२१ ऑक्टोबर : आजचा इतिहास

२१ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


पंतप्रधानांच्या हस्ते फक्त स्वातंत्र्यदिनालाच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जातो. पण त्याला अपवाद करत आज नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत. कारण आज आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. आझाद हिंद स्थापनेची स्थापना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरच आज आठवण काढायला हवी, ती यश चोप्रा, शम्मी कपूर, वामनराव पै आणि अल्फ्रेड नोबल यांचीही.

क्रांतीची आग आझाद हिंद सेना (स्थापना : १९४३)

इंग्रजांविरुद्ध युद्ध करून भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ ला आझाद हिंद सेनेच्या सरकारची स्थापना केली. त्याला आज ७५ वर्ष झाली. नेताजींनी सिंगापूर इथं भारताचं हंगामी सरकार स्थापन केलं. या सरकारला जर्मनी, जपानसारख्या इंग्रजांविरोधातल्या देशांनी मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लढाईमध्ये शरण आलेल्या भारतीय सैन्याच्या मदतीने रासबिहारी घोष यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग उभारली होती. त्यांच्या नेताजींनी आझाद हिंद सेनेचं पुनरुज्जीवन केलं. या सैन्याने नागालँड, मणिपूरच्या सीमेवर इंग्रजांशी लढा दिला. आझाद हिंद सेनेच्या पराक्रमामुळे देशभर देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं. चले जाव चळवळीस त्याचा फायदा झाला. मतभेद असूनही नेताजींनी गांधीजींच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या चळवळीला कायम पूरक भूमिका घेतली.

आझाद हिंद सेनेची पीछेहाट होऊ लागली तेव्हा त्यांनी देशबांधवांना गांधीजींच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळ पुढे नेण्याचं आवाहन केलं. त्यांनी गांधीजींना राष्ट्रपिता हे बिरुद दिलं. आझाद हिंद सेनेच्या पराभवानंतर त्यांच्या सैनिकांवर इंग्रजांनी केलेला खटला गाजला. पंडित नेहरूंनी त्यात सैनिकांची बाजू मांडली. आझाद हिंद सेना हे भारतीय स्वातंत्र्ययुद्धातलं सोनेरी पान ठरलं.


जीवनविद्येचा मार्ग दाखवणारे वामनराव पै (जन्म : १९२३)

‘सर्वांना चांगली बुद्धी दे’ अशी प्रार्थना करणारे आणि लाखो लोकांना करायला लावणारे जीवनविद्या मिशनचे संस्थापक वामनराव पै यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पै यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवून मंत्रालयात सरकारी नोकरी धरली. नोकरी सुरू असतानाच ते दादरसारख्या मध्यमवर्गीय वस्तीमधे प्रवचनं करायला लागले. साध्या-सोप्या शब्दांत जगणं उलगडून दाखवणारं तत्वज्ञान लोकप्रिय होऊ लागलं. लोकांच्या आग्रहातून चिंचपोकळीच्या कामगार कल्याण केंद्रात त्यांची प्रवचनं सुरू झाली. नंतर काळाचौकीतल्या हनुमान मंदिरात प्रवचनांस सुरवात झाली. १९५५ मधे विजयादशमीच्या दिवशी जीवनविद्या मिशनचं काम सुरू झालं. त्यांचे लाखो अनुयायी होते. पण ते १९८१ला अर्थ खात्यातून उपसचिव म्हणून निवृत्त होईपर्यंत नोकरी करतच होते. पै यांनी जीवनविद्येची शिकवण देणारी २५ पुस्तकंही लिहिली. त्यांच्या प्रेरणेतून मुंबईनजीक असलेल्या कर्जत इथं जीवनविद्या ज्ञानपीठ उभारण्यात आलंय. वयाच्या ८८ व्या वर्षी वामनराव पै यांचं २९ मे २०१२ ला निधन झालं.

यश चोप्रा : त्यांनी देशाला रोमान्स शिकवला (निधन २०१२)

किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखले जाणारे हिंदी सिनेमांचे निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांचं २०१२ मधे आजच्या दिवशी निधन झालं. त्यांचे मोठे भाऊ बीआर चोप्रा यांच्या पावलावर पाऊल टाकून ते फिल्म इंडस्ट्रीत आले. 'धूल का फूल' हा ते डायरेक्टर असलेला पहिला सिनेमा. त्यानंतर मल्टिस्टारर 'वक्त'ने मोठं यश मिळवून दिलं. ७१ला यशराज फिल्म्स या नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू करून त्यांनी एक से बढकर एक पिक्चर काढले. एकीकडे दिवार, त्रिशुल, मशाल, काला पत्थर सारखे अॅक्शनप्रधान सिनेमे काढताना त्यांनी रोमँटिक सिनेमांचा प्रवाह सुरूच ठेवला होता. याला खरं तर 'दाग'ने सुरवात झाली होती. 'कभी कभी' आणि 'सिलसिला'ने त्यावर ठसा उमटवला. 'चांदनी'नंतर तर तीच यश चोप्रांची ओळख बनली. 'लम्हे', 'डर', 'दिल तो पागल हैं', 'वीरझारा', 'जब तक हैं जान' हे त्यांचे सगळेच सिनेमे यशस्वी ठरले आणि त्यांनी नाईन्टीजच्या पिढीला प्रेम करायला शिकवलं. `मेरे पास मां हैं` पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास `सिमरन जी ले अपनी जिंदगी`च्या वाटेवर येऊन पोचला. शाहरूखची भूमिका असलेला ‘जब तक है जान’ हा आपल्या कारकीर्दीतला शेवटचा सिनेमा असल्याचं त्यांनी २०१२ मधेच जाहीर केलं होतं. कुटुंबाला वेळ देण्यासाठी निवृत्ती जाहीर केली. त्यांचं २१ ऑक्टोबर २०१२ ला डेंग्यूनं निधन झालं.

शम्मी कपूर : तुमसे अच्छा कौन हैं (जन्म : १९३१)

साठच्या दशकातील तरुणाईला ‘याहू’ अशी साद देणारे अभिनेते शम्मी कपूर यांचा आज बड्डे. वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून अभिनयाचा वारसा त्यांना मिळाला होता. ‘जीवन ज्योति’ (१९५३) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ‘तुमसा नही देखा’ (१९५७) या सिनेमाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. शम्मी कपूर यांनी मुख्य अभिनेता म्हणून ५० पेक्षा जास्त तर सहाय्यक अभिनेता म्हणून २० हून जास्त सिनेमात काम केलं. १९६८ साली आलेल्या ‘ब्रम्हचारी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दिल दे के देखो, जंगली, चायना टाऊन, ब्लफ मास्टर, काश्मीर की कली, तिसरी मंझिल, इवनिंग इन पॅरीस, प्रिंस, तुमसे अच्छा कौन हैं अशा सिनेमांतून धसमुसळा रोमँटिक हिरो ही त्यांची इमेज लोकप्रिय झाली. 'सँडविच' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. मुळात त्यांना इंजिनियर व्हायचं होतं. ते जमलं नाही. पण टेक्नॉलॉजीशी असलेली जवळीक त्यांनी कायम ठेवली. भारतातल्या अगदी सुरवातीच्या इंटरनेट यूजर्सपैकी ते होते. तासन्तास पीसी घेऊन ते नेटवर बसत. त्यांनी इंटरनेट यूजर्स कम्युनिटी ऑफ इंडियाची स्थापना केली. त्याचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू १४ ऑगस्ट २०११ ला झाला. 

सर्वोत्तमाला सलाम करणारे आल्फ्रेड नोबेल (जन्म : १८३३)

नोबेल प्राइजचा उल्लेख येतो तेव्हा यातलं नोबेल काय आहे, असा प्रश्न आपल्याला पडतोच. अमेरिकन संशोधक, उद्योजक आणि विद्वान अल्फ्रेड नोबेल यांच्या नावानेच दरवर्षी विविध क्षेत्रातल्या जगातल्या सर्वोच्च कामगिरीला नावाजलं जातं. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबरलाच स्टॉकहोम इथं झाला. नोबेल यांनी घरीच विज्ञान, साहित्य आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या १७ वर्षातच त्यांनी रशियन, फ्रेंच, जर्मनी, इंग्रजी यासह अनेक भाषेवर प्रभुत्व मिळवलं. केमिकल इंजिनीअर असलेल्या नोबेल यांनी जग काही क्षणात उद्ध्वस्त करू शकेल अशा डायनामाइटचा शोध लावला. यासह ३५५ शोधांचे पेटंट त्यांच्या नावावर आहेत. अल्फ्रेड हे उद्योजक होते. त्यांच्या अनेक कंपन्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी दीडशेहून अधिक पुस्तकं लिहिली. डायनामाईटचा शोध लावणाऱ्या नोबेल यांनी शेवटच्या काळात शांततेचा मार्ग धरला. आयुष्यभर मेहनतीने कमावलेली संपत्ती २७ नोव्हेंबर १८९५ ला एक ट्रस्ट उभं करून त्यात लावली. त्यातूनच नोबेल पुरस्कार देण्याचं स्वप्न बघितलं. आजही नोबेल पुरस्कारांचा सारा खर्च हा ट्रस्टच करतो. १० डिसेंबर १८९६ ला नोबेल यांचा मृत्यू झाला.