१६ डिसेंबरः आजचा इतिहास

१६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १६ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

कवितांचा जादूगार निस्सीम इजेकिल (जन्म १९२४)

नाट्यलेखक, समीक्षक, ब्रॉडकास्टर आणि भाष्यकार असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले निस्सीम इजेकिल भारतातल्या आधुनिक इंग्रजी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा ९४ वा जन्मदिवस आहे. मुंबईतल्या यहुदी कुटुंबात जन्मलेल्या इजेकिल यांना १९८३ मधे साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. 

१९४७ मधे मुंबईच्या एका कॉलेजमधून लिटरेचरमधे बीए केल्यानंतर ते लंडनला गेले. तिथं त्यांनी तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेतलं. १९५२ मधेच त्यांचा ‘टाइम टू चेंज’ हा पहिला कवितासंग्रह आला. त्यांची कविता प्रेम, एकाकीपण, वासना आणि सर्जनशीलता या सगळ्यांविषयी बोलते. सिक्सटी पोयम्स, द डिस्कवरी ऑफ इंडिया, द अनफिनिश्ड मेन हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत. १९८८ मधे पद्मश्रीने सन्मानित इजेकिल यांचं ९ जानेवारी २००४ ला निधन झालं.

नाटककार बबन प्रभू (जन्म १९२९)

लोकप्रिय विनोदी अॅक्टर, नाटककार बबन प्रभू यांनी मराठी रंगभूमीवर फार्स अर्थात प्रहसन नाट्यप्रकार रुजवला. साजबा विनायक प्रभू हे त्यांचं मूळ नाव. दूरदर्शनचं मुंबई केंद्र सुरू झालं तेव्हा बबन प्रभू यांनी आपल्या गमतीदार विनोदी गोष्टींनी लोकांना खळाळून हसवलं. याकूब सईद यांच्यासोबतचा हास परिहास हा त्यांचा कार्यक्रम खूप गाजला.

‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’, ‘माकड आणि पाचर’, ‘घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. आजही मराठी नाट्य रसिकाला प्रहसन नाट्य म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते बबन प्रभू यांचं. लोकांना खळाळून हसवणाऱ्या या कलावंताचं १९८१ मधे निधन झालं.

सर्कस सम्राट बंडोपंत देवल (निधन २०००) 

सर्कस हा मनोरंजनाचा पाश्चात्य कलाप्रकार आहे. ब्रिटीशांच्या आगमनासोबतच या सर्कशी भारतातही आल्या. या सर्कशीच भारतीयीकरण करणाऱ्यांमधे आघाडीवर होते, काशिनाथ सखाराम उर्फ बंडोपंत देवल. विष्णुपंत छत्रे हे भारतातले आद्य सर्कसचालक आहेत. त्यांच्या सर्कशीत नाव कमवलेल्या देवल बंधुंनी १८९५ मधे आपली स्वतंत्र ‘देवल सर्कस’ काढली. शारीरिक कसरतींसोबतच पशूप्राण्यांच्या कौशल्याचं सादरीकरण हे या सर्कसची वैशिष्टय होतं. या सर्कशीला खूप लोकप्रियता मिळाली. 

‘ग्रेट इंडियन सर्कस’ नावाने प्रसिद्ध असलेली देवल बंधुंची ही सर्कस कंपनी १९५७ मधे बंद पडली. सर्कशीतले बेस्ट जोकर अशी ख्याती मिळवलेल्या बंडोपंत देवल यांचा ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. जवळपास ४० वर्ष नवनव्या चित्तथरारक खेळ आणि कसरतींनी देवल सर्कसने जगभरात नावलौकिक मिळवला. वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज इथं बंडोपंत देवल यांचं निधन झालं.

ज्योती आमगे (जन्म १९९३)

जगातली सगळ्यांत कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांचा आज २५ वा बड्डे आहे. वयाच्या ५ व्या वर्षीच ज्योतीला एकॉन्ड्रोप्लेसिया हा हाडाशी संबंधित आजार असल्याचं निदान झालं. बुटकेपणावरून लोकांनी तिला लहानपणी खूप टोमणे मारले. पण ज्योतीने लोकांच्या या प्रतिक्रियांना फाट्यावर मारत आत्मविश्वास मिळवला. एवढंच नाही तर सिनेमात काम करण्याचं स्वप्नही पूर्ण केलं.

२०११ मधे वाढदिवसादिवशी दिला खूप मोठं गिफ्ट मिळालं. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमधे तिच्या बुटकेपणाची नोंद झाली. नागपुरात जन्मलेल्या ६३ सेंटीमीटर उंचीच्या ज्योतीला आता राजकारणात उतरायचंय. त्यासाठी तिनं अपक्ष उमेदवार म्हणून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. ज्योतीने काही हिंदी सिनेमांसोबतच बिग बॉसच्या सहाव्या सिझनमधेही काम केलंय. याशिवाय अमेरिकतल्या 'फ्रेक शो' या हॉरर टीवी शोमधेही काम केलंय.

निर्भया बलात्कार प्रकरण (घटना २०१२)

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातली निर्णायक घटना म्हणजे दिल्लीतलं निर्भया बलात्कार प्रकरण. आजच्या दिवशी २३ वर्षांच्या एका विद्यार्थीनीवर सहाजणांनी धावत्या बसमधे सामूहिक बलात्कार केला. बलात्काऱ्यांनी बेशुद्ध पडलेल्या मुलीला नग्नावस्थेतच रस्त्यावर फेकून दिलं. मानवतेला काळिमा फासणाऱ्या दिल्लीतल्या या घटनेने भारतासोबत अख्या दुनियेला हादरवून सोडलं.

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला. देशभरात आंदोलनाचा भडका उडाला. लोकांतला असंतोष बघून सरकारने पीडित निर्भयाला उपचारासाठी सिंगापूरला पाठवलं. पण तिथं २९ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. २०१४ च्या निवडणुकीतल्या सत्ताबदलाला अण्णा आंदोलनाने पोषक वातावरण तयार केलं. या आंदोलनाच्या अजेंड्यावरही निर्भया बलात्कार प्रकरणाचा मुद्दा होता. आज या घटनेला सहा वर्ष झाली. कोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने कायदा अधिक कठोर केला. पीडितेला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. पण आजही रोज पेपरात बलात्काराची बातमी सापडते. पीडितेच्या वेदना सापडतात.