२८ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२८ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २८ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले (मृत्यू १८९०)

थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, क्रांतीकारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांचा आज स्मृतीदिवस. जोतीराव गोविंदराव फुले हे त्यांचं पूर्ण नाव. सप्टेंबर १८७३ मधे त्यांनी सत्यशोधक समाज संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बालविवाह, विधवाविवाह, महिला शिक्षण, दलित्तोद्धार यासारख्या प्रश्नांना चव्हाट्यावर आणलं. जातीआधारित भेदभावाला विरोध करतानाच जोतिरावांनी जातीनिर्मूलनाचाही कार्यक्रम राबवला. पुण्यात ११ एप्रिल १८२७ ला त्यांचा जन्म झाला. सावित्रीबाईंसोबत मिळून पुण्यात महिलांसाठीची देशातली पहिली शाळा काढली. पुण्यात ११ एप्रिल १८२७ ला त्यांचा जन्म झाला.

जोतिरावांनी संघटनात्मक कामासोबतच महत्त्वाच्या विषयांवर पुस्तकंही काढली. शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणाऱ्या जोतिरावांनी त्यांच्यावर कुळवाडीभूषण हा पोवाडाही गायला. तृतीयरत्न हे त्यांचं पहिलंच नाटक गाजलं. महात्मा फुलेंच्या संघर्षातूनच सरकारने शेतकी कायदा तयार केला. इंग्रजांसोबतच स्थानिक कथित उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर ‘शेतकऱ्यांचा असूड’ पुस्तकातून फटकारे लगावले. ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी हे त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. १८८८ मधे लोकांनी त्यांना महात्मा पदवीने सन्मानित केलं.

इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर (मृत्यू १९६३)

मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक, लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा आज स्मृतीदिवस. एमए पदवीसाठी तयार केलेला ‘मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव’ हा प्रबंध विद्यापीठाकडून मंजूर झाला नसला तरी त्यांचं आता पुस्तक आलंय. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधे मराठा इतिहासाचे रीडर म्हणून त्यांनी काम केलं. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती हे त्यांचे ग्रंथ गाजले. यासोबतच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींवर निबंध लेखन केलं. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या कशेळी इथं २५ मे १८९५ ला त्यांचा जन्म झाला.

आता शंभरी पार केलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संस्थापकांमधे शेजवलकरही होते. मुंबईतल्या कर्नाटक छापखान्याने शेजवलकरांच्या संपादकत्वाखाली प्रगती नावाचं साप्ताहिक सुरू केलं. पण इंग्रजांच्या दबावाने दोनेक वर्षांतच ते बंद पडलं. यामुळे त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचं काम सोपवलं होतं. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण झालं नाही. २८ नोव्हेंबर १९६३ ला त्यांचं निधन झालं.

गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे (जन्म १८७२)

ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि नाटकांचे संगीतकार रामकृष्णबुवा वझे यांचा आज जन्मदिवस. धृपद, खयाल, ठुमरी यासारख्या गायनप्रकारांवर त्यांची हुकमत होती. लहानपणीच वडील वारल्याने आईसोबतच ते वाढले. लहानपणापासूनच्या नादामुळे गायकी शिकण्यासाठी त्यांनी देशभर भटकंती केली. इंदूर, ग्वाल्हेर इथं ते राहिले. मोठ्या गरिबीत लहानपण काढलेल्या रामकृष्णबुवांनी घरोघरी अन्न मागून त्यांनी गायकीचे धडे गिरवले.

‘बलवंत संगीत मंडळी’ आणि ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळ्यांमध्ये ते संगीतगुरू म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. रामकृष्णबुवा हे संगीतक्षेत्रातले अत्यंत भरतीदार गवई, विद्वान, रंगतदार आणि बहुरंगी कलावंत आहेत. त्यांना ‘गायनाचार्य’ म्हणून मान्यता मिळालीय, त्यांच्या संगीत कलाप्रकाश (१९३८) पुस्तकात त्यांच्या काही चिजा समाविष्ट आहेत. तसंच त्यांचं आत्मचरित्रही थोडक्यात दिलंय. ५ मे १९४३ मधे त्यांचं निधन झालं.

बास्केटबॉलचे जनक जेम्स नेस्मिथ (मृत्यू १९३९) 

क्रीडा जगताला बास्केटबॉलची देण देणाऱ्या जेम्स नेस्मिथ यांचा आज स्मृतीदिवस. शारीरिक शिक्षणाची पदवी घेतलेल्या नेस्मिथ यांनी स्प्रिंगफील्‍ड वायएमसीए सेंटरमधे ट्रेनर म्हणून काम सुरू केलं. १८९१ मधे त्यांनी इथंच पहिल्यांदा बास्केटबॉलचा खेळाच्या अभ्यासक्रमात समावेश केला. बघता बघता बास्केटबॉलला मोठा प्रतिसाद मिळू लागला. एवढंच नाही तर बास्केटबॉलचा प्राण असलेले १३ नियमही नेस्मिथ यांनीच बनवले. 

नेस्मिथ यांनी १४ दिवसांतच संपूर्ण खेळाचा आराखडा तयार केला होता. खेळाडूंमधे बॉल गोलमधे घालण्यावरून हाणामारी होऊ नये म्हणून गोलपोस्ट डोक्यावर तयार केला. १९०४ च्या ऑलिम्पिकमधे पहिल्यांदा बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला. त्यानंतर १९३६ च्या बर्लिन ऑलम्पिकमधे बास्केटबॉलचा अधिकृतरित्या समावेश झाला. ६ नोव्हेंबर १८६१ ला कनडात जन्मलेल्या नेस्मिथ यांचा १९३९ मधे अमेरिकेत मृत्यू झाला.

स्मिताचा मुलगा प्रतीक बब्बर (जन्म १९८६)

हिंदी सिनेमातला अॅक्टर प्रतीक बब्बरचा आज वाढदिवस. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा तो मुलगा आहे. आमीर खानचा २००८ मधे आलेला 'जाने तू...या जाने ना' हा प्रतीकचा पहिला सिनेमा आहे. यातल्या भूमिकेसाठी त्याला २००९ मधे फिल्मफेयर स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला होता. याशिवाय 'धोबी घाट'मधे 'स्टारडस्ट अवार्ड फॉर टुमारो' म्हणून त्याला नामांकित करण्यात आलं होतं. 

त्यानंतर २०११ मधे एकाच वर्षात प्रतीकचे चार सिनेमे आले. 'धोबी घाट', 'दम मारो दम', 'आरक्षण' आणि 'माई फ्रेंड पिंटो' हे सिनेमे रिलीज झाले. त्याच्या भूमिकेने एखादा सिनेमा हिट बनलाय, असं काही झालं नाही. पण टीकाकारंनी त्याच्या अॅक्टिंगच खूप कौतूक केलं. आता प्रतीकला आई स्मिता पाटील यांच्यावर बायोपिक बनवायचा आहे.