१८ डिसेंबर: आजचा इतिहास

१८ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १८ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

भोजपुरीचे शेक्सपिअर भिकारी ठाकूर (जन्म १८८७)

भोजपुरी ही भारतातली महत्वाची भाषा. संपूर्ण बिहारसह, पूर्व उत्तरप्रदेश तसंच झारखंड आणि बंगालच्या काही भागात काही कोटी लोक ही भाषा बोलतात. जगभरात बिहारी मजूर गेलेत. तिथे ही भाषा बोलली जाते. या भाषेला आपल्या नाटकांतून स्वतःचा स्वर मिळवून देणारे महाकवी म्हणजे भिकारी ठाकूर. 

भिकारी एक गरीब न्हावी होते. तीस वर्षं त्यांनी हेच काम केलं. पुढे उपजीविकेसाठी खरगपूर गाठलं. तिथून परतले ते रामलीला करायचं ठरवून. गावात त्यांनी नाटकमंडळी उभी केली. सामाजिक समस्यांवर भाष्य करणारी नाटकं लिहून बसवली. ती प्रचंड लोकप्रिय झाली. बिदेसिया हे नाटक तर आजही सादर होतं. नौटंकी, लौंडा नाच हे लोककला प्रकारच त्यातून विकसित झाले. देशभरासह आफ्रिका, सिंगापूर, मॉरीशस इथेही त्यांचे दौरे झाले. राहुल सांकृत्यायन यांनी त्यांना भोजपुरीचा शेक्सपिअर म्हटलं. ती उपाधी त्यांच्यासाठी त्यांना मिळालेल्या पद्मश्रीपेक्षाही मोलाची होती. या अशिक्षित कलाकाराची २५ पुस्तकं प्रकाशित झालीत. ते भोजपुरीतलं अक्षर वाङ्मय आहे. त्यांचं निधन १९७१ला झालं. 

हिरो ते विलन जोसेफ स्टॅलिन (जन्म १८७९)

एका चांभार कुटुंबात जन्मलेल्या स्टॅलिनची आई धार्मिक प्रवृत्तीची होती. त्यामुळे त्याला धर्मगुरू बनवायचं होतं. पण तिथं तो चोरून चोरून मार्क्सची पुस्तक वाचायचा. तिथंच तो झार साम्राज्यशाहीच्या विरोधातल्या चळवळीत सामील झाला. इतकंच नाही तर रशियातल्या बोल्शेविक क्रांतीचा प्रणेता लेनिन यांच्या संपर्कात आला. झार साम्राज्यशाहीच्या तिजोऱ्या फोडण्यात माहीर असलेला स्टॅलिन १९१७ मधे झालेल्या रशियन क्रांतीच्या आंदोलनात आघाडीवर होता.

लेनिनच्या मृत्यूनंतर त्याने आपणच राष्ट्रवादी कम्युनिस्ट विचारधारेचा पाईक असल्याचं सांगत कम्युनिस्ट पार्टीची सुत्रं आपल्याकडे घेतली. तिथूनच स्टॅलिनची एक हूकूमशहा होण्याकडे वाटचाल सुरू झाली. दुसरीकडे औद्योगिकीकरणाशिवाय कम्युनिस्ट क्रांती फेल होणार हे माहीत असलेल्या स्टॅलिनने लगेचच पंचवार्षिक नियोजनाचं काम हाती घेतलं. आपल्या योजना सक्तीने राबवणाऱ्या स्टॅलिनच्या काळातच कोळसा, तेल आणि स्टील यांच्या उत्पादनात अनेक पट वाढ झाली. शेतीचं आधुनिकीकरण केलं. या विकासाच्या चेहऱ्यासोबतच स्टॅलिन आपल्या आड येणाऱ्यांना आडवं करण्यात माहीर होता. कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांसोबतच सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनाही मारल्याचा त्याच्यावर आरोप होता. सुरवातीला हिरो आणि नंतर विलन झालेला स्टॅलिन आयुष्याच्या शेवटी शेवटी संशयी बनलेल्या. स्टॅलिनचं ५ मार्च १९५३ मधे हार्ट अटॅकने निधन झालं.

गोल्डन वॉइस कृष्णा कल्ले (जन्म १९४०)

परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तू, बिबं घ्या बिबं, मैनाराणी चतुर शहाणी ही साठचं दशक गाजवलेली गाणं गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचा आज ७८वा जन्मदिन. त्यांनी दोनशेहून अधिक हिंदी आणि शंभरेक मराठी गाणी गायलीत. तसंच त्यांनी काही गाणी कन्नडमधेही गायलीत. त्या मूळ कारवारच्या, पण वडिलांच्या नोकरीमुळे त्या कानपूरलाच लहानाच्या मोठ्या झाल्या.

शाळेत असतानाच गोड आवाजामुळे त्यांनी स्पर्धा गाजवल्या. सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गाऊ लागल्या. पुढे त्यांनी उत्तर प्रदेशतल्या जत्राही गाजवल्या. मुंबईत आल्यानंतर अरुण दातेंमुळे त्यांना यशवंत देव यांनी मराठीत पहिली संधी दिली. त्यानंतर भावगीतांबरोबरच चित्रपट गीतांवरही त्यांनी ठसा उमटवला. गोल्डन वॉईस ही त्यांची ओळख बनली. त्यांना महाराष्ट्र सरकारने मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केलंय. १५ मार्च २०१५ला त्यांचं निधन झालं.

टीवीचा चेहरा बरखा दत्त (जन्म १९७१)

प्रसिद्ध टीवी जर्नलिस्ट बरखा दत्त यांचा आज वाढदिवस आहे. आजही टीवीवर हिरोईन जर्नालिस्ट दाखवायची असेल तर ती बरखा दत्त यांच्यासारखा बॉयकट केलेलीच असते. पाकिस्तानविरुद्ध १९९९ मधे झालेल्या कारगिल युद्धाच्या उत्कृष्ट कवरेजने बरखा दत्त यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. एनडीटीवी या इंग्रजी न्यूज चॅनलवरचे ‘वूई दी पीपल’ आणि ‘द बक स्टॉप्स हिअर’ हे त्यांचे कार्यक्रम खूप गाजले. ‘वूई दी पीपल’ हा त्यांचा शो तर २०१७ मधे त्यांनी एनडीटीवी सोडेपर्यंत तब्बल १६ वर्ष चालला. या शोसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

जवळपास २१ वर्ष एनडीटीवीत काम केलेल्या बरखा यांना आई प्रभा दत्त यांच्याकडून पत्रकारितेचा वारसा मिळाला. प्रभा दत्त यांची भारतातल्या सुरवातीच्या महिला पत्रकार म्हणून ख्याती आहे. वेगवेगळ्या निवडणुकांसोबतच गुजरात दंगल, २६/११ चा मुंबई हल्ला यासारख्या महत्त्वाच्या घटनांचा रिपोर्टिंग करणाऱ्या बरखा दत्त यांचा टू जी प्रकरणातल्या राडिया टेपमधे नाव आलं. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. आता सध्या त्या मोजो, द प्रिंट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसतात.

सेलेब्रिटी दरोडेखोर विजय मल्ल्या (जन्म १९५५)

जवळपास १७ भारतीय बँकांतून तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं लोन बूडवून लंडनाला पळून गेलेल्या बिझनेसमन विजय मल्ल्याचा आज जन्मदिवस. या प्रकरणात नुकतंच लंडनच्या एका कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिल्याने तो लवकर भारताच्या ताब्यात येणार आहे. राज्यसभेचा खासदार राहिलेल्या मल्ल्याचं २००८ मधे जगातल्या टॉप १०० आणि भारतातल्या ५० सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत नाव होतं. त्यामुळे तो स्वतःलाच ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ म्हणायचा.

यूबी ग्रुप आणि किंगफिशर एअरलाइन्सचा मालक असलेला मल्ल्याला वडलांकडूनच व्यापारी वारसा मिळाला. वडिलांच्या अकाली निधनाने धंद्याची सारी जबाबदारी त्याच्यावर आली. १९८३ मधे यूनाइटेड ब्रेवरिज ग्रुपचे ते अध्यक्ष झाले. काही वर्षांनी दारू आणि एअरलाइन्सच्या धंद्यात आले. कधीकाळी मल्ल्याच्या ऐषोआरामीच्या जीवनाचा लोकांना हेवा वाटायचा. पण दिखाऊ जगण्यानेच मल्ल्याच्या कंपन्या गोत्यात येत गेल्या. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांची निर्लज्जपणे मल्ल्याजी म्हणत बाजू घेतलीय. त्यामुळे त्यांच्या भारतात सुखासुखी परतण्याची शक्यता दिसू लागलीय.