३१ डिसेंबर: आजचा इतिहास

३१ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ३१ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

बंडखोर प्रतिभावंत मल्लिकार्जुन मन्सूर (जन्म १९१०)

लोकप्रिय संगीतही दर्जेदार असू शकतं हे आपल्या प्रतिभावान गायकीने दाखवून देणारे पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मानदंड उभा केलाय. ग्वाल्हेर घ्राणाच्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे त्यांनी संगीत शिकायला सुरवात केली. पण मुंबईत आल्यानंतर जयपूर घराण्याचे अलल्लादियां खांसाहेब आणि मंजीखां यांच्या बंडखोर गायकीने त्यांना घराण्यांच्या पल्याडच्या संगीताकडे नेलं.

कधीकाळी कानडी संगीत नाटकांमधे काम करणारे मन्सूर पुढे विद्वान गायक म्हणून गाजले. एकाचवेळेस अत्यंत रसिकता आणि त्याचवेळेस बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम त्यांच्या गायकीत होता. नितळ आवाज, उत्तम दमसास आणि अनवट रागांवरचं प्रभुत्व यांचा संगम त्यांच्या गाण्यात होता. त्यांना पद्मभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित केलंय. त्यांच्या विनम्र स्वभावाने या त्यांच्या गाण्याला अधिकच उंचीवर नेलं होतं. १२ सप्टेंबर १९९२ला त्यांचं निधन झालं. 

पडद्यावरचे गांधी बेन किंग्जले (जन्म १९४३)

सर बेन किंग्जले यांचा आज ७५ वा वाढदिवस. १९८२ साली त्यांना रिचर्ड अटनबरो यांच्या गांधी या सिनेमात गांधीजींची अजरामर भूमिका केली, तेव्हा ते चाळीस वर्षांचेही नव्हते. पण तरुणपणापासून म्हातारपणापर्यंतचे गांधीजी त्यांनी उभे केले होते. एकाच वेळेस करुणा आणि निग्रह यांचा मेळ असणारं गांधीजींचं व्यक्तिमत्त्व त्यांनी मोठ्या पडद्यावर उभं केलं होतं. ते फारच मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे उचललं. त्यासाठी त्यांना ऑस्करनेही गौरवण्यात आलं.

भारतीय वंशाचे वडील आणि ब्रिटिश आई यांचे ते मुलगा. पाळण्यातलं नाव कृष्णा भानजी. आईचा अभिनयाचा वारसा त्यांनी अभिमानाने पुढे नेला. गांधी या सिनेमाशिवायही त्यांचं इंग्रजी सिनेमा, टीवीमधलं अभिनेता म्हणून ५० वर्षांहून अधिक मोठं करियर आहे. त्यांना पद्मश्री, ग्रॅमी, बाफ्टा, गोल्डन ग्लोब्ज, नाईटहूड, हॉलिवूड व़ॉक ऑफ फेम असे सन्मानही मिळाले.

तरुणांचे साहित्यिक श्रीलाल शुक्ल (जन्म १९२५)

सनदी अधिकारी असलेल्या श्रीलाल शुक्ल यांच्या ‘रागदरबारी’ कादंबरीने साहित्य वर्तुळाचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. स्वातंत्र्यानंतरची गावखेड्यातली बदलती जीवनमुल्यं सांगणाऱ्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. वाचकांच्या तूफान प्रतिसादामुळे पुढे या कादंबरीवर एक टीवी सीरियलही तयार झाली. साध्या सोप्या भाषेमुळे श्रीलाल शुक्ल हे आजही तरुणांमधे फेमस आहेत.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण शुक्ल यांच्याबाबतीत तंतोतंत खरी ठरताना दिसते. गरीबीत वाढलेल्या शुक्ल यांनी वयाच्या १३ व्या वर्षीच संस्कृत आणि हिंदीतून कथा, कविता लिहायला सुरवात केली होती. नंतर त्यांच्या साहित्यकृतींनी हिंदी साहित्याला नव्या उंचीवर नेऊन पोचवलं. पण रागदरबारीमुळे आपल्या इतर साहित्यकृतींकडे वाचकांचं तितकंसं लक्ष गेलं नाही, ही खंत ते बोलून दाखवायचे. 

स्वातंत्र्यसैनिक कृष्ण वल्लभ सहाय (जन्म १८९८)

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते कृष्ण वल्लभ सहाय यांचा आज १२० वा जन्मदिवस आहे. अव्वल दर्जाच्या इंग्रजीसाठी गवर्नर मेडल मिळवणाऱ्या सहाय यांनी शिक्षण सोडून देत स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात भाग घेतला. यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला. 

काँग्रेसचे पुढारी असलेल्या सहाय यांनी बिहारचे चौथे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला. १९६३ ते १९६७ या काळात ते मुख्यमंत्री होते. १९३७ मधे ते पहिल्यांदा बिहार विधान परिषदेचे सदस्य बनले. भारतीय संविधान सभेचेही ते सदस्य होते. वयाच्या ७५ व्या वर्षी सहाय यांचं निधन झालं.

लोकप्रिय गीतकार वंदना विटणकर (निधन २०११)

हा रुसवा सोड सखे, खेळ कुणाला दैवाचा कळला, परीकथेतील राजकुमारा, राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं, शोधिशी मानवा राऊळी मंदिरी, अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी, अशी एकाहून एक सरस गाणी देणाऱ्या गीतकार म्हणजे वंदना विटणकर. रेडियो, टीवी किंवा रंगमंचावरचा कोणताही जुन्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी सातशेहून अधिक गाणी लिहिली आणि दीड हजारांहून अधिक कविता.

गीतकार या ओळखीबरोबरच बालनाट्यातही त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. वंदना थिएटर्स या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दशकं बालनाट्य केली. शिवाजी साटम, विनय येडेकर, विजय गोखले, मेधा जांबोटकर अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या बालनाट्यांतून रंगभूमीवर पदार्पण केलं. मराठीत महिला गीतकारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यातही इतकं मोठं यश मिळवणाऱ्या वंदना विटणकर विसरता येणार नाहीत.