२६ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२६ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २६ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

मिल्क मॅन डॉ. वर्गिस कुरियन (जन्म १९२६)

भारतातल्या दूध क्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांचा आज जन्मदिवस. कुरियन यांनी भारताला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश बनवलं. त्यामुळे आज राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला जगात ओळख मिळवून दिलेल्या अमूल ब्रॅँडचे ते सहसंस्थापक होते. आज या कंपनीची ‘अमूल गर्ल’ अनेकांच्या आस्थेचा विषय बनलीय. केरळातल्या कोझीकोडे इथल्या एका सिरियन ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

सहकारी तत्त्वावरील दुग्धोत्पादनाच्या माध्यमातून डॉ. कुरियन यांनी भारताला खाद्य पदार्थांच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवलं. दुग्धोत्पादनांचा त्यांचा ‘आणंद पॅटर्न’ जगभरात पोचला. थेट शेतकऱ्यांशी संबंधित ३० हून अधिक संस्था त्यांनी उभारल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी १९६५ मधे डॉ. कुरियन यांची राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या संस्थेच्या माध्यमातूनच त्यांनी दुग्धोत्पादन क्षेत्रात मोठं योगदान दिलं. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यासोबत रॅमन मॅगसेसे, कृषिरत्न यासारखे पुरस्कारही मिळाले. ९ सप्टेंबर २०१२ ला त्यांचं निधन झालं.

शिक्षणतज्ञ प्रोफेसर यशपाल (जन्म १९२६)

शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ प्रोफेसर यशपाल यांचा आज जन्मदिवस. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात विज्ञान शिक्षणाचा पाया घालणाऱ्यांमधे प्रो. यशपाल यांचं नावं घेतलं जातं. पार्टिकल फिजिक्सचे जाणकार असलेल्या यशपाल यांनी भाभा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. लहान मुलांना सोप्या भाषेत विज्ञानातल्या गंमती जमती सांगण्यावर त्यांचा भर राहिला.

प्राथमिक शिक्षणाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या शिफारशी करणाऱ्या यशपाल कमिटीमुळेही त्यांना ओळखलं जातं. शिक्षणात विज्ञान कशासाठी, हे सांगताना ते,  विज्ञानामुळे माणसाला जगण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन मिळतो, असं म्हणायचे. कॉस्मिक किरणांचा त्यांचा अभ्यास जगभरात नावाजला गेला. पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.  २४ जुलै २०१७ ला यशपाल यांचं निधन झालं.

लिट्टेचा संस्थापक वेलुपिल्लई प्रभाकरन (जन्म १९५४)

स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी श्रीलंकेला गृहयुद्धात ढकलणाऱ्या वेलुपिल्लई प्रभाकरन याचा आज जन्मदिवस. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम अर्थात लिट्टेचा तो संस्थापक राहिला. काहीजण त्याला अतिरेकी म्हणतात, तर तमिळ राष्ट्रवाद्यांसाठी तो आजही महान योद्धा, स्वातंत्र्यसैनिक आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातून प्रेरणा घेऊन आपण ही लढाई लढत असल्याचं तो सांगायचा. 

१९७५ मधे जाफनाच्या महापौरांची लिट्टेने हत्या केली. त्यानंतर लिट्टेच्या कामाला संघटित स्वरुप येऊ लागलं. दिवसेंदिवस हिंसक होत असलेल्या लिट्टेच्या कारवाया रोखण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेला मदतीचं धोरण अवलंबलं. पण यातूनच लिट्टेच्या समर्थकांनी १९९१ मधे राजीव गांधींची हत्या केली. श्रीलंकेतल्या गृहयुद्धात हजारोंचा जीव गेला. त्याच्या शोधासाठी श्रीलंकेला जगभरातून मदत मिळाली. १९ मे २००९ ला त्याचा श्रीलंकेच्या सैन्य कारवाईत प्रभाकरन मारला गेला आणि श्रीलंकेतलं गृहयुद्ध संपलं.

फॅमिली डायरेक्टर राजा ठाकूर (जन्म १९२३)

मराठी सिनेमांचे प्रसिद्ध डायरेक्टर राजा ठाकूर यांचा आज जन्मदिवस. मास्टर विनायक आणि राजा परांजपे यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. पुढे मध्यमवर्गीयांच्या आवडीचे कौटुंबिक सिनेमे बनवणारे फॅमिली डायरेक्टर म्हणून त्यांची ख्याती झाली. ‘नवचित्र’ या बॅनरखाली त्यांनी स्वतःच सिनेमे काढायला सुरवात केली. गोव्यातलं फोंडा हे त्यांचं जन्मगाव आहे.

अजब तुझे सरकार, संत गोरा कुंभार, घरकुल, एकटी घरचं झालं थोडं, जावई विकत घेणे आहे, पुत्र व्हावा ऐसा, माझे घर माझी माणसे, मी तुळस तुझ्या अंगणी यासारख्या प्रसिद्ध सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. यासाठी त्यांना राष्ट्रीय, राज्य पुरस्कारही मिळाले. काही हिंदी, इंग्रजी सिनेमेही त्यांनी बनवले. २८ जुलै १९७५ मधे त्यांचं निधन झालं.

दणकट अॅक्टर अर्जुन रामपाल (जन्म १९७२)

बॉलीवूड अॅक्टर अर्जून रामपालचा आज बड्डे. २००१ मधे ‘मोक्ष’ सिनेमातून त्याने बॉलीवूडमधलं करिअर सुरू केलं. पण त्याचा हा सिनेमा ‘प्यार, इश्क और मोहब्बत’ या दुसऱ्या सिनेमानंतर रिलीज झाला. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर पडले. पण लोकांनी त्याच्या रोलची प्रशंसा केली. त्याला साईड रोलच मिळाले. सिनेमात प्रोफेशनल यश मिळालं नसलं तरी तो आपल्या दणकट फिटनेसमुळे सतत चर्चेत राहतो.

२००२ मधे रामपालने इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीचा 'फेस ऑफ द इयर' अवॉर्ड जिंकला. रामपालला 'राजनीति', 'रॉक ऑन', 'हाउसफुल' या सिनेमांसाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला. दीवानापन, आंखे, एक अजनबी, हमको तुमसे प्यार है, कभी अलविदा न कहना, हीरोइन, इनकार, रॉय यासारख्या सिनेमांमधे त्याचा रोल आहे.