२५ डिसेंबर: आजचा इतिहास

२५ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २५ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

भारतरत्न पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (जन्म १९२४)

आपल्या भाषणाने लोकांच्या मनाचा ठाव घेणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. १९५७ मधेच ते भारतीय जनसंघाच्या तिकीटावर लोकसभेत गेले. सुरवातीला चार खासदार असलेल्या जनसंघाचे नंतर भारतीय जनता पक्षात रूपांतर झालं. त्यानंतर उदारवादी चेहऱ्याच्या वाजपेयींच्या नेतृत्वात १९९६ मधे एनडीएचा प्रयोग राबवत भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. 

मध्य प्रदेशातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वाजपेयींनी सुरवातीला काही काळ पत्रकारिता केली. नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले. १९८० मधे स्थापना झाल्यानंतर वाजपेयीच भाजपचे पहिले अध्यक्ष होते. पहिल्यांदा १६ मे ते १ जून १९९६ पर्यंत आणि नंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ या काळात ते पंतप्रधान राहिले. २०१४ मधे त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं.  गेल्या ऑगस्टमधे त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. आज जन्मदिनी दिल्लीत त्यांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण करण्यात येत आहे.

सिनेसंगीताचा बादशहा नौशाद (१९१९)

संगीतकार नौशाद यांची जन्मशताब्दी वर्ष यंदा सुरू होतंय. नौशाद यांनी आपल्यावेळच्या संगीतकारांच्या तुलनेत खूपच कमी सिनेमात काम केलं. पण गुणवत्तेच्या बाबतीत ते या सगळ्यांहून खूप पुढे होते. घरातून कुठलाच वारसा नसलेल्या नौशाद यांना १९४० मधे प्रेम नगर सिनेमात पहिली संधी मिळाली. मात्र त्यांना ओळख मिळाली ती १९४४ मधे आलेल्या रतनमुळे. उत्तर प्रदेशातल्या लोकगीतांची धून शास्त्रीय रागांमधे मिसळून त्यांनी नवं संगीत उभं केलं. हे संगीत सुपर हिट झालं. 

अंदाज, आन, मदर इंडिया, अनमोल घड़ी, बैजू बावरा, अमर, स्टेशन मास्टर, शारदा, कोहिनूर, उडन खटोला, दिवाना, मुगल-ए-आज़म, दुलारी, शाहजहां, राम और श्याम, गंगा जमुना, आदमी, पालकी, आईना, धर्म कांटा हे सिनेमे नौशाद यांच्या संगीताने गाजले. भारतीय सिनेमात एकाचवेळी शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीताचा वापर करण्याचा मान नौशाद यांना जातो. एवढंच नाही तर साऊंड मिक्सिंगलाही त्यांनी सुरवात केली. ५ मे २००६ ला त्यांचं निधन झालं.

पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना (जन्म १८७६)

पाकिस्तानचे संस्थापक आणि पहिले गवर्नर जनरल मोहम्मद अली जीना यांचा आज जन्मदिवस आहे. धर्माच्या आधारावर वेगळ्या पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या जीनांचे वडील हिंदू होते. जीनांच्या वडिलांनी जातीचे चटके बसल्याने धर्मांतर केलं होतं. पण तिचं गोष्ट १९४७ मधे भारताच्या फाळणीचं कारण ठरली. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानात कायदे आज़म म्हणजेच महान नेता आणि बाबा-ए-कौम अर्थात राष्ट्रपिता म्हटलं जातं.

जीना वयाच्या २० व्या वर्षीचं बॅरिस्टर झाले. मुंबईच्या मुस्लिम समाजातले ते पहिले बॅरिस्टर होते. आधुनिकतेचा पुरस्कार करणारे जीना सुरवातीला तर स्वतःचा धर्मही लपवायचे. नास्तिकवादी जीना हिंदू मुस्लीम ऐक्याबद्दल बोलायचे. पण याच जीनांनी १९४० मधे धर्माच्या धारावर वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. यासाठीची सैद्धांतिक मांडणी केली. ११ सप्टेंबर १९४८ ला त्यांचं निधन झालं.

महान स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन मालवीय (जन्म १८६१)

जगप्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आणि हिंदू महासभेचे नेते मदन मोहन मालवीय यांची आज जयंती. एका संस्कृत पंडिताच्या घरी जन्मलेल्या मालविय यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संस्कृतचा अभ्यास सुरू केला. त्यांचं घराणं मध्य प्रदेशच्या मालवा परिसरातलं असल्यामुळे त्यांना मालवीय म्हटलं जाऊ लागलं. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी चौराचौरी प्रकरणात १७० भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र मालवीय यांच्या युक्तीवादाने १५१ जणांची फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली.

आता हिंदू महासभेचे लीडर म्हणून ओळखले जाणारे मालवीय सुरवातीला तीनवेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. तब्बल ३५ वर्ष ते काँग्रेसमधे होते. महात्मा गांधींनीही त्यांच्या नेतृत्वशैलीची प्रशंसा केली होती. गांधीजी त्यांना आपला मोठा भाऊ म्हणायचे. मात्र, त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यासाठी २०१४ साल उजाडावं लागलं. १२ नोव्हेंबर १९४६ ला त्यांचं निधन झालं.

सत्तेतले पँथर रामदास आठवले (जन्म १९५९)

सत्तेची दिशा ओळखून राजकारण करणारे नेते म्हणजे रामदास आठवले. आठवले सध्या केंद्र सरकारमधे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. कधीकाळी विचारांसाठी जीवही धोक्यात घालणारे आठवले आता सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार असणारे नेते म्हणून ओळखले जातायत. मध्य मुंबई आणि पंढरपूर मतदारसंघातून ते खासदार झाले. भाषणात उत्स्फूर्तपणे सादर केलेल्या त्यांच्या कविता सध्या चर्चेचा विषय ठरतायंत.

बालपणीच वडील वारल्याने आई हौसाबाई यांनी काबाडकष्ट करून रामदास आठवले यांना लहानाचं मोठं केलं. मुंबईच्या सिद्धार्थ हॉस्टेलमधे राहून शिक्षण घेत असतानाच ते दलित पॅथर्सशी जोडले गेले. इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातही ते आघाडीवर होते. याच काळात १९९० मधे त्यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश झाला. मुलगा मंत्रीपदाची शपथ घेत असताना त्यांची आई शेतावर मजुरी करत होती.