२४ नोव्हेंबरः आजचा इतिहास

२४ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २४ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

विस्मरणात गेलेले मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार (मृत्यू १९६३)

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा आज स्मृतीदिवस. पाचेक वर्षांपूर्वी त्यांच्या मूळगावी स्मारक उभारण्याची चर्चा सुरू होती. यासंबंधीची फाईल मंत्रालयात अडकली होती. यावर विचारणा करायला गेलेल्यांना अधिकाऱ्यांनी सवाल केला, कोण बरं हे कन्नमवार? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कन्नमवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळलं. सरकारी कर्मचाऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांच्या काळातच मुंबईतल्या विक्रोळीत वसाहत उभारण्यात आली. तो सगळा भाग आता कन्नमवार नगर म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेत ते निवडून आले. त्याच्याआधीही ते आमदार होते. विदर्भातले ते एक लोकप्रिय नेते होते. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात ते चले जाव आंदोलनात आघाडीवर होते. १९६२ च्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यानंतर कन्नमवार यांच्याकडे महाराष्ठ्राचं मुख्यमंत्रीपद आलं. त्यांच्या आवाहनावरून १९६२ च्या युद्धात देशाला मदत म्हणून चंद्रपूरकरांनी मुंबईनंतर सर्वाधिक सोनं गोळा केलं होतं. मुख्यमंत्री पदावर असतानाच आजच्या दिवशी १९६३ मधे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कुटुंबाचे खूप हाल झाले. त्यांची पत्नी माई कन्नमवार यांना चहाची टपरी टाकून घर चालवावं लागलं.

कार्यकर्ती लेखिका अरुंधती राय (जन्म १९६१)

प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांचा आज जन्मदिवस. १९९७ मधे त्यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळाला. वेगवेगळ्या मुद्यांवर थेट परखड भूमिका घेणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या भूमिका अनेकदा वादात सापडल्या. 'नर्मदा बचाव आंदोलना'सह अनेक आंदोलनांत त्यांनी भाग घेतला. काही सिनेमातही अरुंधती रॉय यांनी काम केलंय.

मेघालयची राजधानी शिलाँग इथं जन्मलेल्या अरुंधती रॉय यांचं सुरवातीचं शिक्षण केरळात झाला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतून आर्किटेक्टची पदवी घेतली. मात्र करिअर म्हणून सिनेमात काम करायला सुरवात केली. पहिल्यांदा 'मैसी साहब' सिनेमात त्यांनी काम केलं. अनेक सिनेमांच्या पटकथा लिहल्या. काश्मीर, नक्षलवाद या विषयातली त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली. गेल्या वर्षीच आलेली त्यांची ‘मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' ही कादंबरी सध्या चर्चेत आहे.

संवेदनशील दिग्दर्शक अमोल पालेकर (जन्म १९४४)

ख्यातनाम अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांचा आज जन्मदिवस. हिंदीत त्यांच्याइतका यशस्वी झालेला मराठीभाषक हिरो दुसरा नाही. खरं तर त्यांच्याकडे हिरो बनण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांचा चेहरा अतिशय सर्वसामान्य होता. त्यामुळे ते हिंदी सिनेमात सर्वसामान्य माणसाचा चेहराच बनले. १९७४ मधे 'रजनीगंधा'तून बॉलीवूडमधे पाऊल ठेवलं. त्यानंतर चितचोर, घरौंदा, मेरी बीवी की शादी, बातों बातों में, श्रीमान श्रीमती यासारख्या सिनेमांत त्यांनी काम केलं.

डायरेक्टर म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. गोलमालमधला डबलरोल त्यांनी अजरामर केला. त्यासाठी त्यांना फिल्मफेअरही मिळालं. अमिताभ बच्चनपासून अनेक सुपरस्टार असतानाही त्यांनी आपली जागा बनवली. नंतर ते दिग्दर्शक बनले. अनकही, कच्ची धूप, पहेली, अनाहत सारखे वेगळे सिनेमे डायरेक्ट केले तर ध्यासपर्व आणि अनकही हे सिनेमे तर त्यांनी स्वतःच बनवले.

आंबेडकरी साहित्यिक केशव मेश्राम (जन्म १९३७)

आंबेडकरी जाणिवेतून लिहिणारे मराठीतले नामवंत लेखक केशव मेश्राम यांचा आज जन्मदिवस. कथा, कादंबरी, कविता, ललित तसंच वैचारिक अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधे त्यांनी लेखन केलं. २००५ मधे नाशिक इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. १९७७ मधे 'उत्खनन' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला.

रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. जुगलबंदी, अकस्मात, चरित हे कवितासंग्रह, पोखरण, हकिकत, जटायू या कादंबऱ्या आणि खरवड, पत्रावळ, धगाडा, गाळ आणि आभाळ, मरणमाळा, आमनेसामने, कोळीष्टके, ज्वालाकल्लोळ, खांडववन हे त्यांचे कथासंग्रह गाजले. 'अक्षरभाकिते' या संग्रहात दलित संकल्पनेची फेरमांडणी आणि नामांतरानंतरच्या चळवळीचे स्वरूप याविषयीचं लेखन आहे. ३ डिसेंबर २००७ ला त्यांचं निधन झालं.

पटकथा लेखक सलीम खान (१९३५)

बॉलीवूडला सुपरस्टारर देणारा बाप पटकथा लेखक सलीम खान यांचा आज जन्मदिवस. इंदूरला जन्मलेल्या सलीम खान यांची पोरं आज फिल्म इंडस्ट्री गाजवत आहेत. सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान यांनी स्वतःची अनौपचारिक खान इंडस्ट्रीच नावारूपाला आणलीय. इंदूरला एमए करत असतानाच त्यांची दिग्दर्शक अमरनाथ यांच्याशी भेट झाली. त्या भेटीतच त्यांना 'बरत' (१९६०) सिनेमामधे काम मिळालं. यानंतर त्यांचे अनेक सिनेमे आले. पण त्यांना ओळख मिळाला ती पटकथा लेखक म्हणून. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची सलीम जावेद अशी जोडी बनली. तिने इतिहास घडवला.

अंदाज, हाथी मेरे साथी, सीता और गीता, यादों की बारात पासून हा इतिहास घडायला सुरवात झाली. त्यानंतर जंजीर, मजबूर, दिवार, शोले, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, दोस्ताना, शान, शक्ती या जोडगोळीने लिहिलेल्या सिनेमांनी अमिताभ बच्चन नावाचा सुपरस्टार घडवला. हे दोघे वेगवेगळे झाल्यानंतरही त्यांनी एकट्याने काही सिनेमे लिहिले. पण नाम वगळता ते फारसे यशस्वी झाले नाहीत. बॉलीवूडच्या एकेकाळच्या डान्सर हेलन यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांना पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आलंय.