४ डिसेंबरः आजचा इतिहास

०४ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ४ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

जन्मशताब्दीची सुरवात इंद्रकुमार गुजराल (जन्म १९१९)

कवीमनाचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होत आहे. शेजारच्या देशांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी व्यापाराची मदत घेण्याचं त्यांचं धोरण गुजराल डॉक्ट्रीन म्हणून प्रसिद्ध आहे. इंदिरा गांधीचे विश्वासू असलेल्या गुजराल यांनी संजय गांधींसोबतच्या मतभेदांमुळे काँग्रेस सोडली. आणीबाणीत माहिती प्रसारण मंत्री असलेल्या गुजराल यांनी दूरदर्शन, आकाशवाणीचे न्यूज बुलेटीन पंतप्रधान इंदिरा गांधीना दाखवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यांकडून हे खातंच काढून घेण्यात आलं. पुढे १९९७ मधे गुजराल जनता दलाकडून पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या हत्येस डीएमके जबाबदार असल्याचा अहवाल जैन आयोगाने दिला. डीएमकेच्या सदस्यांना मंत्रिमंडळातून न हटवल्यामुळे काँग्रेसनं पाठिंबा काढल्यामुळे त्यांचं सरकार पडलं. 'मॅटर्स ऑफ डिस्क्रिशन' हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. ३० नोव्हेंबर २०१२ मधे त्यांचं निधन झालं.

खमके राष्ट्रपती आर. वेंकटरमण (जन्म १९१०)

देशाचे आठवे राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांचा आज जन्मदिवस. जवळच्या लोकांमधे ते आरवी नावाने ओळखले जायचे. चार पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या आरवींनी तिघांना शपथही दिली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ग्यानी झैलसिंग यांचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींसोबत खटके उडायचे. त्यामुळे चार वर्षे उपराष्ट्रपती असलेल्या आरवींना राजीव यांनी राष्ट्रपतीचा उमेदवार केले. पण आरवी यांनीही ‘माय प्रेसिडेंशियल इयर्स’ लिहून बोफोर्स प्रकरण राजीव गांधींच्या कार्यक्षमतेमुळे चिघळल्याचं म्हटल्याने त्यावेळी खूपच खळबळ उडाली होती. वी. पी. सिंह, चंद्रशेखर आणि पी. वी. नरसिंह राव यांना आरवींनी पंतप्रधानपदाची शपथ दिली. २५ जुलै १९८७ ते जुलै १९९२ पर्यंत ते राष्ट्रपती होते. तामिळनाडूत जन्मलेल्या आरवींचं २७ जानेवारी २००९ ला दीर्घ आजाराने निधन झालं.

भारताचे इतिहासकार डॉ. आर. सी. मुजुमदार (जन्म १८८८)

ताजमहल नव्हे तेजोमहल असा बोगस आणि द्वेषपूर्ण इतिहास लिहिणाऱ्या पु. ना. ओकांचा स्मृतिदिन आज साजरा करणाऱ्या बहुतेकांना उजव्या राष्ट्रवादी इतिहासलेखनातील खरे मानदंड असणाऱ्या डॉ. रमेशचंद्र म्हणजेच आर. सी. मुजुमदारांचा जन्मदिन आजच असतो याची कल्पना नसतेच. आज त्यांचा १३० वा जन्मदिन. इतिहासाची भारतीय दृष्टिकोनातून मांडणी करण्याचं श्रेय त्यांना जातं. पण त्यासाठी त्यांनी केवळ फुशारक्या न मारता प्रचंड अभ्यास केला. पुरावे शोधले. भारतीय विद्या भवनसाठी त्यांनी ११ जाडजूड खंडांत वैभवशाली भारतीय इतिहासाची सविस्तर मांडणी केली. बंगालचा इतिहासही नव्याने लिहिला. ढाका युनिवर्सिटीचे कुलगुरू, बनारस हिंदू युनिवर्सिटी आणि नागपूरच्या इंडॉलॉजी कॉलेजचे प्रिंसिपल म्हणून त्यांचं काम गाजलं. 

बूगी वूगी जावेद जाफ्री (जन्म १९६३)

सुरमई भोपाली जगदीपच्या चेहऱ्यावरच अतरंगीपणा दिसायचा. त्याच्या पोरगा जावेद बापसे सवाई निघाला. मेरी जंगमधे बोल बेबी बोल म्हणत आला तेव्हा मात्र तो कॉमेडीपेक्षाही डान्समधेच रमणारा वाटला. तसा तो रमलाही. त्यामुळेच बूगी वूगी या टीवीवरच्या पहिल्या डान्स शोचा सर्वेसर्वा तोच होता. त्या शोने पर्यायाने जावेदने आजपर्यंतची डान्सची क्रांती केली. 

पण तेवढीच त्याची ओळख नाही. वीडियो जॉकी, वॉइस ओवर, कार्टून फिल्म, अनिमेशन अशा काळाच्या पुढच्या कामांची भारतातली पायाभरणी तो करत राहिला. धमाल, सलाम नमस्तेसारख्या सिनेमांमधे तो लक्षात राहिला. इन्शाल्ला फूटबॉलसारख्या उत्तम डॉक्युमेंट्रीचा निर्माता बनला. कट्टर धार्मिकतेच्या विरोधात त्याने उघडपणे भूमिका घेतली. आपकडून निवडणूक लढून तो हरला. प्रचंड गुणवत्ता असणारा जावेद मळलेल्या वाटेवरून मात्र कधी चालला नाही.  

टॅलेंटचं आगर अजित आगरकर (जन्म १९७७)

आज भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना २००३च्या अॅडलेड टेस्टमधली अजित आगरकरची बॉलिंग आठवावीच लागते. ४१ रन देऊन ६ विकेट घेणाऱ्या अजितने ऑस्ट्रेलियात भारताला जिंकून दिलं होतं. त्या काळात भारतीय क्रिकेट टीम फॉर्ममधे होती आणि अजित आगरकरही. 

अजित आगरकर शिवाजी पार्कचा खेळाडू. सचिन तेंडुलकरसारखाच रमाकांत आचरेकरांचा चेला. तो वनडेमधे भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमधे तो आजही तिसऱ्या नंबरला आहे. त्याने लॉर्डसवर सेंचुरी ठोकलीय. खरं तर ग्रेट बनण्यासाठीची गुणवत्ता त्याच्यात होती. पण तो ग्रेट ठरू शकला नाही. पण त्याच्या टॅलेंटची चमक अधूनमधून कायम दिसत राहिली. आज त्याच्या वाढदिवशी आपण त्याची ती चमकदार कामगिरी आठवू शकतो.