७ डिसेंबरः आजचा इतिहास

०७ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ७ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

चळवळा भाषातज्ञ नोम चोम्स्की (जन्म १९२८)

प्रत्येक अर्थपूर्ण वाक्य केवळ आपल्या भाषेतल्या नियमांचंच नाही तर सगळ्याच भाषांसाठी लागू असलेल्या ग्लोबल व्याकरणाचेही पालन करतं. नोम चोम्स्की यांच्या या वाक्याने १९५६ मधे त्यांनी केलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. आज नव्वदी पार पोचलेले एवराम नोम चोम्स्की हे भाषातज्ञ, राजकीय कार्यकर्ते, इतिहासकार, लेखक म्हणून ओळखले जातात. १९५५ मधे अमेरिकेच्या एमआयटीत चोम्स्की भाषाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून जॉइन झाले. तिथेच त्यांच्या कारकिर्दीला नवं वळण मिळालं.

शिकला सवरलेला माणूस राजकारणापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी धडपडतो. याउलट चोम्स्की हे राजकारणात सक्रीय राहून हिरहिरीने सहभाग घेतात. माणसाचा इतिहास समजून घेण्यासाठी विज्ञानाची समज असणं आवश्यक आहे, असं सांगणाऱ्या चोम्स्की यांनी विएतनामवरच्या अमेरिकी आक्रमणाला त्यांनी उघडउघड विरोध केला. एवढंच नाही तर १९६७ मधे पेंटागॉनविरोधी प्रसिद्ध मार्चच्या आयोजनातही पुढाकार घेतला. यासाठी त्यांना तुरुंगातही डांबण्यात आलं. जगभरातल्या नावाजलेल्या युनिवर्सिटींनी त्यांना मानद पदव्या दिल्या आहेत.

६५ च्या युद्धाचे नायक डेंजिल किलोर (जन्म १९३३)

भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर मार्शल डेंजिल किलोर यांचा आज ८५ वा जन्मदिवस आहे. त्यांना १९६५ मधे झालेल्या भारत पाक युद्धाचे नायक म्हणून ओळखलं जातं. हवाई दलातल्या योगदानासाठी वीर चक्र, परम विशिष्ट सेवा मेडल, कीर्ती चक्र आणि अति विशिष्ट सेवा मेडल सह अनेक सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलंय. लखनऊमधे जन्मलेले किलोर २१ व्या वर्षीच इंडियन एअर फोर्समधे भरती झाले. एअर फोर्समधे ३७ वर्षे सेवा केल्यानंतर १९९१ मधे ते रिटायर झाले. सध्या ते 'स्पेशल ऑलिंम्पिक' स्पर्धेत अपंगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या संघटनेचे संस्थापक ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत.

अक्षर स्वामिनारायण प्रमुखस्वामी महाराज (जन्म १९२१)

आज गुजरातमधल्या स्वामिनारायण संप्रदायाचा प्रभाव आणि प्रसार जगभर झालाय, त्याचं प्रमुख श्रेय प्रमुखस्वामी महाराजांना जातं. त्यांचं मूळ नाव शांतिलाल पटेल असं होतं. ते बाप्स म्हणजे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था या उपपंथाचे पाचवे प्रमुख होते. त्यांनी या जुन्या संप्रदायाला आधुनिक रूप दिलं. कर्मकांडाला चाट देऊन सोपी भक्ती समजावली. नितळ आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाने लाखो लोकांचं जगणं अधिक सुंदर केलं. जगभरात जवळपास ११०० देवळं बांधली. त्यातली अवाढव्य आणि सुंदर अक्षरधाम मंदिरं प्रसिद्ध झाली. विविध धर्म आणि संप्रदायात परस्पर आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांचा प्रभाव होता. १३ ऑगस्ट २०१६ला त्यांचं निधन झालं.

नाटकांमधले शोमन मोहन वाघ (जन्म १९२९)

हिंदी सिनेजगतात सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून करिअरची सुरवात करणारे मोहन वाघ हे नाटकांच्या प्रेमापोटी नेपथ्य, नाट्यदिग्दर्शन आणि नाट्यनिर्मिती यात आले. चंद्रलेखा या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमीवर आणली. दरवर्षी ३१ डिसेंबरला ते नवं नाटक आणायचे. त्यांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले. रणांगण, स्वामी, गरुडझेप, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटकं तुफान गाजली. प्रत्येक नाटक दर्जेदार असायला हवं, यासाठी ते आग्रही होते. कधी शनिवारवाड्यासमोर तर कधी अमेरिकेत नाटक सादर करण्याचे प्रयोग त्यांनी केले.  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई. त्यांचं निधन २४ मार्च २०१०ला झालं.

कार्यकर्ता अॅक्टर विनय आपटे (निधन २०१३)

भारदस्त आवाजासाठी ओळखले जाणारे अॅक्टर विनय आपटे यांचा आज स्मृतिदिवस. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत असतानाच ते रंगभूमीवर आले. सुरवातीच्या काळातच राज्य नाट्य स्पर्धेत ‘मेन विदाऊट शॅडो’ या नाटकातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक, नाट्यनिर्माते आणि नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक डॉक्युमेंट्री, जाहिरातींना बोलतं केलं. अनेकांना त्यांना व्यावसायिक नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी संधी मिळवून दिली. ‘मी नथुराम बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. टीवी सीरियलसोबतच त्यांनी गांधी, आरक्षण, जोगवा, सत्याग्रह, चांदनी बार, धमाल, आंदोलन यासारख्या सिनेमांतही काम केलं. भाजपच्या प्रदेश सांस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केलं.