१३ डिसेंबरः आजचा इतिहास 

१३ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज १३ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.

मराठी इंग्रज थॉमस कँडी (जन्म १८०४) 

एकोणिसाव्या शतकात मराठी भाषा पद्याकडून गद्याकडे, मोडीतून नागरीकडे आधुनिक वळण घेत होती, तेव्हा तिच्या या घडणीवर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्यांपैकी एक भाषातज्ञ म्हणजे मेजर थॉमस कँडी. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत भारतीय भाषांचं प्राथमिक शिक्षण घेऊन ते जुळा भाऊ जॉर्जसह १९२२ला भारतात आले. ते ईस्ट इंडिया कंपनीत कामाला लागले. दोन्ही भावांनी कॅप्टन जेम्स मोल्सवर्थचा इंग्रजी मराठी शब्दकोश तयार करण्यात योगदान दिलं. शिवाय मोल्सवर्थ इंग्लंडला परतल्यावर ते काम पूर्णही केलं. ज़ॉर्ज धर्मप्रचारक बनून परतले तरी थॉमस मात्र शेवटपर्यंत महाराष्ट्रातच राहिले. सरकारी नोकरीत दुभाषापासून मुख्य मराठी भाषांतरकार या पदापर्यंत त्यांनी बढती मिळवली. त्याचवेळेस अनेक पुस्तकांचं भाषांतर केलं. भाषांतरांना मदत आणि मार्गदर्शन केलं. मराठी पाठ्यपुस्तकं तयार केली. इंडियन पीनल कोड आणि इंडियन सिविल प्रोसिजर कोड यांची मराठी भाषांतरंही त्यांचीच. त्यांचं मराठीला सर्वात मोठं योगदान दिलं ते विरामचिन्हांचं. आज आपण मराठीत इंग्रजी विरामचिन्ह वापरतो, त्याचे नियम मेजर थॉमस कँडी यांनीच घालून दिलेत. 


खरे विकासपुरुष तात्यासाहेब कोरे (निधन १९९४) 

एखाद्या गावाचा विकास करून समाजसुधारक म्हणून मिरवणारे आपल्या राज्यात अनेकजण आहेत. त्याचवेळेस ७० अभावग्रस्त गावांच्या आमूलाग्र विकासाचं वारणा मॉडेल मात्र दुर्लक्षितच राहिलं. वारणा उद्योगसमूहाचे प्रणेते तात्यासाहेब कोरे यांचा आज स्मृतिदिन. तात्त्यासाहेबांची कोल्हापूर शहरातली लाकडाची वखार स्वातंत्र्यसैनिकांचं केंद्र होती. प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांचं हक्काचं आश्रयस्थान होती. स्वतः तात्यासाहेबही स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर होतेच. कोल्हापूरच्या प्रजापरिषदेचे ते उपाध्यक्ष होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते यशवंतराव चव्हाणांचे विश्वासू सहकारी बनले. वारणेच्या खोऱ्यात तेव्हा दहा टक्के लोकांनाही सिंचनाची सुविधा नव्हती. अशा कोरडवाहू गावांचा सहकारी चळवळीतून विकास करण्याचं अशक्यप्राय काम त्यांनी करून दाखवलं. साखर कारखाना, दूध डेअरी, पोल्ट्री फार्म, बँक, ग्राहक बाजार, महिला सोसायटी, बालवर्गापासून इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत अनेक शिक्षणसंस्था आणि गाजलेला लहान मुलांचा ऑर्केस्ट्रा हे त्यांचे उपक्रम खरं तर रोलमॉडेल आहेत. राज्य आणि देशाच्या पातळीवरही त्यांनी सहकारी संस्थांवर काम केलं. 

गोव्याचे सिंघम मनोहर पर्रीकर (जन्म १९५५)

आज मनोहर पर्रीकरांसारख्या रुबाबदार नेत्याचा ६३वा वाढदिवस अशा विकलांग अवस्थेत साजरा करावा लागेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांची इच्छा असो वा नसो त्यांना अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदावर राहावं लागेल, असंही कुणाला वाटलं नव्हतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावं म्हणून गोव्यात उपोषणं, याचिका होतील, असाही विचार कुणी केला नव्हता. पण ते पर्रीकरांसारख्या लोकप्रिय मुख्यमंत्र्‍यांच्या बाबतीत होतंय खरं. कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून त्यांनी स्वतःला आणि भाजपलाही सर्वोच्च स्थानावर पोचवलं. एक आयआयटीयन मुख्यमंत्री बनतो हेच आश्चर्य होतं. मुख्यमंत्रीपदाच्या तीन कार्यकाळात त्यांनी गोव्यात इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे अनेक यशस्वी प्रयत्न केले. अवघे दोन खासदार देणाऱ्या गोव्यासारख्या राज्यातून संरक्षणमंत्री बनण्याचा पराक्रम त्यांनी केला. त्यांच्या साध्या राहणीचे आणि प्रामाणिकपणाची उदाहरणं आजही दिली जातात आणि दिली जातील.  

अभिनय अजरामर स्मिता पाटील (निधन १९८६)


स्मिता पाटीलला जाऊन आज ३२ वर्षं झाली. पण तिच्या चाहत्यांना ते खरं वाटत नाही. त्यांनी तिला मनाच्या हळव्या कोपऱ्यात कायम जिवंत ठेवलंय. ती होतीही तशीच. एक अद्भूत गूढ रेखीव सौंदर्य आपल्याकडे ओढून घ्याचचं. ते सौंदर्य फक्त चेहऱ्याचं नव्हतं. ते तिच्या व्यक्तिमत्त्वाचंच होतं. एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात जन्मून तिने नाटक आणि सिनेमात आपला कायमचा ठसा उमटवला. आणि एकेकाळी दूरदर्शनच्या मराठी न्यूजरिडर म्हणूनही. तिचे स्त्रीवादी पुरोगामी विचार तिला शोभून दिसायचे. अचानक वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी ती गेली. ती आज असती तर तिने केवळ सिनेमातच नाही, तर समाजकारणातही अग्रेसर असती. भूमिका, मंडी, बझार, अर्थ, जैत रे जैत, मिर्च मसाला, अर्धसत्य, निशांत अशा तिच्या किती भूमिका सांगायच्या. ती नसती तर समांतर सिनेमांचा प्रवाह अर्धवटच राहिला असता. कदाचित भारतीय सिनेमाच अपुरा असता. 

अनारी सुपरस्टार व्यंकटेश (जन्म १९६०)

नव्वदच्या दशकात प्रतिबंधमधून चिरंजीवी, शिवामधून नागार्जून अँग्री यंग मॅन बनून साऊथमधून हिंदीत येत होते, तेव्हाच व्यंकटेशही आला. फुलों सा चेहरा तेरा गात हा भोळ्या चेहऱ्याचा हिरो तेलुगूतून हिंदीत आला. एकाच अनारी सिनेमाने देशभर पोचला. त्यानंतर तो हिंदीत फारसा आला नाही. आणखी एखादा तकदीरवाला आला तेवढाच. पण साऊथचे सिनेमे डब होऊन टीवीवर दिसू लागले त्यात तो पुन्हा एकदा त्यांच्या फॅनमधे पोचला. खरं तर तो हिरो बनण्यासाठीच जन्माला आला होता. त्याचे वडील सुरेश प्रोडक्शनचे मालक माजी खासदार रमा नायडू. त्यामुळे तो चाईल्ड आर्टिस्ट म्हणून आला. पण गॅप घेऊन एमबीए झाला. नंतर परतला तो हिट होण्यासाठीच. त्याने साऊथमधे सत्तरच्या वर सिनेमे केलेत. तो आजही सुपरस्टार आहे.