमदनगर महापालिकेत मात्र तसं घडलं नाही. अहमदनगरमधे एकूण ६८ जागा आहेत. अंतिम आकडेवारी अशी, शिवसेना २४, राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजप १४, काँग्रेस, ५, बहुजन समाज पार्टी ४, समाजवादी पार्टी १, अपक्ष २. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्या आघाडीचे २३ नगरसेवक पकडायला हवेत. अपक्षांमधे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमचा समावेश आहे. 

सहानुभूतीचा फायदा शिवसेनेला 

भाजपचे शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे भानुदास कोतकर आणि राष्ट्रवादीचे अरुण जगताप यांच्या भावकीच्या राजकारणाला आव्हान दिलं, म्हणून शिवसेनेच्या संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांचा खून झाला. काँग्रेसच्या सहकार क्षेत्रातल्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधामुळेच अहमदनगर शहरात शिवसेनेचं राजकारण टिकून आहे. त्यामुळे केडगाव हत्याकांडाची सहानुभूती मिळवत प्रस्थापितांविरुद्ध रागाचा फायदा मिळवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. अरेला कारे म्हणत शिवसेनेने दिलेला भयमुक्तीचा नारा त्यांना फायद्याचा ठरला. 

माजी आमदार अनिल राठोड यांचं पालिकेच्या राजकारणावर आधीपासूनच नियंत्रण आहे. पण त्यांना अँटी इन्कम्बसीचा फटका बसला नाही. कारण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ते हस्तिदंती मनोऱ्यातून पुन्हा रस्त्यावर उतरलेले दिसले. कार्यकर्त्यांचा बांधणीचा जोरावर त्यांनी विधानसभेची सेमीफायनल समजून निवडणूक लढवली. धुळ्यात अनिल गोटेंच्या नादी लागून दुय्यम स्थान घेण्याची चूक शिवसेनेने इथे केली नाही. अस्तित्वाच्या लढाईत शिवसैनिक मतभेद विसरून इरेला पेटला. त्याचा फायदा शिवसेनेला झाला. थेट उद्धव आणि आदित्य ठाकरेंनाही त्यामुळेच मैदानात उतरावं लागलं. 

देवेंद्र पॅटर्न चालला नाही

महापालिका निवडणुकांत हमखास यशस्वी होण्याचा देवेंद्र फडणवीस पॅटर्न अहमदनगरमधे चालला नाही. भाजपने काँग्रेसमधले हमखास जिंकणारे सिटिंग नगरसेवक फोडले. सत्तेची सगळी ताकद पणाला लावली. आमदार शिवाजी कर्डिले आणि कोतकर एकत्र असल्यामुळे साम दाम दंड भेद यात कमी पडण्याचं कारण नव्हतंच. मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीचं स्वप्नं दाखवलं. त्यालाही नगरकर भुललं नाही. 

खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात मतदारांत राग असल्याचं स्पष्ट झालं. त्यांचा मुलगा आणि सून यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या पक्षांतून आयात केलेल्या नेत्यांच्या जिवावर भाजपचं राजकारण दीर्घकाळ चालू शकत नाही का, असा प्रश्न अहमदनगरच्या निकालांना उभा केलाय. आतापर्यंतच्या रितीनुसार भाजप शिवसेनेला पाठिंबा देते की कर्डिलेंच्या भावकीला बळी पडून राष्ट्रवादीच्या सोबत जाते, यावर अहमदनगरच्या राजकारणाची पुढची दिशा ठरू शकेल. 

राष्ट्रवादी स्पर्धेत, काँग्रेस सपाट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगरमधे आपली ताकद सिद्ध केलीय. त्यांची हक्काची पारंपरिक मराठा मतं त्यांनी हातातून निसटू दिली नाहीत. केडगाव हत्याकांडांत तुरुंगात जावं लागूनही त्यांनी संपर्क आणि सत्तेच्या जोरावर बऱ्यापैकी टोटल गाठलीय. १८ नगरसेवकांच्या जोरावर राष्ट्रवादी अजूनही महापौरपदाच्या शर्यतीत आहे. काँग्रेसशी युती करण्याचा निर्णय राष्ट्रवादीसाठी शहाणपणाचा ठरला.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपने नगरसेवक फोडल्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली ती पुढे येऊच शकली नाही. देशभरातल्या शहरी मतदारांशी काँग्रेसचा कनेक्टच संपलाय का, असा प्रश्न वारंवार उभा राहतोय. शिवाय दलित आणि मुस्लिम हे काँग्रेसचे परंपरागत मतदार काँग्रेसकडे पुन्हा एकदा वळत आहेत, असे मागचे काही महापालिकांचे निकाल सांगत होते. पण काँग्रेस भाजपच्या स्पर्धेत नसेल, तर हे समाजगट बसपा किंवा सपालाही स्वीकारायला तयार आहेत, असा या निवडणुकांचा अर्थ आहे. 

आता काय होऊ शकतं? 

शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर अशी परंपरागत सेटिंग अहमदनगरमधे आहेच. ती दोघांच्याही सोयीची आहे. तसे संकेत दोघांनीही दिले आहेत. 

पण कर्डिले, कोतकर, जगताप हे व्याही एकत्र आले तर राष्ट्रवादी आणि भाजप अशी विचित्र युती होऊ शकते. त्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शिवसेनेला राष्ट्रवादी समर्थन देऊ शकते,  अहमदनगरच्या वाकड्या राजकारणात काहीही अशक्य नाही. पण संग्राम जगताप आणि अनिल राठोड हे विधानसभा निवडणुकांतले प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्याची शक्यता कमी आहे.

अयोध्येसारखा मुद्दा हाती घेतला तर पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारसंघात फायदा होतो, असा निष्कर्ष शिवसेनेने काढला तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळे यापुढे ते भाजपला अडचणीत आणण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमकपणे उतरू शकतात.

शिवछत्रपतींचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम विजयी झालाय. त्याची पत्नी मात्र पराभूत झालीय. राज्यभर तो तिरस्काराचा धनी आहे. पण त्याच्या पद्मशाली समाजाच्या मतदारांनी त्याला स्वीकारलंय. हे जातींचं ध्रुवीकरण राजकारणात अशक्य गोष्टी घडवू शकतं, हे यातून स्पष्ट झालंय. 

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्यावरची नाराजी या निकालांनी सिद्ध केलीय. त्यांच्या विरोधातली पक्षांतर्गत मोहीम तीव्र होऊ शकते. 

दुसरीकडे विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याने अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी आपला क्लेम केलाय. काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या हक्काच्या जागेवर विखे कोणत्या आधारावर दावा करतात, ते पाहावं लागेल. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसपा, शेतकरी संघटना, सपा, रिपब्लिकन, कम्युनिस्ट अशा सगळ्यांनाच सोबत घेऊन लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, हे या निकालांनी दाखवून दिलंय. त्याआधी काँग्रेसमधल्या गटातटांनी आपल्यातली भांडणं संपवायला लागतील.