प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २७ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
‘बैर बढ़ाते मस्जिद मन्दिर, मेल कराती मधुशाला’ अशा अजरामर काव्यपंक्ती लिहणारे हिंदीतले महान कवी-लेखक हरिवंश राय बच्चन यांचा आज जन्मदिवस. ख्यातनाम अॅक्टर अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा. हरिवंश राय यांच्या 'दो चट्टाने' कवितासंग्रहाला 'साहित्य अकादमी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आलं ते साल होतं १९६८ . त्याच वर्षी त्यांनी सोवियत लँड नेहरू पुरस्कार आणि आफ्रो एशियन संमेलनात कमल पुरस्कारही मिळाला.
आयुष्यभर दारूला हात न लावणाऱ्या हरिवंश राय यांनी आपल्या 'मधुशाला' या दीर्घ कवितेतून रसिकांना शब्दश: झिंगवलं. उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमधे जन्मलेल्या हरिवंश राय यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे हिंदी विशेषज्ञ म्हणून काम केलं. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय जीवनावरही कविता लिहीली. तेरा हार, आत्म परिचय, सतरंगिनी, खादी के फूल, बंगाल का काव्य, बुद्ध और नाचघर, बहुत दिन बीते, जाल समेटा, पंत के सौ पत्र' या त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना आहेत. १९७६ मधे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १८ जानेवारी २००३ ला त्यांचं निधन झालं.
लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळंकर यांची आज जयंती. दादासाहेब नावानं ओळखले जाणारे मावळंकर स्वातंत्र्यपूर्व काळातही केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष राहिले. रत्नागिरीच्या राजापुरातल्या एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नंतर त्यांचं कुटुंब गुजरातची राजधानी अहमदाबादला राहायला आलं. वकिली करणाऱ्या दादासाहेबांनी तरुण वयातच स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली.
१९३७ मधे त्यांनी मुंबई प्रांताच्या विधानसभेत अहमदाबादचं प्रतिनिधित्व केलं. १९३७ ते १९४६ या काळात ते मुंबई विधानसभेचे स्पीकर राहिले. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी लोकसभाध्यक्ष म्हणून दादासाहेबांचं नाव सुचवलं. त्यांच्या नावावर सदस्यांनी बहुमताने शिक्कामोर्तब केलं. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटीशांनी तुरुंगात केलेल्या छळकहाण्या सांगणारं त्यांचं गुजराती भाषेतलं ‘मनावतना झरना’ हे पुस्तक खूप गाजलं. लोकसभाध्यक्ष असतानाच २७ फेब्रुवारी १९५६ ला त्यांचं निधन झालं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना लोकसभेचे जनक या उपाधीने नावाजलं.
आपल्या चपळ शरीरयष्टीने मार्शल आर्टला जगभरात पोचवणाऱ्या ब्रुस ली यांचा आज जन्मदिवस. ब्रुस ली यांचं पूर्ण नाव ली जून फान असं आहे. अॅक्टर, डायरेक्टर, मार्शल आर्टचा किंग, तत्वज्ञ आणि कुंग फू कराटेतल्या 'जीत कुन दो' या प्रकाराचा जनक अशा अनेक गोष्टी ब्रुस ली यांच्या नावावर आहेत. अमेरिकेत जन्मून हाँगकाँगमधे वाढलेला हा काळासावळा तरुण चीनी राष्ट्रवादाचा जयघोष करत चीन्यांच्या गळ्यातला ताईत बनला.
जगभरात सिनेमातल्या मार्शल आर्ट्ससाठी त्यांची ख्याती आहे. हाँगकाँगपुरती मर्यादीत असलेली मार्शल आर्ट्सची कला त्यांनी जगभरात पोचवली. त्यामुळे आजही मार्शल आर्ट्स शिकणारे त्यांना देवासारखं मानतात. कुठल्याही हत्याराविना युद्ध खेळण्याची ही कला पाश्चात्य देशातल्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. पॉप साँग कल्चरमधेही त्यांचं नाव एक स्टार म्हणून आदरानं घेतलं जातं. द बिग बॉस, फिस्ट ऑफ फ्यूरी, वे ऑफ द ड्रैगन, एंटर द ड्रैगन और द गेम ऑफ डेथ हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. वयाच्या ३२ व्या वर्षी २० जुलै १९७३ मधे त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलं नाही.
'आनंदओवरी'कार दि. बा. मोकाशी (जन्म १९१५)
विसाव्या शतकातले श्रेष्ठ मराठी लेखक दि. बा. मोकाशी यांचा आज जन्मदिवस. त्यांनी रोजच्या जगण्यातल्या अनुभवांवर आधारित ललित लेखन केलं. कादंबरी, बालसाहित्यासोबतच गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा हे वेगळे कथाप्रकारही मोठ्या कौशल्याने हाताळले. मोकाशींना नवकथाकार म्हणून ओळखलं जातं. उरण इथं त्यांचा जन्म झाला. इंजिनिअरची पदवी घेतलेल्या मोकाशींनी पुण्यात रेडिओ दुरुस्तीचं काम केलं.
तीन कादंबऱ्या, तीन ललित आणि प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तकं अशा भरगच्च साहित्यकृती त्यांच्या नावावर आहेत. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. संत तुकारामाच्या जीवनावरील ‘आनंदओवरी’ कादंबरीचं अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरं झाली. ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही चरित्रात्मक कादंबरी त्यांनी लिहिली. २९ जून १९८१ ला त्यांचं निधन झालं.
संयुक्त महाराष्ट्राचे खंदे पुरस्कर्ते लेखक, कवी, पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर यांचा आज स्मृतीदिवस. मुंबई प्रांतात सामील होणाऱ्या विदर्भावर अन्याय होऊ नये म्हणून १९४७ मधेच पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत अकोल्यात वाटाघाटी झाल्या. त्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या १६ जणांनी अकोला करारावर सह्या केल्या. त्यावर वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या माडखोलकरांचीही सही आहे. २८ डिसेंबर १९०० मधे मुंबईत त्यांचा जन्म झाला.
नवकवींना प्रोत्साहन देण्यासाठी १९२० मधे रविकिरण मंडळाची स्थापन झाली. यामधे माडखोलकरांचा पुढाकार होता. १९४५ मधे बेळगावला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या संमेलनातच संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला. न. चिं. केळकरांचे लेखनिक म्हणून सुरू केलेल्या पत्रकारितेच्या प्रवासात ते नागपूर तरुण भारतचे संपादक म्हणून निवृत्त झाले. दहा समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, सहा एकांकिका, दोन लघुकथासंग्रह आणि काही कविता एवढी विपूल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. आपल्या राजकीय कादंबऱ्यांनतून त्यांनी गांधीवादाला विरोध केला. आजच्या दिवशी १९७६ मधे नागपुरात त्यांचं निधन झालं.