३१ ऑक्टोबर : आजचा इतिहास

३१ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३१ ऑक्टोबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या ५ गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याशी जवळच्या असणाऱ्या. इंदिरा गांधी, सी. के. नायडू, जी. माधवन नायर, एसडी बर्मन आणि अमृता प्रीतम यांच्याविषयीच्या.

आयर्न लेडी इंदिरा गांधी (हत्या १९८४)

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आजच्या दिवशी हत्या झाली होती. आज त्यांची ३४ वी पुण्यतिथी. घरातूनच राजकारणाचा वारसा मिळालेल्या इंदिरानी १९३० मधे लहान मुलांची ‘वानरसेना’ स्थापून स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. सुरवातीला राज्यसभा सदस्य असणाऱ्या इंदिराबाईंनी माहिती प्रसारण, अणुऊर्जा, परराष्ट्र मंत्रालय यासारखी महत्वाची खाती सांभाळली. १९७१ ला राजकारणातील कामगिरीसाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. १९७५ ला देशात आणीबाणी लागू करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. पोखरण अणुचाचणी त्यांच्याच काळात झाली. त्यांनी पंजाबमधील खलिस्तानवादी शक्तींना मोडून काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं. भारतीय सैनिकांनी सुवर्णमंदिरात घुसून दहशतवादाची पाळंमुळं उखडून काढली. मात्र, पुढं त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

पहिले कॅप्टन सी. के. नायडू ( जन्म १८९५)

सी. के. नायडू यांचं पूर्ण नाव कोट्टेरी कंकैया नायडू. नागपूरात जन्मलेल्या नायडूंचा आज जन्मदिन. वयाच्या सातव्या वर्षापासून ते क्रिकेट खेळायचे. १९१६ला त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधे पदार्पण केलं. यामधे २०७ सामन्यांत २६ शतकं आणि ५८ अर्धशतकांच्या मदतीने ११,८२५ रन काढले. ४११ विकेटही मिळवले. भारताने टेस्ट क्रिकेट खेळणारी टीम म्हणून इंग्लंडविरुद्ध पहिली मॅच १९३२ ला खेळली. त्याचे ते कॅप्टन होते. पण त्यांना फक्त सातच इंटरनॅशनल मॅच खेळता आल्या. तरीही ते भारतीय क्रिकेटचे पहिले स्टार होते. त्यांनी भारतीय क्रिकेटचा पाया रचला. १९५६ मधे त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं. असा सन्मान प्राप्त होणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. १४ नोव्हेंबर १९६७ ला त्यांचं मध्य प्रदेशात निधन झालं.

भाजपवासी जी. माधवन नायर (जन्म १९४३)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी आपण भारवल्याचं सांगत नुकत्याच भाजपमधे प्रवेश करणारे इस्त्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांचा आज ७५ वा वाढदिवस. देशाची मान उंचवाणारी कामगिरी इस्रोमधे करूनही अँट्रिक्स प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून काढून टाकलं. पुढे कोर्टाने त्यांना त्यात निर्दोष ठरवलं. परिणामी ते काँग्रेसचे टीकाकार बनले. त्यामुळे त्यांचा भाजपच्या दिशेने प्रवास नक्की मानला जात होता. मुळात इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानतर त्यांनी भाभा अणूऊर्जा संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेतलं. त्या पदापासून इस्त्रोच्या अध्यक्षपदाबरोबरच ते अंतराळ आयोगाचे सचिव बनले. या ६ वर्षाच्या कार्यकाळात नायर यांनी आपल्या नेतृत्वात २५ मिशन यशस्वी केले. त्यांना १९९८ मधे पद्म भूषण तर २००९ ला पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

एस डी बर्मनः गाता रहें मेरा दिल (मृत्यू १९७५)

माना जनाब ने पुकारा नहीं, तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, जाने वो कैसे लोग थे, मेरे सपनों की रानी, सर जो तेरा चकराये, एक लडकी भीगी भागीसी अशी शेकडो अवीट गोडीची गाणी अजरामर आहेत. त्यामुळे एसडी बर्मन हे नावदेखील. महान संगीतकार एस. डी. बर्मन यांची आज ४३ वी पुण्यतिथी. सचिन देव बर्मन हे त्यांचं पूर्ण नाव. १ ऑक्टोबर १९०६ ला एसडींचा जन्म झाला. टॅक्सी ड्रायव्हर, बाझी, प्यासा, गाईड, पेईंग गेस्ट, चलती का नाम गाडी, कागज के फूल, सुजाता, बंदिनी, ज्वेल थीफ अशा अनेक सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिलं. कधी गुरुदत्तपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेकांशी त्यांच्या संगीताचं नातं जुळलं. सात वेळा फिल्मफेअर, दोन वेळा नॅशनल फिल्म अवॉर्ड, पद्मश्रीने त्यांना सन्मानित केलं होतं.

प्रेमळ बंडखोरीचं नाव अमृता प्रीतम (निधन २००५)

स्वतंत्र होणाऱ्या देशाला मोकळा श्वास घ्यायला शिकवणाऱ्या लेखिका, कादंबरीकार आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा आज स्मृतिदिन. ८६ वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगून त्यांनी ३१ ऑक्टोबर २००५ ला जगाचा निरोप घेतला. अमृता प्रितम यांनी लहानपणापासूनच लिखाणाला सुरवात केली. अमृता प्रीतम यांनी १०० पुस्तकं लिहिली. त्यात त्यांची आत्मकथा ‘रसीदी टिकट’चा समावेश आहे. आजही त्या पंजाबीतल्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्तम साहित्यिक मानल्या जातात. पण त्यांचं साहित्य फक्त पंजाबीपुरतं राहिलं नाही. भारतातल्या सर्व भाषांबरोबरच ते जगभरातल्या भाषांमधे पोचलं. प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमाच्या कहाण्या आज आख्यायिका बनल्या आहेत. त्यांना ‘कागज ते कॅनवास’ या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९६९ पद्मश्री तर २००४ ला पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं.